मी शब्द देतो.! शिवसैनिकांना जो धोका डॉ. लहामटेंनी दिला, तो मी देणार नाही. माझा कान धरुन जाब विचारा- अमित भांगरे

सार्वभौम (अकोले)-

सन २०१९ साली पिचड साहेबांनी भाजपात प्रवेश केला आणि तेव्हा खर्‍या अर्थाने जनतेने निवडणुक हाती घेतली होती. मतदारांचा पक्ष कोणता? हे त्यांना देखील माहित नव्हते. पण, फक्त वैभव पिचड यांचा पराभव करणे हेच अंतीम उद्दीष्ट होते. त्यामुळे, अकोेले तालुक्यातील सर्वात कट्टर शिवसैनिकांनी देखील स्वत:चा पक्ष सोडून डॉ. लहामटे यांना मतदान केले होते. मात्र, झालं काय? निवडून आल्यानंतर साहेब म्हणू लागले. वाकड्या आणि सुदाम्याची काहीच गरज नव्हती, एकट्या श्रीकृष्णाने दगड लोटून दिला असता. त्यामुळे, शिवसैनिक आणि अन्य मतदार की ज्यांनी २०१९ च्या परिवर्तनाच्या लाटेत सहभाग घेतला होता. त्यांच्या कष्टाचे मोल शुन्य झाले. निवडणुकीनंतर डॉ. लहामटे यांनी कधीच शिवसैनिकांना जवळ घेतले नाही. उद्धव ठाकरे किंवा आज महायुतीत असून एकनाथ शिंदे यांचे फोटो सुद्धा बॅनरवर लावले नाही. कधी शिवसैनिकांचे फोन घेतले नाही. त्यामुळे, झक मारली आणि मदत केली अशा प्रकारच्या प्रतिक्रिया शिवसैनिकांनी कालच्या मेळाव्यात व्यक्त केल्या आहेत. आम्हाला डॉ. लहामटे यांनी कोलुन दिले, आता तुम्ही देखील त्याच वळणीवर जाऊ नका अशी विनंती शिवसैनिकांनी केली असता. अमित भांगरे म्हणाले. की, मी शब्द देतो.! शिवसैनिकांना जो धोका डॉ. लहामटेंनी दिला, तो मी देणार नाही. अन्यथा खा. भाऊसाहेब वाकचौरे आणि खेवरे नाना यांनी माझा कान धरुन मला जाब विचारावा..!!

त्यानंतर अमित भांगरे म्हणाले. की, डॉ. किरण लहामटे हा असा व्यक्ती आहे. जो महायुतीकडून उभा असून देखील त्यांनी भाजपाचे नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणविस, चंद्रशेखर बावनकुळे, शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांचे फोटो बॅनरवर लावले नाही. म्हणजे, शिंदे यांनी सुरु केलेल्या सरकारच्या योजना आणि त्यातून मिळणारी मते चालतात, एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये राहून त्यांनी दिलेला निधी चालतो.  पण, बॅनरवर त्यांचे फोटा चालत नाही. इतका स्वार्थीपणा करणारा हा व्यक्ती आहे. महायुती म्हणून निवडणुक लढविणार्‍यांचे फोटो यांना चालत नाही. तर, यांना शिवसैनिक काय चालणार आहे? गळ्यात फक्त भगवे परिधान करुन चालत नाही. तर, त्या भगव्याची शिकवण आहे. सर्वांस पोटास लावणे आहे. ही शिकवण अंगीकारली पाहिजे. मात्र, गडी एकटा निघाला हे वाक्य आम्ही वारंवार ऐकले आहे.

गद्दारांना जागा दाखवून देऊ.!

खरंतर २०१९ मध्ये काय झाले हे आता महत्वाचे नाही. पण, आता शिवसैनिकांनी गद्दारांना धडा शिकविण्यासाठी एकत्र आले पाहिजे. उद्धव ठाकरे यांना या महायुतीने प्रचंड त्रास दिला आहे. साहेबांनी राजिनामा दिला आणि घराकडे जात असताना लाखो शिवसैनिकांच्या डोळ्यात पाणी होते. का? तर केवळ आपलेच गद्दार निघाले. त्यामुळे, साहेब फ्लोअर टेस्टला देखील सामोरे गेले नाही. पण आपला, चिन्ह आपले तरी त्यावर अधिकार सांगून सगळी शिवसेना फोडली. आता हा हिशोब आपल्याला चुकता करायचा आहे. हे डॉ. लहामटे त्याच भाजपाचे उमेदवार आहेत. त्यामुळे, ज्यांनी आपल्याशी गद्दारी केली. त्यांना त्यांची जागा दाखविल्याशिवाय आपण शांत बसायचे नाही. त्यामुळे, शिवसैनिकांनी एकत्र या, लोकसभेला जशी आपली ताकद दाखविली. तशी विधानसभेला दाखवा. कळुद्या या तालुक्याला. की, या तालुक्यात किती कट्टर आणि जागरुक शिवसैनिक आहे. म्हणून अमित भांगरे यांना प्रचंड मतांनी विजयी करा.

- रावसाहेब खेवरे (संपर्कप्रमुख)

मला विश्‍वास आहे, अमित तसा नाही.!

सुरूवातीला अडिच वर्षे सरकार होते. मात्र, आमदार म्हणून लहामटे यांनी कधीच आम्हाला जुमानले नाही. कधी मान सन्मान दिला नाही. कोठे प्रतिनिधीत्व दिले नाही. २०१९ ला  हजारो शिवसैनिक त्यांच्या सोबत गेले. मात्र, त्यांनी शिवसैनिकांचा साधा फोन सुद्धा उचलला नाही. कधी शिवसैनिकांची कामे केली नाही. पण, आता सर्व शिवसैनिक जागरुक झाले आहे. ते महाविकास आघाडीसोबत असणार आहे. मला विश्‍वास आहे, जसे डॉ. किरण लहामटे यांनी धोकेबाजी केली. तसा अमित नाही याची मला खात्री आहे. त्यामुळे, येणार्‍या काळात आम्हाला प्रतिनिधीत्व मिळेल, आमच्या कार्यकर्त्यांची कामे होतील, मान सन्मान मिळेल अशी मला खात्री आहे. त्यामुळे, यंदा आपल्याला भाजपाचे सरकार पुन्हा घरी बसवायचे आहे. गद्दारीचा हिशोब चुकता करायचा आहे. त्यामुळे, अमित भांगरे यांना तुतारी वाजविणारा माणूस हे बटन दाबून विजयी करायचे आहे.

- मच्छिंद्र धुमाळ (उबाठा-तालुकाध्यक्ष)

शिवसेना कमकुवत आहे की सक्षम.! 

अकोले तालुक्यात अशोकराव भांगरे यांनी शिवसेनेकडून निवडणुक लढविली होती. तेव्हा अवघ्या काही मतांनी त्यांचा पराभव झाला होता. तर, शिवसेनेचे बंडखोर नेते मधुकर तळपाडे यांनी देखील दोन वेळा शिवसेनेकडून उमेदवारी केली होती. त्यात देखील ५६ हजार आणि ४८ हजार मते पडली होती. त्यामुळे, राष्ट्रवादी नंतर खरा दावेदार येथे शिवसेना आहे. २०१९ मध्ये शिवसेनेचे मतदान दिसून आले नाही. त्यामुळे, ती स्थिती २०२४ मध्ये राहिली तर येणार्‍या काळात हे सिट शिवसेनेला कधीच सुटणार नाही. शिवसेनेची ताकद दिसणार नाही. कालच स्वत:ला कट्टर शिवसैनिक म्हणणारे काही महाभाग बंडखोर तळपाडे साहेबांचे कौतुक गाताना दिसले तर नंतर शिवसैनिकांच्या मेळाव्याला देखील दिमाखात मिरवताना दिसले. त्यामुळे, एकात एक नाही, अन बापात लेक नाही अशी स्थिती शिवसेनेची होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे, येणार्‍या काळात शिवसेना जिवंत ठेवायची असेल तर शिवसैनिकांनी कंबर कसून एक झाले पाहिजे आणि महायुतीच्या उमेदवाराला पराभूत करणे. ही काळाची गरज ठरणार आहे