तिने प्रेमात धोका दिल्याने प्रियकराची आत्महत्या, मुलीसह तिघांवर गुन्हा दाखल, अभ्यासिकेत जीवन उध्वस्त.! पालकांचा एकच टाहो.!

 

सार्वभौम (संगमनेर) :- 

                         संगमनेरातील अभ्यासिका मध्ये अभ्यासासाठी येणाऱ्या तरुणाला एका मुलीवर प्रेम झाले. मंग काय फोनवर हाय, हॅलो सुरू झाले. त्याने प्रेमात मुलीला स्कुटी घेऊन दिली. मात्र, त्यांचे प्रेमात छोट-छोट्या कारणावरुन वाद होऊ लागले. त्यानंतर मुलीने फोनवर पिडीत तरुणाला शिवीगाळ केली. आणि मुलीच्या चुलत्याने मारण्यासाठी मुले पाठवतो असा दम दिला. जेव्हा प्रेमात धोका झाला हे तरुणाला समजले तेव्हा त्याने क्षणाचाही विलंब न करता एका शेततळ्यात आपली जीवनयात्रा संपवली. ही सर्व धक्कादायक घटना 29 जानेवारी 2026 रोजी दुपारी 1:30 वाजण्याच्या दरम्यान घडली. यात दिपक लहानु हांडे (रा.शेंडेवाडी, ता. संगमनेर) हा मयत झाला आहे. त्याचा शोध घेतला असता तो कुठे ही सापडून आला नाही. जेव्हा शेततळ्यात सापडला तेव्हा तो मयत अवस्थेत होता. त्यानंतर मयत दिपकच्या आईने पोलीस ठाणे गाठले. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून तीघांवर घारगाव पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस करत आहे.

        याबाबत सविस्तर माहिती अशी की, मयत दिपकचे आई वडील हे शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. मयत दिपक हा दिड वर्षांपासून संगमनेरातील एका नामांकीत अभ्यासिकेत अभ्यास करत होता. अभ्यास झाल्यानंतर तो संध्याकाळी पुन्हा आपल्या घरी शेंडेवाडी येथे येत होता. दि. 29 जानेवारी 2026 रोजी सकाळी 8 वाजता मयत दिपक हा अभ्यासिकेत जातो असे सांगुन घरातुन निघाला. दुपारी 1:30 वाजण्याच्या दरम्यान दिपकचा आईला फोन आला. तो घाबरलेल्या स्थितीत त्याने आईला सांगितले की, प्रेयसी व तिची आई या दोघींनी फोन केला व मला शिवीगाळ दमदाटी केली. त्यानंतर पुन्हा अनोळखी फोन वरून फोन आला आणि टेकुडे बोलतो असे सांगून शिवीगाळ दमदाटी करून तू संगमनेर मध्येच थांब तुला मारण्यासाठी साकुर वरून संगमनेरला मारण्यासाठी मुले घेऊन येत आहे. असे सर्व आईला सांगितले. फोनवर दमबाजी केल्याने मयत दिपक हा घाबरला त्याने आपला मोबाईल स्विचऑफ केला.

        दरम्यान, आईने मयत दिपकला पुन्हा फोनवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्याने मोबाईल बंद केला होता. त्यानंतर आईने व नातेवाईकांनी वारंवार दिपकच्या मोबाईलवर संपर्क केला असता मयत दिपकचा मोबाईल बंद होता. त्यानंतर मयत दिपकचा शोध घेण्याचा सर्वांनी प्रयत्न केला. तेव्हा मयत दिपकच्या आईला समजले की, आरोपी तनुजा टेकुडे व मयत दिपकचे दोन वर्षांपासून प्रेम संबंध होते. दिपकने प्रेमात प्रेयसिला दुचाकी स्कुटी घेऊन दिली. जेव्हा या दोघांमध्ये टोकाचा वाद होऊ लागला. शिवीगाळ दमदाटी होऊ लागली. प्रेयसिचे चुलते फोनवर मारण्यासाठी मुले पाठवतो आशा धमक्या देऊ लागले. तेव्हा मयत दिपकने मोबाईल बंद केला. त्यानंतर दिपकच्या नातेवाईकांनी देखील फोनद्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न केला तरी देखील मोबाईल बंद आला. तीन दिवस झाले तरी दिपक मिळुन आला नाही. 

दरम्यान, काल रविवार दि.1 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास दिपक हा शेततळ्यात आढळून आला. त्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी पाहिले असता पोलिसांना कळवले. पोलिसांनी ओळख पटवली असता मयत दिपकच्या आई वडिलांना कळवले. त्यानंतर मयत दिपकच्या आईने दिपक सोबत फोनवर झालेली सर्व घटना पोलिसांना सांगितली. त्यानंतर तीघांवर घारगाव पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे.


खरंतर आई वडील काबाड कष्ट करुन आपल्या मुलांना अधिकारी किंवा स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी संघर्ष करीत असतात. त्याची जाण मुलांनी आणि मुलींनी ठेवली पाहिजे. अभ्यासाच्या नावाखाली, अकॉडमीच्या नावाखाली, शिक्षणाच्या नावाखाली मुलं मुली शहरात येतात आणि नको त्या मार्गाला जातात, संगमनेर अकोले आणि अन्य तालुक्यात अक्षरश: तास दिड तासासाठी लॉज मिळतो, ना कोणती नोंद असते ना कोणता पुरावा, त्यामुळे राजरोस हा भयानक प्रकार सुरु आहे. अल्पवयीन मुली गरोदर राहण्याचे प्रमाण सर्वात जास्त अकोले तालुक्यात आणि त्यात राजूर परिसरात आहे. त्यामुळे, हे प्रकार थांबण्यासाठी कोठोर कारवाई होणे अपेक्षित आहे. दुर्दैवाने ही प्रकरणे दडपली जातात. अप्पर पोलीस अधिक्षक सोमनाथ वाकचौरे साहेब यांचे बाकी याबाबत कौतुकास्पद काम आहे. त्यांनी अशा प्रकरणार अनेक लॉजवाले जेलमध्ये टाकले आहेत. खरंतर पोलीस पोलिसांचे काम करतील, पण पालकांनी याबाबत आपल्या पाल्याशी बोलले पाहिजे, त्यांच्याबाबत योग्यती जबाबदारी घेतली पाहिजे.

         - ॲड. रवि शेळके (सामा. कार्यकर्ते)