वायरमनने मागितली 50 हजारांची लाच, हॉटेल चालकाचा लाचखोरीला करंट, गणेश दातीरला ठोकल्या बेड्या.!


सार्वभौम (संगमनेर) :- 

                एका हॉटेलव्यवसायाचा निंबाळे परिसरात डीपी वरून चोरून लाईटीचा वापर सुरू होता. ती चोरी कंत्राटी वायरमन यांनी पकडली असता त्याने पन्नास हजार रुपयांची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार आज शुक्रवार दि. 5 जुन रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास घडला. यात गणेश माधव दातीर (रा.पिंप्रीलौकी, ता.संगमनेर) याला नगर लाचलुचपत पथकाने बेड्या ठोकल्या आहे. लाचखोर दातीर याने ही रक्कम स्वीकारली नसली तरी तक्रादार यांच्याकडे वारंवार पैश्याचा तगादा लावला. त्यामुळे, तक्रादार यांनी थेट लाचलुचपत विभागाकडे तक्रार करून आज दुपारी त्याला ताब्यात घेतले असुन त्याची संपत्ती, बँकखाते, घरझडती यासाठी पुढील प्रक्रीया सुरू केली आहे. यात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर याप्रकरणी नगरलाचलूचपत पथकाने ही दमदार कामगिरी केली आहे.

         याबाबत सविस्तर माहिती अशी की, कोल्हेवाडीरोड येथे एक नामांकीत हॉटेल आहे. या हॉटेलला मोठ्या प्रमाणात वीज पुरवठा लागतो. या हॉटेल व्यवसायिकांनी हा वीजपुरवठ्याचे पैसे वाचवण्यासाठी त्यांनी चोरून विजचा वापर सुरू केला. या  हॉटेलला वीज पुरवठा चोरून वापरत असल्याची माहिती लाचखोर दातीर याला मिळाली.  लाचखोर दातीर याने हॉटेल वरती जाऊन चोरून वापरत असलेला विज पुरवठा पकडला. लाचखोर दातीर याने वरिष्ठ अधिकारी यांची भीती घालुन तुमच्यावर कारवाई करतो असे सांगितले. परंतु, हॉटेल व्यावसायिक यांनी सांगितले की, आपण वरिष्ठांकडे न जाता इथेच मिटून घेऊ. त्यावेळी लाचखोर दातीर यांनी पैश्यांची मागणी सुरू केली. तेव्हा आपण वापरत असलेला विजपुरवठा याने पकडला, त्याची वायर देखील काढून घेण्यात आली. मंग याला पैसे द्यायचे कसले. त्यामुळे, तक्रारदार यांनी लाचखोर वायरमन दातीर याला पैसे देण्यास टाळाटाळ केली असता लाचखोर दातीर यांनी हॉटेल व्यावसायिकांवर कारवाईची भाषा सुरू केली.

         दरम्यान, लाचखोर दातीर हा हॉटेलवरील कारवाई टाळण्यासाठी तक्रादार यांच्याकडे खिशाला न परवडणारी रक्कम मागू लागला. तो पैश्यांसाठी हॉटेल व्यवसायच्या मालकाला त्रास देऊ लागला. कधी हॉटेलवर तर कधी तक्रादार याना कॉल करू लागला. त्याची अवाजवी रक्कमेला तक्रादार हे वैतागले त्यांनी थेट नगरलाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर नगरचे पथक आज दुपारी थेट संगमनेरात दाखल झाले. तक्रादार हॉटेल चालक हे त्यांच्या मतावर ठाम होते. त्यामुळे, लाचलुचपत विभागाने थेट निंबाळे येथे सापळा रचला. तो निंबाळे परिसरात असताना लाचखोर वायरमन गणेश दातीर यांनी तक्रारदाराकडे पन्नास हजार रुपयांची लाच मागितली असता लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले. आज दुपारी याप्रकरणाची सखोल चौकशी सुरू होती. यात आणखी कोण आहेत का? यांनी यापुर्वी कोणाकडे अशी मागणी केली आहे का? यांच्या घरात तसेच बँकेत किती मालमत्ता आहे. आशा प्रकारची पुढील कारवाई सुरू आहे. तक्रारदार यांच्या हॉटेलवरती वारंवार कारवाई होत असल्याने या पाठीमागे काही वादाची किनार होती का? अशी चर्चा गावात आता रंगु लागली आहे.       

दरम्यान, संगमनेर तालुक्यात किती भ्रष्टाचार बोकाळला आहे याची प्रचिती आता येऊ लागली आहे. संगमनेरात असे कुठले शासकीय व निम्नशासकीय कार्यालय राहिले नाही की, जिथे लाचलुचपत विभागाने छापा मारला नाही. त्यामुळे, येथे प्रत्येक शासकीय कार्यलयात भ्रष्टाचार होत असल्याची चर्चा संगमनेरातील सुज्ञ नागरिक करत आहे. अगदी पोलीस खात्यात अधिकाऱ्यांपासुन ते कर्मचाऱ्यांपर्यंत छापे मारल्याचे संगमनेरात पाहायला मिळाले. येथील हप्तेखोरीची अनेकदा अधिकाऱ्यांकडे तक्रारी झाल्याचे पाहायला मिळत आहे. इतकेच काय.! सर्कलपासून ते तलाठी यांच्यावर कितीवेळा ट्रॅप होताना दिसत आहे. त्यामुळे, या वर्षी लाचखोरीत संगमनेर तालुका जिल्ह्यात अव्वल असल्याचे बोलले जात आहे.