नाट्यमय घडामोडीनंतर विखेंची माघार, थोरात विरूद्ध अमोल खताळ.! भाजपा सोडून शिवसेनेत प्रवेश.! खताळ योग्य उमेदवार.!

  

सार्वभौम (संगमनेर)-

                        लोकसभेच्या निकालानंतर संगमनेरातील राजकीय आणि सामाजिक वातावरण फारच ताईट झाले होते. खर्‍या अर्थाने. मा. खा. डॉ. सुजय विखे यांनी संगमनेरचा माहोल बदलुन टाकला होता. मात्र, रोखठोक सार्वभौमचे ठाम मत होते. की, ते वातावरण तयार करणार आणि अमोल खताळ यांच्या पाठीशी साम, दाम, दंड, भेद अशा पद्धतीने उभे राहून बळ देणार. अर्थात संगमनेरात स्वत: डॉ. विखे यांनी भर सभेत सांगितले. की, यापुर्वीचे थोरात विरोधक केवळ मॅनेज आणि पाकीटवाले होते. मात्र, अमोल खताळ हे संगमनेर तालुक्यातील कट्टर विरोधक म्हणून नावारुपाला आलेले आहे. त्यामुळे, यापुर्वींच्या उमेदवारांच्या तुलनेत खताळ आणि थोरात ही फाईट किमान ऐतिहासिक आणि पाहण्याजोगी असणार आहे. आता खताळ हे विखे समर्थक आणि विश्‍वासू आहेत. मात्र, संगमनेरची जागा शिवसेनेला गेल्यामुळे ते शिंदे गटात प्रवेश करतील आणि विखे पाटील यांच्या जोरावर ते निवडणुकीला सामोरे जातील. त्यामुळे, बलाढ्य थोरात यांना ते किती शह देऊ शकतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

गेल्या महिनाभरापासून संगमनेरमध्ये एक वेगळे वातावरण निर्माण झाले होते. बाळासाहेब थोरात विरूद्ध डॉ. सुजय विखे अशा प्रकारची लढत होईल असे अनेक प्रांजळ मतदारांना वाटत होते. मात्र, एकदा पराभूत झाल्यानंतर ते पुन्हा पराभूत होण्यासाठी संगमनेरात येणार नाही असे राजकीय विश्‍लेषकांना वाटत होते. मात्र, बाळासाहेब थोरात हे भावी मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहेत. त्यामुळे, त्यांना इतक्या सहज सोडायचे नाही म्हणून डॉ. विखे यांनी संगमनेरच्या जंगलात प्रवेश केला. टायगर अभी जिंदा हैं.! असे म्हणत जनतेला असे भासविले. की, मीच उमेदवारी करणार आहे. मात्र, तसे काही झाले नाही. प्रचंड गर्दी, अनेक दर्दी, आरोप प्रत्यारोप हे सर्व सुरू असताना अचानक अध्यक्ष महोदय आले आणि सगळ्या कष्टावर पाणी फिरविले. त्यानंतर फिल्मी स्टाईलने मारामारी, गाड्या जाळाजाळी, घरातून ओडून मारहाण आणि धराधरी. यात सहा गुन्हे दाखल झाले आणि अनेक प्रतिष्ठीत लोकांना गुन्हेगार करण्यात आले. हे सर्व सुरू असताना आंभोर्‍याची सभा आली आणि ती देखील सफाईदार झाली. मात्र, त्यात टायगर अभी जिंदा हैं.! चा नारा लागला नाही. एखाद्या चित्रपटाला लाजवेल अशी ही स्टोरी संगमनेरात पहायला मिळाली आहे. आता विखे जरी निवडणुकीच्या रिंगणात नसले. तरी, विखे आणि खताळ हेच थोरातांना टफ देऊ शकतात हे वास्तव होते. मात्र, आता वाच्चाळवीरामुळे नेमकी किती व कोणाला फटका बसतो. हे येणारा काळ ठरविणार आहे.  

लोकसभेचा वचपा काढायचा होता.!

खरंतर पहिल्यापासून संगमनेरात अमोल खताळ यांचेच नाव चर्चेत होते. मात्र, अचानक डॉ. सुजय विखे यांनी वादळी ऐन्ट्री केली आणि अनेक विरोधक जागे झाले. होय.! विखे है तो मुमकीन है.! असे अनेकांना वाटू लागले होते. मात्र, मुळात काहीतरी वातावरण झाले असते. तरी डॉ. सुजय विखे येथे उभे राहतील आणि पुन्हा राजकीय फालुदा करून घेतील अशी सुत्राकडुन शक्यता नव्हती. तरी देखील ते आले, त्यांनी पाहिले आणि वातावरण ताईट करुन ते निघून गेले. अर्थात त्यांना लोकसभेच्या पराभवाचा वचपा काढायचा होता. त्यामुळे, संगमनेरातील कॉंग्रेस कितीही नाही म्हटली. तरी हावा मात्र ताईट झाली होती. वातावरण फिरले होते. त्यामुळे, टायगर अभी जिंदा हैं.! हे वाक्य अनेकांच्या काळजात धडकी भरीत होते. दुर्दैवाने एक देशमुख बरळला आणि होत्याचे नव्हते होऊन गेले.

धांदरफळ सभेने वारं फिरलं.!

हजारो लोकांना सभेला जमा करायचे, त्यांची व्यवस्था करायची, सभा गाजवायच्या, मुद्देसुद मांडणी करुन विरोधकांना काऊंटर करायचे आणि मतदारांना आकर्शीत करायचे हे वाटते तितके सोपे नाही. तळेगाव, साकूर, हिवरगाव पावसा, धांदरफळ आणि आंभोरे या सभांना तोबा गर्दी पहायला मिळाली. राज्यात, जिल्ह्यात आणि तालुक्यात सभांची चर्चा आणि विरोधकांना घाम फोडण्याचे काम डॉ. विखे यांनी केले होते. मात्र, धांदरफळ येथील सभेने सर्व वातावरण बदलुन टाकले. देशमुखच्या बोलण्यातून लोकांनी प्रचंड राग आला. निवडणुका इतक्या खालच्या पातळीवर जात असेल तर ते संगमनेरच्या मतदारांना कधीच मान्य होणार नाही. त्यामुळे, त्या एका सभेने संपुर्ण वातावरण बदलुन टाकल्याचे पहायला मिळाले.

अमोल खताळ कट्टर विरोधक.!

राजकारणात जेव्हा प्रस्तापित व्यक्तीच्या विरोधत बोलणे किंवा विरोधी पक्षात असणे म्हणजे प्रबळ तथा दावेदार उमेदवार म्हणता येणार नाही. यापुर्वी थोरात साहेबांना केवळ विरोधी पक्षात आहे म्हणून उमेदवारी मिळाली होती. आता मात्र, जसे अकोले तालुक्यात डॉ. किरण लहामटे यांनी पिचड साहेबांना प्रचंड व कडवा विरोध केला. म्हणून ते २०१९ साली उमेदवार झाले आणि त्यांनी पिचडांचा पराभव देखील केला. तसेच गेली कित्तके वर्षे अमोल खताळ यांनी थोरात यंत्रणेला विरोध केला आहे. त्यांना दंड होईल असा पाठपुरावा केला आहे. त्यामुळे, खताळ यांना उमेदवारी मिळाली तर ते बर्‍यापैकी फाईट देतील असे अनेकांना वाटत होते.

संधी मिळाली, चांगले काम केले.!

अमोल खताळ यांना मा. महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष केले. त्यावर काम करताना खताळ हे गावोगावी पोहचले, तीन चार कोटी रुपयांचा निधी आणून खताळ यांनी वितरीत केला. आमदार, खासदार नसताना देखील ५०० कोटी रुपयांचा निधी संगमनेर तालुक्याला आणला. ज्यांनी ज्यांनी गौणखणिज घोटाळे केले, कामात कुचराई केली, शासनाचा टॅक्स चुकविला, बेकायदेशीर कामे केली, ज्या अधिकार्‍यांनी जनतेला त्रास देण्याचा प्रयत्न केला त्यांची बदली तर कधी त्यांना वठणीवर आणण्याचे काम केले. अनेक महिलांची प्रकरणे केली, विविध योजना राबविल्या, संगमनेरात हजारोंचे मेळावे आणि विखेंना संगमनेरात पाय रोवण्यासाठी एक चांगला विरोधक जो मॅनेज होऊ शकत नाही असा विश्‍वास दिला. त्यामुळे, पक्ष कोणता माहित नाही. पण, खताळ विरुद्ध थोरात अशीच लढत होणार हे शाश्‍वत होते.