हुकुमशहावर लोकशाहीचा विजय, देवगावातील क्रांतीकारी बंड यशस्वी.! पाकीट पुढारी व सुपारी बहाद्दारांमुळे अकोले अस्वस्थ.!
सर्वभौम अकोले :-
अद्य क्रांतीकारक राघोजी भांगरे यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर अकोले तालुक्यात काही विघ्नसंतोषी व्यक्तींनी दोन समाजात तेढ निर्माण करुन दिली होती. त्यावर शिवाजी राजे धुमाळ यांनी सगळ्यांच्या इज्जतीचा पंचनामा केला होता. स्वत:ला सजग नागरिक आणि आम्ही बहुजन या गोंडस नावाखाली पाकीट पुढार्यांनी लोकप्रतिनिधींच्या सुपार्या घेऊन त्यात तालुक्याचे वातावरण दुषित केले होते. मात्र, अमित भांगरे आणि वैभव पिचड यांच्यासह काही समझदार आदिवासी बांधवांमुळे या वादावर पडदा पडला. ही एक बाजु असली तरी दुसरीकडे पुतळ्याहून पेटलेला वाद शांत करण्यापेक्षा आम्ही नवाच पुतळा बसवु, आम्ही म्हणू तेच होईल, आम्ही म्हणजे सर्व काही असा उर बडविणार्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना देवगाव ग्रामस्थांनी चांगलीच कानशीलात लगावली. ज्या हुकुमशाही पद्धतीने पुतळा पाडला होता, त्या विरोधात गाव एकवटले आणि लोकशाही पद्धतीने अद्य क्रांतीकारक राघोजी भांगरे यांच्या पुतळ्याची विधीवत पुर्णस्थापना करण्यात आली.
आदिवासी बांधव आणि आदिवासी नेत्यांना विश्वासात न घेता अद्य क्रांतीकारक राघोजी भांगरे यांचा पुतळा पाडण्यात आला होता. निधी आणायचा आणि तो वाट्टेल तसा वापरायचा ही हुकुमशाही भुमिका देवगावच्या ग्रामस्थांनी कडेलोट केली. जो निधी आणला किमान तो वापरताना जागा कोणाची आहे, त्याला परवानगी घ्यावी लागेल, ग्रामस्थांशी चर्चा करावी लागेल, पुतळ्याची रचना, जुन्या पुतळ्याचे काय करायचे, दोन पुतळ्यांमध्ये दिसणारी संदिग्धता, पुतळा काढल्यानंतर त्यांची काळजी, काढताना घ्यावी लागणारी काळजी, जागा मालकाची परवानगी, ग्रामपंचायतीचा ठराव, सुशोभीकरण करताना पुतळा काढण्याची गरज होती का? शासनाची परवानगी आहे का? अशा अनेक बाबी पुढे आल्या. या सगळ्या प्रक्रियेत ठेकेदार अजित नवले आणि शौलेंद्र पांडे यांची भावनिक दृष्ट्या कोणतीच चुक नाही. मात्र, कायदेशीर दृष्ट्या त्यांची चूक नक्कीच आहे. त्यांचा हेतू शंभर टक्के चांगला होता. मात्र, ज्याने त्या दोन्ही तरुणांना पुतळा काढण्याचे आदेश दिले तो नेमकी भाकरीच खात होता की शेण? हा प्रश्न अनेकांना पडला आहे. कारण, पडद्याआड दडलेल्या या व्यक्तीमुळे निरापराध दोन तरुणांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले आहे. इतकेच काय.! तर यात जे मजूर पुतळा पाडण्यासाठी होते त्यांना देखील प्रशासन आरोपीच्या पिंजर्यात उभे करण्याच्या प्रयत्नात आहेत. यापलिकडे ज्या अधिकार्यांनी एका खाजगी जागेत कोट्यावधी रुपयांचा निधी दिला, त्याची अंमलबजावणी केली त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल होणे अपेक्षित आहे. त्यांच्याकडून संबंधित रक्कम शासनाने अदा करणे अपेक्षित आहे. त्यामुळे, भविष्यात शासनाने असे कायदेशीर पाऊल टाकले. तर, या अधिकार्यांच्या जाती पाहून येथील पाकीट पुढारी भविष्यात मोर्चे, आंदोलने आणि पत्रकार परिषदा घेताना दिसून आले तर वाईट वाटण्याचे काहीच कारण नाही.
या नेत्यांमुळेच अडचणी वाढतात..
अकोले तालुक्यात वेगवेगळ्या टोळ्या निर्माण झाल्या आहेत. कोणी सुपारी घेऊन काम करत आहे. तर कोणी दारु आणि मटनासाठी लाळचाटी भुमिका घेत आहे. व्यक्तीची जात पहायची आणि त्याच्या पाठीशी बहुजन म्हणून उभे रहायचे. मात्र, चुक झाली त्याचे खंडण करण्यासाठी चुकीच्या पद्धतींचा अवलंब करायचा ही भुमिका अधिक रुजत चालली आहे. चुकीला चूक म्हणण्याची दानत राहिली नाही. किंवा आम्ही म्हणजे कायद्यापेक्षा मोठे आहोत ही मानसिकता पाकीट पुढार्यांची झाली आहे. उठ सुट अकोले बंद करायचे, ज्यांच्या मागे चार-दोन सुद्धा डोके नाही त्यांनी माईक पुढे आला की हजारोंचा मोर्चा काढू, याव करु त्याव करु अशा भंपक गोष्टी मीडियासमोर मांडायच्या. खायचे दात एक अन दाखवायचे एक अशी दुटप्पी भुमिका मांडणारे भाडोत्री नेते नव्याने उदयाला येत आहे. हे लोक अकोले तालुक्यातील सामाजिक शांतता भंग करु पहात आहेत. जात आणि धर्म यांचा आधार घेऊन तालुक्याच्या संस्कृतीला गालबोट लावताना दिसत आहे. त्यांचा बुरखा फाडण्याचे काम शिवाजी राजे धुमाळ यांनी जसे केले तसे अनेकांनी करणे अपेक्षित आहे. अन्यथा काल पुरोगामी ओळख असलेल्या तालुक्याची ओळख बिहार झाल्याशिवाय राहणार नाही आणि यांच्या असल्या फालतू राजकीय अस्थित्वासाठी, दारु मटणांसाठी किंवा पाकीटासाठी हे असेच चालु राहिले तर अकोल्यात देखील नक्षलवाद तयार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून गोंडस नावाने रिकाम्या उचापती करणार्यांनी आत्ताच थांबून घेणे सामजिक सलोख्यासाठी नित्तांत गरजेचे आहे.
तुमचा लढा तुम्ही लढा, सुपारी देऊ नका.!
या बोलघेवड्या नेत्यांमुळे समाजाचे किंवा चांगल्या मानसांचे किती नुकसान होते, ज्या कारवाया होणार नाहीत त्या होण्यासाठी परिस्थिती निर्माण केली जाते. ज्या गोष्टीला फार किंमत द्यायची गरज नाही त्या गोष्टीला अतिरिक्त किंमत देऊन राजकीय पोळी भाजली जाते याचे अनेक उदा.आपल्या समोर आहेत. त्यातील फक्त तीन उदाहरणे मांडावी वाटतात. सन २०२३ मध्ये आदरणीय विनंय सावंत साहेब यांच्यावर ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यावर अपवाद वगळता अती शहाणे यांनी अकोले गेस्ट होऊस येथे मिटींग बोलविली. तेथे टोलेजंग भाषणाबाजी झाली, साहेब तुम्ही घाबरु नका, गुन्हा असा आहे, गुन्हा तसा आहे, आपण हे करु, ते करु सावंत साहेबांसाठी भाषणांचा भडिमार झाला. मात्र, त्याच पत्रकार परिषदेत स्वत: सागर शिंदे उठून म्हणाले. की, साहेब तुम्ही कोणाचेच ऐकू नका. कायदेशीर जामीन घ्या आणि हवे तर हा गुन्हा खोटा आहे म्हणून आपण हायकोर्टात जाऊ. मात्र, गुन्हा दाखल झाला म्हणजे त्याची कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी लागेल. दुर्दैवाने अति शहाण्यांच्या नादी लागून या घटनेकडे दुर्लक्ष झाले आणि किमान चार आठ दिवस सावंत साहेबांना अटक म्हणून सामोरे जावे लागले. त्यांची अटक म्हणजे केवळ राजकीय स्टण्टबाजीचे ते बळी ठरले. याची कल्पना त्यांना नंतर झाली. त्यानंतर २०२३ मध्ये गटशिक्षण अधिकारी जालिंदर खताळ साहेब यांच्याकडून काही कायदेशीर चुका झाल्या होत्या. त्याची मालिका रोखठोक सार्वभौमने लावली होती. त्यात देखील काही पुढार्यांनी प्रचंड हस्तक्षेप केला. हे प्रकरण थेट जिल्हा परिषदेचे सीईओ साहेब यांच्या जातीवर नेवून ठेवले. केवळ काही सुपारी बहाद्दारीच्या वक्तव्यामुळे खताळ साहेब यांचे निलंबन करण्यात आले. तर अन्य दोन शिक्षकांना देखील निलंबित करण्यात आले. हे सर्व श्रेय्य फक्त आणि फक्त पाकीट पुढार्यांना जाते. मात्र, हा सर्व प्रकार शिक्षकांच्या लक्षात आल्यानंतर ज्या १४ शिक्षकांनी या पुढार्यांच्या नादाला लागून सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्यांना शासकीय नियम अट व शर्तींचे उल्लंघन केल्याबद्दल कारवाई का करु नये अशी नोटीस पाठविली होती. त्या सर्व शिक्षकांनी तेव्हा शिक्षक बँकेत सागर शिंदे यांची भेट घेऊन विनंती केली. तेव्हा तक्रार मागे घेतल्यानंतर एकही शिक्षकावर कारवाई झाली नव्हती, हा सामोपचाराचा मार्ग होता. मात्र, पाकीट पुढार्यांनी तिघांना निलंबीत करण्याचे भाग्य आपल्या माथी घेतले होते.
त्या पाकीट पुढार्यांमुळेच तरुण अडचणीत.!
खरंतर अद्य क्रांतीकारक राघोजी भांगरे यांच्या पुतळ्याची विटंबना असा आरोप केला जात होता. त्यात अजित नवले आणि शौलेंद्र पाडे असे दोघे आरोपी होते. मुळात जर या तथाकथीत पुढार्यांनी तालुक्यातील वातावरण दुषित केले नसते. तर, या मुलांना जामीन मिळणे अधिक सोपे गेले असते. वकीलांनी त्यांची बांजु जशी मांडली तशी तेव्हा देखील मांडली असती. मात्र, या घटनेला नको तसा रंग दिला गेला. खरंतर यात पोपट चौधरी यांच्या वकीलांनी ठरविले असते तर फार प्रबळ युक्तीवाद करता आला असता. मात्र, अमित भांगरे, बी.जे.देशमुख, अजित नवले, दशरथ सावंत साहेब हे आदल्या दिवशी पोलीस उपाधिक्षक यांच्या दालनात जाऊन बसले होते. आरोपींना जामीन मिळण्यास काहीच हरकत नाही अशी विनंती केली होती. अर्थात थेट जामीन द्या अशा प्रकारचा युक्तीवाद करता येत नाही. त्यामुळे काही गोष्टी कायद्याच्या चौकटीबाहेर असतात. मात्र, यात फिर्यादीने सहकार्य केले नाही असे कोणाचे म्हणणे असेल तर तो त्यांचा आडबंगपणा आणि मी म्हणजे कायद्याचा बादशाह असाच असेल. अर्थात ऍट्रॉसिटीत जामीन मिळत होता तर उपोषण करायची काय गरज होती. केस मागे घ्या अन्यथा आम्ही फाशी घेतो असा दबाव टाकायची काय गरज होती. म्हणजे तालुक्यात गुन्हा दाखल झाला की अशी प्रकारे फिर्यावर दबाव टाकणे ही प्रथा रुजू होऊ पहात आहे. मात्र, तरी देखील पोपट चौधरी यांचे सहकार्य नंतर नाकारले गेले ही फार दुर्दैवी बाब आहे. तसेही ऍट्रॉसिटीत चांगला युक्तीवाद झाला तर जामीन होतो. मात्र, तालुक्यात काही विदुषक व्यक्तींनी जे राजकारण केले, नेत्यांच्या सुपार्या घेऊन सामाजिक आणि जातीय तेढ निर्माण केली ती या तरुणांचे जामीन फेटाळण्यासाठी पुरक होती. मात्र, सलोख्याने हा प्रकार मिटला हे एक बाजू असली तरी वकीलांचा युक्तीवाद देखील तितकाच महत्वाचा ठरला.