ड्रग्ज डिक्कीत ठेवणाऱ्या त्या आरोपीला अटक, PSI च्या अडचणी वाढल्या, पोलिसांनी दिली कबुली.! LCB चे कौतुक.!

 

सह्याद्री सार्वभौम :- 

                          संगमनेर शहरातील कासिफ कुरेशी याला आयुष्यातून उठविण्यासाठी ड्रग्ज प्रकरणात अडकविण्याचा मित्रांनीच घाट घातला होता. दुर्दैव असे की, हा उपद्व्याप वर्दीचा इमान राखणाऱ्या प्रवृत्तीच्या आडून झाल्याने खाकीवर शिंतोडे उडाले गेले. यदा कदाचित सीसीटिव्ही फुटेज समोर आले नसते तर एका निरापराध व्यक्तीला आयुष्यभर जेलची हवा खावी लागली असती. असे म्हणतात की, कानून के हाथ लंबे होते हैं.! या उक्तीप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने हे सीसीटिव्ही फुटेज रेकॉर्डवर घेतले आणि गाडीच्या डिक्कीत ड्रग्ज ठेवणाऱ्या तौसिफला आरोपी करुन त्याला नेवासा फाटा येथून अटक केली. त्याला आज न्यायालयात हजर केले असता एलसीबीने कबुल केले की, होय.! तौसिफ कुरेशी यानेच कासिफ कुरेशी याच्या गाडीच्या डिक्कीत ड्रग्ज ठेवले होते. त्यामुळे, तौसिफ याचे मोबाईल ताब्यात घेऊन व्हाटसअप, कॉल डिटेल्स, बॅंक खाते तपासायचे आहे. तसेच त्याने हे कृत्य कोणाच्या सांगण्याहून केले, त्याच्या कटात कोणकोण सामिल आहे, तो कोणाच्या संपर्कात होता अशा विविध गोष्टींच्या चौकशीसाठी त्याला पोलीस कोठडी मिळावी असा युक्तीवाद केला. त्यानंतर न्यायालयाने तौसिफ ताहीर कुरेशी (वय 34,रा.भारतनगर,ता. संगमनेर) याला दि. 28 सप्टेंबर 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे, यात आता पीएसआय श्रीकांत सावंत यांचे पाय किती खोलात होते हे सिद्ध होणार आहे. ही कायदेशीर बाजू असली तरी सावंत यांना बुडवायचे की वर काढायचे हे सर्वस्वी स्थानिकगुन्हे शाखेच्या ताब्यात असणार असल्याची चर्चा आहे.

           याबाबत सविस्तर माहिती अशी की, संगमनेर बस स्थानकावर कासिफ या व्यक्तीला मित्रांनी बोलावून घेतले आणि त्याला ड्रग्ज प्रकरणात अडकविण्याचा कट रचला होता. दुर्दैवाने तो यशस्वी देखील झाला, पण कासिफचे नशिब बलोत्तर म्हणून सीसीटिव्ही फुटेज समोर आले आणि सगळा डाव उलथापालथ झाला. ही घटना घडवून आणण्यात तथा या कटाचा मुख्य सुत्रधार पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत असल्याचे आरोप झाले. त्याचे कारण म्हणजे बस स्थानकासह त्या परीसरात असणारे सीसीटीव्ही फुटेज त्यांच्यावरील आरोपाला सहायभूत ठरले. अर्थातच हे फुटेज पाहिल्यानंतर सावंत साहेब किती दोषी आहेत याचा न्यायनिवाडा होतो. म्हणून तर सावंत यांना कंट्रोल जमा व्हावे लागले. कदाचित त्यांच्यावर काही ठपका नसता तर त्यांच्यावर कारवाई झाली नसती. त्यामुळे, प्रत्यक्षदर्शी सावंत हे दोषी वाटत असले तरी आता कागदोपत्री काय - काय पुरावे समोर येतात, एलसीबी या गुन्ह्याला किती बारकाईने तपासते, किती पुरावे हस्तगत करते यावर या गुन्ह्याची मदार आवलंबून असणार आहे.

          खरंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने न्यायालयात जी बाजू मांडली आहे. त्याहून काही गोष्टी लेखी व अप्रत्यक्षपणे त्यांनी मान्य केल्या आहेत. की, ताब्यात घेतलेले सीसीटीव्ही फुटेज त्यांना मान्य आहेत, सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा घटनाक्रम त्यांना मान्य आहे, तपासी अधिकाऱ्यांनी सांगितले की तौसिफ याने कासिफ याच्या पिवळ्या गाडीच्या डिक्कीत ड्रग्ज ठेवले आहे. त्यामुळे कासिफ याच्यावरील बालंट नकळत डोक्याहून खांद्यावर आले आहे. आता यात महत्वाची बाब म्हणजे तौसिफ याच्याशी कोणकोण संपर्कात होते, त्याने तीन मित्रांसह पीएसआय सावंत किंवा घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या पोलिसांना फोन केले होते का? त्यांची चॅटिंग किंवा कॉल डिटेल्स उपलब्ध आहे का? आता गुन्हा घडून महिना होत आला, त्यामुळे आरोपींच्या मोबाईलमध्ये पोलिसांना व्हाटसअप इमेज सोडून धतुरं काही हाती लागेल अशी सुत्राम शक्यता नाही. त्यामुळे आता तौसिफ याचे कॉल डिटेल्स आणि टेक्निकल पद्धतीने हस्तगत केलेला डाटा याहून काय तपास होईल तोच सत्य. मात्र, कॉल डिटेल्स फक्त एका तौसिफचे नव्हे तर त्याच्या सोबत असणाऱ्या मित्रांचे, पीएसआय सावंत, त्यांच्या सोबत असणारे कर्मचारी आणि झिरो पोलीस यांच्या खाजगी मोबाईलमध्ये देखील पोलिसांना हात घालावे लागणार आहे. कारण, हा घटनाक्रम आणि पोलिसांनी केलेली कारवाई यातील हलचाली सर्व काही सांगून जातात. त्यामुळे, हा तपास फक्त एकट्या तौसिफच्या भोवती फिरु नये हिच अपेक्षा संगमनेरच्या सुज्ञ नगरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

             बनवा बनवी अशी ही बनवाबनवी.!

      एक सत्य बाहेर पडले की सर्व सत्याची बाजू ओपन होते. हा ड्रग्जचा गुन्हा देखील तसाच आहे. पीएसआय सावंत यांनी फिर्यादीत म्हटले आहे. की, आम्ही पोलीस ठाण्यात कारवाई केली. आता एलसीबी म्हणते बस स्थानकावर घटना घडली, पीएसआय सावंत फिर्यादीत म्हणतात ड्रग्ज आम्ही कासिफच्या खिशातून जप्त केले आणि एलसीबी म्हणते गाडीतून जप्त केल्याचे सीसीटिव्हीत स्पष्ट दिसते. पीएसआय सावंत फिर्यादीत म्हणतात आम्ही पिवळ्या गाडीची झडती घेतली त्यात काहीच मिळून आले नाही असा मुळ एफआयआरमध्ये स्पष्ट उल्लेख आहे. मात्र, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा म्हणते पिवळ्या रंगाच्या गाडीत आरोपी तौसिफ याने ड्रग्ज ठेवले आणि ते सावंत यांनी जप्त केले असे फुटेजमध्ये स्पष्ट दिसते आहे. सावंत यांच्या फिर्यादीत आरोपी तौसिफ वर्ज आहेत आणि एलसीबीने त्याला आरोपी केले आहे. या घटनेत सावंत यांच्या फिर्यादीत घटनास्थळचा पंचनामा पोलीस ठाण्यात केला असे आहे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या तपासात पंचनामा बस स्थानकावर अर्थात जेथे घटना घडली तेथे पंचनामा होणे अपेक्षित आहे. विशेष म्हणजे या संपुर्ण घटनेत ड्रग्जची पुडी तर एकच आहे, ती पुडी देखील सावंत यांनी बस स्थानकावर जप्त केलेली हे सीसीटीव्हीत दिसत आहे. मग FIR मध्ये पोलीस ठाण्यात दुसरी कारवाई दाखविली आहे त्यात देखील एक ड्रग्ज पुडी जप्त केल्याचे FIR मध्ये दाखविले आहे. मग प्रश्न निर्माण होतो की दुसरी ड्रग्ज पुडी कोठे आहे.? याहून लक्षात येते की, एकतर यांनी एक ड्रग्ज पुडी गायब केली किंवा बस स्थानक व पोलीस स्टेशनमधील पुडी एकच आहे आणि घटना बनावट आहे. त्यामुळे ही फिर्यादच बनावट नाही ना.? जर ड्रग्ज पुडी बस स्थानकावर ताब्यात घेतली तर पोलीस ठाण्यात पंचनामा केला ते पंच गुन्हेगार नाही का? जो पुर्णपणे चुकीचा तपास आणि कारवाई पोलिस निरिक्षक समिर बारवकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पुर्ण झाला त्यांचे काय? बारवकर साहेब यात मुख्य दोषी नाहीत का? सावंत यांना तपास करायचा अधिकार आहे मात्र कारवाई करायचा अधिकार आहे का.? यात दोषी कोण.? असा प्रश्न संगमनेरकर उपस्थित करु लागले आहेत. एकंदर हा गुन्हा आणि तपास पाहून अशी ही बनवा बनवी या चित्रपटाची आठवण झाल्याशिवाय रहात नाही.

पुढील भाग वाचा :- जितके पीएसआय श्रीकांत सावंत दोषी त्याहून अधिक पोलीस ठाण्याचे प्रभारी समिर बारवकर दोषी नाहीत का? सविस्तर वाचा पुढील भाग...क्रमश: