संगमनेरात तलाठ्यानंतर पुन्हा तहसिलच्या क्लार्कवर ट्रॅप, 13 हजारांची मागणी, हॉटेलमध्ये ठोकल्या बेड्या.!
- सुशांत पावसे
सह्याद्री सार्वभौम :-
आश्वी येथील तलाठ्याला बेड्या ठोकून आठ दिवस देखील झाले नाही, तोच खुद्द संगमनेर तहसिल कार्यालयाच्या बाहेर तहसिलदारांचा क्लार्क कैलास विठ्ठल खाडे (रा. अकोले) याने वाटप पत्राचा आदेश करुन देण्यासाठी 13 हजार रुपयांची लाच मागितली. घटना आज गुरुवार दि. 26 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास घडली. क्लार्कने 10 हजार रोख रक्कम स्विकारली असता अहिल्यानगरच्या लाच लुचपत विभागाने त्याला बेड्या ठोकल्या आहेत. संगमनेरात लाचखोरीला काही लाज राहिली आहे की नाही? महसुलमध्ये इतका अंदाधुंद कारभार आणि दिवसा ढवळ्या भ्रष्टाचार होऊ लागला आहे. त्यामुळे, जिल्हाधिकारी यांनी महसुलच्या बाबतीत कठोर पाऊले उचलावी अशी मागणी समाजसेवकांकडून केली जात आहे. ही कारवाई पोलीस उपाधिक्षक अजित त्रिपुटे, पोलीस निरिक्षक छाया देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
याबाबत सविस्तर माहिती अशी. की, कैलास खाडे हा तहसिल कार्यालयात क्लार्क म्हणून कार्यरत आहे. येणार्या प्रत्येक व्यक्तीची अडवणुक करुन पै-पै लुटण्याचा त्याचा गोरख धंदा अनेक वर्षापासून सुरु असल्याच्या तक्रारी आहेत. त्याच्या वरिष्ठांकडे तक्रारी करुन देखील पाठीशी घालण्या पलिकडे साहेबांनी काहीच केले नाही. त्यामुळे सामान्य तक्रारदारालाच थेट लाचलुचपतची दारे ठोठावी लागली आहे. आरोपी लाचखोर याच्याकडे एक सामान्य व्यक्ती गेल्या अनेक दिवसांपासून येत होता. त्याला त्याच्या मालमत्तेचे वाटप करायचे होते. कायदेशीर सर्व गोष्टींची पुर्तता त्याने केली होती, आवश्यक असणारी कागदपत्रे देखील पुर्ण होते. तक्रारदार कैलास खाडे याच्याकडे वारंवार आदेश करण्याची विनंती करत होता. मात्र, वरिष्ठांच्या नावाखाली तो मलिदा मागत असल्याची माहिती समोर येत होती. सर्व कागदपत्र व कायदेशीर बाबी पुर्ण असून देखील पैसे कशासाठी द्यायचे.? आमच्याकडे इतके पैसे नाहीत अशी तक्रारदार यांनी विनंती देखील केली. मात्र, गेंड्याच्या कातड्याचे काही सरकारी नोकर एकतील तेे दलाल कसले..! आरोपी खाडे याने तक्रारदाराला सांगितले की काही झाले तरी पैसे लागतील.
दरम्यान, भ्रष्टाचाराला सपोर्ट करणे, कोणाला लाच देणे हे तक्रारदाराला काही पटले नाही. काम व्हावे ही अपेक्षा असली तरी 13 हजारांची मागणी पुर्ण करणे शक्य नव्हते. त्यामुळे, तक्रारदाराने थेट लाचलुचपत विभाग अहिल्यानगर यांच्याशी संपर्क केला. आपली कैफीयत मांडली आणि भ्रष्ट खाडे याच्यावर ट्रॅप करण्याचे ठरले. त्यानंतर आज आज गुरुवार दि. 26 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास तहसिल कार्यालयाच्या परिसरात ट्रॅप लावण्यात आला. तक्रारदार यांनी खाडे याला तहसिल परिसरात असणाऱ्या एका चहाच्या टपरीवर बोलावून घेतले. 13 हजारांमधील जी ठरलेली रक्कम खाडे याला द्यायची होती ती दिली आणि पैसे मोजत असताना लाचलुचपत विभागाने भ्रष्टाचारी खाडे याच्यावर झडप मारली. त्यावेळी एकच गोंधळ उडाला, नेमकी काय झाले हे कोणाच्या लक्षात येईना. मात्र, लाचखोर व्यक्तीला बेड्या ठोकल्या हे पाहून अनेक सामान्य नागरिकांनी आनंद व्यक्त केला. खरंतर खाडे हा यापुर्वी अकोले तहसिलमध्ये होता. त्याच्याकडे कुळ कायदा हा टेबल होता. तेथे देखील त्याने अनेकांना त्रास दिला, अनेक सामान्य माणसांकडून पैसा वसूल केला. जेव्हा त्याच्यावर ट्रॅप झाला तेव्हा अनेकांनी समाधान व्यक्त केल्याच्या प्रतिक्रीया मिळाला. याप्रकरणी आता गुन्हा दाखल करण्याचे काम चालु आहे.
दरम्यान, संगमनेरात आठ दिवस झाले नाही तेव्हा तलाठ्यावर लाचलुचपत विभागाने कारवाई केली होती. आता पुन्हा अव्वल कारकूनावर वाटपपत्रात 13 हजारची कारवाई झाली. खरंतर, संगमनेरचे तहसीलदार धिरज मांजरे यांनी पदभार स्वीकारल्यापासुन सर्वाधिक लाचलुचपत विभागाची कारवाई संगमनेर महसूल मध्ये झाली आहे. कधी खडीक्रेशरची गाडीला 50 हजारांचा हप्ता मागण्याचा प्रयत्न झाला. तर कधी घरकुलात वाळू उपसण्यासाठी तलाठ्यानी लाच घेतली आहे. हे रंगेहात पकडलेले तलाठी महसूल कर्मचारी असले तरी तहसीलदार धिरज मांजरे यांच्या कारभारा बाबत देखील विभागीय आयुक्तांकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. मागील काही दिवसांपूर्वी महसूलचे तलाठी, सर्कल हे निलंबित करण्यात आले असले तरी याच अकृषक जमिनीवरून नियमांची पायमल्ली तहसीलदार धिरज मांजरे यांनी केले असल्याची तक्रार देखील करण्यात आली आहे. त्यामुळे, वारंवार होणाऱ्या लाचलुचपतच्या कारवाईमुळे संगमनेर महसूल जिल्ह्यात अव्वल असल्याची चर्चा होत असुन येथे महसूल विभागात किती भ्रष्टाचार बोकाळला आहे हे न बोलेले बरे.
दरम्यान, तक्रारदार हे त्यांचे परिवारासह राहण्यास असुन त्यांचे वडीलोपार्जित शेतजमीनीचे खातेवाटप करण्यात आले आहे. ७/१२ उता-यावर स्वतंत्र पोट हिस्स्यांची नोंद तक्रारदार यांचे वडील व ३ चुलते यांचे नावाने लावण्यात आलेली आहे. ७/१२ उता-याचे संगणकीकरण करताना तक्रारदार यांचे वडीलांचे व चुलत्यांचे नावावर असलेल्या शेतजमीनीचे ७४/१२ उता-यावर तक्रारदार यांचे आत्यांची नावे लागली व पुन्हा एकत्र गट झाल्याचा दिसुन आल्याने सदर शेतजमीनीच्या ७/१२ उता-यावर चौघा भावांची स्वतंत्र पोट हिस्स्या प्रमाणे नोंद करणेबाबत तकारदार यांचे चुलत्याचे नावे तहसिल कार्यालय, संगमनेर येथे अर्ज केला होता. सदर अर्जामधील दिनांक ०५/०२/२०२६ रोजीच्या सुनावणी मध्ये तहसिल कार्यालय, संगमनेर येथे तक्रारदार यांचेसह त्यांचे वडील, तीन चुलते व तीन आत्या हजर होत्या व सुनावणी दरम्यान आरोपी कैलास खाडे हा हजर राहुन त्यांनी तक्रारदार यांचे चुलत्यांचे अर्जप्रकरण तहसिलदार, संगमनेर यांचेसमक्ष सादर केले होते. त्यानंतर दिनांक ११/०२/२०२६ ते २३/०२/२०२६ पावेतो आरोपी खाडे याने तक्रारदार यांना फोन करून त्यांचेकडे त्यांचे चुलत्यांनी दाखल केलेल्या अर्जप्रकरणाच्या' सुनावणीमध्ये मदत केल्याचे मोबदल्यात' तसेच तहसिलदार, संगमनेर यांनी सदर अर्जप्रकरणामध्ये दिलेल्या निकालाच्या आदेशाची प्रत देण्याचे मोबदल्यात १३००० हजार रूपये लाचेची मागणी करत असले बाबतची तकार ला.प्र.वि.कार्यालयात दि. २५/०२/ २०२६ रोजी तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीप्रमाणे दिनांक २६/ ०२/ २०२६ रोजी तहसिल कार्यालय येथे लाचमागणी पडताळणी वेळी यातील आरोपी लोकसेवक कैलास विठठल खाडे महसुल सहायक , तहसिल कार्यालय, संगमनेर जि. अहिल्यानगर यांनी तकारदार यांचेकडे तकारदार यांच्या चुलत्यांच्या नावे दिलेल्या अर्जामधील सुनावणीमध्ये मदत केल्याचे मोबदल्यात व तहसिलदार संगमनेर यांनी सदर अर्जामध्ये दिलेल्या निकालाच्या आदेशाची प्रत देण्याकरीता १३,०००/- रूपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती १०,०००/- रूपये लाचेची मागणी करून स्विकारण्याची संमती दर्शवली व दिनांक २६/ ०२/२०२६ रोजी यशस्वी सापळा कारवाई दरम्यान आरोपी लोकसेवक खाडे यांनी तहसिल कार्यालय, संगमनेर येथील शेजारील जय श्रीराम चहाच्या टपरीजवळ तकारदार यांचेकडुन पंचासमक्ष १ ०,० ०० /- रुपये लाचेची रक्कम स्विकारली आहे.
