माझ्या बापाने माघार घ्यायला सांगितली तरी घेणार नाही, गायकरांच्या दगाबाजीवर विकास शेटेंची नाराजी.!

रोखठोक सार्वभौम :- 

                अहिल्यानगर जिल्हा बँकेची रणधुमाळी सुरु झाली असून इच्छुक उमेदवारांनी अर्ज घेतले आहेत. यात अकोले तालुक्यातून आ. डॉ. किरण लहामटे, मा. आ. वैभव पिचड, सिताराम पा.गायकर, विकास शेटे, संजिवनी शिंदे- गायकर, परिघा विश्वास आरोटे असे महत्वाचे काही अर्ज दाखल झाले आहेत. या निवडणुकीत अकोले तालुक्यातून मोठी मजेदार गोष्ट पहायला मिळत असून कट्टर वैरी मित्र झाले असून पक्के मित्र आता कट्टर विरोधक झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. कारण, वैभव पिचड आणि सिताराम पा. गायकर यांच्यातील मतभेद आपल्याला काही नवे नाहीत, तरी देखील पिचड यांचा अर्ज दाखल करण्यासाठी गायकरांनी आवर्जुन हजेरी लावल्याचे दिसले. तर, ज्या गायकरांमुळे डॉ. लहामटे आमदार झाले, त्या दोघांमध्ये दुरावा दिसून आला आहे. तर यात सर्वात महत्वाचे म्हणजे आम्ही गायकरांचे मानसपुत्र असे अटकेपार झेंडे मिरविणारे विकासराव शेटे पाटील गायकरांच्या विरोधात दंड थोपटताना दिसून आले. यात आणखी विशेष बाब म्हणजे दोन वर्षापासून माझा राजकीय वारसदार तुच...जिल्हा बॅंकेच्या तयारीला लाग असे म्हणाऱ्या गायकर पाटलांनी अचाकन ध्रुवताऱ्याला मांडीहून लोटावे तसे ढकलून दिले आणि त्यांची मुलगी राजकीय वारसदार म्हणून पुढे आणली. तरी देखील गायकरांंचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी मी निवडणुक करीत आहे अशा प्रकारची प्रतिक्रीया विकास शेटे यांनी दिली. त्यामुळे, पहिली गोष्ट म्हणजे शेटे आणि गायकर अशी लढत होईल असे अनेकांना वाटत नाही आणि विकास शेटे म्हणतात आता माझा बाप जरी मला थांब म्हटला तरी मी निवडणुकीतून माघार घेणार नाही. त्यामुळे, या निवडणुकीला भलतीच रंगत येणार असल्याचे दिसते आहे.

              खरंतर असे म्हणतात जिल्हा बॅंकेत राजकारण, पार्टी, पक्ष, गट-तट असा काही प्रकार नसतो. हे एक वास्तव असले तरी, राजकीय गोळाबेरीज करताना हा विचार नक्की होत असतो. जिल्हा बॅंकेत थोरात आणि विखे असे दोन मुख्य गटांचे प्राबल्य असून फक्त विश्वासात घेतले नाही, मर्जीतला उमेदवार घेत नाहीत, बॅंक भरती प्रक्रियेत सहभाग दिला जात नाही किंवा राजकीय विरोध जिवंत राहिला पाहिजे अशा प्रकारची आडमुठी खेळी अनेक नेते घेताना दिसतात, अखेर होते काय? बऱ्यापैकी जागा बिनविरोध होतात. आता तर विखे आणि थोरात यांच्यातील राजकीय वैर वसरले असून त्यांच्यातील मनोमिलनाने डॉ.सुजय दादा विखे यांचे पुनर्वसन होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे,  संगमनेर तालुक्यावरील विखेंची पकड कमी होऊन भविष्यातील संगमनेरचे गणित सुटसुटीत होण्याचे चिन्ह दिसत आहे. कारण, बाळासाहेब थोरात यांना पराभूत करण्यासाठी डॉ. सुजय विखे यांची भाषा आणि भाषणे आजही अनेकांच्या कानात गुंजत आहे खरंतर सुजय विखे हेच संगमनेरच्या विजयाचे शिल्पकार होते. आता मात्र बाळासाहेब थोरात हे ज्येष्ठ नेते झाले असून त्यांच्या शेजारी बसून जेवण करणे इतकेच काय.! तर, चार चौघात त्यांच्या पाया पडणे हा सर्व सुसंस्कृतपणा दोघांमध्ये सुरु झाला आहे. आता या दोघांमधील रायकीय प्रपंच मांडण्याचे कारण काय? तर अर्थातच जिल्हा बॅंकेची निवडणुक विखे आणि थोरात यांच्या भोवतीच फिरताना दिसत आहे. भविष्यातील राजकारण सुरळीत आणायचे असेल तर थोरातांना सुरात सुर मिळविणे महत्वाचे ठरणार आहे. त्यामुळे, विखेंच्या बहुतांशी उमेदवारांना विरोधक कोणताही विरोध करताना दिसत नाहीत,  विखे धार्जीने सदस्य हे डॉ.सुजय विखे यांना योग्य जागेवर बसविण्याकरीता बलाबल करतील यासाठी अंतर्गत व्युव्हरचना सुरु असल्याचे बोलले जात आहे.

            वरील सर्व घटनाक्रमाला अनुसरुन विखे यांना अकोले तालुक्यात सिताराम पा. गायकर यांना पसंती दिली आहे. कारण, कट्टर अजित दादांचे विश्वासू म्हणून ओळख असतानाही याच गायकर साहेबांनी जिल्हा बॅंक विखेंच्या ताब्यात नेवून घातली, त्यामुळे अकोले तालुक्यातून उमेदवारी देताना पहिल्यांदा गायकर साहेबांचा विचार झाला तर त्यात गैर काही नाही. मात्र ते स्वत: उमेदवारी करतात की मुलीला पुढे करतात यावर बरेच गणितं आवलंबून आहे. या निवडणुकीत जरी ठराविक मतदार असले तरी पुर्वीप्रमाणे टोपीवाले अर्थात ज्येष्ठ मतदार कमी असून तरुणांचे ठराव जास्त आहे. त्यामुळे, एकतर अर्थपुर्ण जोरावर निवडणुक होईल किंवा परिवर्तनवादी निवडणुक होण्याची शक्यता आहे. आता या सर्व प्रक्रियेत डॉ. किरण लहामटे यांचे सोसायटी मतदार संघातून गणित बसत नाही. त्यात शरद चौधरी हे गायकर पा. यांचे काम करतील असे वाटत नाही. त्यामुळे, सदैव पिचडांच्या नावाने बोटं मोडणारे आमदार आता पिचडांना मदत करतील की जे गायकर पाटील पिचडांच्या दिमतील गेले त्यांना मदत करतील.! यावर देखील महत्वाची गणिते अवलंबून आहेत. तसेच या निवडणुकीत कैलास वाकचौरे हे पिचड आणि गायकर यांच्या मनोमिलनाचे शिल्पकार आहेत, ऐनवेळी ते देखील उमेदवार म्हणून पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे, अकोले तालुक्याचे राजकारण आता सघ्या तरी एका वेगळ्य वळणावर असून आणखी थोड्या दिवसात राजकीय भुकंपजन्य परिस्थिती पहायला मिळणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

            एकंदर आदिवासी मतदार संघातून डॉ. किरण लहमटे, मा. आ. वैभव पिचड आणि अमित दादा भांगरे याच्यात नेमकी काय तडजोड होते, हे पहाणे महत्वाचे आहे. त्यानंतर या जागेवर शिक्कामुर्तब होईल. त्यानंतर सोसायटी मतदार संघात गायकर साहेब यांची उमेदवारी झाली तर विकास शेेटे यांच्यासोबत थेट लढत होणार आहे. खरंतर या दोघांचे नातेवाईक, मित्र परिवार, कौटुंबिक स्नेह हा एकच असून ज्या-ज्या नातेवाईकांचे ठराव झाले आहेत त्यांच्यासाठी जिल्हा बॅंक मतदान ही एक कसोटी किंवा धर्मसंकट असणार आहे. कारण, पिचड, गायकर आणि शेटे यांचे संभाव्य मतदार (यादी) तपासले तर या तिघांच्या याद्यांना अनेक नावे एकसारखीच आहे. मतदार देखील मालामाल होण्याचे स्वप्न पहात असून वास्तवत: तो ऐनवेळी काय करतो ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. एकंदर,  सिताराम पा. गायकर व विकासराव शेटे अर्थात मानसपुत्र यांच्यातील लढाई पहाण्याजोगी रहाणार आहे. गायकर साहेबांनी एनवेळी धोका दिल्याने नाराज झालेल्या विकासराव शेटे यांनी या निवडणुक आखड्यात उडी मारली आणि आपल्या राजकीय गुरुवरच डाव टाकला आहे. खरंतर कचरुपाटील शेटे आणि गायकर साहेब ही जय विरु सारखी जोडी मानली जाते. हे असे असले तरी विकास शेटे यांनी म्हणाले की, माझा बाप जर मला थांब म्हणाला, माघार घे म्हणाला तरी मी घेणार नाही, माझ्यात निवडून येण्याची पात्रता आहे मी एमबीए झालेला उच्चशिक्षित यशस्वी उद्योजक असून मला मतदारांनी साथ दिल्यास स्वत:ला सिद्ध करुन दाखवेल असे ते म्हणाले आहे. त्यामुळे मतदार नेमकी कोणाच्या बाजूने कौल देतात हे थोड्याच दिवसात दिसून येईल.