अकोल्यात अद्य क्रांतीकारक राघोजी भांगरे यांच्या पुतळ्याची विटंबना, दोन ठेकेदारांवर गुन्हा दाखल, आमदारांची निधी.!

सार्वभौम (अकोले, राजूर) :- 

 शासनाची कोणतीही परवानगी न घेता आदिवासी बांधवांचे आराध्य दैवत अद्य क्रांतीकारक राघोजी भांगरे यांचा पुतळा उखडण्यात आला. त्यांचा चबुतरा तोडून पुतळा अडगळीच्या ठिकाणी ठेवण्यात आला. ही गोष्ट समाजसेवक पोपट चौधरी यांना समजली असता त्यांनी तेथे काम करणार्‍या कर्मचार्‍यांना विचारणा केली. तसेच ठेकेदारांना देखील याबाबत जाब विचारला. मात्र, ठेकेदारांनी प्रशासनावर लोटून दिले. त्यानंतर चौधरी यांनी पी.डब्लु.डी अधिकार्‍यांना विचारले असता त्यांनी सांगितले. की, आम्ही फक्त सुशोभिकरण करण्यासाठी परवानगी दिली होती. पुतळा काढणे आणि त्याची विटंबना याबाबत आमचा काही एक संबंध नाही. त्यानंतर पोपट चौधरी यांनी थेट पोलीस ठाणे गाठले. लोकप्रतिनिधींचे ऐकूण ठेकेदार काहीही कारभार करीत असतील तर ते खपून घेतले जाणार नाही. दैवताची विटंबना झाल्याचे पाहून चौधरी यांनी राजूर पोलीस ठाण्यात उपस्थित राहून ठेकेदार अजित बाळु नवले (रा. पाडाळणे, ता. अकोले) व शैलेंद्र गणपत पांडे (रा. अकोले, जि. अहिल्यानगर) अशा दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी. की, पोपट चौधरी हे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत. ते यापुर्वी आमदार डॉ. किरण लहामटे यांचे कार्यकर्ते राहिले आहेत. मात्र, आमदारांकडून योग्य वागणूक न मिळाल्याने जसे अनेक कार्यतर्के त्यांना सोडून गेले तसा चौधरी यांनी देखील रामराम केलेला आहे. तेव्हापासून चौधरी यांची आदिवासी बांधवांची समाजसेवा सुरु आहे. अद्य क्रांतीकारक राघोजी भांगरे हे आदिवासी बांधवांचे आराध्य दैवत असून त्यांची जन्मस्थान देवगाव येथे आहे. त्यामुळे, त्यांचे दर्शन घेण्यासाठी चौधरी नेहमी देवगावला जात असतात. नेहमीप्रमाणे ते आज बुधवार दि. १० सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ४ वाजता देवगाव येथे गेले होते. तेथे क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या स्मारकाच्या आजुबाजुचे सुशोभिकरण चालु होते. नव्याने होणार्‍या कामाचा त्यांना आनंद होता त्यामुळे, चौधरी यांचे कामावर देखील लक्ष होते. त्यांनी कामगारांचे कौतुक देखील केले.

मात्र, क्रांतीकारक राघोजी भांगरे यांचे दर्शन घेण्यासाठी चौधरी पुढे गेले असता त्यांना नेहमीच्या जागेवर पुतळा दिसला नाही. पुतळ्याची जागा पुर्णत: तोडलेली होती. त्याचे विचित्र पद्धतीने नुकसान केलेले दिसून आले. त्यामुळे, तेथे काम करीत असलेल्या कर्मचार्‍यांना चौधरी यांनी विचारणा केली. की, या चबुतर्‍यावर असणारा पुतळा कोठे आहे? हा चबुतरा कोणी तोडला, आमच्या आराध्य दैवताचा पुतळा कोठे ठेवला? त्यावर कामगारांनी सांगितले. की, आम्हाला ठेकेदारांनी सांगितले आहे. तर पुतळा त्या बाजुला ठेवला आहे. जेव्हा चौधरी आणि त्यांच्या सोबत असणारे सचिन धोंडू भोंगरे, दत्तात्रय भिवा भांगरे आणि मुरलीधर नानाजी भांगरे हे पुतळा शोधत असताना त्यांनी पाहिले. की, फार मोठा इतिहास असणारे, आदिवासी बांधवांचे दैवत, क्रांतीवीर राघोजी भांगरे यांचा पुतळा जमिनीवर ठेवला आहे, तो अडगळीत टाकला असून पुतळ्याची विटंबाना केली आहे. त्यामुळे, चौधरी यांना प्रचंड दु:ख झाले.

दरम्यान, चौधरी आणि उपस्थित आदिवासी बांधवांनी ठेकेदार अजित बाळु नवले व शैलेंद्र गणपत पांडे यांना याबाबत माहिती विचारली असता. त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे समाधानकारक उत्तर मिळाले नाही. तर, हा पुतळा मंगळवार दि. ९ सप्टेंबर २०२५ रोजी काढल्याची माहिती मिळाली. याप्रकरणी पोपट चौधरी यांनी या घटनेबाबत पी.डब्लु.डी अधिकार्‍यांना विचारणा केली. त्यावर अधिकार्‍यांनी सांगितले. की, आम्ही फक्त सुशोभिकरण करण्याचे सांगितले आहे. अद्य क्रांतीकारक राघोजी भांगरे यांच्या पुतळ्याला काही करु नका अशी सुचना होता. त्यामुळे, आमचा आणि त्यांनी केलेल्या कृत्याचा काही एक संबंध नाही. हा प्रकार काही वेळात संपुर्ण अकोले तालुक्यात पसरला, काही क्षणात शेकडो कार्यकर्ते देवगावकडे रवाना झाले. तर त्यांनी घटनेच्या ठिकाणी जाऊन निषेध नोंदविला. त्यानंतर ही घटना आदिवासी बांधवांना माहित होताच त्यांनी राजूर पोलीस ठाणे गाठले. तेथे शेकडो बांधवांनी पोलीस ठाण्याच्या बाहेर ठिय्या आंदोलन केले. संबंधीत घटनेतील दोषी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक सरोदे यांनी अजित बाळु नवले (रा. पाडाळणे, ता. अकोले) व शैलेंद्र गणपत पांडे (रा. अकोले) अशा दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

भाग दोन उद्या, हा उद्योग कोणाचा..!!