PSI ला हाताशी धरून मित्राचा काटा काढला.? ड्रग्ज प्रकरणात चोर सोडून सन्याशाला फाशी.! शहर पोलिसांचा पराक्रम. एसपींकडे तक्रार..
सह्याद्री सार्वभौम .-
संगमनेर शहराची वाटचाल आता बिहारकडे होते आहे की काय असा प्रश्न पडू लागला आहे. ना एसपींचे भय, ना पालकमंत्रींचे, ना आमदार, ना खासदार आणि ना ही गृहमंत्री साहेबांचे भय, आमचे कोणी काहीच वाकडे करु शकत नाही अशी मानसिकता शहर पोलिसांची होऊन बसली आहे की काय.? असा प्रश्न सगमनेरच्या सुज्ञ नागरिकांना पडला आहे. याचे कारण देखील तसेच आहे. चक्क शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांनी एका निरापराध व्यक्तीला खोट्या गुन्ह्यात गोवण्यासाठी बनावट सापळा रचला आणि त्या व्यक्तीच्या गाडीत ड्रग्ज ठेवून त्याला बेड्या ठोकल्याचा आरोप सावंत यांच्यावर करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असुन पीएसआय सावंत यांच्या संशयास्पद हलचाली, घटनाक्रम आणि ज्या व्यक्तीने गाडीत ड्रग्ज ठेवले त्या व्यक्तीसोबत दिसून येणारी सलगी हा सर्व प्रकार बनावट गुन्ह्यास पुरक असल्याचे पोलीस अधिक्षक याच्याकडे करण्यात आलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे. त्यामळे, या घटनेची सखोल चौकशी करुन श्रीकांत सावंत यांचे निलंबन करण्याची देखील मागणी करण्यात आली आहे. त्यामळे, संगमनेर शहर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले असून येथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याच्या आत आणि सुसंस्कृत शहर बदनाम होण्याच्या आत पोलीस अधिक्षक किंवा गृहमंत्री यांनी या घटनेकडे गांभिर्याने लक्ष घालणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.
या व्हिडिओत ड्रग्ज ठेवत असल्याचे दिसत आहे,याबाबत तक्रार अर्जात दिलेली सविस्तर माहिती अशी की. कासिफ कुरेशी हा तरुण शहरातील भारतनगर येथे राहतो. त्याचा पाळीव जनावरे खरेदी विक्री करण्याचा व्यवसाय आहे. त्याच्याच व्यवसायात असणाऱ्या त्याच्या मित्रांसोबत कासिफ याचे गेल्या काही दिवसांपासून मतभेद होते. त्याचा काटा काढण्यासाठी त्याचे मित्र कासिफ सोबत जवळीक साधत होते. याच मित्रांनी पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांना हाताशी धरुन कासिफ याला खोट्या गुन्ह्यात अडकविले आहे असे तक्रार अर्जात म्हटले आहे. अर्जदार असद रऊफ कुरेशी यांनी पुढे म्हणले आहे. की, कासिफ याचे मित्र त्याला म्हणाले. की. आपण एकत्र येऊ आणि एक व्यवसाय सुरु करू तू आज दि. 3 सप्टेंबर 2026 रोजी संध्याकाळी संगमनेर बस स्थानकावरील जगदंब टी सेंटर येथे ये....असे म्हणून त्याला बोलावून घेतले. ठरल्याप्रमाणे त्या दिवशी कासिफ सायंकाळी 07 वाजण्याच्या समारास त्याच्या पिवळ्या स्कुटरवर जगदंबा टी सेंटर येथे गेला. त्या ठिकाणी या मित्र परिवाराने चर्चेला सुरूवात केली. या दरम्यान तौफिक नावाच्या व्यक्तीने त्याला फोन आल्याचे भासविले आणि तो चर्चेतून उठून कासिफ याच्या गाडीकडे गेला. मनात कोणत्याही प्रकारचे कपट नाही असे दाखवून तौफीक गुपचुप कासिफ याच्या पिवळ्या गाडीजवळ गेला, फोनवर बोलण्याचे नाटक करुन त्याने त्याच्या खिशातून एक पांढऱ्या रंगाची पुडी काढली आणि ती कासिफच्या गाडीच्या पुढील डिक्कीत ठेवली. आपल्याला कोणी पाहिले नाही ना.! याची खात्री करुन तौफिक पुन्हा चर्चेत येवून सामिल झाला. त्याच्यावर मात्र कोणीही शंका घेतली नाही.
पुढे तक्रारीत म्हटले आहे. की, याच वेळी २० ते २५ फुटाच्या अंतरावर पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत हे काही व्यक्तींसोबत उभे होते. ते कासिफला ओळखत असल्यामळे सावंत यांनी त्याला हात वर करुन ओळख देखील दिली. दरम्यान कासिफ याची मित्रांसोबत चर्चा झाल्यानंतर तो त्याच्या घराकडे निघाला. त्याच दरम्यान पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांनी त्याच्या पाठोपाठ जाऊन जोशी स्विट्सच्या दुकानासमोर कासिफच्या गाडीला आपली गाडी आडवी लावली. कासिफच्या सोबत कोणत्याही प्रकारची चर्चा न करता पीएसआय साहेब त्याच्या अंगाची झडती घेऊ लागले. अंतर्वस्रात हात घालुन देखील तपासणी केली. मात्र, त्यांना त्यावेळी काहीच मिळून आले नाही. साहेब नेमकी काय तपासत आहात अशी विचारणा केली असता त्यानी कासिफ याच्या कानशिलात लावली. तुझी गाडी बस स्थानकावर घे असे म्हणत एका पोलीस कर्मचाऱ्याला कासिफच्या गाडीवर बसविले आणि यांची गाडी पुन्हा बस स्थानकावर आली. पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांनी ज्यावेळ कासिफ याच्या गाडीची तपासणी सुरु केली. त्यावेळी ज्या तौफिकने कासिफच्या गाडीत ड्रग्ज ठेवले होते. तो देखील त्याच ठिकाणी उपस्थित होता. कासिफ हा डग्ज बाबत पर्णतः अनभिज्ञ होता. त्यामळे पोलिसांचे नेमकी काय चालले आहे हे त्याच्या लक्षात येत नव्हते. मात्र. याच दरम्यानचा सीसीटीव्ही फुटेज तपासला असता पोलीस आणि ड्रग्ज ठेवणारा यांच्यातील हलचाली मात्र प्रचंड संशयास्पद दिसून येत आहेत. कासिफ याला संगमनेर बस स्थानकावर आणले असता त्याच्या गाडीच्या डिक्कीतून ड्रग्ज हस्तगत केल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहेत.
PSI सावंत व ड्रग्ज ठेवणारा व यांच्या हलचालीइतकेच काय.! तर त्याल ताब्यात देखील घेतल्याचे स्पष्ट दिसत आहे. आता हा प्रकार इथेच थांबला नाही. कासिफ याला पोलिसांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात नेले. त्याने गुन्हा कबुल करावा यासाठी त्याच्यावर प्रचंड दबाव टाकण्यात आला, तुला जामिन मिळवून देण्यासाठी मी स्वतः मदत करतो असे पीएसआय सावंत यांनी शब्द सुद्धा दिला. मात्र, कासिफ याने खोटा गुन्हा अंगावर घेण्यास नकार दिला, तो पोलिसांना शरण गेला नाही. त्यामुळे, सावंत यांनी पाच ते सहा पोलिसांना बोलविले आणि कासिफ याचे हातपाय पकडण्यास सांगितले. त्यानंतर कासिफ याला बेड्या ठोकण्यात आल्या. एका व्यक्तीने एक प्लास्टिकची पिशवी फोडली त्यात ड्रग्जच्या चार पूड्या होत्या. त्यातील तीन बाजुला काढल्या आणि एक पुडी बळजबरीने कासिफ याच्या खिशात टाकली. त्यानंतर याच ठिकाणी पोलिसांनी पंच तयार करुन पंचनामा केला असे तक्रार अर्जात म्हटले आहे. त्यामुळे. घटना घडली एकीकडे आणि दाखविली दुसरीकडे, ड्रग्ज ठेवले एकाने आणि अटक केली दुसऱ्याला, हा गुन्हा पोलिसांच्या मदतीने घडवून आणला असून तो पुर्णत: अन्यायकारक व खोटा आहे. या घटनेत सीसीटीव्ही हा सबळ पुरावा असून गुन्ह्यातील विसंगती लक्षात येते. त्यामळे, आम्हाला न्याय मिळावा, पोलीस उपनिरीक्षक व या गुन्ह्यातील दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी अर्जदार असद रऊफ कुरेशी यांनी पोलीस अधिक्षक यांच्याकडे दि. 14 सप्टेंबर 2026 रोजी लेखी पत्र व सबळ पुरावे पेंड्राईव्हमध्ये देऊन केली आहे.
चित्रपटाला लाजवेल अशी कामगिरी . ।
मुळात तौफिक या व्यक्तीने कासिफच्या पिवळ्या रंगाच्या गाडीतील पुढील डिक्कीत ड्रग्जची पुडी ठेवल्याचे सीसीटीव्हीत स्पष्ट दिसते आहे. इतकेच काय.! तर पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत हे ते ड्रग्ज ताब्यात घेताना सीसीटीव्हीत दिसत आहेत. पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे कासिफ याला बस स्थानक परिसरातून ताब्यात घेताना दिसत आहेत. असे असताना पोलिसांनी जी फिर्याद दाखल केली. त्यात निव्वळ बनावट घटनाक्रम दाखवून फक्त कारवाई दाखविण्याचा आताताईपणा केल्याचे लक्षात येते. यात आणखी एक धक्कादायक प्रकार म्हणजे संगमनेर बस स्थानकावर पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत हे कासिफ याच्या पिवळ्या गाडीतून ड्रग्ज ताब्यात घेताना सीसीटीव्हीत दिसत आहेत. असे असताना त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. की., कासिफ याच्या ताब्यात मिळुन आलेल्या पिवळ्या रंगाच्या दुचाकी गाडीत काहीच मिळुन आलेले नाही. असा स्पष्ट उल्लेख आहे. त्यामळे, इथे पोलिसांचा खोटारडेपणा स्पष्टपणे दिसून येत आहे. आता हे सर्व उघड उघड दिसून येत असताना पोलीस पोलिसांना किती पाठीशी घालतात की निर्पेक्षपणे कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जय भिम चित्रपटाची आठवण येते..!
जय भिम हा चित्रपट असा आहे. की. पोलीस सामान्य नागरिकांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्यासाठी अनेक खोटे पुरावे जमा करतात. वेगवेगळ्या पद्धतीने घटनाक्रम जुळवून आणतात आणि निरापराध व्यक्तींना जेरीस आणतात. जो गुन्हा केला नाही त्याची शिक्षा निरापराध्यांना भोगायला लावतात. मात्र. म्हणतात ना. सत्य परेशान हो सकता हैं. लेकीन पराजीत नाही. त्यानुसार खोटा गुन्हा दाखल करणे. निरापराध्याला शिक्षा देणे हे पाप पोलिसांच्या माथी फोडले जाते. यासाठी एक प्रामाणिक पोलीस अधिकारी पुढे येतो आणि पोलिसांच्याच खोट्या गुन्ह्याचा उलगडा करतो. अखेर न्यायालयात हे सर्व सिद्ध होते आणि पोलिसांना त्याची शिक्षा भोगावी लागते. आता या संगमनेरच्या गुन्ह्यात पोलीस उपाधिक्षक. अप्पर पोलीस अधिक्षक की पोलीस अधिक्षक पुढे येतात आणि खऱ्याला खरे म्हणतात व खोट्याला खोटे म्हणायची मानसिकता ठेवतात हे पाहणे महत्वाचे आहे. खरंतर पोलीस अधिक्षक यांनी हा तक्रार अर्ज स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग केला आहे. ही एक न्यायाची पहिली पायरी म्हटली तर हरकत नाही. मात्र. एलसीबीने देखील या चौकशीत मिले सुर मेरा तुम्हारा अशी भुमिका घेतली नाही म्हणजे देव पावला. !
