व्याजाच्या पैशाांना तगादा लावल्याने तरुणाची आत्महत्या, चक्रवाढ व्याजाने पैसे वसुल करणाऱ्या सहा सावकारांवर गुन्हा दाखल.!


सह्याद्री सार्वभौम (संगमनेर) :- 

                          संगमनेर शहरालगत असणाऱ्या घुलेवाडी परिसरात एका व्यक्तीच्या पत्नीला कॅन्सर झाल्याने त्याने उपचारासाठी पाच जणांकडून पैसे घेतले. मात्र, ते वेळेत न गेल्याने त्यांनी चक्रवाढ व्याज लावुन पैसे मागण्याचा तगादा लावला त्यांच्याकडून कोरे चेक व स्टँप करून घेतले. जेव्हा लाखो रुपये व्याजात जाऊ लागले.आणि व्यवसाय पार्टनर दगाफटका करू लागला तेव्हा या व्यक्तीने राहत्या घरी किचनरूम मध्ये छताला गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. ही घटना 3 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घुलेवाडी परिसरात घडली. नारायण सखाराम दहे (रा. घुलेवाडी, ता. संगमनेर) असे या मयत व्यक्तीचे नाव आहे. ही आत्महत्या सावकारांच्या कर्जाला कंटाळून केल्याचे चिट्ठीतुन समोर आले आहे. त्यामुळे, मयताच्या मुलाने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून भास्कर फकीरा सातपुते (रा. पावबाकी,सुकेवाडी रोड, ता. संगमनेर), सचिन मधुकर गायकवाड (रा.घुलेवाडी फाटा, ता. संगमनेर), राम उर्फ रामा शिंदे  (रा. शिवाजीनगर,ता. संगमनेर), शिवनाथ आव्हाड (रा.मालदाड रोड, ता. संगमनेर), अनिल मंडलीक (रा.रायतेवाडी, ता. संगमनेर),  शुभम हासे (रा. चिखली, ता. संगमनेर) यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच यांना तात्काळ बेड्या ठोकण्यात आल्या. याचा पुढील तपास पोलीस करत आहे.

        याबाबत सविस्तर माहिती अशी की, अक्षय नारायण दहे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नारायण दहे हे डेन्टलकॉलेज जवळ घुलेवाडी परिसरात राहतात. त्यांचा मसाल्याचा व्यवसाय होता. मुलगा व सुन हे दोघे ही खाजगी कंपनीत काम करत होते. मात्र, पत्नीला कॅन्सर झाल्याने मयत नारायण दहे हे काटकसरीने घर चालवत होते. कॅन्सर आजरामुळे त्यांनी काही लोकांकडून व्याजाने पैसे घेतले होते. घरात काटकसर करून घेतलेल्या पैश्यांची परत फेड ते हळूहळू करत होते. दि. 3 ऑगस्ट 2026 रोजी मयत नारायण दहे यांचा मुलगा व सुन कामावर गेले.आणि पत्नी व आई ह्या नातेवाईकांकडे गेल्या. घरात नारायण दहे हे एकटेच होते. चार वाजण्याच्या दरम्यान मयत नारायण दहे यांना सुन फोन करत होती. त्यावेळी नारायण दहे यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे, त्यांनी शेजारी राहणाऱ्या महिलेला फोन केला असता त्यांनी फोन चालू ठेऊन ते घरी गेले. त्यावेळी घराचा दरवाजा अर्धा उघडलेला होता त्यांनी पूर्ण दरवाजा उघडून ते आत गेले.

         दरम्यान, ते आत गेले असता त्यांना घरातील किचन रूम मध्ये सीलिंग फॅनला गळफास घेतलेले नारायण दहे दिसले. त्यांनी फोनवर तात्काळ सांगितले. त्यानंतर मयत नारायण दहे यांचा मुलगा घरी आला. त्यांनी मयत नारायण दहे याना खाली उतरून तात्काळ घुलेवाडी येथील रुग्णालयात नेले. तोपर्यंत फार काळ लोटला होता. डॉक्टरांनी नारायण दहे यांना  मयत असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी अंगझडती घेतली असता मयत नारायण दहे यांच्या खिशात एक चिट्ठी मिळुन आली. यामध्ये अनिल मंडलीक  याने 15 महिन्यांपूर्वी 6 लाख रुपये दिले होते. त्या रकमेच्या व्याजापोटी 3 लाख रुपयांची भिशी चालू केली. त्यासाठी दरमहिना 20 हजार रुपये हप्ता घेत होता. ऑगस्ट 2025 पर्यंत 6 लाख रुपये फेडले तरी तो रकमेच्या व्याजापोटी 20 हजार रुपये मागणी करत होता. मागील व्यवहार पूर्ण झाल्याने अनिल मंडलीक याच्याकडून पुन्हा 5 लाख रुपये नारायण दहे यांनी घेतले. त्या व्याजापोटी त्याने पुन्हा दुसरी भिशी काढून दिली व दरमहा 25 हजार रुपये व्याज मागणी करत होता. त्यानंतर नारायण दहे यांच्याकडे 20 लाख रुपये चक्रवाढ व्याजाप्रमाणे होत असल्याचे आरोपी अनिल मंडलीक यांनी सांगितले. त्यानंतर  कोरे चेक व स्टँप पेपर करून घेतले. त्यानंतर आरोपी सचिन गायकवाड यांनी देखील 7 लाख रुपये नारायण दहे याना दिले होते. त्याची त्यांनी 12 लाख रुपयांची उसनवारी पावती करून घेतली. तो वारंवार पैश्याची मागणी करत होता त्यावेळी सचिन गायकवाड यांनी कोरे चेक घेतले.

         आरोपी रामा शिंदे व शिवनाथ आव्हाड यांनी नारायण दहे यांना 3.5 लाख रुपये दिले. त्यापैकी 6 लाख रुपये व्याजाची मागणी करत होते. शुभम हासे याने देखील काही रक्कम दिली होती तो 2 लाखांची मागणी करत होता. आरोपी शुभम हासे याने घरी जाऊन दमदाटी करून पैश्याची मागणी करत होता. आरोपी भास्कर सातपुते यांच्यासोबत मयत नारायण दहे यांचा एकत्रित व्यवसाय होता. 13 लाख 47 हजार रुपयांचा कागद भास्कर सातपुते यांनी केला होता. त्यांनी वेळेत मशीन न दिल्याने व्यवसायात मोठा तोटा झाला. एककीकडे पत्नीच्या कॅन्सर आजाराने त्रस्त असताना दुसरीकडे पैश्याना मोठ्या प्रमाणात व्याज लावुन पैश्यांचा वारंवार तगादा लावला. त्यामुळे, ह्या सर्व वेदना मयत नारायण दहे यांच्या विचारांत वारंवार येत असाव्या. त्यांनी 3 ऑगस्ट 2026 रोजी घरी कोणी नसताना टोकाचे पाऊल उचलले. घरातील किचन रूम मध्ये सीलिंग फॅनला दोरी बांधून गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. त्यापूर्वी त्यांनी एक चिट्ठी लिहून ठेवली. त्यातून ही आत्महत्या सावकारांच्या कर्जाला कंटाळून केल्याचे समोर आले आहे.