अखेर PSI श्रीकांत सावंत नियंत्रण कक्षेत जमा, निलंबन की बडतर्फ लवकर फैसला, सार्वभौमच्या पाठपुराव्याला यश.!

 

सह्याद्री सार्वभौम:- 

                    संगमनेर शहरातील सर्वात वादग्रस्त ठरलेले पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांची अखेर नगरच्या नियंत्रण कक्षेत बदली करण्यात आली आहे. ड्रग्ज प्रकरण, अल्पवयीन मुलास अटक, आरोपींना चटके देणे आसे विविध आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहे. या घटनांची चौकशी चालु असून चौकशीअंती त्यांच्यावर निलंबनाची किंवा बडतर्फीची टांगती तलवार असणार आहे. सावंत यांच्या बदलीबाबत पोलीस अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी या कारवाईबाबत दुजोरा दिला आहे. पीएसआय श्रीकांत सावंत यांच्या अनेक कारणाम्यांवर रोखठोक सार्वभौमने आवाज उठविला होता, त्यांच्या कुकर्मावर सलग सात मालिका लिहिल्या होत्या, यात अल्पवयीन मुलास आरोपी करणे आणि ड्रग्ज प्रकरणात खोटी करावाई करुन निरापराध व्यक्तीला जेलमध्ये टाकणे यावर परखड लिखाण केले होते. त्यामुळे, माध्यमांच्या रेट्यामुळे पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांनी ही कारवाई केली आहे. या कारवाईमुळे संगमनेर शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून अति तेथे माती होते आशा प्रकारच्या प्रतिक्रिया सोशल मीडियात उमटू लागल्या आहेत. ज्या पोलीस अधिकाऱ्याच्या विरोधात कोणी लिहिण्याचे धाडस कोणी करत नव्हते, अशा वेळी सावंत यांची फोफावत चाललेली दहशत रोखठोक सार्वभौमने मोडीत काढल्याच्या प्रतिक्रीया पहायला मिळाल्या आहेत.

       याबाबत सविस्तर माहिती अशी. की, संगमनेर शहर पोलीस ठाण्यात कधी नव्हे इतका उन्माद पहायला मिळू लागला होता, चुकीच्या कारवाया, अर्थपुर्ण तडजोडी, आरोपींवर हल्ले, पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुरघोडी, अनेकांना दुटप्पी वागणूक आणि बरेच काही घडताना दिसत होते. असा सगळा भोंगळा कारभार असताना देखील हम किसीसे डरते नही, हम यहॉं के किंग, हमारा कोई कुछ उखाड नही सकता अशा प्रकरचा अविर्भाव काही अधिकाऱ्यांमध्ये निर्माण झाला होता. मात्र, जेव्हा-जेव्हा या सुसंस्कृत संगमनेरात अताताईपणा झाला आहे, अधिकाऱ्यांनी उन्माद केला आहे. तेव्हा येथील जनता आणि मीडियाने त्यांना घरचा रस्ता दाखविला आहे. त्याच प्रमाणे आता पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांना देखील संगमनेरातून काढून दिल्याचे पहायला मिळत आहे. यापुर्वी संगमनेरात देशमुख म्हणून अधिकारी होते, त्यांनी शहर पोलीस ठाणे चालविताना हम करे सो कायदा अशी भुमिका घेतली होती, तेव्हा त्यांच्या विरोधात रोखठोक सार्वभौम आणि संगमनेरकर एकवटले होते. नंतरच्या काळात त्यांना देखील बदलीला सामोरे जावे लागले होते. सेम तिच परिस्थिती सावंत यांच्याबाबत पहायला मिळाली होती. एव्हाना सावंत यांचे कारणामे दुय्यम अधिकारी असून देखील फार भयानक होते. त्यामुळे, येथील जनता त्यांना प्रचंड वैतागली होती. आज सावंत यांची बदली झाल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे.

               नेमकी काय प्रकरण होते.!

      पीएसआय श्रीकांत सावंत यांनी संगमनेर बस स्थानकावर ड्रग्ज ची कारवाई केली होती. मात्र ती नैसर्गिक कारवाई नसून चक्क तीन व्यक्तींशी सलगी करुन बनावट सापळा रचला आणि एका निरापराध व्यक्तीला अटक केली होती. हा सर्व प्रकार सीसीटिव्हीत कैद झाला होता.  मात्र, तरी देखील सावंत यांनी ही कारवाई बस स्थानकावर नव्हे तर पोलीस ठाण्यात केली असे फिर्यादीत दाखविले होते. ज्या स्कुटी गाडीतून ड्रग्ज जप्त केले ती गाडी देखील सीसीटिव्हीत दिसत असून सावंत त्या गाडीतून ड्रग्ज काढताना दिसत आहे.  असे असताना खोटी फिर्याद घेऊन संबंधित पिवळ्या स्कुटी गाडीतून काहीच जप्त केला नाही, किंवा काहीच मिळून आले नाही असे नमुद केले आहे. त्याहून भयानक म्हणजे ज्या तीन व्यक्तींनी मिळून हा कट रचला, त्यांच्याशी देखील सावंत सलगी करताना दिसत आहेत, कारवाई बस स्थानकावर केली हे सीसीटिव्हीत दिसत असताना पंचनामा मात्र, पोलीस ठाण्यात केल्याचे फिर्यादीत दाखविण्यात आले आहे. जे पोलीस कारवाईत नव्हते त्यांना बळजबरी कारवाईत दाखविल्याचे देखील त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे, खोटी फिर्याद देवून बनावट गुन्हा नोंदविला आणि कायद्याचा, अधिकाराचा व आपल्या वर्दीचा दुरुपयोग केल्याचा आरोप सावंत यांच्यावर करण्यात आला होता. त्यानंतर त्यांची संगमनेर शहर पोलीस ठाण्यातून बदली करण्यात आली आहे.

             आता पुढे निलंबन की बडतर्फ.!

       पीएसआय श्रीकांत सावंत यांच्यावर विविध प्रकारचे आरोप ठेवण्यात आले आहेत. त्यात महत्वाचे म्हणेज ड्रग्ज प्रकरणाचा खोटा गुन्हा दाखल करुन खोटा तपास केल्याचे निष्पन्न होऊ लागले आहे. त्यामुळे, या ड्रग्ज प्रकरणाचा तपास आता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. यात सावंत हे हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत होते. दुसरी गोष्ट म्हणजे ड्रग्ज प्रकरणात सावंत यांच्या विरुद्ध तक्रार अर्ज दाखल करण्यात आला होता. त्याचा तपास देखील सुरु आहे, चौकशी करताना सावंत यांनी दबावतंत्राचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला. घटनेची चौकशी, गुन्ह्याचा तपास हा निर्पेक्ष व्हावा यासाठी सावंत यांच्यामुळे काही पुरावे नष्ट होऊ नये, त्यांनी कोणावर दबाव टाकू नये म्हणून पीएसआय सावंत यांची नियंत्रण कक्षेत बदली करण्यात आली आहे. आता बदली ही तात्पुत्या स्वरुपाची कारवाई आहे. मात्र, या ड्रग्ज प्रकरणात किंवा अल्पवयीन आरोपी अटक प्रकरणात जर सावंत दोषी आढळले. तर, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होऊ शकते. किंवा जर त्यांनी आरोपींना हाताशी धरुन खोटा गुन्हा दाखल केला असेल, त्यांनी अधिकारी असण्याचा गैरफायदा घेतला असेल, आपल्या पदाचा गैरवापर केला असेल तर त्यांना पोलीस खात्यातून बडतर्फ देखील करण्यात येऊ शकते. यात जर सखोल आणि निर्पेक्ष चौकशी झाली, चौकशी यंत्रणा फितूर झाली नाही, अधिकारी राजकीय किंवा अर्थपुर्ण यंत्रणेला बळी पडले नाही. तर मात्र श्रीकांत सावंत यांच्यावर बडतर्फीची कारवाई निश्चित आहे. याचे कारण म्हणजे सीसीटिव्ही आणि बनावट फिर्याद यात जमीन आसमानचा फारक आहे. भलेही त्यांचा ड्रग्ज ठेवण्यात, आरोपींशी संगनमत यात हात नसेल. पण, कारवाई कोठे केली अन कोठे दाखविली,  फिर्याद घेतली कशी व कोठे आणि सीसीटिव्हीत वास्तव काय दिसते. याहून देव जरी खाली आला तरी तो म्हणेल हे सर्व खोटं केलं आहे, तुला शिक्षा भोगावी लागेल. पण, आजकाल सरकारी यंत्रणा देवापेक्षा स्वत:ला मोठी भासू लागली आहे. त्यामुळे, सावंतांना वर्दी आश्रय मिळाला तर नवल वाटायला नको.! तुर्तास आता निलंबन होतय की बडतर्फ केले जाते याकडे संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

                 सावंताच्या विरोधात तक्रारींचा डोंगर.!

जोर्वे येथील तरुण शेतकऱ्याला 29 डिसेंबर 2025 रोजी मारहाण केली अशी पहिली पोलीस उपनिरीक्षक सावंत व टिमची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करण्यात आली. तेथून पुढे देखील पोलीस उपनिरीक्षक सावंत यांची वाटचाल वादग्रस्त राहिली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक सावंत यांच्याकडे यापुर्वी गुन्हा रजि. नं ९७८/२००५ मध्ये अबरार रऊफ शेख याला पोलीस उपनिरिक्षक श्रीकांत सावंत यांच्या हालगर्जीपणामुळे जामीन झाला होता. त्यामधील गुन्ह्यातील आरोपीला डिफॉल्ट बेल झाला. त्यावरून पोलीस अधीक्षक यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली. शहरालगत असणाऱ्या काही आरोपी तरुणांना पकडण्यात आले. त्यांना अमानुष मारहाण करून चटके देण्यात आले. त्यानंतर न्यायाधीशांसमोर आरोपींनी कैफियत मांडली. त्याची गंभीर दखल घेत कोर्टाने आरोपींना निजीकक्षेमध्ये जबाब नोंदवले. त्यावेळी आरोपींची बाजु प्रकर्षाने ऍड. सुशांत कवडे यांनी कोर्टापुढे मांडली. त्यावेळी तात्काळ आरोपींचे मेडिकल करण्याचे आदेश देण्यात आले. आता हा विषय प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश अहिल्यानगर यांच्या समोर सुरू आहे. तेथे देखील पोलीस उपनिरीक्षक सावंत यांचे नाव चर्चेत आले. त्यानंतर अॅड. के.डी. दारोळे, रवि शेळके व अॅड. सागर शिंदे यांनी एका अल्पवयीन मुलास बेकायदेशीर अटक केल्याबाबत न्यायालयात तक्रार केली, ते प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ठ आहे. आता तर ड्रग्ज प्रकरणात कासिफ कुरेशी यांच्या कुटुंबाने गंभीर आरोप केले आहे. दि.०२ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२ ते रात्री ८. वा. पर्यत गुलाम फरीद, तौसिफ कुरेशी व इम्रान सौदागर व पीएसआय श्रीकांत सावंत यांनी त्यांच्या मोबाईल  किंवा फोनच्या व्हॉटसअपद्वारे एकमेकांशी किती वेळा संपर्क केलेला आहे त्याबाबत त्यांचे CDR व कॉल रेकॉर्ड डाटा तपासण्यात यावा अशी मागणी अॅड. शरीफ पठाण यांनी केली,  एका निरापराधी व्यक्तीच्या पाठीशी पठाण खंबीरपणे उभे राहिले. त्यांनी PSI सावंत यांचेवर तसेच इमरान सौदागर, तौसिफ कुरेशी, गुलाम फरीद यांचेवर गुन्हे दाखल करण्यात यावे आणि आम्हाला नुकसान भरपाई मिळावी अशा महत्वाच्या मागण्या करुन तक्रार केली आहे. त्यामुळे, या चौकशीत पोलीस उपनिरीक्षक सावंत यांची उचलबांगडी झाली असुन पुढे ते दोषी आढळतात की, नाही हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरले आहे.

               आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे.!

         पोलीस ठाण्यात अधिकारी खाक्या वर्दीत येतात आणि जातात, त्यांनी आपल्या स्वभावाचा किंवा कार्यकर्तुत्वाचा ठसा जनतेत आणि पोलीस ठाण्यात कायम उमटून ठेवलेला असतो. पण, यात सावंत हे एकमेव अधिकारी असतील की त्यांची बदली व्हावी, त्यांच्यावर वरिष्ठांनी कारवाई करावी यासाठी कर्मचाऱ्यांनी देव पाण्यात ठेवले होते. अर्थात का? तर सदैव दुजाभव करणे, अधिकाऱ्यांचे कान भरणे, दुय्यम वागणूक देणे, फक्त मोजक्या व्यक्तींवर उदार होणे अशा अनेक प्रकारच्या वागणुकीने लाभार्थी सोडले तर सर्व पोलीस ठाणे नाराज होते असे बोलले जात आहे. इतकेच का.! पोलीस ठाण्याच्या व्यतिरिक्त संगमनेर शहरातील जनता देखील सावंत यांच्याबाबत प्रचंड नाराज होती,  त्यांच्या अतिरेकापुढे अनेकांनी हात जोडले होते. या व्यतिरिक्त आरोपींवर वचक नक्की असला पाहिजे मात्र, त्यांची लुटमार होता कामा नये.! असे अनेक आरोप सावंत यांच्यावर होताना दिसत आहे. एकंदर अधिकारी चांगला असला तरी त्यांच्या कर्तुत्वामागे एक दुसरी बाजू देखील असते. ती दुसरी बाजू सार्वभौमने सदैव जनतेसमोर आणली आहे. त्यामुळे, काही लाभार्थी व चाटुगिरी करणारे लोक म्हणतात आम्ही पोलिसांच्या विरोधात लिहितोय, पण चुकीला चुक म्हणायची दानत सार्वभौमने कायम ठेवली आहे आणि पुढेही ठेवत राहू....एकंदर पीएसआय सावंत चुकीचे नसते तर कारवाई झाली नसती. त्यामुळे, भविष्यात त्यांनी केलेल्या चुकीच्या कामामुळे त्यांना काय काय भोगावे लागते किंवा कोणकोणत्या कारवाईला सामोरे जावे लागते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. तुर्तास सावंत यांच्यावर झालेल्या कारवाईमुळे संपुर्ण पोलीस ठाण्यात व शहरात आनंदी आनंद गडे असेच वातावरण दिसते आहे.