संगमनेर शिवसेना शहराध्यक्षांच्या कानफाडीत मारली, पोलीस ठाण्यातच राडा, 12 जणांवर गुन्हा दाखल.!

 

सार्वभौम सह्याद्री (संगमनेर):- 

                           संगमनेर शहराततील मालदाडरोड परिसरात गाडीचा कट मारल्यावरून किरकोळ वाद झाला. या वादाचे रूपांतर मोठ्या वादात होऊन पोलीस ठाण्यात जाऊन पोहचले. पोलीस ठाण्यात जाताच गाडी चालवणाऱ्या मुलाला बाहेर काढण्यासाठी टोळके जमा झाले. मंग काय! ठाणे अमलदारा समोरच मोठं-मोठ्याने आरडा ओरडा करून खुर्ची ढकलुन देऊन गोंधळ घातला. हा वाद पोलिसांच्या देखील हाताबाहेर गेला. आणि रात्रीपासून ते दिवस उजेडेपर्यंत हा वाद पोलीस ठाण्यातच सुरू असल्याची घटना बुधवार व गुरुवार दि.22 ऑक्टोबर 2025 ते 23 ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या दरम्यान घडली. यामध्ये पोलीस कॉ. योगेश हासे यांनी दिलेल्या फिर्यादीकरून आरोपी सागर बागे, सुरज बागे, ऋषी आव्हाड, सागर पगारे, मनोज पगारे, सनी धारणकर व इतर 6 अनोळखी व्यक्तींवर (सर्व. रा. संगमनेर शहर) यांच्यावर विविध कलमान्वये संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटने मध्ये समजावून सांगण्यासाठी गेलेल्या शिवसेना शहराध्यक्ष विनोद सुर्यवंशी यांच्या कानशिलात दिल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे. खरंतर, पोलीस ठाणे म्हणले की, ब्र शब्द लोकांच्या तोंडातून बाहेर पडत नाही. येथे रात्री सुरू झालेला वाद हा सकाळ पर्यंत सुरू होता. तरी देखील पोलीस गुन्हा दाखल करून आरोपींना ताब्यात घेण्यास पोलीस पुढे आले नाही. त्यामुळे, येथे पोलिसिंग किती सुरू आहे हे न बोलेले बरं.

         याबाबत पोलीस कॉ. योगेश हासे यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, आदित्य कानकाटे याच्या गाडीला कट मारल्याचा कारणाने तो पोलीस ठाण्यात माहिती देण्यासाठी आला होता. त्यानंतर सागर बागे, सुरज बागे, ऋषी आव्हाड, सागर पगारे, मनोज पगारे, सनी धारणकर व इतर पाच ते सहाजण हे पोलीस ठाण्यात आले. त्यानंतर गाडीला कट मारल्यावरून दोघांमध्ये चर्चा सुरू झाली. ते बोलत बोलत पोलीस ठाण्याच्या बाहेर जाऊन बोलत होते. त्यानंतर आदित्य कानकाटे हा पुन्हा पोलीस ठाण्यात येऊन बसला. तेवढ्या मध्ये शिवसेनेचे पदाधिकारी विनोद सुर्यवंशी हे तेथे आले. त्यांनी पोलीस ठाण्यात आदित्य कानकाटे याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, आदित्य कानकाटे याला विनोद सुर्यवंशी यांचा राग आला. आदित्य कानकाटे याने विनोद सुर्यवंशी यांच्या कानशिलात लगावली. तेथुन खऱ्याअर्थाने वाद सुरू झाला. 

           विनोद सुर्यवंशी यांच्यासोबत असणाऱ्या तरुणांनी तेथे गोंधळ घालण्यास सुरवात केली. या तरुणांनी पोलीस ठाण्यात घुसुन धुडगूस घातला. हे सर्व कृत्य पोलीस ठाण्यात ठाणे अमलदारा पुढे झाले. तरी देखील पोलीस कारवाई करण्यासाठी पुढे आले नाही. हा वाद रात्री सुरू झाला. तर सकाळी आठ वाजता शांत झाल्याने नागरिकांनी पोलिसांवर नाराजी व्यक्त केली आहे. या वादाला राजकीय किनार येऊ लागल्याने फिर्याद देखील दाखल करण्यास पोलिसांना विलंब लागला आहे. उशीरा का होईना शहाणपण आले. त्यानंतर पोलीस कॉ. योगेश हासे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून आरोपी सागर बागे, सुरज बागे, ऋषी आव्हाड, सागर पगारे, मनोज पगारे, सनी धारणकर व इतर 6 अनोळखी व्यक्तींवर (सर्व. रा. संगमनेर शहर) यांच्यावर विविध कलमान्वये संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

             

दरम्यान, योगेश सुर्यवंशी हा त्याचा मित्र सागर बागे याला घरी सोडवण्यासाठी मालदाड रोडला जात असताना लाल रंगाची वॅगनर गाडीने कट मारला. या गाडीचा पाठलाग करून आम्हाला कट का मारला असे विचारायला गेले असता त्याने चारचाकी गाडी आडवी मारली. यामध्ये ओळखीचा आदित्य कानकाटे असल्याचे त्यांना खात्री झाली. आदित्य कानकाटे याने विनोद सुर्यवंशीला शिवीगाळ करून धक्काबुकी केली. आणि चाकूचा धाक दाखवुन अडीच तोळ्याची सोन्याची चैन हिसकावुन घेतली. यामध्ये आदित्य शितलकुमार कानकाटे (रा. नेहरू चौक, ता. संगमनेर) याच्या विरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टोळीयुद्धाने संगमनेर शहराचे स्वास्थ्य बिघडले

संगमनेर शहरातील हा वाद गेली अनेक दिवसांपासून सुरू आहे. एकमेकांच्या रेकॉर्डिंग टाकणे, व्हिडीओ टाकणे, रील मधुन धमकी देणे असे प्रकार सुरू होते. एकमेकांच्या गल्लीत जाऊन मारण्याच्या वलग्ना करत होते. यामधून दोन गटात वाद विकोपाला जात होता. त्यातच आदित्य कानकाटे हा मालदाड रोडला गेल्याने हा वाद पुन्हा उफाळुन आला. त्याची चारचाकी वाहनाचा वेग प्रचंड होता. आशा वेळी सर्वसामान्य व्यक्तीला धक्का लागला असता तर? एखाद्याचा मृत्यू झाला असता तर याला जबाबदार कोण?ऐन दिवाळीत प्रचंड गर्दी असताना हा सर्व टोळी युद्धाचे सर्वांना दर्शन झाले. त्यामुळे, पोलिसांचा किंचितही धाक या गुन्हेगारी असणाऱ्या तरुणांवर राहिला नाही. मात्र, संगमनेरची तरुणाई गेली काही दिवसांपासून व्यसनाच्या आहारी गेली आहे. तरुणांना ड्रग्ज सारखा नशेचा पदार्थ सहज उपलब्ध होतो. त्यामुळे, शहरातील सुशिक्षित घराण्यातील तरुणाई देखील या व्यसनाच्या विळख्यात अडकली आहे. तर काही तरुणांनी मद्यधुंद अवस्थेत रात्रभर फटाके वाजवून सर्वसामान्य व व्यापारी लोकांना हाक नाक त्रास दिला गेला.