कैलास वाकचौरे यांची अपमानापेक्षा बंडखोरी, डॉ. लहामटेंना झटका, गायकरांना टेन्शन, पिचडांना हातभार, भांगरेंना सोपस्कर.!

 

सार्वभौम (अकोले)-

जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती कैलास वाकचौरे हे भाजपात असताना मान सन्मान मिळत नव्हता. त्यामुळे, त्यांनी पिचडांच्या हाती कमळ देऊन डॉ. लहामटे यांच्या हातून घड्याळ बांधून घेतले. पण, झाले काय? अक्षरश: आगीतून उठून फुफाट्यात पडल्याची जाणिव त्यांना झाली. खुद्द सहकार महर्षी सिताराम पा. गायकर साहेब यांना गेली साडेचार वर्षे अपमान सहन करावा लागला. तर वाकचौरे कोण? त्यामुळे, तोंड दाबुन बुक्क्यांचा मारा त्यांनी गेल्या कित्तेक दिवस सहन केला. १५ वर्षे जिल्हा परिषदेवर काम करताना अनेक कार्यकर्ते वाकचौरे यांनी संभाळले. त्यामुळे, कळस गावासह शहरात आणि काही गावांमध्ये त्यांची पकड कायम राहिली आहे. वाकचौरे यांच्यामुळे, डॉ. किरण लहामटे यांना १० ते १२ हजार मतांचा फटका बसला आहे. तर, एकट्या सिताराम पा. गायकर यांचे आता टेन्शन वाढले आहे. कारण, निवडणुकीचा सगळा भार त्यांच्यावर पडणार आहे. तसेच एकीकडे भावनिक लाट निर्माण करुन वैभव पिचड हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांना पुन्हा एक सेनापती भेटल्याने अधिकचे नवचैतन्य त्यांच्यात निर्माण झाले आहे. यात एक मात्र नक्की. की, अमित भांगरे यांना कैलास वाकचौरे यांचा तोटा होणार होता. मात्र, लहामटे यांच्याकडून १० ते १२ हजार मतांचा आकडा कमी झाल्याने भांगरे यांना थोडासा दिलासा मिळाला आहे. आता वाकचौरे यांच्यामागे किती मते जातात, लोक अपक्ष उमेदवारास किती स्विकारतात, अर्थपुर्ण राजकारणात अपक्ष शेवटपर्यंत किती तग धरतात अशा अनेक गोष्टी कैलास वाकचौरे यांच्यामुळे, अनुत्तरीत झाल्या आहेत.

कायम अपमान सहन केला.!

अकोले नगरपंचायत निवडणुकीत कैलास वाकचौरे यांची जादु चालली असे अनेकजण म्हणत होते. तर, भाजपातील भाऊ समर्थक त्या गोष्टीचे खंडण करीत होते. ही तू-तू, मै-मै सुरू असताना भाजपाने रिपाईला दिलेला शब्द पाळला नाही. चंद्रकांत सरोदे यांना स्विकृत नगरसेवक आणि कॉलेजवर एक पदाधिकारी अशा प्रकारची चर्चा झाल्याचे बोलले जात होते. मात्र, गरज सरो आणि वैद्य मरो अशी भुमिका भाजपाने घेतल्यामुळे रिपाई कार्यकर्ते नाराज झाले होते. त्यांनी युतीधर्म तोडला. मात्र, यावेळी कैलास वाकचौरे यांना देखील फार वाईट वाटले होते. त्यानंतर अंतर्गत कलह निर्माण झाला आणि वाकचौरे बाहेर पडले. त्यानंतर राष्ट्रवादीत तरी मान सन्मान मिळेल असे वाटले होते. मात्र, कोणत्याही कार्यक्रमाचे निमंत्रण नाही, कधी बॅनरवर फोटो नाही, त्यांच्या कार्यकर्त्यांना कधी सामावून घेतले नाही, वाकचौरे आणि आमदार यांचा संवाद अगदी दुसवट्याच्या नात्यासारखा होता. त्यामुळे, त्यांनी राजकारणातून सन्यास घेतल्यासारखी स्थिती केली. याच दरम्यान त्यांनी कारखान्याच्या संचालक पदाचा राजिनामा देखील दिला. जेव्हा वैभव पिचड साहेबांनी अर्ज मागे घेतला नाही. त्यात वाकचौरे यांचा देखील हात होता असे म्हटले जाते. त्यांनी गेल्या चार दिवसांपासून वैभव पिचड यांना जाऊन मिळण्याची तयारी केली होती. आज अखेर प्रचंड अपमान सहन करुन त्यांनी पुन्हा भावनिक होऊन स्वगृही प्रवेश केला आहे.

डॉ. किरण लहामटे यांना झटका.!

अजित दादा गेल्या महिन्यात अकोले शहरात आले होते. त्यांनी तीन वेळा कैलास वाकचौरे यांचे नाव घेऊन डॉ. किरण लहामटे यांना निवडून आणण्याची जबाबदारी दिली होती. मात्र, वाकचौरे यांनी डॉ. किरण लहामटे यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून अपक्ष असणार्‍या वैभव पिचड यांना साथ देणे पसंत केले आहे. त्यामुळे, कळस, वाशेरे, औरंगपूर, पानसरवाडी, धामनगाव, अकोले शहर अशा अनेक गावांमधून डॉ. लहामटे यांना जो काही सपोर्ट होणार होता, तो आता होणार नाही.  कैलास वाकचौरे हे राष्ट्रावादी सोडून जाणे हे राजकीय दृष्ट्या फार झटका देणारे आहे. वाकचौरे यांच्यामागे किमान १० ते १२ हजार मतदान आहे. तर, २०२४ ची निवडणुक ही फक्त ५ ते १० हजार अशा लिडची असणार आहे. त्यामुळे, मानसांची किंमत न कळल्याचे परिणाम डॉक्टर साहेबांना भोगावे लागू शकतात असे सुज्ञ व्यक्तींना वाटते.

गायकर साहेबांचे टेन्शन वाढले.!

माझा जीव गेला तरी बेहत्तर.! पण कारखाना बंद पडता कामा नये. इतकी तळमळ असणारा हा व्यक्ती रात्रंदिवस धावतो आहे. अजित दादांच्या मध्यास्तीने एनसीडीसीतून ९४ कोटी कर्ज मिळाले म्हणून दादांनी दिलेली जबाबदारी पार पाडताना त्यांची दमछाक झाली आहे. सगळे गेले तरी दादांचे ऋण म्हणून कारखाना चालला आहे. त्यामुळे, इच्छा असो वा नसो तोंड दाबुन बुक्क्यांचा मारा सहन करावा लागतो आहे. एकला चलो रे अशा स्वभावाचे आमदार आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारे गायकर साहेब. या दोघांच्या स्वभावात जमीन आसमानचा फरक. त्यात दादांनी सभेत चार वेळा गायकर साहेबांचे नाव घेऊन डॉ. लहामटे यांना निवडून आणण्याची जबाबदारी प्रामुख्याने त्यांच्यावर सोपवली आहे. त्यामुळे, एक एक व्यक्ती बाहेर पडू लागला तर निवडणुक कशी हताळायची? नियोजन कसे करायचे? ठेकेदार म्हणजे पक्ष नव्हे तर तळागाळातील कार्यकर्ता हा निवडणुकीत कामाला येत असतो हे गायकर साहेबांना ज्ञात आहे. त्यामुळे, वाकचौरे यांची बंडखोरी गायकर साहेबांची डोकेदुखी ठरले आहे.

वैभव पिचड यांना हातभार.!

तिकडे राष्ट्रवादीत राहून आमदार आणि गायकर साहेबांच्या हाताखाली काम करण्यापेक्षा इकडे येऊन नेतृत्व केलेले कधीही चांगले.  त्यामुळे, गेली कित्तेक वर्षे पिचड कुटुंबाशी असणारे ऋणानुबंध जोपासण्यासाठी आणि संकटात त्यांना साथ देण्यासाठी वाकचौरे यांनी अचानक क्रांतीकारी निर्णय घेतला आहे. एकीकडे आईचे ऑपरेशन, दुसरीकडे वडिलांचे आजारपण यामुळे वैभव पिचड यांना निवडणुकीत फारसे लक्ष देता येणार नाही. अशात कैलास वाकचौरे हे फार महत्वाची भुमिका बाजावू शकतात. त्यामुळे, वैभव पिचड यांना वाकचौरे यांचा फार मोठा हातभार लाभणार आहे. कारण, अकोले नगरपंचायतीत देखील वाकचौरे यांनी फार मोलाची भुमिका निभावली होती. तसेच त्यांच्याकडे १९९५ पासून निवडणुकींचा अनुभव आहे. त्यामुळे, ते कठीण काळात पिचडांच्या रथाचे सारथ्य करणार आहे.

अमित भांगरे यांना फायदा होईल.!

खरंतर अपक्ष उमेदवारी ही या तालुक्यात फारशी साधक नाही. १९७७ साली देखील पिचड साहेबांनी अशा प्रकारची निवडणुक लढविली होती. मात्र, तेव्हा ते तीन नंबरला होते. त्यामुळे, सध्यस्थितीचा विचार करता महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत दिसते आहे. त्यामुळे, महायुतीतून १० ते १२ हजार मते वजा होणे. ही अमित भांगरे यांच्यासाठी जमेची बाजू आहे. तर, अपक्ष उमेदवार विजयकडे जाण्यासाठी सहाय्यभूत असली. तरी हे वाटते तितके सोपे नाही. मात्र, तुर्तास डॉ. लहामटे यांची मते कमी करणे किंवा गोठविणे हे भांगरे यांच्यापुढील आव्हान आपोआप सोपे झाले आहे. तर, मारुती मेंगाळ यांची उमेदवारी ही डॉ. लहामटे यांच्यासाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. वैभव पिचड यांनी निवडणुक केली नसती तर त्यांची मते डॉ. लहामटे यांना कधीच पडली नसती. त्यात भांगरे यांचा फायदा होता. मात्र, त्यांच्या उमेदवारीने भांगरे यांना सहकार्य झाले असते. पण, बळ कमी झाले नाही. कारण, कॉंग्रेस, डॉ. अजित नवले यांचा मार्क्सवादी, कम्युनिस्ट, शिवसेना, रिपाई यांची फार मोठी ताकद असून फक्त योग्य संघटन होणे आणि बुथ नियोजन हाच निम्मा विजय ठरू शकतो. तर, शरद पवार साहेब यांची एक सभा तालुक्याचे चित्र आणखी बदलु शकते.