एका विद्यालयाच्या सेक्रेटरी व कॅशियरने 2 लाखांची मागणी केली, 50 हजार घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात, शिक्षक भरती करताना पैशांची मागणी

 

- सुशांत पावसे 

सार्वभौम (संगमनेर) :-

               संगमनेर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणार्या एका विद्यालयात पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती होऊन देखील भविष्यात फुल पगार मिळण्यासाठी विद्यालयाचे सह सेक्रेटरी व कॅशियर यांनी एका शिक्षकाकडे 3 लाख रुपयांची मागणी केली. यात तडजोडी अंती 2 लाख देणे ठरले, त्यातील 50 हजार रोख आणि नंतर  1 लाख 50 हजार देतो असा सौदा यांच्यात झाला होता. मात्र, अभ्यास करुन भरती व्हायचं आणि पुन्हा यांना पैसे द्यायचे हे काही तक्रारदार यांना योग्य वाटत नव्हते, तक्रारदार हे यापुर्वी पुणे महानगरपालिकेत कार्यरत होते, त्यामुळे लाच घेणे आणि देणे हे त्यांना योग्य वाटले नाही. त्यामुळे त्यांनी थेट नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानंतर, आज शुक्रवार दि. 27 जून 2025 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास नाशिकच्या पथकाने संबंधित विद्यालयाच्या परिसरात सापळा रचला आणि सह सेक्रेटरी बाबुराव राजाराम गवांदे (रा. मालदाड रोड, संगमनेर) व चंद्रभान काशिनाथ मुटकुळे (रा. चिकणी, ता.संगमनेर, जि. अहिल्यानगर) अशा दोघांना 50 हजार रुपये रोख घेताना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमकी शाळा सुटायच्या दरम्यान हा प्रकार घडल्यामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी सायंकाळी चौकशी सुरु होती, यात बर्‍यापैकी  राजकीय हस्तक्षेप होत होता, मात्र, रात्री उशिरा याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कामगिरी नाशिक लाचलुचपत पथकाने केली. 

            तक्रारदार यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, माझी नियुक्ती पुणे महानगरपालिका शाळेत शिक्षक (शिक्षण सेवक) म्हणुन झाली होती, त्यानंतर दुस-या फेरीत माझी नियुक्ती संगमनेर शहरातील एका नामांकीत संस्थेत २० टक्के अनुदानित तत्वावर झाली. त्यानंतर मी संस्थेचे मुलाखतीमध्ये उत्तम गुण मिळविल्याने त्यांनी माझी शिक्षक पदासाठी नियुक्ती केली आणि तसे नियुक्तीपत्र देखील दिले होते. त्यावेळी मी माझे पुर्वीचे पदाचा रितसर राजीनामा देवुन  दि. २० सप्टेंबर २०२४ रोजी शिक्षक म्हणून संगमनेर येथे रूजू झालो होतो. दि. २४ जून २०२५ रोजी मी शालेय कामकाजामध्ये व्यस्त होतो. त्या दरम्यान दुपारी माझे मोबाईलवर संस्थेचे लेखनिक चंद्रभान मुटकुळे यांचे दोन मिसकॉल आलेले दिसले. म्हणुन मी त्यांना फोन केला आणि विचारले. की, सर तुम्ही कॉल केला होता का? तेव्हा ते म्हणाले, तुम्हाला संस्थेचे सह सेक्रेटरी बाबुराव गवांदे यांनी संस्थेचे कार्यालयात भेटावयास बोलावले आहे असा निरोप दिला.

           

दरम्यान, पुढे फिर्यादीत म्हटले आहे. की, त्यानुसार मी काही वेळाने दुपारी अंदाजे २.३० वाजण्याच्या सुमारास संस्था कार्यालयात गेलो आणि संस्थेचे सह सेक्रेटरी गवांदे यांना भेटलो. तेव्हा तेथे संस्थेचे लेखनिक मुटकुळे हे देखील उपस्थित होते. सह सेक्रेटरी गवांदे सर म्हणाले की, तुम्ही २० टक्के अनुदानित पदावर सह शिक्षक म्हणून काम करीत आहात. भविष्यात पुढील टप्पा अनुदान ४० टक्के, ६० टक्के याप्रमाणे १०० टक्के पर्यंत शासनाचे अनुदान वाढणार आहे, त्याप्रमाणे तुम्हाला भरपुर पगार मिळणार आहे, हे सगळे माझे हातात आहे. माझे शिवाय तुमचे कोणतेही काम होणार नाही. महाराष्ट्र शासनाने जरी तुम्हाला पवित्र पोर्टल मार्फत या संस्थेत पाठविले असले तरी देखील तुमचे सगळे भविष्य माझे हातात आहे. कारण तुम्ही शासनाकडुन नियुक्त झालेले असल्यामुळे संस्थेचे आर्थिक नुकसान झालेले आहे. त्यामुळे संस्थेचे आर्थिक नुकसान भरून काढावयाचे असल्याने वेळ वाया न घालवता तुम्ही संस्थेला ३ लाख रूपये आणुन जमा करा.

            गवांदे पुढे म्हणाले की, आम्ही इतर शासनाकडुन आलेल्या लोकांकडुनही ५ ते १० लाखापर्यंत पैसे जमा केलेले आहे. फक्त तुच असा एकटा आहे की, ज्याने आजपर्यंत एकही रूपया दिलेला नाही. त्यामुळे तुला भविष्यात सर्व काही सुरळीत चालु द्यायचे असेल व वेळेवर अनुदान घ्यायचे असेल येत्या तर २-३ दिवसात ३ लाख रूपये माझेकडे आणुन दे व याबाबत कोणालाही सांगू नको. दरम्यान, त्यावर संबंधित शिक्षक त्यांना म्हणाले की, माझी नियुक्ती परीक्षा देवुन शासनातर्फे झालेली आहे, त्यामुळे मी कशासाठी पैसे देवु, त्यावर त्यांनी सर्व संस्थांमध्ये असेच चालते व सर्व संस्थाचालक असे पैसे घेतात. तुझे भविष्यात होणा-या सर्व आर्थिक बाबी संस्थेच्या हातात आहेत. तुझे करीयरची ही सुरूवात आहे, जर तु पैसे आणुन दिले नाही तर, तुझे करीयर बरबाद करू शकतो एवढे माझेकडे अधिकार आहेत अशी धमकी त्यांनी दिली. 

          दरम्यान, संस्थेचे सह सेक्रेटरी  बाबुराव गवांदे यांच्याकडे विनंती केली पण त्यांची काही मानसिकता झाली नाही. ते पैसे घेण्यावर ठाम होते. त्यानंतर तडजोडी अंती 2 लाख रुपये देण्याचे ठरले होते. त्यातील 50 हजार रोख द्यायचे होते. याबाबत फिर्याद यांनी थेट नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली, त्यानुसार हे पथक संगमनेर येथे दाखल झाले. त्यांनी सापळा रचला, संबंधित रक्कम घेऊन शिक्षक शुक्रवार दि. 27 जून 2025 दुपारी 4:00 वाजता घेवुन संस्थेच्या कार्यालयात गेलो तेथे पंचांच्या समक्ष संस्थेचे सह सेक्रेटरी बाबुराव गवांदे यांची भेट घेतली त्यावेळी मी त्यांना सांगितले मी 50 हजार रूपये आणले आहेत बाकीचे पैसे नंतर देतो, माझी नियुक्ती शासनातर्फे झालेली असतांना पैसे का घेतात असे विचारले असता त्यांनी संस्थेत प्रत्येक जण घेतो असे म्हणाले त्यानंतर मी 50 हजार रूपये लाचेची रक्कम देण्यासाठी पॅन्टचे खिशातुन काढुन त्यांचे समोर धरले असता त्यांनी प्रथम नोटांना हात लावला व लागलीच लेखनिक मुटकुळे यांना आवाज दिला त्यावेळी नोटांचे बंडल माझे हातातच होते. लेखनिक मुटकुळे हे आल्यानंतर त्यांनी मुटकुळे यांना पैसे घेवुन मोजण्यास सांगितले. लेखनिक मुटकुळे यांनी लाचेची रक्कम माझेकडुन स्विकारली, त्याक्षणी दोघांना पथकाने ताब्यात घेतले असे फिर्यादीत म्हटले आहे. 

 दरम्यान, आता पवित्र पोर्टल च्या माध्यमातून काही संस्थेवर शिक्षक भरती होते आहे. त्यात अकोले व संगमनेर सह अनेक संस्थांमध्ये भरती प्रक्रिया राबविली जात आहे. यात देखील मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होण्याची शक्यता आहे. अनेक पात्र शिक्षकांकडून लाखो रुपयांच्या रकमा मागितल्या जात आहे. संस्थेच्या विकासासाठी भिकार्यासारखी रक्कम मागून मोठा भ्रष्टाचार होताना दिसतो आहे. त्यावर अंकुश राखण्यासाठी अशा प्रकारे जर कोणी पैसे मागत असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

           

दरम्यान, दरम्यान, संगमनेर तालुक्यात किती भ्रष्टाचार बोकाळला आहे. याची प्रचिती येऊ लागली आहे. इथे नित्कृष्ट दर्जाचे कामकरून कोट्यावधीचा भ्रष्टाचारा होत असल्याचे पाहायला मिळते. जलजीवन मिशनचे असंख्य तक्रारी आहे. यामध्ये अनेकांचे हात मलिद्याने बरबटलेले आहे. बांधकाम कामगार घोटाळ्यात संगमनेर अव्वल असल्याची चर्चा होत आहे. यामध्ये अनेक एजंट लोकांनी शासनाची फसवणुक करून लाखो रुपये स्वतःच्या फायद्यासाठी घशात घातले आहे. त्यामुळे, कामगार आयुक्तांनी यामध्ये लक्ष घालावे अशी मागणी आता होत असुन दोषींवर कारवाईची मागणी होत आहे. अनेक कर्मचाऱ्यांचे तक्रारी होतात. पण, तक्रारीची दखल घेतली ते अधिकारी कसले? त्यांचे हात जर मलिद्याने बरबटलेले असले तर ते काय कारवाई करणार असा प्रश्न संगमनेरातील सुज्ञ लोकांना पडला आहे. इथे कोट्यावधीचे विकास काम होत असले तर भ्रष्टाचार किती होतो हे न बोलले बर! त्यामुळे, येथे प्रत्येक शासकीय कार्यलयात भ्रष्टाचार होत असल्याची चर्चा संगमनेरातील सामाजिक कार्यकर्ते करत आहे. अगदी पोलीस खात्यात अधिकाऱ्यांपासुन ते कर्मचाऱ्यांपर्यंत  छापे मारल्याचे संगमनेरात पाहायला मिळाले. येथील हप्तेखोरीची अनेकदा अधिकाऱ्यांकडे तक्रारी झाल्याचे पाहायला मिळत आहे. इतकेच काय! सर्कल पासुन ते तलाठी,कोतवाल यांच्यावर कित्येकवेळा ट्रॅप होताना दिसत आहे. त्यामुळे, ह्या वर्षी लाचखोरीत संगमनेर तालुका पुन्हा जिल्ह्यात "अव्वल" होतो की काय अशी चर्चा सुरू होत आहे. 

           दरम्यान, मांडवे गावातील तलाठ्यावर पन्नास हजार रुपयांची लाच मागितल्याने लाचलुचपत पथकाने करावाई केली होती. तो तेथुन पसार झाला होता. महिना उलटून देखील त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले नाही. त्यामुळे, कारवाई होऊन देखील आरोपी मोकाट सुटतात कसे? त्यांना कोणी पाठीशी घालते का? खडी क्रेशरची गाडी चालावी म्हणुन एक तलाठी पन्नास हजार घेत असेल तर रात्रीचे वाळू, मुरूम चालवण्यासाठी किती रुपये मोजले जात असेल हे न बोलेले बरे. स्वतः आमदार अमोल खताळ हे वाळूची गाडी पकडतात. मात्र, महसुल विभाग झोपेचे सोंग घेऊन मोठ्या प्रमाणात मलिदा घेते असल्याची चर्चा वारंवार होत आहे. कारण, एका तलाठ्याची शेतकऱ्यासोबत संभाषण करताना पोटहिस्सा साठी पैसे दिल्याची व्हिडीओ व्ह्यायरल झाली. मात्र, कारवाई फक्त गावातील सजा बदलणे. त्यामुळेच, महसुल अधिकारीच कर्मचाऱ्यांना पाठीशी घालत असल्याची चर्चा होत आहे.