पोलिसांच्या ताब्यात असताना गुंजाळला बुक्क्यांचा प्रसाद, आमदारांच्या कार्यकर्त्यांचा उन्माद.! पोलिसांच्या अकार्यक्षमतेचे दर्शन.!
सह्याद्री सार्वभौम (संगमनेर) :-
आ. अमोल खताळ यांच्यावर हल्ला करणाऱ्या प्रसाद गुंजाळ हा पोलिसांच्या ताब्यात असताना आ.खताळ यांच्या कार्यकर्त्यांने त्याच्यावर हात उचलुन डाव्या डोळ्यावर बुका मारून व गालावर चापटी मारून दुखापत करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना घडली. हा सर्व प्रकार काल सोमवार दि.31 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या दरम्यान घडला. यात प्रसाद आप्पासाहेब गुंजाळ याच्या तक्रारीवरून संदेश बाळासाहेब देशमुख (रा.राजापूर, ता. संगमनेर) याच्याविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या ताब्यात असताना देखील आमदारांच्या कार्यकर्त्यांकडुन गंभीर मारहाण होत असल्याने हा तालुक्यात चर्चेचा विषय बनला असुन आमदारांनी कार्यकर्त्यांना वेळीच समज द्यावी आशा देखील प्रतिक्रीया उमटत आहे. तर पोलिसांच्या कायदा सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडाल्या आहे. स्वतः पोलीस निरीक्षक समीर बारवकर हे असताना देखील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल तर हे पोलिसांचे अपयश आहे. लोकप्रतिनिधीवर सोशल मीडियावर गरळ ओकून तो मंदिर परिसरातच फिरत होता. तरी पोलिसांनी तात्काळ ताब्यात का घेतले नाही? की, पुन्हा हल्ला होण्याची पोलीस वाट पाहत होते का? असा प्रश्न देखील उपस्थित होऊ लागला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, प्रसाद गुंजाळ हा खांडगाव परिसरात राहतो. गावात महादेव मंदिराचे श्रद्धा स्थान असल्याने अनेकजण दर्शनासाठी येत असतात. प्रसाद गुंजाळ हा देखील श्रावण महिन्यात पाणी वाहून दर्शन घेण्यासाठी जात असतो. तिसऱ्या सोमवारी देखील प्रसाद गुंजाळ हा महादेवाचे दर्शन घेण्यासाठी सकाळी 10 वा. आला. तो दर्शन करून मंदिराच्या गाभार्याच्या बाहेरील पटांगणात बसलेला होता. तेव्हा तेथे पोलीस निरीक्षक समीर बारवकर व काही पोलीस आले. तेथे आमदार अमोल खताळ हे दर्शनासाठी येणार असल्याने त्यांनी प्रसाद गुंजाळ याला मंदिराच्या पटांगणातून बाहेर घेऊन आले. तेव्हा प्रसाद गुंजाळ याला पोलीस ना. सातपुते व पोलीस कॉ. आगलावे यांच्या ताब्यात दिले. पोलीस प्रसाद गुंजाळला पोलीस गाडीकडे घेऊन चाले होते.
दरम्यान, पोलीस प्रसाद गुंजाळला घेऊन जात असताना समोरून आमदारांचा कार्यकर्ता संदेश देशमुख हा आला. त्याने कुठलेही कारण नसताना प्रसाद गुंजाळ याच्या डाव्या डोळ्यावर बुका मारून उजव्या गालावर दोन तीन चापटी मारून दुखापत करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर शेजारी असणाऱ्या पोलिसांनी ही झटापटी सोडवून प्रसाद गुंजाळ याला पोलीस गाडीत बसवुन पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर प्रसाद गुंजाळ याला मारहाण झाल्याने त्याला घुलेवाडी येथे नेऊन वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर प्रसाद गुंजाळ याच्या तक्रारी वरून संदेश बाळासाहेब देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोपनीय विभाग करतोय काय.?
खरंतर आ. अमोल खताळ हे श्रावणी तिसऱ्या सोमवारी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या महादेवाचे दर्शन घेण्यासाठी जाणार होते. तेथे भाविकांना भेटणार होते हे सर्व पोलिसांना माहीत असताना तेथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न कसा निर्माण होतो? पोलिसांना लोकप्रतिनिधीवरील हल्लेखोरांचे गाव, नाव माहीत असताना तो त्या परिसरात कसा फिरतो? जो हल्लेखोर वारंवार सोशल मीडियातून गरळ ओकत आहे. त्याच्यावर चार दिवसांपूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई केली. तरी देखील तो आमदार अमोल खताळ येत असताना त्याच परिसरातच बसत असल्याने पुन्हा लोकप्रतिनिधीवर हल्ला होण्याची पोलीस वाट पाहत होते का? त्यामुळे, वर्दीच्या डोळ्यासमोर हल्ले होतात आणि कारवाई होत नाही. मग पोलीस करतात तरी काय.? एक वर्षांपूर्वी याच प्रसाद गुंजाळ या तरुणाने आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला केला होता. तेव्हा परिस्थिती हाताबाहेर गेली होती. अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्यासह शेकडो पोलिसांनी सौम्य पध्दतीने परिस्थिती हाताळली. त्यानंतर आंदोलने झाली. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे स्वतः आंदोलन स्थळी आले. त्यांनी कारवाईची मागणी केली. हे सर्व पोलीस प्रशासनाला माहीत असताना पुन्हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर येतो यामध्ये सर्वधिक अपयश कोणाचे असेल तर पोलिसांचे असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, आमदार अमोल खताळ आणि प्रसाद गुंजाळ यांच्यातील वाद हा संगमनेर तालुक्यापुरता मर्यादीत राहिलेला नाही. याबाबत विधानसभेच हा मुद्दा चर्चेला होता आणि महाराष्ट्राच्या मीडियाने या घटनेची दखल घेतली होती. हे प्रकरण फक्त मारामारी आणि हल्ला यावरच थांबले नाही तर सोशल मीडियावर यांच्यात शितयुद्ध आजही सुरु आहे. खुद्द अमोल खताळ नाही पण त्यांचे कार्यकर्ते आणि गुंजाळ यांच्यातील व्हायरल पोष्टमुळे हा मुद्दा किती संवेदनशिल आहे हे संपुर्ण तालुक्याला माहिती आहे. मुळात प्रसाद गुंजाळ हा काही साव नाही, त्याने शेअर मार्केटच्या माध्यमातून अनेकांचे कुटुंब उध्वस्त केल्याच्या तक्रारी असल्याचे मत पोलिसांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे, त्याच्याबद्दल समाजात फार काही चांगली धारणा आहे असे बिल्कुल नाही. मात्र, तरी देखील त्याचे देव दर्शनाला येणे आणि त्याच वेळी आ. खताळ तेथे जाणे हा योगायोग म्हणावा की पुर्वनियोजन.... याबाबत पोलीस अनभिज्ञ आहेत. मात्र एका सत्तेतील आमदारावर त्या परिसरात हल्ला होऊ शकतो हे पोलिसांना माहित नसावे म्हणजे ही खेदाची आणि दुर्दैवी बाब आहे. कारण गुंजाळ याच परिसरात राहतो हे माहित असताना देखील तेथे कोणतीही उपायोजना नसावी हे म्हणजे पोलिसांनी नेमकी कोणता प्रसाद खाल्लाय याबाबत शंकेला वाव निर्माण होते.
आता यात आणखी एक प्रश्न प्रकर्षाने निर्माण होतो. की, गुंजाळ आणि आमदार एकाच वेळी आले कसे.? आले तरी पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी गुंजाळला तात्पुरते ताब्यात घेतले असेल. तर, पोलीस असताना त्याच्यावर हल्ला होतो म्हणजे संगमनेरात मोगलाई माजली आहे का.? की पोलिसांच्या समोर आम्ही कोणालाही मारु, दहशत निर्माण करु, कोणाचेही थोबाड फोडू किंवा फिल्मि स्टाईलने वर्दी समोर हाणामाऱ्या करु आमचे कोणी काही उखडत नाही असा संदेश द्यायचा आहे का.? की, आम्ही वर्दीच्या आशिर्वादाने काहीही करु शकतो, आम्हाला भय नाही असा संदेश द्यायचा आहे? की, संगमनेरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न राहिलाच नाही, पोलिसांचा धाक राहिला नाही असे प्रतित करायचे आहे? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उनुत्तरीत राहतात. शहरात चोऱ्या घरफोड्या होतात, लुटमार होते, दरोडे पडतात तरी त्यातील चोर मिळत नाहीत. त्यामुळे नागरिकांचा वर्दीवरील विश्वास डळमळीत होत चालला असून खुद्द आमदारांवर हल्ले होऊ शकतात तर आपण किस झाड कि पत्ती ? असे संगमनेरकरांना वाटू लागले असून इथे प्रत्येकाला असुरक्षिततेची भावना वाटू लागल्याची चर्चा सुज्ञ नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे, पोलिसांनी आपल्या कार्यकक्षा वृंदावून नागरिकांना सुरक्षित वाटेल असे काम करावे अशी अपेक्षा सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केली आहे.
