पिचडांना भाजप सोडावं लागेल, तरी ते राज्यमंत्री होतील.! पिचड उमेदवार की किंग मेकर.! सध्या घर का ना घाट का.!
ऍड. सागर शिंदे
सार्वभौम (राजकीय विश्लेषण) :-
सन २०१९ साली भाजपाचा झेंडा हाती घेतलेल्या पिचड परिवाराची प्रचंड गोची झाली आहे. त्यामुळे, ना घर का, ना घाट का अशा आवस्थेत त्यांचे राजकारण येऊन ठेपले आहे. मात्र, अशा कठीण परिस्थितीत फक्त एकमेव माणूस असे आहे. ते यातून तोडगा काढू शकतात. ते म्हणजे मधुकर पिचड साहेब. यांच्या जेव्हा लक्षात आले. की, आता महायुती होत आहे आणि भाजपातून आपल्याला तिकीट मिळणे अशक्य आहे. त्यानंतर त्यांनी धनगर-आदिवासी आरक्षणाचा मुद्दा हाती घेऊन थेट शरद पवार साहेब यांची भेट घेतली. अंतर्गत काय शिजले हे जरी गुलदस्त्यात असले तरी डॉ. लहामटे यांचे राजकारण संपविण्यासाठी पवार साहेब फार मोठी खेळी खेळणार यात तिळमात्र शंका नाही. पिचड साहेब अमित भांगरे यांना बिनशर्त पाठींबा देऊन नंतर विधानपरिषदेवर जातील आणि राज्यमंत्री पदाचे दावेदार होतील. अशा प्रकारची व्युव्हरचना असू शकते. अर्थात माजी मंत्री वयाने म्हातारे झाले तरी त्यांचा शब्द अजून देखील चिरतरुण आहे. त्यामुळे, तळपाडे, मेंगाळ, भांगरे, पिचड अशा प्रकारचे चित्र दिसेल आणि एक आमदार तर एक राज्यमंत्री अशी प्रकारची संधी अकोले तालुक्याला मिळेल अशा प्रकारची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
सन २०१९ साली राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिलेल्या पिचड पिता-पुत्राला धडा शिकविण्यासाठी शरद पवार यांनी विभक्त होणार्या मतांची गोळाबेरीज केली आणि एकास एक उमेदवार देऊन डॉ. किरण लहामटे यांना १ लाख १३ हजार मतांनी निवडून आणले. मात्र, २०२४ मध्ये पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती झाली आणि डॉ. लहामटे यांनी शरद पवार यांना सोडचिठ्ठी देऊन दादांशी आपले बस्तान बांधले. त्यामुळे, झाले काय? की पिचड आणि लहामटे ह्या दोन्ही तलवारी एकाच मॅनात फिट्ट बसल्या. त्यामुळे, त्यांनी शत्रुंशी झुंजण्यापेक्षा एकमेकांशीच लढाई सुरू केली. जसजशा निवडणुका जवळ येऊ लागल्या तसतसे हे विळ्या भोपळ्याचे वैर झाले. सवतीसारख्या दोघांमधील कुरबुरी तालुक्यासाठी फक्त आणि फक्त मनोरंजनाचा कार्यक्रम झाला. पण, तिकीट कोणाला मिळणार? तर महायुतीत डॉ. लहामटे यांनी बाजी मारली हे पिचड स्विकारत नसतील. तरी ते कटू पण सत्य आहे.
आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अकोल्यात येऊन डॉ. किरण लहामटे या पठ्ठ्याला निवडून द्या अशी साद जनतेला घातली. त्यामुळे, डॉ. लहामटे यांचे तिकीट फायनल झाले हे सांगण्यासाठी कोण्या ज्योतीष्याची गरज नाही. अशा परिस्थितीत महायुतीतून तिकीटाचे दावेदार असणारे पिचड यांनी काय भुमिका घ्यावी? अन कोठे जावे? उमेदवारी करावी की बिनशर्त पाठींबा द्यावा? याबाबत ते स्वत: संभ्रमात आहेत. मात्र, येथे राज्याच्या राजकारणात खरे कार्ड चालेल ते म्हणजे माजी मंत्री मधुकर पिचड साहेब यांचे. त्यांनी महायुतीची हलचाल पाहिली आणि थेट शरद पवार साहेब यांची भेट घेतली. तब्बल अर्धा तास चर्चा केल्यानंतर ते माघारी आले आणि कोणत्याही प्रकारची राजकीय सौदाबाजी न करता सामाजिक गोष्टींवर भर दिला. त्यात भंडारदरा धरणाचे नाव आद्य क्रांतीकरक राघोजी भांगरे असे ठेवण्यासाठी बर्यापैकी शक्तीप्रदर्शन केले.
आता यात महत्वाचे म्हणजे भाजपाकडून उमेदवारी मिळणार नाही हे जवळजवळ फिक्स झाले आहे. संधी आहे ती फक्त महायुती बिघडण्यातून, मात्र त्याच्या देखील सुत्राम शक्यता वाटत नाही. मग प्रश्न पडतो की, अपक्ष निवडणुक लढायची का? तर, अकोले तालुक्यातील जनता अपक्ष उमेदवारला सपोर्ट करत नाही. मात्र, अपक्ष उमेदवारामुळे कोणाचातरी काटा होतो हे बाकी निच्छित. मग काटा करायचा तर डॉ. लहामटे यांचाच झालेला त्यांना अपेक्षित असणार आहे. मात्र, राजकीय सारिपाठाचा अभ्यास केला. तर, लक्षात येते की, पिचड अपक्ष लढले तर फायदा डॉ. लहामटे यांना होतो. त्यामुळे, थेट लढत ही पवार गट विरुद्ध दादा गट म्हणजे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी. मात्र, येथे युतीत बिघाडी झाल्याने आघाडीला अलबेले वातावरण होणार आहे. त्यामुळे, पिचड साहेब काय भुमिका घेतली हे फार महत्वाचे असणार आहे. ते सध्या उमेदवार होतात की किंग मेकर होतात याहून तालुक्याचे राजकारण फार वेगळी दिशा घेणार आहे.
आता यावर अनेक भाजपाप्रेमी, काही भाऊ प्रेमी आणि उपद्रवी पदाधिकारी यांना अक्षेप असेल मात्र, येणार्या काळातील राजकीय अपवाद वगळता पिचड पिता-पुत्रांना भाजपा सोडल्याशिवाय पर्याय नाही. अर्थात बीजेपीतून अलिप्त झाल्याशिवाय त्यांना अच्छे दिन नाही ही आता काळ्या दगडावरील पांढरी रेष आहे. ज्या पिचडांना पाडण्यासाठी लहामटेंनी एकास एक करण्याचा प्रयत्न केला. त्याच लहामटेंना पाडण्यासाठी पिचड देखील एकास एक करण्याच्या तयारीत असतील. फरक इतकाच असेल की माजी मंत्री मधुकर पिचड आणि शरद पवार यांच्या जुन्या मैत्रीचा फायदा वैभव पिचड यांना होईल आणि तालुक्यातील गणिते बदललेली दिसतील. त्यासाठी राजकीय संयम बाळगावा लागला तर तो बाळगण्याची कितपत तयारी पिचडांची असेल याबाबत मात्र शंका आहे.