माझे गैरवर्तन तुझ्या आईला सांगितले तर तुझ्यावर अॅसिड फेकेल, आरोपीचा मुलीच्या आई आणि भावावर हल्ला, तिघांवर गुन्हा.!
सार्वभौम सह्याद्री (संगमनेर) :-
संगमनेर तालुक्यातील जोर्वे परिसरात इयत्ता 12 वीत शिकणाऱ्या मुलीसमोर गैरवर्तन केले. हे सर्व कृत्य व तुझे नाव आईला सांगते असे म्हणताच तो म्हणाला की, आईला नाव सांगितले तर वडगावपानला ऍसिड हल्ला झाला तसे करीन असे म्हणताच पिडीत मुलगी घरात गेली. जेव्हा आई वडील आले तेव्हा जाब विचारण्यासाठी गेले असता त्यांच्यावर कोयता हातोडीने मारहाण केल्याची धक्कादायक घटना मंगळवार दि. 24 मार्च 2026 दुपारी 12:30 वाजण्याच्या दरम्यान घडली. यात सार्थक राजेंद्र बलसाने, आश्विनी राजेंद्र बलसाने, भविष्य राजेंद्र बलसाने (सर्व रा. जोर्वे, ता. संगमनेर) यात तिघांवर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस करत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पिडीत 17 वर्षीय मुलीचे आई वडील हे मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. ते सकाळी 8 ते 10 वाजण्याच्या दरम्यान घरातून कामाला जातात व संध्याकाळी 7 वाजता घरी येतात. पिडीत मुलगी ही 12 वीचे शिक्षण पूर्ण करून घरीच आहे. पिडीत मुलीच्या घरापासून काही अंतरावर बलसाने यांचे घर आहे. त्यांचे व पिडीत मुलीच्या घरच्यांचे तीन महिन्यांपुर्वी किरकोळ कारणावरून वाद झाले होते. त्यामुळे दोन्ही कुटुंब आपापसात बोलत नाही. मात्र, आरोपी सार्थक बलसाने हा काही कामधंदा करत नसुन तो घरीच असतो. तो मोठं मोठ्याने शिवीगाळ करत असतो. दि. 24 मार्च 2026 रोजी देखील 12:30 वाजण्याच्या दरम्यान त्याने पिडीत मुलीला पाहुन गैरवर्तन सुरू केले. पिडीत मुलीला राग अनावर झाला तिने आरोपी सार्थक बलसानेला बोली की, तुझे नाव आईला सांगेल त्यावेळी तो म्हणाला की, आईला नाव सांगितले तर वडगावपान सारखा ऍसिड हल्ला करीन अशी धमकी दिल्याने पिडीत मुलगी ही घरात जाऊन बसली.
दरम्यान, पिडीत मुलीचे आई वडील हे सायंकाळी 7 वाजता घरी आले. त्यावेळी पिडीत मुलीने आरोपी सार्थक बलसाने याने केलेले कृत्य सांगितले. तेव्हा पिडीत मुलीच्या आईला राग आला त्यांनी घरातील नातेवाईक बोलवले. ते 7:30 वाजण्याच्या दरम्यान जाब विचारण्यासाठी गेले. तेव्हा आरोपी सार्थक बलसाने याने केलेल्या गैरवर्तन बाबत विचारणा केली. त्यावेळी दोन्ही कुटुंबात शाब्दिक बाचाबाची सुरू होऊन आरोपी सार्थक याने घरातुन कोयता आणला तर आईने हातोडी आणुन मारहाण सुरू केली. त्यावेळी आरोपी सार्थक याने पिडीत मुलीच्या भावाला पाठीत कोयत्याने दुखापत केली. तर पिडीत मुलीला हतोडीने मारहाण करून शिवीगाळ दमदाटी करून धमकी दिली. भांडणाचा आवाज एकूण आजूबाजूचे लोक जमा झाले त्यांनी भांडणे सोडवली. त्यानंतर पिडीत मुलीने व नातेवाईकांनी पोलीस ठाणे गाठले व घडलेली सर्व कैफियत पोलिसांना सांगितली त्यानंतर संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात आरोपी सार्थक राजेंद्र बलसाने, आश्विनी राजेंद्र बलसाने, भविष्य राजेंद्र बलसाने (सर्व रा. जोर्वे, ता. संगमनेर) यात तिघांवर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस करत आहे.
दरम्यान, जोर्वे गावातील महिलांनी उपविभागीय पोलीस अधीक्षक कुणाल सोनवणे यांना निवेदन दिले आहे. आरोपी सार्थक बलसाने याच्या गैरकृत्यांचा त्यांनी पाढाच वाचला आहे. त्याच्या वारंवार गैरवर्तनूकीमुळे गावातील नागरिकांना त्रास होत असल्याचे या पत्रात म्हणले आहे. आता त्याने अल्पवयीन मुलीला तुला ऍसिड टाकुन कायमची संपुन टाकू अशी धमकी दिली. त्याच्यावर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे, सार्थक बलसाने याच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर्वे गावातील महिलांनी निवेदनातुन केली आहे.
