बाप रे.! 153 किलो गांजा, 90 लाखांचा मुद्देमाल, दोघांना अटक, पाच जणांवर गुन्हा.!
सह्याद्री सार्वभौम :-
उडीसाहुन आलेला उच्च दर्जाचा गांजा पुण्याकडे घेऊन जात असताना तो संगमनेर तालुक्यातील सायखिंडी फाटा येथे ताब्यात घेण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज सोमवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास केली. यात 88 लाख 77 हजार 470 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तर 152 किलो 61 ग्रॅम गांजासह अन्य वस्तू आणि दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्ह्यात दत्तात्रय नानाभाऊ इचके (रा. कवठे यमाई, ता. शिरूर,जि, पुणे), श्रीहरी बाळू मिडगुले (रा. कान्हूर यमाई, ता. शिरूर) यांना ताब्यात घेतले असुन कुंफु(पूर्ण नाव नाही), साहेबराव उर्फ भाऊसाहेब बाबू मिडगुले (रा. कान्हूर मसाई,ता. शिरूर), विशाल उर्फ दादा साळुंके (रा. पुणे) आशा पाच जणांना आरोपी केले असुन तिघेजण फरार आहेत. हा गांजा उडीसाहुन पुणे जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी वितरीत केला जाणार होता. अशी माहिती पोलिसांना मिळाली होती.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहरात अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गस्त घातला. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव यांना गोपनीय माहिती मिळाली की, आसाम वरून येणारा गांजा पुण्याच्या दिशेने एका व्हाइट नेक्सोन मधुन जाणार आहे. तेव्हा जाधव यांनी पथकातील कर्मचारी घेऊन सायखिंडी फाटा येथे गस्त घातला. आलेल्या प्रत्येक वाहनाची पोलिसांनी चौकशी सुरू केली. ज्या काही संशयास्पद होत्या त्यांची तपासणी देखील केली. सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास एम. एच. 12 यु.एफ.9113 ही कार आली असता पोलिसांनी ती अडवली. गाडी बाजुला घेऊन त्यांना गाडीत काय आहे हे विचारले असता त्यांनी उडवाउडविची उत्तरे दिली. तर, गाडीची चौकशी करु नका असे म्हणून गांजा तस्करांनी विरोध केला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना कायदेशीर समज दिली.
गांजा पकडणारा हाच तो व्हिडिओ
दरम्यान, दोघांनी पळापळ करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांचा मोठा फौजफाटा असल्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना अपयश आले. पोलिसांनी गाडीची तपासणी केली असता 9 प्लास्टिकच्या गोण्या पॅकबंद दिसल्या. त्यातून उग्र वास येत होता. जेव्हा ते खोलुन पाहिले तेव्हा लक्षात आले. की, त्यात काळपट हिवरट रंगाची पाने, फुले, काड्या व बिया असलेले कॅनाबीस या वनस्पतीचे शेंडे होते. हा गांजा असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. जेव्हा पॅकेटचे मोजमाप केले तेव्हा 152 किलो 61 ग्रॅम असून तो एक उच्च प्रतीचा गांजा असल्याचे निदर्शनास आले. तर पोलिसांनी कार, त्यांचे मोबाईल, रोख रक्कम आणि गांजा असा 88 लाख 77 हजार 470 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या गाडीत दोन नंबर प्लेट देखील मिळून आल्या. त्यावर ओ. डी. 08 एक्स.4385 अशी नंबर प्लेट मिळुन आली. त्यामुळे, गाडीची नंबर प्लेट बदलुन हे अवैध गांजाची तस्करी करत होते. मात्र, स्थानिक गुन्हे शाखेने त्यांच्यावर करडी नजर ठेवत त्यांच्या मुसक्या आवळल्या.
दरम्यान, या दोघांकडे चौकशी केली असता हा गांजा कुठून आणला व कोणाकडे जाणार होता याची माहिती पोलिसांनी विचारली असता दोघे उडवाउडवीची उत्तरे देऊ लागली. मात्र, त्यांना खाक्या दाखवला असता ते पोपटासारखी बोलू लागली. हा गांजा आसाम येथुन कुंफु याच्याकडून आणला तर साहेबराव उर्फ भाऊसाहेब बाबु मिडगुले व विशाल उर्फ दाद्या साळुंके यांच्याकडे हा गांजा ठेवला जाणार होता. तर तो पुढे पुणे जिल्ह्यात वितरीत करणार होता. त्यामुळे, पुणे जिल्ह्यात गांजा कोठेकोठे जाणार होता. याचा तपास करणे पोलिसांसाठी आव्हान असणार आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव, पो. कॉ. विजय पवार,पो. कॉ. रिचर्ड गायकवाड, पो. कॉ. विकास साळवे,पो. ना. राहुल डोके,पो. ना. भीमराज खरसे,पो. कॉ. भगवान थोरात, पो. कॉ. सुनील मालनकर,स. फौ.महादेव भांड यांनी ही दमदार कामगिरी केली.
दरम्यान, संगमनेर हे गांजासाठी प्रसिद्ध होत आहे. येथे 454 किलो गांजा सापडला तेव्हा देखील संगमनेर शहर पोलीस ठाणे अनभिज्ञ होते. नाशिक येथुन नार्कोटिक्स डिपार्टमेंट ती कारवाई केली. कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. त्यानंतर शंभर किलोमीटर लांबुन येऊन स्थानिक गुन्हे शाखेने आज संगमनेर शहर हद्दीत छापा टाकला त्यामध्ये लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. मात्र, संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील पोलीस करतात तरी काय? फरार महिला आरोपी शहर हद्दीत आजही गांजाचा व्यवसाय करत असुन तिला खाकीचाच आशिर्वाद असल्याचे बोले जाते. साधे बसस्थानक परिसरातील ड्रग्जवर शहर पोलिसांनी छापा टाकला तो देखील वादाच्या भोवऱ्यात सापडला. त्यामुळे, शहर पोलिसांवर नागरिकांमध्ये नाराजीचा सुर आहे.
