बाळासाहेब थोरात साहेबांना मुख्यमंत्री करायचे आहे, पठारावर कार्यकर्त्यांचा निर्धार.! अमित भांगरेंचे काम करण्याच्या सुचना.!
सार्वभौम (अकोले)-
आज नाही तर कधीच नाही, अशा प्रकारची संधी संगमनेर तालुक्याला आली आहे. आता महाविकास आघाडीचे सरकार राज्यात येणार आहे. कॉंग्रेसला चांगल्या जागा देखील येणार आहे. त्यामुळे, संगमनेर तालुक्याला मुख्यमंत्री पद भेटणार आहे. म्हणून अमित भांगरे यांना निवडून दिले. तर, बाळासाहेब थोरात यांचे हात राज्यात बळकट होणार आहे. त्यामुळे, कोणत्याही भावनिक आणि भुलथापांना बळी पडू नका. पठार भागातील २५ ते ३० गावे, त्यातील ५१ बुथ आणि ४२ हजार ५०० मतदार यांनी अमित भांगरे यांच्या तुतारीला यांना मत द्यायचे आहे. जसे किरण लहामटे यांना मत म्हणजे भाजपाला मत, तसे अमित भांगरे यांना मत म्हणजे बाळासाहेब थोरात यांना मुख्यमंत्री होण्यासाठी मत हे लक्षात ठेवा. थोरात साहेबांना मुख्यमंत्री करण्याची हीच संधी आहे. त्यामुळे, यंदा तरी महाविकास आघाडीला आम्ही विजयी करणार. अशा प्रकारचा निर्धार जिल्हा परिषदेचे मा. गटनेते अजय फटांगरे यांनी व्यक्त केला आहे.
खरंतर पुर्वी मधुकर पिचड साहेब यांनी पठार भागावर चांगला जम बसविला होता. त्यावेळी कॉंग्रेसकडे फक्त ५ ते १० ग्रामपंचायती ताब्यात असायच्या. मात्र, तेथे जसे बाळासाहेब थोरात यांनी अजय फटांगरे यांना ताकद दिली. त्यानंतर तेथील चित्र पुर्ण उलटे झाले. २०१९ मध्ये बाळासाहेब थोरात यांनी डॉ. लहामटे यांना मदत करण्याचे ठरविले होते. पिचड साहेब मैदानात असून देखील पठार भाग थोरात साहेबांच्या ईशार्याकडे लक्ष ठेवून होता. पिचड भाजपात गेले आणि थोरात साहेबांनी लहामटे यांना सपोर्ट केला. मात्र, लहामटे यांनी त्यांच्या मदतीची जाणिव ठेवली नाही. आता पुन्हा लहामटे भाजपाच्या वळचणीला जाऊन बसले. त्यामुळे, थोरात यांनी अमित भांगरे यांना सपोर्ट करुन पठार भागाहून १५ हजारांपेक्षा जास्त लिड देण्याच्या सुचना केल्या आहेत. त्यामुळे, आता कार्यकर्ते कामाला लागले आहे.
डॉ. लहामटेंनी थोरातांचा अपमान केला होता.!
अकोले तालुक्यातील विधानसभेचे गणित कायम संगमनेर तालुक्यातील पठार भागावर अवलंबून राहिले आहे. ४० वर्षे राजकारण करताना माजी मंत्री आदरणीय मधुकर पिचड यांनी कधीच बाळासाहेब थोरात यांना दुखावले नाही. मात्र, पाच वर्षे डॉ. लहामटे आमदार झाले आणि त्यांच्यामुळे बाळासाहेब थोरात यांच्या मान सन्मानाला भर सभेत ठेच पोहचली. त्यामुळे, २०१९ मध्ये डॉ. लहामटे यांना मदत करुन देखील त्याची जाणिव त्यांनी ठेवली नाही याची खंत बाळासाहेब थोरात यांनी बोलुन दाखविली. तर आमच्या नेत्यांचा अपमान करुन आता त्यांना कशी मते पडतात हेच आम्ही पाहतो असे म्हणत कार्यकर्त्यांनी डॉ. लहामटे यांच्या विरोधात दंड थोपटल्याचे पहायला मिळाले.
उतनार नाही, मातनार नाही, घेतला वसा, सोडणार नाही.
मागील आमदारांनी थोरात साहेबांची पदाची आणि प्रतिष्ठा याची जरा देखील काळजी घेतली नाही. आपण त्यांच्यामुळे निवडून आलोय, पठार भागातील जनतेने त्यांना मताधिक्य दिलेय याची देखील जाणिव ठेवली नाही. पठार भागावर त्यांच्यासाठी काम करणार्या कार्यकर्त्यांना चांगली वागणूक दिली नाही. मात्र, मी बाळासाहेब थोरात साहेब यांना गुरू मानले आहे. त्यांच्या शब्दापुढे मी जाणार नाही. त्याच्या आशिर्वादाने मला येथील जनता साथ देणार आहे. त्यामुळे, मी उतनार नाही, मातनार नाही, घेतला वसा, सोडणार नाही. पठार भागावर कधीच मी दुर्लक्ष करणार नाही. संगमनेर मोठा आणि अकोले लहाण भाऊ आहे. त्यामुळे, मला आपण पदरात घ्यावे, येणार्या काळात पठार भागाच्या इतिहासातील सर्वात जास्त निधी मी पठार भागावर आणल्याशिवाय राहणार नाही. आदरणीय थोरात साहेब महाविकास आघाडीत मोठ्या पदावर असणार आहे. त्यांच्या बोटाला धरुन मी या पठार भागाचा विकास करणार आहे.
पठार भागावर सुचना येताच टिम सज्ज.!
पठार भागावर थोरात साहेबांनी २ हजार कार्यकर्त्यांची बैठक घेतल्यानंतर अजय फटांगरे, चंद्रकांत घुले, सुहास वाळुंज, जालिंदर घागरे, शांताराम वाकळे, अरुण वाघ, सुरेश कान्हेरे, नाना भालके, सुरेश आहेर, राजू आहेर, बाळासाहेब ढोले, राहुल गडगे, अक्षय ढोकरे, डॉ. सय्यद मोमीन, भानुदास गोंदके, किरण भागवत, पांडुरंग उंडे, भानुदास फटांगरे, अतुल कौटे, भाऊराव जाधव, गणेश आभाळे, गोरक्ष लेंडे, गणेश सुपेकर, सामुद्रे भारती, भाग्यश्री नरवडे, सुनिल नरवडे, भाऊराव कोठवळ, गणेश धात्रक, रंगनाथ फटांगरे, अमित फटांगरे असे अनेक कार्यकर्ते आता सक्रिय झाले आहेत. विशेष म्हणजे यात शिवसेना, कॉंग्रेस आणि अन्य पक्षाचे देखील कार्यकर्ते आहेत. मात्र, संगमनेर तालुक्याच्या अस्मितेसाठी आणि महाविकास आघाडीचे सरकार येण्यासाठी या कार्यकर्त्यांनी पायाला भिंगरी बांधली आहे.
फक्त साहेब म्हणतील तसं.!
संगमनेर पठार भाग आणि अकोले तालुक्यातील देखील पठार भागावरील काही गावे ही फक्त आणि फक्त बाळासाहेब थोरात यांच्या आदेशाची वाट पाहतात. येथे विकास, प्रलोभने, लाडक्या बहिनी, नारळ फोडून अश्वासने देणे, मी हे करतो-ते करतो अशा वल्गना पठारावर चालत नाही. त्यामुळे, डॉ. लहामटे यांनी काम केले म्हणजे काही उपकार केले नाही. आम्ही काम केले आहे, निवडून दिले आहे ते फक्त थोरात साहेबांच्या शब्दाखातर. मात्र, त्यांनी थोरात साहेबांचा अकोल्यात अपमान केला. त्यामुळे, आता साहेब म्हणतील तसं आम्ही मतदान करणार आहोत. आम्हाला साहेब मुख्यमंत्री झालेले पहायचे आहे. अशा प्रकारची प्रतिक्रिया पठार भागावरील कार्यकर्त्यांनी दिल्या आहेत.
मी म्हणत होतो राष्ट्रवादी सोडू नका.!
भाजपाला मदत होऊ नको असे आम्ही वैभव पिचड यांना सांगितले होते. अपक्ष उमेदवारी करणे वाटते तितके सोपे नाही. विशेष म्हणजे आपल्या उमेदवारीमुळे जर आपल्या आब्रुचे वाभाडे काढणारा व्यक्ती निवडून येत असेल. तर, त्याला मदत करणे कितपत योग्य आहे? असे सांगून देखील वैभव पिचड यांनी उमेदवारी केली. हे योग्य वाटत नाही. पण, भाजपाला मतांचे विभाजन करायचे आहे. त्यासाठी पिचड यांच्या खांद्यावर बंदूक ठेवली आहे. २०१९ मध्ये देखील आम्ही वैभव पिचड यांना म्हणत होतो. की, राष्ट्रवादी सोडून जाऊ नका. पण, त्याने ऐकले नाही. भाजपा ४५ वर्षे सत्तेत राहणार आहे असा भ्रमाचा भोपळा तेव्हा तरुणाईच्या डोक्यात घुसला होता. तेव्हा आमचे ऐकले नाही आणि ते भाजपात गेले. आज काय परिस्थिती आहे हे नव्याने सांगायला नको.!