पोलिसांनो.! आम्ली पदार्थांबाबत आ. खताळांची तळमळ व्यर्थ जाता कामा नये.! आता तरी तपासात शहाणपण येऊद्या.!
सह्याद्री संगमनेर :-
संगमनेर शहरात पोलिसांनी आम्ली पदार्थांवर पुन्हा एकदा कारवाई केली याचे शंभर टक्के कौतुक केले पाहिजे. मात्र, या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांकडून हालगर्जीपणा होताना दिसत आहे. याचे कारण म्हणजे दरोड्याच्या तयारीत असणारे आरोपी पाच ते सहा महिने जेलमध्ये राहतात, त्यांना जामीन होत नाही. मात्र, शहर पोलिसांच्या कृपादृष्टीमुळे विद्यार्थ्यांचे आणि तरुणांचे आयुष्य बरबाद करणाऱ्या आम्ली पदार्थांच्या गुन्ह्यात दोन महिन्यात डिफॉल्ट जामीन होतो ही घटना बाकी दुर्दैवी आहे. कारण, यापुर्वी गुन्हा रजि. नं ९७८/२००५ मध्ये अबरार रऊफ शेख याला पोलीस उपनिरिक्षक श्रीकांत सावंत यांच्या हालगर्जीपणामुळे जामीन झाला होता. जर, आरोपींना दोषारोपपत्राच्या माध्यमातून कठोर शिक्षा होणार नसेल पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याशिवाय राहणार नाही. विशेष म्हणजे संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल खताळ पाटील यांनी त्यांच्या मतदारसंघातील आम्ली पदार्थ यावर विधानसभेत आवाज उठविला होता. त्यानुसार करावाई सुरु झाली. मात्र, आरोपींच्या मुसक्या आवळताना पोलीस अधिकारी कामात हालगर्जीपणा करीत असतील, तपासात दिरंगाई करत असतील तर कारवाई करुन तरी उपयोग काय? म्हणून यापुर्वी पोलीस अधिक्षक यांनी दि. 18 जून 2026 रोजी पोलीस उपनिरिक्षक श्रीकांत सावंत यांना हालगर्जीपणामुळे कारणे दाखवा नोटीस देखील बजावली होती. आता "पुढच्याला ठेच, मागचा शहाणा" अशी अपेक्षा पोलीस दलाकडून आहे. आमदार अमोल खताळ यांची तळमळ आणि विद्यार्थ्यांचे भविष्य खुद्द पोलिसांच्या हातात असल्याचे बोलले जात आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी. की, संगमनेर शहरातील बसस्थानक परिसरात हाय प्रोफाइल ड्रग्ज विक्री करताना एका तरुणाच्या मुसक्या आवळल्या. या तरुणाकडून तब्बल 39 ग्रॅम ड्रग्ज ताब्यात घेतला असुन 2 लाख 7 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही कारवाई काल गुरुवार दि. 3 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 7:20 वाजण्याचा सुमारास केली. यात कासिफ असद कुरेशी (रा. भारतनगर, संगमनेर शहर, ता.संगमनेर) यास अटक केली आहे. खरंतर, एकीकडे संगमनेर हे शिक्षणाचे माहेर घर होत असताना दुसरीकडे अमली पदार्थांच्या नशेत तरुण पिढी अडकत चाली आहे का? कारण, शहरपोलीस ठाण्याच्या हद्दीत कधी नव्हे 456 किलो गांजा पकडला गेला. त्याच रात्री 33 किलो त्यानंतर पुन्हा फॉर्च्युनर गाडीत ड्रग्ज पकडले गेले. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई होते याचे धागेदोरे शेवट पर्यंत का जात नाही? आरोपी कासिफ कुरेशी हा कोणाकडून ड्रग्ज घेत होता? त्याच्या मागील कर्ताधर्ता कोण याची सखोल चौकशी होऊन त्याच्या मुळाशी जाणे अपेक्षित आहे. आता या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करत आहे.
संगमनेर शहरातील तरुणांकडे कॉलेजच्या मुलांमध्ये ड्रग्ज सेवनात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याची माहिती गोपनीय पोलिसांकडे येत होती. हे ड्रग्ज सेवन करताना तरुण मुले वाम मार्गाला जात आहे. आशा तक्रारी वारंवार पोलीस ठाण्यात येत होत्या. पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांना गोपनीय माहितीद्वारे माहिती मिळाली की, शहरातील बसस्थानक परिसरात सायंकाळी एक तरुण व्हाइट पावडरची विक्री करतो. अशी माहिती पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांना मिळाली. त्यांनी तात्काळ एक पथक तयार करून बसस्थानक परिसरात पाठवले. तेथे पोलिसांनी सापळा रचला आरोपी कासिफ कुरेशी हा नंबर नसलेली पिवळ्या रंगाची दुचाकी गाडीघेऊन येतो. आणि तेथे व्हाइट पावडर विकतो.
दरम्यान, तो गाडीघेऊन बसस्थानक परिसरात आला. त्याची गोपनीय सूत्रांकडुन मिळालेली माहिती, वर्णन हे मिळते जुळते होते. त्याची संशयित नजर पोलिसांच्या लक्षात आली त्याच्याकडे पोलीस चौकशीसाठे गेले असता तो झटापटी करून पळ काढत होता.त्यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करून त्याला संगमनेर शहर पोलीस ठाण्यात आणले. तेव्हा ड्रग्ज संदर्भात विचारले असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. मात्र, खाकी दाखवली असता तो पोपटासारखा बोलू लागला. त्याची पंचासमोर अंगझडती घेतली असता त्याच्या पँटच्या खिशातील उजव्या बाजुस प्लास्टिक पिशवी मिळून आली. तिची पडताळणी केली असता तिचा उग्रवास आला. ते ड्रग्ज असल्याची खात्री झाल्यानंतर अजुन कुठे मुद्देमाल ठेवला आहे का? याची चौकशी केली. या बंद प्लास्टिकच्या पुडी मध्ये 39 ग्रॅम ड्रग्ज 1 लाख 17 हजार रुपयांचा मिळून आला तर दुचाकी देखील पोलिसांनी मुद्देमालात हस्तगत केली असुन कासिफ असद कुरेशी (रा. भारतनगर,संगमनेर शहर, ता.संगमनेर) यांस अटक केली आहे. ही दमदार कामगिरी शहरातील गुन्हे प्रकटीकरण शाखेने केली.
आता तरी शहाणपण येवोत.!
आम्ली पदार्थांबाबत आ. अमोल खताळ विधानसभेत तळमळीने बोलतात. त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधत प्रत्येक पोलीस ठाण्यात अमली पदार्थ विरोधी स्वतंत्र युनिट करण्यास भाग पाडले. मात्र, त्यांच्याच मतदारसंघात अमली पदार्थांच्या आरोपीला पोलिसांकडून पाठबळ मिळते की काय असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. यापुर्वी पोलीस उपनिरिक्षक श्रीकांत सावंत यांच्या हालगर्जीपणामुळे अबरार शेख या ड्रग्ज माफीयाला डिफॉल्ट जामीन मंजुर झाला होता. भविष्यात कासिफ कुरेशी याला जामीन मंजुर होऊ नये, पोलीस अधिक्षक यांना नोटीस काढण्याची वेळ येऊ नये किंवा आमदार आमोल खताळ यांची तळमळ व्यर्थ ठरू नये हिच मापक अपेक्षा आहे. म्हणून जर पीएसआय असे गुन्हे निर्गतीसाठी सक्षम नसतील तर असे तपास एपीआय किंवा पीआय दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे देणे अपेक्षित आहे. आता पोलीस उपाधिक्षक कुणाल सोनवणे तसेच पोलीस निरीक्षक बारवकर हे या प्रकरणात घालुन वेळेत "सबळ दोषारोपपत्र" दाखल करतील अशी भावना आमदार महोदयांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
