बाप लेकाचा वाद मिटवायला गेला अन त्याच्यावरच चाकुने वार केले.! रक्ताच्या थारोळ्यातून थेट दवाखान्या, गुन्हा दाखल.!


सह्याद्री सार्वभौम (संगमनेर) :-

                       संगमनेर तालुक्यातील निमगाव पागा येथे जत्रेत बाप लेकाचे वाद सुरू होते. त्यावेळी मारहाण करणाऱ्या मुलाला चांगल्या भावनेने समजुन सांगण्यासाठी गेला. परंतु, तेच वाद अंगलट येऊन स्वतःच्या अंगावर वार झेलण्याची वेळ आली.  त्या मुलाने तुझा काय संबंध म्हणत चाकूने सपासप वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना बुधवार दि.25 मार्च 2026 सायंकाळी 5 वाजण्याच्या दरम्यान घडली. यात नितीन रावसाहेब कानवडे हे गंभीर जखमी असुन त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. ते शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रवींद्र भाऊसाहेब बागडे (रा. निमगावपागा, ता. संगमनेर) याच्यावर हाफमर्डरसह गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास काळे करत आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नितीन कानवडे हे निमगावपागा येथील रहिवासी आहेत. ते शेती व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात. गावात चाखणबाबा या देवस्थानची यात्रा मोठ्या उत्साहात भरती. मोठ्या प्रमाणात गर्दी देखील होती. सालाबादप्रमाणे ह्या वर्षी दि.24 व दि.25 मार्च रोजी ही यात्रा भरलेली होती. पहिल्या दिवशीची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. मात्र, बुधवार दि.25 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या दरम्यान नितीन कानवडे व कुटुंबातील सदस्य हे यात्रेत आले. देवाचे दर्शन घेतले घरी यात्रेतून खाऊ घेण्यासाठी एका दुकानापुढे थांबले. तिथे जिलेबी गरम होत होती. तो पर्यंत ते बाहेर उभे होते. मात्र, त्यांच्या समोर मोठ्या प्रमाणात गर्दी होती. तिथे ओळखीचे लोक असल्याने ते तेथे गेले.

           दरम्यान, गावातीलच व्यक्तीचे वाद सुरू होते. आरोपी रविंद्र बागडे हा त्याच्या वडीलांना मारहाण करत होता. त्याचे चुलते त्याला समजावुन सांगत होते. त्यावेळी आरोपी रविंद्र बागडे याच्या चुलत्याने रविंद्रला दोन चार चापट मारून वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. हे पाहुन नितीन कानवडे हे देखील पुढे आले. तु तुझ्या वडिलांना का मारतो तुला काही समजते का? असे बोले असता त्याला राग अनावर झाला. तुझा काय संबंध बोलण्याचा. मला विचारणारा तु कोण असे म्हणत आरोपी रविंद्र याने पॅन्टच्या उजव्या खिशातील बाजुस चाकू काढला व तुला आज जिवंत सोडणार नाही असे म्हणुन चाकू काढून अंगावर धावुन पोटावर सपासप वार केले. पुन्हा वार करण्यासाठी गेला असता गावातील लोकांनी त्याला पकडले. मात्र, नितीन कानवडे हे गंभीर जखमी झाल्याने ते रक्तबंबाळ अवस्थेत खाली पडले. त्यांना तात्काळ उचलुन गावातील दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. परंतु, घाव मोठा असल्याने शहरातील खाजगी दवाखान्यात पुढील उपचारासाठी आणले.

          दरम्यान, नितीन कानवडे हे आत्यावस्थेत असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. ते शुद्धीवर आल्यानंतर पोलिसांनी घेतलेल्या जबाबावरून रविंद्र भाऊसाहेब बागडे (रा. निमगावपागा, ता. संगमनेर) याच्यावर हाफमर्डरसह गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास काळे करत आहे. आरोपी सर्वांसमोर वार करून अद्यापही फरार आहे. त्यामुळे, आरोपी रवींद्र बागडे याला तात्काळ अटक करून कारवाई करावी अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे.