डॉ. लहामटेंना मतदान म्हणजे भाजपाला मतदान, संविधान, जातीयवाद, लहामटे भाजपाचे पांघरुन घेऊन आलेत.!

सार्वभौम (अकोले)-

डॉ. किरण लहामटे यांना मतदान म्हणजे भाजपाला मतदान, अशा प्रकारचे वक्तव्य मा. महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. कारण, अकोले तालुक्याला तशा प्रकारचा इतिहास आहे. येथे स्व. अशोकराव भांगरे आणि मा. आ. वैभव पिचड यांनी भाजपाकडून निवडणुका लढविल्या आहेत. दोघांच्या मागे कार्यकर्त्यांचे इतके बळ असून देखील त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे, येथे भाजपाच्या गोटातून विरोधी उमेदवार आहेत. डॉ. लहामटे यांना मत म्हणजे भाजपाला मत दिल्यासारखे आहे. देशात, राज्यात आणि तालुक्यात पसरविला जाणारा जातीयवाद, पक्ष फोडाफोडी, इडी, सीबीआय, सीआयडी यांचा होणारा गैरवापर, पक्षात या नाहीतर जेेलमध्ये जा अशी प्रवृत्ती असणार्‍या पक्षाला मतदान करायचे का? संविधान बदलु पाहणार्‍यांना बळ द्यायचे काय? आदिवासी समाजाच्या बजेटवर घाला घालणार्‍यांच्या पाठीशी उभे रहायचे का? अशा प्रकारचा सवाल थोरात यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे, महाविकास आघाडीला साथ द्या आणि अमित भांगरे यांना विजयी करुन तालुक्याचा सांस्कृतीक, पुरोगामी व दहशतमुक्त वारसा कायम ठेवा असे आवाहन थोरात यांनी केले. ते अमित भांगरे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अकोल्यात आले होते.

लाडकी बहीण योजना ही केवळ निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर सुरू करण्यात आली आहे. राज्याच्या तिजोरीवर कर्ज काढून केवळ मतांसाठी पैशाची वाटप केली आहे. हे निवडणुक आयोगाच्या लक्षात येताच या योजनेला स्थगिती दिली आहे. ज्या महिलांना पैसे मिळाले त्यांची दिवाळी झाली. मात्र, ज्यांना मिळाले नाही त्यांना आता प्रलोभने दाखविली जात आहे. त्यांचे अर्ज जमा करुन आम्ही पैसे मिळवून देऊ असे सांगितले जात आहे. मात्र, निवडणुक काळात कोणालाही पैसे मंजूर करून देता येत नाही. केवळ दिशाभूल करण्याचे काम चालु आहे. उलट या योजनेला कायदेशीर दर्जा देऊन महाविकास आघाडीचे सरकार आले तर यापेक्षा जास्त रक्कम देऊन लाडक्या बहिनीचा सन्मान करण्यात येणार आहे. त्यामुळे, महिलांनी देखील अविचारी पक्षांसोबत जाण्यापेक्षा विचारांसोबत यावे. पुरुषांनी ही योजना किती फसवी आहे हे आपल्या भगिनिंना सांगावे. अजित पवार यांनी लाडकी बहिन योजना सुरू केली आणि आपल्या एकुलत्या एक बहिनीच्या विरोधात आपल्या बायकोला निवडणुकीत उभे केले. त्यामुळे, हा केवळ निवडणुकीचा कनवळा आहे असे खा. सुप्रिया सुळे म्हणाल्या.

एकोप्याने निवडून दिले आता ऐकोप्याने पाडा.!

२०१९ मध्ये डॉ. किरण लहामटे यांना निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले होते. एकास एक उमेदवारी करण्यासाठी आम्ही देखील सहभागी होतो. म्हणून सर्वांनी थांबून घेतले आणि डॉ. लहामटे यांना विजयी केले. मात्र, ते देखील त्याच वळचणीचे निघाले. गेल्या वेळी लहामटेंना विजयी करण्यासाठी एकोप्याने आपण लढलो होतो. आता त्यांनी गद्दारी केली. त्यामुळे, त्यांचा पराभव करण्यासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, कम्युनिस्ट, मार्क्सवादी, आंबेडकरी चळवळ, विविध वैचारिक संघटना, आदिवासी संघटना अशा सर्वांना एकत्र घ्या आणि लहामटेंना एकोप्याने निवडून दिले आता त्यांना ऐकोप्याने पाडा. 

पुरोगामी अकोले तालुक्याचे कौतुक.!

अकोले तालुक्याने नेहमी पुरोगामी विचार जपला आहे. डाव्या विचारांना खतपाणी घालुन जातीयवादी, धर्मांध व संविधान विरोधी लोकांनी मातीत गाडले आहे. २०१९ साली आपण पाहिले आणि काल झालेल्या लोकसभा निवडणुकीत देखील आपण पाहिले आहे. डॉ. किरण लहामटे हे देखील भाजपा सोबत होते आणि पिचड साहेब देखील भाजपा सोबत होते. तरी संगमनेरमध्ये फक्त सात हजारांचे लिड होते आणि अकोल्यात मात्र ३० हजारांचे लिड होते. त्यामुळे, येथे गद्दारी आणि जातीयवादी पक्षांना लोक स्विकारत नाही. हेच येत्या २०२४ मध्ये होणार आहे. अकोले तालुक्यातील मतदार हे उमेदवार पाहत नाही. तर, विचार पाहतात, पक्षाची रित पहातात आणि त्यानुसार मतदान करतात. मागच्या आमदाराचा विजय देखील याच विचाराने झाला आहे. त्यामुळे, हा तालुका भाजपला बळ मिळेल असे कधी वागणार नाही.

निवडणुक संपली की आमदार आम्हाला विसरले.!

अकोले तालुक्याला संगमनेर पठार भागावरील ४० पेक्षा जास्त गावे जोडलेली आहेत. त्यामुळे, बाळासाहेब थोरात यांनी डॉ. लहामटे यांना मदत केली होती. मात्र, डॉ. लहामटे निवडून आल्यानंतर ते बाळासाहेब थोरात यांना विसरुन गेले. मदत केली याचा विसर होता. उलट अकोले तालुक्यात आल्यानंतर डॉ. लहामटे यांच्या कार्यकर्त्यांकडून अपमन होतो. अशा प्रकारची खदखद थोरात साहेबांनी व्यक्त केली. तसेही आमदार लहामटे आणि थोरात यांचे गेल्या पाच वर्षात जरा देखील सुत जमले नाही. कधी कोरोनात रेमडिसिव्हर तर कधी मुळा, प्रवरेचे पाणी, कधी मान सन्मान तर कधी पठारभाग अशा विविध कारणांनी दोघांमध्ये कायम ३६ चा आकडा राहिला आहे. इतकेच काय.! तर, नगर पंचायतीमध्ये देखील लहामटेंनी कॉंग्रेसची कशी अवहेलना केली यावर देखील त्यांनी प्रकाश टाकला. त्यामुळे, येथील आमदार निवडणुक संपली की आम्हाला विसरले.! अशा प्रकारची भावना थोरातांनी व्यक्त केली.

गडी एकटा निघाला तर आम्ही कोठे होतो.!

आमचे मित्र डॉ. लहामटे हे निवडून आले आणि आठच दिवसात ते डोंगरावर एकटेच गेले. त्यांचा कॅमेरा, त्यांचे फडके गळ्याभोवती टाकले आणि गाणं टाकलं. गडी एकटा निघाला. आम्ही रिल्स पाहिली आणि फार वाईट वाटले. तेव्हा आम्हाला प्रश्‍न पडला, आम्ही कोठे होतो? आहो.! आम्ही जिवाला जीव दिला, सव्वा लाख जनता सोबत होती, लोकांनी उपाशी तापाशी राहून काम केले, कार्यकत्यांना झोपा नव्हत्या मग हा गडी एकटा निघाला कुठं? त्यांच्या निर्णयाचे आम्हाला प्रचंड वाईट वाटले आहे. त्यांनी भाजपाला पाठबळ देऊन फक्त आमच्या पाठीत खिंजीर खुपसला नाही. तर सव्वा लाख लोकांच्या पाठीत डॉ. लहामटे यांनी खंजिर खुपसला आहे. त्यामुळे आता पुन्हा सगळ्यांना सोबत घेऊन जायचे आहे आणि जे एकटे निघाले आहे त्यांना एकटे पाडायचे आहे. 

- डॉ. अजित नवले (शेतकरी नेते)