सन 1990 प्रमाणे बाळासाहेब थोरात आणि अमोल खताळ यांच्यातील राजकीय युद्ध, निवडणुक तुल्यबळ होणार.!
- सुशांत पावसे
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर तालुक्यात निवडणूकीची रणधुमाळी पहायला मिळत आहे. काँग्रेसकडुन आ. बाळासाहेब थोरात तर शिवसेना शिंदे गटाकडून अमोल खताळ यांच्यात लढत दिसणार आहे. आ. थोरातांना १९९० साली वसंतराव गुंजाळ यांनी कडवी झुंज दिली होती. त्याचीच पुनरावृत्ती आता होणार का? याची चर्चा तालुक्यात जोर धरू लागली आहे. कारण, आजपर्यंत संगमनेरातील विरोधकांना निधी मिळाला नाही. मात्र, आता तशी परिस्थिती नाही. संगमनेर तालुक्यात विखें पाटलांनी ५०० कोटींपेक्षा जास्त निधी देऊन तळेगाव, निमोण, मालुंजे, घारगाव अशा मोठ्या गावांसह अठरा गावं विखें पाटलांच्या नेतृत्वाखाली आहे. तर तालुक्यातील १ लाख ३५ हजार महिलांचे लाडकी बहीण योजनेचे १०१ कोटी रुपये संगमनेरच्या महिलांना लाभ झाला आहे. त्यामुळे, महिलांचे मतदान संगमनेर विधासभा मतदारसंघात निर्णायक असणार आहे. राष्ट्रीय वयोश्री योजना, दिव्यांग योजनात, संजय गांधी निराधार योजना, पिक विमा योजनेचे तालुक्यात अमोल खताळ यांनी काम मोठ्या प्रमाणात केल्याने ही निवडणूक चुरशीची होऊन अपराजित थोरात साहेब पराजीत होऊ शकतात का? असा प्रश्न अनेकांना पडला असला तरी निवडणूक मात्र तुल्यबळ होणार असे जाणकारांना वाटत आहे.
आता इतिहासाची पाने चाळली. तर, एक गोष्ट लक्षात येईल. की, बाळासाहेब थोरात यांचा पराभव करणे सोपे नाही. परंतु, तितकेच अवघडही नाही. कारण, १९९० साली राम जन्मभूमीच्या वादाचे पडसाद देशात उमटले होते. विश्व हिंदू परिषदेने शिला पूजन करून हिंदुत्वाचे वातावरण निर्माण करुन जनमानसांच्या ह्रदयावर "जय श्री राम चा नारा" कोरला होता. त्यामुळे शहरच नाही. तर, ग्रामीण भागही भगव्या रंगात न्हावून निघाला होता. हीच लाट संगमनेर तालुक्यात पहायला मिळाली आणि त्याचे भांडवल करत भाजपाने वारकरी सांप्रदायातील जय हरी वसंतराव गुंजाळ यांच्या गळ्यात माळ टाकून संघ परिवारात स्वागत केले. राम मंदीराच्या शिला पुजनात वसंतरावांनी मोठे योगदान दिले. या धार्मिक परिघावर हिंदुत्ववाद असेलही. मात्र, याचा केंद्रबिंदू राजकीय हेतू हाच होता. असे राजकीय अभ्यासकांचे मत आहे. त्याला अनुसरून भाजपाने १९९० च्या विधानसभा निवडणुकीत थोरांतापुढे गुंजाळ यांचे आव्हान दिले. तेव्हा अवघ्या ४ हजार ८६२ मतांनी वसंतरावाचा पराभव झाला. त्यामुळे अपराजित साहेब पराजित होऊच शकत नाही. असे कोणाला वाटत असेल तर तो दुधखुळेपणा ठरेल असे जाणकारांना वाटते.
आता हा सगळा इतिहास सांगण्याचे कारण की, जी राजकीय परिस्थिती १९९० ला झाली होती. त्याचीच पुनरावृत्ती आता २०२४ मध्ये पहायला मिळेल की काय ? असे वाटू लागले आहे. तेव्हाही लढत एकास एक होती, आताही आहे. तेव्हा थोरात साहेबांच्या विरोधात प्रचंड नकारात्मक वातावरण तयार झाले होते. तशी आताही सुप्त लाट असल्याचे बोलले जाते. गेल्या काही दिवसांपुर्वी तालुक्यात चांगले वातावरण फिरले होते. विखे साहेबांनी संगमनेरात स्थानिक स्वराज्य संस्थांना पळता भुई थोडी केली होती. त्यामुळे, विरोधात कधी नवे इतक्या ग्रामपंचायत ताब्यात आल्या. इकेच काय! आ.थोरात साहेबांचे स्वतःचे जोर्वे गाव हे देखील विखे पाटलांच्या ताब्यात आहे. त्यामुळे, जिथे काँग्रेस नेत्या जयश्री थोरात, इंद्रजीत थोरात हे तळ ठोकुन होते तेथे पराभव होऊ शकतो तर वेळप्रसंगी बदल देखील घडु शकतो. सगमनेरमध्ये काही निवडक गोष्टींचा विकास झाला. हे नाकारुन चालणार नाही. मात्र, त्यातून ठराविक दलाल मोठे होऊन अनेकदा संगमनेरच्या भावना दुखावल्या हे देखील तितकेच खरे आहे. त्यात प्रवरा नदिचे वस्रहरण असले किंवा पर्यावरणाची हानी अशुद्ध पाणी असेल किंवा कत्तलखान्यांमुळे उद्भवणारे प्रश्न, ग्रामीण भागातील रस्ते असतील तर तरुणांची बेरोजगारी. अशा एक ना अनेक समस्यांनी साहेबांनी जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. इतकेच काय? निळवंड्याचे पाणी ढवळून नेहमीच शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी साहेबांनी पळविले आहे. त्यामुळे, तळेगाव पट्टा साहेबांच्या विरोधात चांगलाच दांडपट्टा फिरवेल असे नेत्यांना वाटते आहे. त्यामुळे, ही सेफ जागा आहे. असे जर कोणाला वाटत असेल. तर, तो निव्वळ मुर्खपणा ठरेल. जनता एकदा फिरली. तर, काय होते. हे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सुशिलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह दिग्गजांनी पाहिले आहेे. त्यामुळे, उद्या संगमनेरची देखील बारी असू शकते. यात शंका नाही. फक्त ना. विखे साहेबांना श्रीकृष्णाची भूमिका बजावून कार्यकर्त्यांनी कर्णाच्या भूमिकेत लढले तर संगमनेरच्या कुरुक्षेत्रावर नक्कीच पाणिपथ घडेल.
खरंतर, एकेकाळी विरोधकांनी गावात साधा हायमॅक्स आणुन दाखवा असे थोरात समर्थक गावोगावी बोलत होते. आता मात्र चित्र बदलले आहे. महायुती सरकार आले आणि विखे पाटील पालकमंत्री झाले. तेव्हापासून आ. थोरात यांचेच गावोगावचे सरपंच गावात निधी आणण्यासाठी ग्रामपंचायतचे पत्र घेऊन विखे पाटील यांच्या ऑफीसला जाऊन बसत होते. त्यामुळे, आ.थोरात यांच्या ताब्यात असणाऱ्या गावांमध्ये देखील विखें पाटलांनी निधी दिला आहे. तर जिथे विखें पाटलांचे वर्चस्व आहे तिथे निधींचा महापूर वाहताना पाहायला आहे. एकट्या निमोण गावात ११ कोटींचा निधी तर तळेगाव गटात ४४ कोटींचा निधी तर समनापुर गटात ३६ कोटी निधी दिल्याचे सर्वांनी पाहिले आहे. तर लाडकी बहीण योजनेचे गावोगावी कॅम्प भरून भाजप सेनेच्या कार्यकर्त्यांनी नेते मंडळीने महिलांचे फॉर्म भरले आहे. वयोश्री योजनेचे वडीलधाऱ्या हजारो माणसांना लाभ मिळून दिला आहे. संजय गांधी निराधार योजनेतून हजारो वयोवृद्धांना लाभ मिळून दिला याचे अध्यक्ष अमोल खताळ असल्याने त्यांना याचा निश्चित फायदा होणार असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. हे सर्व असताना समाजवादी विचाराचे ज्या लोकांची आ. थोरातांना मदत होत आली. समोर स्वतःच्या विचारांचा उमेदवार नसल्यामुळे ते आ. थोरातांना मतदान करत होते. परंतु आता अपक्ष का असेना समाजवाद्यांसमोर दत्ता ढगेंच्या रूपाने समाजवादी विचारांचा उमेदवार उभा राहिला आहे. त्यांनी या निवडणुकीत दंड थोपटल्यामुळे आ. थोरात यांना समाजवाद्यांचे मते मिळतील का?असे मत अनेकांनी उपस्थित केले आहे.