ब्रेकींग.! बिबट्या गाडीला धडकला, बिबट्याने दोघांवर हल्ला केला, बिबड्याच्या जबड्यातून दोघे बचावले.!

सार्वभौम(संगमनेर) :- 

              संगमनेर तालुक्यातील संगमनेर खुर्द परिसरातील नाशिक-पुणे हायवेवर जखमी बिबट्याला धरण्यासाठी गेलेल्या एकावर व पाहण्यासाठी आलेल्या एका जनावर बिबट्याने हल्ला केला. मात्र, नशिब बलोत्तर म्हणुन या दोघांचा जीव वाचला. या हल्ल्या मध्ये दादु मधुकर रुपवते (रा. खांडगाव,ता. संगमनेर) व गोविंद बाबाराजा गायकवाड (रा. संगमनेर खुर्द, ता. संगमनेर) हे दोघे गंभीर जखमी झाले असुन त्यांना मानेवर, पायावर व हातावर बिबट्याने हल्ला केला आहे. त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. ही घटना आज मंगळवार दि. 5 नोव्हेंबर 2024 रोजी संध्याकाळी 7:30 वाजण्याच्या दरम्यान घडली. खरंतर, वारंवार बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू होत असल्याच्या घटना पुढे येत असताना देखील  इतक्या बेजबाबदारपणे बिबट्याला जाळ्यात पकडण्यासाठी गेले कसे? हे जाळे हातात असल्याने फार मोठे धाडस केले. मात्र, ते अंगलट आले होते. काही काळ शांत बसलेला बिबट्या अचानक उठला आणि दादु रुपवते व गोविंद गायकवाड या दोघांवर हल्ला करून पळ काढल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

            याबाबत सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील संगमनेर खुर्द परिसरातील पुणे नाशिक हायवेवर मोठ्या प्रमाणात रहदारी सुरू असते. आज संध्याकाळी  7:30 वाजण्याच्या सुमारास एका बिबट्याला हायवेवरून जाणाऱ्या मोठ्या गाडीने धडक दिली असावी. या धडकेत बिबट्या जखमी झाला. बिबट्या रोडच्या कडेला जखमी होऊन शांत बसलेला होता. हायवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असल्याने तेथील लोकांची नजर या बिबट्यावर पडली. हायवेवरील लोकांनी गाडी थांबुन या बिबट्याचे दर्शन घेतले. परिसरातील लोकांनी बिबट्या पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. काही क्षणात शेकडो लोक पाहण्यासाठी जमले. बिबट्या जखमी असल्याने तो शांत बसलेला होता. परंतु लोक दुचाकी थांबुन बिबट्यावर लाईट लावुन जवळ जाऊन पाहत होते.

             दरम्यान, बिबट्या काही काळ शांत बसला. तेथे जनतेला बिबट्याला पाहण्यासाठी मोह आवरला नाही. अनेकांनी फोटो व्हिडीओ काढले. तेथे जनतेचा आवाज मोठ्या प्रमाणात होऊ लागला. त्याची हालचाल सुरू झाली. तो पर्यंत वनविभागाचे अधिकारी यांना फोन केला असता ते घटनास्थळी पोहचले. त्यांनी या बिबट्याला पकडण्यासाठी एक जाळे आणले. त्यांच्या सोबत काही प्राणी मित्र होते. त्यामधील गोविंद गायकवाड हा एक तरुण होता. तो व त्याचे सहकारी जाळे घेऊन बिबट्याला पकडण्यासाठी गेले. परंतु तो बिबट्याचे डोके धरत नाही तेच बिबट्याने गोविंदच्या मानेवर पंजा मारल्याने त्याची जाळीवरील पकड निसटली. त्यामुळे, सर्वांनी तेथुन पळ काढला. त्यानंतर पाहण्यासाठी आलेल्या दादु रुपवते यांच्या पायावर हल्ला केला. या हल्ल्यातुन वाचण्यासाठी सर्वांनी पळ काढला. मात्र, दादु रुपवते व गोविंद गायकवाड हे दोघे बिबट्याच्या हल्ल्यात सापडले. हे दोघे गंभीर जखमी झाले असुन त्यांना पुढील उपचार खाजगी दवाखान्यात सुरू आहे. या घटनेनंतर वनरक्षक बिबट्याला ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करत आहे.

         खरंतर, देवगाव येथील बिबट्याला पकडण्यासाठी महाराष्ट्रतील रेस्क्यू फोर्स आली होती. अनेकजण या बिबट्याला पकडण्यासाठी रात्रं दिवस एक करत होते. देवगाव येथील बिबट्या पकडण्यात आला त्यावेळी गोविंद गायकवाड हा देखील बिबट्याला पकडण्यासाठी होता. त्यामुळे, या गायकवाडचे धाडस चांगलेच वाढले. आज देखील बिबट्या जखमी होऊन रोडच्या कडेला शांत बसला होता. त्यावेळी या बिबट्याला पकडण्यासाठी गोविंदने मोठ्या जिद्दीने धाडस केले. परंतु ते अंगलट आले होते. नशीब बलोत्तर म्हणुन गोविंदला फारसे काही झाले नाही.