-संगमनेर-अकोल्याला झुक झुक गाडी का हवीय..!

- ऍड. सागर शिंदे

सह्याद्री सार्वभौम :- 

                      अकोले व संगमनेर तालुक्यातून रेल्वे गेली पाहिजे म्हणून दोन्ही तालुक्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. नाशिक-पुणे रेल्वे मार्गाचा पहिला सर्व्हे झाला तेव्हा देवठाण पुढे बोटा रेल्वे स्टेशन होते. मात्र, हा सर्व्हे रद्द झाला आणि पुन्हा अकोले तालुक्याचे देवठाण स्टेशन वगळुन रेल्वे थेट समनापूर मार्गे निघुन गेली. त्यात फक्त संगमनेर स्टेशन होते. हा दुसरा सर्व्हे झाला तेव्हा राज्य शासनाने ३१६ कोटी रुपये खर्च करून जमिनींचे अधिग्रहन केली आणि शेतकर्‍यांच्या सातबार्‍यावर इतर हक्कात रेल्वेचे नाव देखील सामाविष्ठ केले. मात्र, दुर्दैवाने हा सर्व्हे देखील रद्द झाला आणि आता नाशिक ते शिर्डी असा प्लॅन तयार करुन त्याची प्रक्रिया मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे, संगमनेर आणि अकोले दोन्ही तालुके वंचित राहिले असून त्यांनी आपापल्या परीने आंदोलने उभी केली आहेत. खरंतर संगमनेर आणि लोणीचे नेते अकोले तालुक्याचा विचार करायला तयार नाहीत आणि अकोल्याचे नेते संगमनेर लोणीच्या नेत्यांना दुखवायला तयार नाहीत. येथे मतांचे व हिताचे राजकारण पडद्याआड दिसून येते. मात्र, अकोले तालुक्यातील सामान्य शेतकरी, मजूर, नोकरदार, व्यापारी, व्यवसायिक, प्रवासी यांना प्रमाणिकपणे वाटते आहे. की, अकोले तालुक्यातून रेल्वे गेली पाहिजे. ती कशासाठी याचे उत्तर या लेखातून आपण शोधणार आहोत.

पर्यटन :- अकोले तालुक्यात आशिया खंडातील सर्वात मोठी संदन दरी आहे, तसेच ११ टीएमसी असणारा भंडारदरा तथा क्रा.राघोजी भांगरे धरण आहे. निळवंडे धरण आहे, रंधा धबधबा आहे, आंब्रेला फॉल, घाटघर प्रकल्प, कोकणकडा, नेकलेस फॉल, भंडारदर्‍याचा रिंगरोेड, धरणातील बोटींग, तवा धबधबा, तालुक्यात मे जुनमध्ये होणारा सुप्रसिद्ध काजवा मोहत्सव तसेच पावसाळ्यात अकोले तालुका म्हणजे मिनी जम्मू कश्मीर म्हणून या तालुक्याची ओळख आहे.

देवस्थान :- जर अकोले तालुक्यातून रेल्वे गेली तर येथे साई बाबांचे मंदीर, अगस्ति महाराजांचे मंदीर, उंचखडक बु येथील राम मंदीर, रतनवाडी येथील अमृतेश्‍वराचे हेमाडपंथी मंदीर, टाकेद येथील हेमाडपंथी मंदीर, सिद्धेश्‍वर येथील ऐतिहासिक मंदीर, पुढे आझरचा गणपती, घोरपडाआई देवीचे मंदीर, धारेरावचे मंदीर, महामती आश्रम, म्हाळदेवी येथील खंडेराव महाराज, गणोरे येथील आंबाबाईचे मंदिर, निमदारीची देवी, पिंपळगाव निपाणी येथील संटुआईचे मंदीर अशी अनेक जागरुक देवस्थाने अकोले तालुक्यात आहेत. त्यामुळे, रेल्वेमुळे तेथील भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढणार आहेत.

शिक्षण :-

अकोले तालुका हा अतिशय दुर्गम भाग आहे. येथे आज देखील आदिवासी समाज जंगलातून बाहेर यायला तयार नाही. जी मुले इयत्ता १० वी १२ वी पर्यंत शिकली आहेत. त्यांना उच्च शिक्षणासाठी संधी मिळत नाही. त्यामुळे जर रेल्वेची सुविधा झाली. तर, येथील प्रत्येक विद्यार्थी विद्येचे माहेरघर असणार्‍या पुण्यात सहज जाऊ शकेल. हा विद्यार्थी पुणे, नाशिक, मुंबई येथे शिक्षणाच्या निमित्ताने जाऊ शकेल. स्पर्धा परिक्षेला जाणारे अनेक मुले चाकण किंवा अन्य ठिकाणी ट्राफिकमध्ये अडकून त्यांचे करिअर धोक्यात आले आहेत. त्यामुळे, डॉक्टर, वकिल, इंजिनियर, संशोधक आणि अन्य शिक्षणाच्या सुविधांची जवळीकता या रेल्वे मार्गाने होणार आहे.

 नोकरी व्यवसाय :- अकोले व संगमनेर तालुक्यातून अनेक लोक नोकरी निमित्त नाशिक, पुणे, मुंबई अशा ठिकाणी नोकरी किंवा व्यवसायानिमित्त बाहेर गेले आहेत. त्यांना स्वत:च्या तालुक्यात राहून जीवण जगणे आनंदाचे वाटते. मात्र, चाकण आणि पुण्यातील ट्रॉफिक पाहिली की त्यांना प्रवास नकोसा वाटतो. सिन्नर, चाकण, नाशिक अशा विविध एमआयडीसींमध्ये हजारो लोक दोन्ही तालुक्यातून कामानिमित्त बाहेर गेले आहेत. त्यांना या रेल्वे मार्गाने प्रवास सुखकर होणार आहे.

कच्चा व पक्का माल :-

नगर जिल्ह्यात अकोले तालुक्याचे क्षेत्रफळ  सर्वात जास्त आहे. तर संगमनेर येथे लोकसंख्या सर्वाधिक आहे. विशेष म्हणजे मुळा, प्रवरा, आढळा, म्हळुंगी, कृष्णावती अशा अनेक नद्या या तालुक्यातून वाहतात. हा भाग पर्जन्यछायेखाली येतो. म्हणून तर एकट्या अकोले तालुक्यात २३ टीएमसी पाणी साठा होतो. त्यामुळे, येथे शेती आणि त्याला पुरक धंदे मोठ्या प्रमाणावर आहेत. शेतातील पालेभाजी आणि आदिवासी विभागातून निघणारा काळभात व इंद्रायनी तसेच अन्य दुर्मिळ धान्यांची निमिर्ती होते. त्यांना बाजारपेठा मिळत नाही म्हणून ही रसायनमुक्त धान्य लयास चालली आहेत. या धान्यांना आणि पालेभाज्यांना शहरे जवळ करण्यासाठी रेल्वे मार्ग महत्वाची भुमिका पार पाडणार आहेत. तसेच या तालुक्यात गणपतींच्या मुर्ती, पणत्या, मडकी अशा विविध मालांची निमिर्ती होते. त्यांना मोठ्या बाजारपेठा या रेल्वे मार्गामुळे मिळणार आहे.

दळणवळण :- नाशिक, पुणे रेल्वे मार्ग अकोले-संगमनेर येथून झाला तर मोठ्या प्रमाणावर दळणवळण सुखकर होणार आहे. येथील व्यापार, व्यवसाय, शिक्षण, पर्यटन, धार्मिक स्थळांना भेटी, शेतमाल, मेडिकल सुविधा तातडीने मिळणार आहे. इतकेच काय.! तर दुर्गम भागातील आदिवासी माणूस देशाच्या संपर्कात येणार आहे. रेल्वे सुविधा निर्माण झाल्यामुळे नाशिक, पुणे, मुंबहून देशातील विविध ठिकाणी जाणे येणे शक्य होणार आहे.

दुग्धजन्य पदार्थांची निर्यात :-

राज्यात सर्वात जास्त दुध उत्पादन हे संगमनेर तालुक्यात होते. तसेच राजहंस दुधसंघ हा दोन राज्यात आपल्या दुधाची निर्यात करत असतो. त्यांचे दुधापासून निर्माण होणारे अन्य प्रोडक्ट फार लोकप्रिय आहेत. त्याला राज्यात प्रचंड मागणी आहे. तसेच अकोले तालुक्यातील अगस्ती दुधससंघ, त्यांची लस्सी, तुप, राजूरचा पेढा आणि तूप यांना बाजारात मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. जर अकोले-संगमनेर मार्गे रेल्वे झाली तर राज्याचे आणि देशाचे आर्थिक उत्पन्न वाढीसाठी हा रेल्वेमार्ग महत्वाची भुमिका पार पाडणार आहे.

सर्वात कमी अंतर :- प्राथमिक माहितीनुसार पहिला रेल्वेमार्ग केवळ २३४ किलोमिटर अंतराचा होता. त्यानंतर संगमनेर मार्गे तो अधिक लांबून गेला. आता जो शिर्डी मार्गे आहे तो ३०२ किलोमिटर अंतराचा आहे. नाशिक शिर्डी ८२ किमी, शिर्डी पुणतांबा १८ किमी, पुणतांबा ते अहिल्यानगर ७७ किमी, अहिल्यानगर ते पुणे १२५ किमी असा ३०२ किमी अंतर असून तब्बल ६८ किलोमिटर अंतर जादा झाले असून पुण्याहून पुणतांबा ही प्रचलित म्हण नाशिक-शिर्डी-पुणे मार्गाने सत्यात उतरविली आहे. म्हणून नाशिक पुणे रेल्वे मार्ग अकोले-संगमनेर मार्गे व्हावा अशी सगळ्यांची धारणा आहे. त्यामुळे, कोट्यावधी रुपयांची बचत होणार आहे. परिणामी राज्याच्या व देशाच्या तिजोरीवर कमी ताण पडणार आहे.

रोजगार निर्मित्ती :-

अकोले तालुक्यातून रेल्वे गेली तर लाखो भाविक शिर्डीच्या दर्शनासाठी येणार आहेत. दर्शन झाल्यानंतर पर्यटनासाठी   ते अकोले तालुक्यात येतील आणि बोटींग, लॉजिंग, ट्रॉव्हलिंग, हॉटेल, चहापाणी, वाहतूक अशा विविध माध्यमांतून रोजगार निर्मित्ती होणार आहे. आदिवासी व दुर्गम भागातील तरुणांच्या रोजगाराचा प्रश्‍न मार्गी लागणार आहे.

किल्ल्यांचे दर्शन :- अकोले तालुक्यात पर्यटनासाठी फार मोठा वाव आहे. येथे उशिरा सुर्य उगवणारे फोफसंडी गाव, राज्यातील सर्वात मोठे उंच शिखर कळसुबाई, छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान शिवनेरी, बाळेश्‍वर गड, राजा हरिश्‍चंद्र गड, सह्याद्रीच्या कुशितील रतनगड, अलंग मलन गड, छत्रपती शिवराय विश्रांतीला थांबले होते तो पट्टकिल्ला (विश्रामगड) असे अनेक ऐतिहासिक किल्ले अकोले तालुक्यात आहेत. ते पर्यटन व संशोधनाच्या दृष्टीकोणातून फार महत्वाचे आहेत. येथे देशी व विदेशी पर्यटक येऊ शकतात. त्यामुळेे, अकोले तालुक्यातून रेल्वे स्टेशन होणे नित्तांत गरजेचे आहे.

क्रां. राघोजी भांगरेंचे जन्मस्थान :-

जसे अकोले तालुक्यातून रेल्वे गेली तर ती जुन्नर तालुक्यातून देखील जाणार आहे. त्यामुळे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवनेरी या जन्मस्थळाला स्पर्श करून जाणार आहे. राजे जसे संबंध महाराष्ट्राचे दैवत आहे. तसे अद्य क्रांतीकारक राघोजी भांगरे हे संबंध आदिवासी समाजाचे दैवत आहेत. महाराष्ट्रातील सर्वात मोठी जयंती ही अकोले तालुक्यात होते. त्यामुळे, जसे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देशातून लोक चैत्यभुमीला येतात तसे भविष्यात राघोजी भांगरे यांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्रातून आणि देशातून आदिवासी बांधव व अभ्यासक अकोले तालुक्यात येतील. म्हणून हा रेल्वेमार्ग नित्तांत गरजेचा आहे.

चित्रपटांची निमिर्त्ती :- अकोले तालुक्याला महाराष्ट्राचे जम्मू कश्मिर म्हटले जाते. त्यामुळे येथील डोंगर दर्‍या, पाणी, नदी, नाले, धरणे, धबधबे, झरे, किल्ले, सह्याद्रीच्या पर्वतरांगा, तालुक्यातील आदिवासी संस्कृती, निसर्गाने नटलेली हिरवाई, जुन्या पद्धतीची शेती, डोंगरावर उरतणारे ढग असा अनोखा देखावा अकोले तालुक्याला निसर्गाने दिला आहे. त्यामुळे येथे फुल और काटे, जान, यंटम, नवरदेव अशा १०५ चित्रपटांची निर्मित्ती याच मातीत झाली आहे. जर येथे रेल्वे आली तर चित्रपट निर्मित्तीचे केंद्र देखील होऊ शकते.

आरोग्य/मेडिकल :-

अकोले तालुका हा अति दुर्गम भाग आहे. येथे जर एखाद्या व्यक्तीला मेंदुचा किंवा ह्रदयाचा आजार झाला तर त्याला तत्काळ संगमनेरला न्यावे लागते. तेथे देखील तात्पुरता उपचार होतो. तेव्हा अकोल्याचे पेशन्ट नाशिक, पुणे किंवा मुंबईला न्यावे लागते. अशा वेळी चाकण, पुणे किंवा अन्य ठिकाणी प्रचंड ट्राफीक लागते. जर रेल्वेमार्ग झाला तर मेडिकलच्या सुविधा जवळ होतील आणि अनेकांचे प्राण वाचतील.

पर्याय काय आहे.....?

१) जर अंतरराष्ट्रीय दुर्बिन प्रकल्पाचा अडथळा होत असेल तर नाशिक पुणे रेल्वे मागे हा आवश्यक आंतरावर भुयारी करण्यात यावा.

२) अंतरराष्ट्रीय दुर्बिन प्रकल्पाच्या पुर्वेकडून जितक्या दुरहून रेल्वे मार्ग नेला आहे. तितक्या दुरहून पश्‍चिमेकडून हा रेल्वे मार्ग न्यावा.

३) जर अंतरराष्ट्रीय दुर्बिन प्रकल्पाला रेल्वे वेगाने परिणाम होणार असेल. तर, त्या २५ किलोमिटर परिसरात रेल्वेची वेग मर्यादा कमी करावी. तथा नियमित वेग मर्यादा निर्धारीत करावी.

४) जर शिर्डी मार्ग रेल्वे न्यायचीच असेल तर सिन्नर येथे जंक्शन करुन एक मार्ग शिर्डीला आणि दुसरा मार्ग अकोले-संगमनेर मार्गे पुणे असा करावा.

५) जर अकोले-संगमनेर मार्गे रेल्वे द्यायची नसेल तर आसनगाव ते शिर्डी हा रेल्वेमार्ग मंजूर करून त्याचे काम तत्काळ सुरू करावे.

६) कसारा ते शिर्डी हा देखील रेल्वे मार्ग शक्य आहे. त्याचे अंमलबजावणी करण्यात यावी.

७) जर अंतरराष्ट्रीय दुर्बिन प्रकल्पाला अडथळा निर्माण होत असेल तर सिन्नर, अकोले, संगमनेर, जुन्नरमार्गे नव्याने सर्वेक्षण करुन अंतरराष्ट्रीय दुर्बिन प्रकल्पाच्या आवश्यक त्या अंतराने रेल्वेमार्ग निर्माण करावा.

राजकीय स्टण्ट थांबवा :-

जर रेल्वे अकोले-संगमनेर मार्गे पाहिजे असेल तर कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा नेत्याने तथा कार्यकर्त्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणे टाळले पाहिजे. राजकीय द्वेष किंवा निवडणुकींची गणिते आखण्यासाठी कोणाला टार्गेट करणे टाळले पाहिजे.

तेव्हा काय झोपले होते का:- पहिले सर्वेक्षण झाले तेव्हा कोणी त्यावर ठाम भुमिका मांडली नाही, की हाच सर्व्हे अंतीम असावा. त्यानंतर सगळ्यांच्या डोळ्यासामोर दुसरा सर्व्हे झाला आणि रेल्वे समनापुर मार्गे निघुन गेली. त्याचे भुसंपादन झाले तरी कोणी आवाज उठविला नाही. इतकेच काय.! अकोलेकरांनी तर सोडाच, संगमनेरकरांनी देखील अकोल्याचा विचार केला नाही. आता रेल्वे शिर्डीमार्गे गेली आणि सगळ्यांना जागा आल्या. संगमनेर म्हणतय आमच्या मार्गे व अकोलेकर म्हणतात आमच्या मार्गे त्यामुळे सोंग निघुन गेले अन आता सगळे जागे झाले.  

आंदोलन हायजॅक करणे :-

रेल्वेची चळवळ आता कोण्या एकाचे काम राहिले नाही. जेव्हा लढायचे होते, बोलायचे होते, आंदोलने करायची होती, संघर्ष करायचा होता तेव्हा सगळे झोपले होते. आता एकत्र या म्हणायचे आणि त्यात राजकारण करुन आंदोलन हायजॅक करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तो कोठेतरी थांबला पाहिजे. खर्‍या अर्थाने लोकप्रतिनिधिंना हे उशिरा सुचलेले शहाणपण म्हणावे लागेल. 

बैठक बोलवा :- आता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा. किंवा बाळासाहेब थोरात यांना टार्गेट करण्यापेक्षा त्यांच्याशी सामोपचाराने चर्चेला बसले पाहिजे. सोबत खा. भाऊसाहेब वाकचौरे, खा. निलेश लंके, खा. अमोल कोल्हे, खा. राजाभाऊ वाजे, आ. अमोल खताळ, आ. डॉ. किरण लहामटे, आ. आतुल बेनके, आ. दिलिपराव वळसे पा. आ. सत्यजित तांबे यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधींनी एकत्र बसले पाहिजे आणि दबावगट निर्माण केला पाहिजे.

राज्य व केंद्रावर दबाव :-

आमदारांनी रेल्वेचा मुद्दा विधानसभेत आणि खासदारांनी संसदेत अधिक प्रकर्शाने मांडला पाहिजे. विशेष म्हणजे आ. खताळ यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे, आ. लहामटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे, खा. भाऊसाहेब वाकचौरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे तर खा. अमोल कोल्हे यांनी खा. शरद पवार यांच्याकडे अशी प्रत्येक नेत्याने आपल्या वरिष्ठ नेत्यांकडे फक्त अग्रहाने नव्हे हट्टाने आणि अती अग्रहाने ही मागणी केली पाहिजे.

शिष्टमंडळ :- सिन्नर ते पुणे या रेल्वे मार्गावर जे कोणी खासदार आणि आमदार असतील त्यांनी एकत्र येवून एक शिष्टमंडळ तयार केले पाहिजे. राज्य आणि केंद्राला तथा रेल्वे मंत्र्यांना या रेल्वेमार्गाची गरज आणि पर्याय सुचविले पाहिजे. ही मागणी प्रचंड प्रकर्षाने लावून धरली पाहिजे. 

- ऍड. सागर शिंदे