शरीर उत्तेजित करणारे औषध विकणाऱ्या तरुणास पोलिसांनी ठोकल्या बेड्या, कॉलेजची मुले होत होते शिकार.!

 

सह्याद्री सार्वभौम (संगमनेर):- 

                 संगमनेर शहरातील लाल बहादूर शास्त्री चौकात उत्तेजक पदार्थ विक्री करून मोठं रॅकेट चालवणारा तरुण ताब्यात घेतल्याने संगमनेर शहरात एकच खळबळ उडाली आहे. ही कारवाई संगमनेर शहर पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख यांच्या पथकाने सोमवार दि.27 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास केली. यात 2 लाख 23 हजार 120 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तर मेफेंटरमाइन सल्फेट इंजेक्शन हे उत्तेजक औषधाच्या 10 एम. एलच्या 3 बॉटल व 9 इंजेक्शन सिरींज अन्य वस्तूसह एका तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. या गुन्ह्यात आदित्य किशोर गुप्ता (वय 24,रा. साईनगर, ता. संगमनेर) याला अटक करण्यात आली आहे. आता हे उत्तेजक औषध या तरुणाला कोण देत होते? या औषधांच्या रॅकेट मध्ये आणखी कोण-कोण आहेत? याचे कनेक्शन पुण्याशी आहे का? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण होत असुन पोलीस याचा शोध घेत आहेत. मात्र, संगमनेर शहर हाय प्रोफाइल व्यसनाच्या विळख्यात अडकत चालल्याने संगमनेरातील सुज्ञ नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.  

याबाबत सविस्तर माहिती अशी की, संगमनेर शहरात मेफेंटरमाइन सल्फेट इंजेक्शन हे उत्तेजक औषध घेऊन तरुण आपल्या शरीराला इंजेक्शन देऊन नशा करत होते. या नशेमध्ये अनेक तरुणांनी गैरवापर केल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. संगमनेर शहरचे पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख यांना गोपनीय सुत्रांकडून माहिती मिळाली की, लाल बहादूर शास्त्री चौकात एम. आर. व्हिटॅमीन सप्लिमेंट शॉप मध्ये उत्तेजक औषधांची विक्री होत आहे. त्यांनी तात्काळ आपले एक पथक शॉपकडे पाठवले. तेथे पोलिसांनी सापळा रचला. या शॉप मध्ये खरोखर औषधांची विक्री होते का? हे तपासण्यासाठी पोलिसांनी एक बनावट ग्राहक पाठविले. त्यावेळी घटनास्थळी आदित्य गुप्ता होता. त्यांनी ग्राहक म्हणुन गेलेल्या व्यक्तीला मेफेंटरमाइन सल्फेट इंजेक्शन औषध दाखवले. त्यांचे रेट काय आहे याची देखील सविस्तर माहिती दिली. हे औषध कसे दिले जाते. याची माहिती सांगून इंजेक्शन सिरींज दाखवली. तेव्हा ग्राहक म्हणुन गेलेल्या व्यक्तीला खात्री पटली की, येथे मोठ्या प्रमाणात उत्तेजक औषधांची विक्री केली जाते.

          दरम्यान, त्याने आजुबाजुला लपवुन बसलेल्या बाकीच्या पोलीस पथकाला फोन केला. आपल्याला मिळालेली माहिती खरी असुन येथे उत्तेजक करण्यासाठी मेफेंटरमाइन सल्फेट इंजेक्शन हे डॉक्टरांच्या चिट्ठी शिवाय दिले जाते. तेव्हा बाकी पथकाने तेथे छापा टाकला. त्याच्या शॉपची संपूर्ण झाडाझडती घेतली असता मेफेंटरमाइन सल्फेट इंजेक्शन 10 एम. एलच्या तीन बॉटल, 9 इंजेक्शन सिरींज, रोख रक्कम, वाहन, मोबाईल असा एकुण 2 लाख 23 हजार 120 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. तर या घटनेत आदित्य किशोर गुप्ता (वय 24, रा. साईं नगर, ता. संगमनेर) याला बेड्या ठोकण्यात आल्या. त्याला आज न्यायालयापुढे हजर केले. ही दमदार कामगिरी पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत, पोलीस ना. बाबासाहेब सातपुते, पो.कॉ. खुळे, पो. कॉ. क्षीरसागर यांनी केली. मात्र, मेफेंटरमाइन सल्फेट इंजेक्शन हे या शॉप मध्ये कुठून आले. या रॅकेट मध्ये अजुन कोण-कोण आहेत. कोणत्या मेडिकलचा संबंध आहे का? याचा कसुन तपास आता पोलीस करत आहे. मात्र, या कारवाई नंतर मोठ्या प्रमाणात राजकीय हस्तक्षेप होऊ लागला होता. त्यामुळे, हे रॅकेट चालवण्यासाठी या तरुणाला कोणाचा राजकीय आशिर्वाद आहे का? अशी चर्चा पोलीस वर्तुळात सुरू आहे.

        मेफेंटरमाइन सल्फेट इंजेक्शन हे कमी प्रमाणात घेतले तर उत्तेजक होण्यासाठी लोक वापरतात. त्यामुळे, हळूहळू लोकांना ही नशा लागते. बहुतेक तरुण हे व्यायाम(जिम) करण्यासाठी वापरतात. मात्र, हे इंजेक्शन घेताना प्रमाण अधिक झाले तर हृदयाची गती वाढवुन, ब्लड प्रेशर वाढवुन मृत्यु देखील येऊ शकतो. खरंतर, मेफेंटरमाइन सल्फेट इंजेक्शन हे हृदयरोग तज्ञ व भुल तज्ञ यांनाच वापरण्याचा अधिकार आहे. त्यामुळे, डॉक्टरांच्या सल्ल्यानेच हे औषध घेतले पाहिजे. मात्र, तरुणांनी याची नशा म्हणुन वापर केला. तर शरीराची मोठ्या प्रमाणात हानी होईल. आणि मृत्यूला आमंत्रण दिले जाईल.

   - डॉ.संदिप कचेरीया (वैद्यकीय अधिकारी, संगमनेर)