तालुक्यात जातीय तणाव लावून आका गेले देव दर्शनाला.! हे म्हणजे असे झाले.! सौ चूहे खा के बिल्ली चली हज को.! खरे दोषी कोण.!
सार्वभौम (अकोले) :-
अद्य क्रांतीकारक राघोजी भांगरे यांचा पुतळा पाडून त्यांची विटंबना झाली. त्यात दोन ठेकेदारांना आरोपी करण्यात आले. मात्र, असे बोलले जाते. की, हे काम पांडे आणि नवले हे ठेकेदार करीत नव्हते. तर, एक कोटी रूपयांचे हे काम वाळे अर्थात लोकप्रतिनिधींचे कलेक्टर करीत असल्याचा आरोप होत आहे. आता या खोलात आपल्याला जायचे नाही. मात्र, जो कोणी काम करीत होता. त्याने राघोजी भांगरे यांचा पुतळा काढला त्यासाठी कोणाची परवानगी घेतली होती? तो पुतळा इतका सर्वसाधारण होता का? जो इतक्या सहज उखडून टाकता येणे शक्य होते, तो पुतळा म्हणजे यांची खाजगी मालमत्ता होती का? जी कधीही नेस्तनाबुत करता येईल आणि कधीही उभारता येईल, आम्ही निधी आणतोय आणि देतोय म्हणजे उपकार करतो, आम्ही काहीही पाडू आणि काहीही उभे करू, सरकार, कायदे आणि समाज आमच्यापुढे शुन्य आहे अशा अविर्भावात येऊन जो मनमानी कारभार करण्यात आला. त्या दादागिरी आणि मी म्हणजे मुख्यमंत्री आणि मी म्हणजे कलेक्टर या हुकूमशाही वृत्तीचे बळी म्हणजे पांडे आणि नवले आहे.
अर्थात अद्य क्रांतीकारक राघोजी भांगरे यांचा तो जगातील पहिला पुतळा होता. मग त्याचा जिर्णोद्धार करणे म्हणजे शंभर टक्के कौतुकाचे आणि अभिमानाचे काम आहे. पण, मी म्हणजे तालुक्याचा बाप, माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही, मी बोले आणि तालुका हाले ही मानसिकता आज दोन निरापराध तरुणांना गुन्हेगार ठरवून गेली आहे. लेकरं जेलमध्ये आणि गुन्हेगार मात्र मस्त मौजमजा करीत फिरता आहेत. देशात कायद्याचे राज्य आहे, त्यात महाराष्ट्र राज्य येते आणि अकोले तालुका देखील त्यात मोडतो, त्या अकोल्यात प्रशासन नावाचा प्रकार असतो. तो फक्त टक्केवारी घेऊन आणि मलिदा खाण्यासाठी नसतो तर त्यात पुतळा उभारणे आणि पुतळा काढणे याच्या परवानग्या देखील असतात. हेच आपले नेते विसरुन गेले आहे. त्यामुळे, मी सांगतोय तो पुतळा उखडून टाका आणि मी सांगतोय तो पुतळा बसवा, जनतेच्या भावना आणि स्थानिक स्वराज्य संस्था व कार्यकर्त्यांना विचारायची काहीच गरज नाही अशा प्रकारची हुकूमशाही तालुक्यात पहायला मिळाली आहे. त्या हेकड स्वभावाचे बळी म्हणजे बहुजन समाजाची दोन लेकरे आरोपाच्या पिंजर्यात उभे राहिले आहेत.
खरंतर तालुक्यात विकासाची अनेक कामे झाली. त्याबाबत कौतुकच आहे. पण, त्याची गुणवत्ता पहायची असेल तर अगदी सहा महिन्यांपुर्वी राजूरच्या पुढे कोतुळ फाट्याहून पुढे चितळवेढे रोड झाला आहे. त्या मार्गाने जो जाऊन दाखवेल त्याला एक हजार रुपयांचे बक्षिस जाहिर केले पाहिजे. अर्थात हे धाडसाचे काम कोणी करणार नाही. त्यामुळे, मलिद्याचा टक्का वाढल्याने क्वालिटीचा टक्का पुर्णत: घसरुन गेला आहे. तरी देखील एकही ठेकेदार ब्लॅकलिस्ट नाही ना कोठे क्वालिटी कंट्रोल कार्यरत आहे. त्यामुळे, विकासाच्या नावाखाली प्रचंड मोठी धुळ जनतेला चारली जात आहे. अर्थात ठेकेदार करणार तरी काय? गुतली गाय आणि फटके खाय.! पेमेंन्ट गुतल्यामुळे बंड पुकारणे शक्य होत नाही. त्यामुळे, ठेकेदारांना नेता जे सांगेल ते गुपचूप ऐकूण घ्यावे लागत आहे. त्याचाच एक प्रत्येय म्हणजे राघोजी भांगरे यांचे स्मारक पाडायला लावले आणि आता पळकुट्याची भुमिका घेतली. दुर्दैवाने त्या लेकरांना वाचविण्याऐवजी येथील काही दलालांना सुपारी देऊन हकनाक ठेकेदार तरुणांना आणखी अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.
अर्थात एक पुतळा बसविण्यासाठी केवळ नेत्याची परवानगी चालत नाही. किंवा निधी मिळाला म्हणजे सर्व काही झाले, आम्ही बोले तैसेच चाले असा गोड गैरसमज आदिवासी बांधवांनी धुळीस मिळविला आहेत. या हेकेखोरपणाचा परिणाम बिचार्या ठेकेदारांना भोगावा लागत आहे. पुतळा करायचाच होता तर स्थानिक नेत्यांना अर्थात जे समाजाचे प्रतिनिधित्व करतात अशा व्यक्तींना तरी विश्वासात घ्यायला पाहिजे होते. देवगाव ग्रामपंचायत आणि तेथील सरपंच, पदाधिकारी ज्येष्ठ मंडळी यांच्याशी चर्चा करायला पाहिजे होती. प्रशासनाच्या माध्यमातून आवश्यक त्या परवानग्या घ्यायला पाहिजे होत्या, जिल्हाधिकारी ते ग्रामपंचायत यांच्याशी पत्रव्यवहार करुन काही ठराव घेणे अपेक्षित होते. ज्यांनी पै-पै जमा करुन १५ ते २० वर्षापुर्वी राघोजी भांगरे यांचे स्मारक उभारले त्यातील ज्येष्ठ मंडळींना विश्वासात घ्यायला पाहिजे होते. पुतळा काढताना त्याची विधीवत पुजा करायला पाहिजे होती, ज्येष्ठांच्या हातून किंवा समाजासाठी योगदान असणार्यांच्या हातून पुतळ्याला हार घालुन त्याला व्यवस्थित ठिकाणी ठेवणे अपेक्षित होते. अद्य क्रांतीकारक राघोजी भांगरे यांचा नवा पुतळा आणि जुना पुतळा यांच्यातील साम्य जनतेच्या निदर्शनास आणून द्यायला पाहिजे होते. जेणे करुन समाजात एकच व्यक्तीरेखा दोन चेहर्यांनी सभ्रमीत होतील असा गैरसमज पसरला नसता. जे काही करायचे होते ते व्यक्तीगत मालकीसारखे न करता समाजाला सांगून, विश्वासात घेऊन काम करणे अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नाही.
आम्ही पैसा आणलाय, आम्ही काम करतोय मग ते कसे करायचे ते आम्ही ठरवू या अविर्भावापोटी आज जनतेच्या भावनांचा बांध फुटला आणि जनता रस्त्यावर उतरली. मात्र, या सगळ्या चुकांमध्ये दोन निरापराध उमद्या तरुणांचा गुन्ह्याच्या माध्यामातून बळी गेला. तालुक्यात जातीय वातावरण पसरत असताना दिल्लीत नेत्यांच्या भेटी गाठी घेणे इतके महत्वाचे होते का? मात्र, निरापराध लेकरांना जेलमध्ये टाकून विकासाच्या नावाखाली तालुक्यातून पळ काढणे हे अनेकांना योग्य वाटले नाही. ? स्वत: चुका करायच्या आणि दुसर्यांना भोगायला लावून देत देवदर्शन करीत बसायचे, हे म्हणजे असे झाले. की, सौ चूहे खा के बिल्ली चली हज को.!
उद्या क्रमश: भाग ३