विखे पाटलांचे खंदे समर्थक घुगे यांच्यावर संगमनेरात गोळीबार, गौणखणिजाहून वाद, विशाल खेमनरसह पाच जणांवर गुन्हे दाखल.!
सह्याद्री सार्वभौम (संगमनेर):-
भाजपचे तालुका सरचिटणीस व मालुंजे गावचे माजी सरपंच संदिप घुगे घराजवळ शेतपावली करत असताना त्यांच्यावर दोघाजनांनी मोटार सायकलवर येऊन गोळीबार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना काल बुधवार दि.1 जुलै 2026 रोजी रात्री 10 वाजण्याच्या दरम्यान घडली. सुदैवाने कुठलीही जिवीत हानी झाली नसुन संदिप घुगे यांच्यावर गोळीबार केला असता ती गोळी घरातील दरवाजाला छेदून आत गेली. त्यानंतर चौघांनी आपल्या हातातील तलवारीने घराची तोडफोड करून तुला आज जिवंत सोडणार नाही अशी जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना पोलिसांना समजताच पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपींचा मागमूस घेण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर संगमनेर तालुका भाजपाचे सरचिटणीस संदिप घुगे यांनी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून आरोपी विशाल हौशीराम खेमनर (रा. अंभोरे, ता. संगमनेर), प्रवीण ठकाजी पुणेकर (रा. डीग्रस,ता. संगमनेर), सुदर्शन शिवाजी श्रीराम व इतर तीन अशा सहा जणांनी हा जीवघेणा हल्ला केला. त्यांच्यावर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस करत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मालुंजे गावचे माजी सरपंच संदिप घुगे यांची गावात गेली अनेकदिवसांपासून सत्ता आहे. गावातील अनेक लोक त्यांच्याकडे विविध विषय घेऊन समस्या सोडवण्यासाठी येत असतात. गावातील एका नागरिकाच्या शेत जमीनीतून आरोपी विशाल खेमनर हा अवैध मुरूम व माती वाहतूक करून त्रास देत असल्याची माहिती भाजपचे सरचिटणीस संदिप घुगे याना सांगितली. संदिप घुगे यांनी अवैध वाहतुकीबद्दल आरोपी विशाल खेमनर याला जाब विचारला असता त्याने फोन करून संदिप घुगे यांना धमक्या दिल्या. तुला सोडणार नाही तुला संपवणार असा फोन करून आरोपी विशाल खेमनर याने भाजपचे सरचिटणीस संदिप घुगे यांना फोनद्वारे व व्हाट्सएपद्वारे धमक्या देत राहिला.
दरम्यान, काल बुधवार दि.1 जुलै 2026 रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास संदिप घुगे हे कुटुंबासोबत जेवण करून घराजवळ शेत पावली करत होते. ते शेत पावली करून घराकडे जात असताना पाठीमागुन काळ्या रंगाची दुचाकी युनिकॉर्न गाडीवर तिघेजण बसलेले व त्यांच्या पाठीमागे दुचाकी गाडीवर तिघे जण आले. युनिकॉर्न गाडी पुढे आल्याने त्या गाडीवरील चालक सुदर्शन श्रीराम हा गाडी घराच्या दिशेने घेऊन आला मागे बसलेले विशाल खेमनर व प्रवीण पुणेकर यांनी संदिप घुगे यांना ओळखले आणि दोघांच्या कंबरेला असलेली बंदुक काढुन संदिप घुगे यांच्यावर ताणली. दुचाकी गाडी लावून श्रीराम याने हातात तलवार घेऊन संदिप घुगे यांच्या दिशेने गेला. संदिप घुगे यांनी हे पाहताच घरात पळ काढला. घराचा दरवाजा ओढुन कडी लावली असता त्याच वेळेस बंदुकीतुन दोन राउंड फायर झाले. त्यापैकी एक गोळी ही दरवाजाच्या फळीतून छेदून आत घरात गेली.
दरम्यान, घराचा दरवाजा बंद केला. आरोपींना दरवाजा उघडता येत नसल्याने त्यांनी हातात असणाऱ्या तलवारीने घरच्या खिडक्यांच्या काचा फोडल्या. तु आज वाचला असला तरी तुला जिवंत सोडणार नाही अशा धमक्या देण्यात आल्या. घरासमोरून पुन्हा मोटारसायकलवर ते शिवीगाळ करून निघुन गेले. ही घटना पोलिसांना समजली असता त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपअधीक्षक कुणाल सोनवणे व पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यानंतर भाजपचे सरचिटणीस संदिप घुगे यांनी पोलीस ठाण्यात जाऊन घडलेला प्रकार सांगितला त्यावरून तक्रार दाखल केली. त्यानंतर आरोपी विशाल हौशीराम खेमनर (रा. अंभोरे, ता. संगमनेर), प्रवीण ठकाजी पुणेकर (रा. डीग्रस,ता. संगमनेर), सुदर्शन शिवाजी श्रीराम व इतर तीन आशा सहा जणांनी हा जीवघेणा हल्ला केला.त्यांच्यावर हाफमर्डरसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा पुढील तपास पोलीस करत आहे.
खरंतर, भाजपचे सरचिटणीस संदिप घुगे व शेतकऱ्याने याच आरोपीं विरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. तरी देखील पोलिसांनी कुठली दखल घेतली नाही. आरोपींना साधे पोलीस ठाण्यात देखील बोलवले नाही. त्यामुळे, गुन्हेगारांचा कायद्याचा धाक राहिला नाही. त्यांची वेळेत कानउघाडणी न झाल्याने त्यांनी एक पाऊल पुढे टाकले. यावेळी त्यांनी फोनवर किंवा व्हाट्सएपवर दमबाजी न करता थेट भाजपचे सरचिटणीस संदिप घुगे यांच्या घरी जाऊन गोळीबार केला. जर गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी तात्काळ दखल घेतली असती तर आज घरी जाऊन गोळीबार झाला नसता. त्यामुळे, तालुका पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह निर्माण होऊन तालुका पोलिसांवर नाराजी व्यक्त केली आहे. रेकॉर्डवरील आरोपीवर भाजप पदाधिकारी व शेतकरी तक्रार दाखल करून देखील पोलीस वेळेत दखल घेत नसतील तर संगमनेरची कायदा सुव्यवस्था वेशीवर टांगली आहे का?असा प्रश्न सुज्ञ नागरिकांनी उपस्थित केला आहे.
