महायुतीत अद्याप सावळा गोंधळ, कोणी माघार घेईना अन उमेदवार काय ठरेना.! गुन्हेगारांच्या टोळ्या सक्रीय राजकारणात.!
सह्याद्री(सार्वभौम): -
संगमनेर नगरपालिका निवडणूक अर्ज भरण्याची अंतीम तारीख आता जवळ येत असुन कार्यकर्त्यांची निवडणुकीच्या रणांगणात उतरण्याची तयारी सुरू आहे. मात्र, महायुतीकडुन नगराध्यक्षासह उमेदवारांचा तिढा सुटलेला नसुन भाजप व शिवसेना नगराध्यक्षपदावर दावा करताना दिसुन येत आहे. खरंतर, शिर्डी लोकसभा आणि संगमनेर विधानसभेला ही जागा शिवसेना शिंदे गटाला सोडल्यामुळे आता नगराध्यक्षपदाला भाजप दावा करत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर अजित पवार गटाची राष्ट्रवादी देखील माघार घ्यायला तयार नाही. त्यामुळे, तीन तिघाडी कानबिघाडी पाहायला मिळत आहे. आता नगराध्यक्षपदाचा हा श्रेय वादाचा चेंडु मुंबईच्या दरबारात असुन हा तिढा कसा सुटणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र,जसा विधानसभेला सर्व नेते एक करून ना. विखे पाटलांना यश आले तसे पुन्हा येईल का? असे राजकीय अभ्यासकांना वाटते. परंतु, नगरपालिका निवडणूकीत महायुतीकडुन आयाराम गयाराम यांना संधी मिळते. की, निष्ठावंतांच्या पदरात तिकीट हे पाहणे देखील आता उत्सुकतेचे ठरले आहे.
खरंतर, संगमनेर विधानसभा निवडणुकीत आ. अमोल खताळ हे निवडून आले. त्यानंतर सर्वच निवडणूका आता चुरशीच्या होणार असे चित्र दिसु लागले. परंतु, पहिली निवडणूक कारखान्याची लागली. महायुतीकडुन तिच्या बैठका घेण्यात आल्या. कारखाना ताब्यात घेऊ आशा वलग्ना होऊ लागल्या. परंतु झाले काय कारखाना निवडणुकीत माघार घेऊन निवडणूक बिनविरोध सोडली. त्यानंतर आता नगरपालिका निवडणूक लागली. 10 तारखे पासुन अर्ज भरण्यासाठी सुरवात झाली. तरी देखील नगराध्यक्षपदाचा प्रभावी चेहरा समोर आला नाही. त्यामुळे, महायुतीत एकात एक नाही आणि बापात लेक नाही. अशीच गत पाहायला मिळत आहे. आजपर्यंत विरोधात होते तेव्हा तहान लागली विहीर खोदत होते. यामुळे नगरपालिकेत बोटावर मोजण्या इतके नगरसेवक देखील कधी येत नव्हते. आता एक जिवाने लढण्याची वेळ आली. तर महायुतीचे पदाधिकारी वाटाघाटीच्या श्रेयवादात पडले.
दरम्यान, भाजप व राष्ट्रवादी हे एकमेकात नगरसेवकांची वाटाघाटी तयारी दाखवत आहे. मात्र, मुस्लिम समाजातील वार्ड मध्ये राष्ट्रवादीला तिकीट देऊन धन्यता मानत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरोगामी विचार सोडला नसला तरी आ. संग्राम जगताप यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे जिल्ह्यातील मुस्लिम समाज नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांच्या निषेधार्थ मोर्चा काढताना देखील जिल्ह्यात पाहिले आहे. त्यामुळे, संगमनेरात राष्ट्रवादी आता ओबीसी कार्ड खेळण्याच्या तयारीत आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांच्या विचारांचे मोठ्या प्रमाणात लोक असल्याने त्याचा फायदा उचलण्याच्या तयारीत आहे. असा दावा राष्ट्रवादीचे पदाधिकारी आता करत आहे. तर माजी खा. सुजय विखे पाटील यांनी भाजप मोठा भाऊ असल्याची भूमिका स्पष्ट केली आहे. भाजप आता नगराध्यक्षासह किती उमेदवार घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परंतु, मागील वेळेस सौ. दुर्गा तांबे, आप्पाशेठ केसेकर, शौकत जहागीरदार, ज्ञानेश्वर कर्पे या चौरंगी लढतीत काय झाले हे सर्वांसमोर स्पष्ट चित्र आहे. तर आ. अमोल खताळ यांनी उमेदवारांची यादी तयार आहे. एक दोन दिवसात सर्व उमेदवार जाहीर होऊन जनतेच्या मनातील नगराध्यक्षाचा उमेदवार मिळेल असा दावा केला आहे.
*गुन्हेगारांच्या टोळ्या निवडणुकीत सक्रीय*
संगमनेर शहरात महायुती कडुन व शहर विकास आघाडी कडून कुठलाही नगरसेवक पदाला उमेदवार जाहीर झाला नाही. मात्र, जुगार अड्डे क्लबवर असणारे तरुण, मटका व गंभीर गुन्ह्यात असणारे काही लोक या निवडणुकीत सक्रीय झाले आहे. सोशल मीडियावर पोस्टर टाकतात. वरती नेत्यांचे फोटो टाकतात. आणि जनतेत प्रचार करत असतात. त्यामुळे, जनतेत देखील पक्षांची प्रतिमा डागळण्याची शक्यता आहे. आशा उमेदवारांपासुन आम्ही दोन हात लांब आहे असे बोले जाते. मात्र, निवडणुकीत यांचा वापर केला जात असल्याचे पाहायला मिळत आहे. तर संगमनेर शहरात गेली अनेकदिवसांन पासुन गुन्हेगारीचा आलेख वाढत आहे. त्यामुळे, या तरुणांपासुन कोणाच्या मतांची वाढ होते की अडचणीचे हा येणारा काळच ठरवेल.
