छातीत चाकू भोकसून खून : तिघांना जन्मठेप, 20 हजार दंड, वडगावच्या चिकन शॉपवर झाली होती मारामारी.!
सह्याद्री सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथे चिकन शॉपवर दोन कुटुंबात मारहाण झाली होती. त्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली होती.पोलीस ठाण्यात तक्रार केल्याचा राग मनात धरून दुसऱ्या दिवशी पुन्हा वाद झाले या वादात बाळासाहेब माधव चत्तर यांच्या छातीवर पोटावर धार-धार चाकूने वार करून खुन केल्याची धक्कादायक घटना 22 जुन 2020 रोजी वडगावपान परिसरात घडली होती. हत्या केल्यानंतर आरोपीला तात्काळ ताब्यात घेतले होते. आरोपी राहुल देविदास काळे(रा.वडगावपान,ता. संगमनेर), देविदास हरिभाऊ काळे (रा. वडगावपान,ता. संगमनेर) रामनाथ सावित्रा गायकवाड, महेश संपत सुपेकर (रा. संगमनेर) यास सहाय्यक पोलीस निरीक्षक पप्पु कादरी यांनी तात्काळ अटक केली होती. त्यानंतर पप्पु कादरी यांनी या गुन्ह्याचा सखोल तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सोमवार दि. 30 मार्च 2026 रोजी जिल्हा सत्र न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली. सरकारी वकील जयंत दिवटे यांचा युक्तीवाद आणि सबळ पुरावे यांच्या आधारे जिल्हासत्र न्यायाधीश व्ही. बी. गव्हाणे यांनी आरोपी राहुल देविदास काळे यास जन्मठेप व वीस हजार रुपयांचा दंड, देविदास हरिभाऊ काळे यास दहा वर्षे साधी कैद व सोळा हजार रुपये दंड, रामनाथ सावित्रा गायकवाड यास दहा वर्षे सक्तमजुरी व सोळा हजार रुपयांची दंडाची शिक्षा ठोठावली आहे तर दोघा जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. ही शिक्षा म्हणजे आरोपी राहुल काळेचा गुन्हेगार कार्यकाळ संपवणारी आहे अशा प्रतिक्रिया जनतेतून उमटत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, प्रविण बाळासाहेब चत्तर यांनी रविवारी दि. 21 जुन 2020 रोजी देविदास हरीभाऊ काळे याच्यासह अन्य एका महिलेसोबत शाब्दीक चकमक व मारामारी झाली होती. याबाबत प्रतिक चत्तर हे काळे यांना समजून सांगत असताना काळे याने त्याच्या हातातील दगड त्यास फेकून मारला. त्यामुळे प्रतिकच्या डोक्याला लागला होता. त्यावेळी काळे यांने बाळासाहेब चत्तर यास ठार मारण्याची धमकी दिली होती. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सोमवारी 22 जुन रोजी राहूल देविदास काळे, देविदास हरिभाऊ काळे व रामनाथ सावित्रा गायकवाड यांनी काल झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन चत्तर यांच्या चिकन शॉपवर जाऊन त्यांनी शिवीगाळ दमदाटी सुरू केली. तर राहुल काळे याने त्याच्या हातातील चाकुने बाळासाहेब चत्तर यांच्या पोटात चाकु खुपसत त्यांची हत्या केली होती. तसेच त्याचा मुलगा प्रतिक याच्या दंडावर आणि पाठीवर वार करुन घटनास्थळाहून पळ काढला होता.
दरम्यान, पोलीस उपअधीक्षक रोशन पंडीत यांनी घटनेची चौकशी सुरू केली. रोशन पंडीत यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासी अधिकारी पप्पु कादरी यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर पोलिसांनी मुख्य आरोपी राहुल काळे याचा शोध सुरू केला. पोलिसांनी पुणे, नाशिक, नगर, औरंगाबाद अशा विविध जिल्ह्यात त्याचा शोध घेण्यासाठी फिल्डिंग लावली होती. मात्र, पप्पु कादरी यांना एक धागा सापडताच त्यांनी आरोपी राहुल काळे यास नगर येथुन अटक केली होती. तर राहुल काळे हा गंभीर गुन्ह्यातील आरोपी असून देखील त्यास त्याच्या मित्रांनी आश्रय दिला. त्यामुळे, महेश संपत सुपेकर (रा. मुळशी, ता. पुणे) या दोघांनी केली होती. राहुल काळे याची गुन्हेगारी पार्श्वभूमी होती. त्यामुळे गावात त्यांची दहशत आहे. ही दहशत मोडीत काढण्यासाठी पोलिस उपअधीक्षक रोशन पंडीत यांनी त्यास बेड्या ठोकून गावातून फिरविण्याचे ठरवले. पोलिसांनी गुन्हेगारांची भिती कमी करण्यासाठी चक्क त्यांला गावभर फिरविले. त्यामुळे पोलिसांचे नागरिकांनी कौतुक केले होते. काही दिवसांनंतर आरोपी राहुल काळे याला पुढे जाऊन शिक्षा लागेल या भीतीपोटी त्याने सराईत गुन्हेगारांसोबत जेल तोडून पसार देखील झाला होते. परंतु, स्थानिक गुन्हे शाखेने दोन दिवसात पकडुन त्याच्या मुसक्या आवळल्या होत्या.
दरम्यान, जेव्हा ही घटना घडली तेव्हा फिर्यादी प्रतीक चत्तर हा गंभीर जखमी होता. त्याने दवाखान्यात उपचार सुरू असताना पोलिसांना जबाब दिला. त्यानंतर पोलिसांनी खबरदारी घेऊन घटनास्थळ गाठले. तात्काळ घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. घटनास्थळावरील भौतीक पुरावे गोळा करून असे अनेक इव्हडन्स सहाय्यक पोलीस निरीक्षक पप्पु कादरी यांनी जमा केले. एक सबळ दोषारोपपत्र न्यायालयात ठेवण्यात आले. त्यानंतर हा खटला 2020 ते 2026 या काळात सुरू राहीला. यामध्ये 15 साक्षिदारांची साक्ष नोंदवण्यात आली. त्यामध्ये महत्वाची वैद्यकीय अधिकारी संदिप कचेरिया यांची साक्ष झाली. सहाय्यक पोलीस निरीक्षक पप्पु कादरी यांनी अनेक सबळ पुरावे व परिस्थितीजन्य पुरावे न्यायालयात सादर केले होते. त्याच्या आधारावर सरकारी वकील जयंत दिवटे यांनी प्रबळ युक्तीवाद करून प्रतिवाद्यांचा युक्तिवाद खोडून काढला. त्यानंतर दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपी राहुल देविदास काळे यास जन्मठेप व वीस हजार रुपयांचा दंड, देविदास हरिभाऊ काळे यास दहा वर्षे साधी कैद व सोळा हजार रुपये दंड, रामनाथ सावित्रा गायकवाड यास दहा वर्षे सक्तमजुरी व सोळा हजार रुपयांची दंडाची शिक्षा ठोठावली आहे. या गुन्ह्याच्या निकाला करता पैरवी अधिकारी सहाय्यक फौजदार प्रवीण डावरे, महिला पो.कॉ. नयना पंडीत, शितल तोरकडी यांनी काम केले आहे.
