मा. आ. थोरात कार्यकर्त्यांच्या हाती बंडाचा झेंडा अन लोणीहून ठरतोय आ. खताळांचा अजेंडा.! आ. तांबेंचा मात्र फडकतोय आघाडीचा फंडा.!


सार्वभौम (संगमनेर) : 

                  संगमनेरच्या इतिहासात चाळीस वर्षांनंतर परिवर्तन झाले आणि आ. अमोल खताळ हे निवडुन आले. त्यानंतर संगमनेरचे राजकीय गणितं सर्व बदलली. माजी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पराभवानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेची ही पहिली निवडणूक असल्याने त्या पराभवाचा वचपा काढतात. की, पुन्हा पराभवाला सामोरे जावे लागते. हे येणारा काळच ठरवेल. मात्र, संगमनेर शहराची सर्व सुत्र आ. सत्यजित तांबे यांनी हातात घेऊन शहर विकास आघाडी करण्याचा निर्धार त्यांनी केलेला दिसतो. ते प्रत्येक वार्डात स्वतः जाऊन लोकांच्या गाठीभेटी घेऊन कोणाच्या प्रभागात कोणाची लोकप्रियता आहे. यावर नगरसेवक या पदाला त्या व्यक्तीला संधी देणार असल्याचे दिसते. तर दुसरीकडे सुकानु समिती कडून बैठक पार पडुन अंतीम यादी जाहीर होऊन नगरसेवक पदाला मिरीटवर महायुती संधी देणार आहे. यासाठी विखे पाटील हे अंतीम निर्णय घेणार आहे तर आ. अमोल खताळ यांनी नगरपालिकेच्या जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आढावा बैठक घेऊन प्रत्येक प्रभागात फिरले आहे. मात्र, या नगरपालिका निवडणुकीत संगमनेरचा उमेदवार लोणीतून ठरणार? नगरपालिका निवडणुकीतून पंजा हटणार? असे राजकीय वर्तुळात चित्र दिसत आहे. त्यामुळे, माजी आ. थोरात कार्यकर्त्यांच्या हाती बंडाचा झेंडा अन लोणीहून ठरतोय आ. खताळांचा अजेंडा, आ. तांबेंचा मात्र फडकतोय आघाडीचा फंडा असेच काहीसे दिसत असुन "कौन बनेगा नगराध्यक्ष" याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

        दरम्यान, संगमनेर नगरपालिकेला महिला आरक्षण निघाल्याने प्रभावी महिलाच्या शोधात महायुती दिसते. जेणेकरून निवडणूक सोपी जाईल. तो चेहरा जनतेत रुजवून मताचे परिवर्तन होईल. आशा महिलेचा शोध घेत असुन स्मिता गुणे, सुजाता देशमुख, पायल ताजने, रुपाली जोंधळे, रेखा गलांडे अशी नावे महायुतीकडुन चर्चेत आहे. तर आ.सत्यजित तांबे यांनी सुत्रे हातात घेऊन शहर विकास आघाडीचा निर्णय घेतल्याचे समोर येत आहे. महिला आरक्षण असल्याने सौ. मैथीली तांबे व सौ. दुर्गा तांबे या पैकी एक निवडणुकीच्या रणांगणात असणार आहे. महिला आरक्षण निघताच सौ.मैथीली तांबे यांचा चेहरा समोर आणला. त्यांनी शहरात हळदी कुंकू व होम मिनिस्टर हे नवरात्री उत्सवात कार्यक्रम आयोजीत करून महिलांसाठी पैठणी, भेटवस्तू असे शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून जनतेत सहभाग घेतला. त्यामुळे, मैथिली तांबे हाच त्यांचा प्रभावी चेहरा असु शकतो. असे राजकीय वर्तुळात चित्र दिसत आहे. तर दुसरीकडे आ. अमोल खताळ यांनी नगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेतली. प्रत्येक प्रभागात जाऊन जनतेच्या समस्या ऐकल्या. मात्र, महिला आरक्षण असल्याने महायुतीकडुन अद्याप महिलेचा प्रभावी चेहरा समोर आलेला नाही.

संगमनेरचा उमेदवार लोणीतून ठरणार?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन माजी खा. डॉ. सुजय विखे यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांची बैठक मालपाणी लॉन्स येथे घेतली.  त्यावेळी, सुकानु समितीचा निर्णय घेतला. या समितीत महायुतीचे पदाधिकारी नेमले गेले. मात्र, या समितीचा अंतीम निर्णय हा ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे ठेवला. त्यामुळे, विरोधकांनी हा मुद्दा बनवत आता संगमनेरचा निर्णय लोणीतून ठरणार. संगमनेरचे सर्व निर्णय हे लोणीतुनच ठरवले जातात. अशी सोशल मीडियावर टिका होऊ लागली आहे. त्यामुळे, संगमनेरचे निर्णय घेताना आ.अमोल खताळ यांना देखील मर्यादा असल्याचे बोले जाते. खा.डॉ. सुजय विखे पाटील या बैठकीत बोले की, आ.अमोल खताळ यांना विधानसभा निवडणुकीपूर्वी मी ओळखत ही नव्हतो. पण, कामाच्या वृत्तीवर विश्वास होता. म्हणुन मी स्वतः मुंबईत जाऊन शिंदे साहेबांकडुन त्यांच्यासाठी ए. बी फॉर्म आणला. हे सर्व डॉ. सुजय विखे यांनी स्पष्ट सांगितले. त्यामुळे, संगमनेरचे सर्व निर्णय हे लोणीच्या सल्ल्यानेच होतात. असा मुद्दाकरून आ. अमोल खताळ यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न काँग्रेसकडुन होत आहे.

संगमनेर नगरपालिकेतून काँग्रेस हटणार?

गेली कित्येक वर्षे संगमनेरच्या नगरपालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकत होता. मात्र, काँग्रेसचे माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचा विधानसभेला निवडणुकीत पराभव झाला आणि सर्व राजकीय गणित संगमनेर शहरात बदलून गेली. अपक्ष आ. सत्यजीत तांबे यांच्या मातोश्री सौ. दुर्गा तांबे या काँग्रेसकडुन सातत्याने निवडुन येत असल्याने ऐनवेळी त्यांना शहर विकास आघाडीची वेळ का आली?माजीमंत्री बाळासाहेब थोरात हे वर्कींग काँग्रेस कमिटीचे सदस्य असताना देखील काँग्रेस पक्षाकडून येथे उमेदवारी करायला कोणी तयार नाही का? की, संगमनेरात काँग्रेसचा विचार संपत आला. असे एक ना अनेक प्रश्न विरोधकांनी उपस्थित करून माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांना कोंडीत पकडण्याचा डाव रचला आहे. संगमनेर नगरपालिकेतुन काँग्रेसचा पंजा हटणार अशी टीका सोशल मिडीयातून शिवसेना आता करत आहे. तर माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर शहराची सर्वसूत्र आ.सत्यजीत तांबे यांच्याकडे दिल्याने ते शहरविकास आघाडीचा निर्णय घेत आहे. मात्र, टीकेला सामोरे थोरात साहेब यांना जावा लागत आहे.