भावाच्या अंत्यविधीचा खर्च दिला नाही म्हणून भाऊजयीसह दोघींची निघृण हत्या, बेलापुरात रक्ताचे पाट वाहिले.! आरोपी पसार..
सार्वभौम (अकोले) :-
सख्खा भाऊ मयत झाल्यानंतर त्याच्या मयतीचा ५० हजार रुपये खर्च भाऊजयीने दिला नाही. त्यामुळे, तिची दिराने हत्या केली आहे. जेव्हा या दोघांचा वाद चालु होतो तेव्हा त्याच्या नात्यातील एक महिला तेथे सोडविण्यासाठी गेली असता या माथेफिरूने तिच्यावर देखील कोयत्याने सपासप वार केले. यात उज्वला अशोक फापाळे (वय ३५, रा. बेलापूर, ता. अकोले) व वैशाली संदिप फापाळे (वय ४०) अशा दोघींचा जागीच मृत्यु झाला आहे. दोघी रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर आरोपी दत्तात्रय उर्फ बापू प्रकाश फापाळे (वय ४५) हा घटनास्थळाहून पसार झाला. ही घटना सोमवार दि. ७ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्याचे काम सुरू होते. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. यात महत्वाचे म्हणजे उज्वला फापाळे यांनी त्यांचे दोन्ही मुले माहेरी ठेवले होते. म्हणून ते वाचले. अन्यथा या माथेफीरू फापाळे याने त्यांची देखील हत्या केली असती असे स्थानिक नागरिक प्रतिक्रिया देत होते.
याबाबत सविस्तर माहिती अशी. की, अशोक फापाळे आणि आरोपी दत्तात्रय फापाळे हे दोघे भाऊ होते. अशोकराव यांचे निधन झाल्यानंतर त्यांची पत्नी उज्वला फापाळे आणि तिची दोन मुले असा परिवार बेलापूर येथे रहात होता. ज्यावेळी अशोक फापाळे यांचे निधन झाले होते. तेव्हा त्यांचा भाऊ तथा आरोपी दत्तात्रय फापाळे याने अंत्यविधीसाठी लागणारे साहित्य आणि अन्य खर्च केला होता. मात्र, तो गेल्यानंतर यांच्यात जमीन वाटप आणि अंत्यविधीत झालेला खर्च याबाबत कायम वाद होत होते.
दरम्यान, या सर्व गोष्टीला कंटाळून उज्वला फापाळे हिने तिचे दोन लेकरं घेतली आणि ती कामासाठी पुण्यातील चाकन येथे निघून गेली. तेथे गेेल्यानंतर कामधंदा करणे आणि इकडे शेती देखील करणे असा संघर्ष तिचा सुरु होता. मात्र, आरोपी दत्तात्रय फापाळे हा तिला काही सुखाने जगू देत नव्हता. उज्वला ही तिच्या शेतातील स्वयाबिन काढण्यासाठी घरी आली होती. मात्र, तिला आरोपी दत्तात्रय हा स्वयाबिन काढून देत नव्हता. तुझ्या नवर्याच्या अंत्यविधीसाठी माझे ५० ते ६० हजार रुपये खर्च झाले आहे. ते मला दे असे म्हणून त्यांच्यात वाद सुरू झाले.
दरम्यान, माझा नवरा होता तर तुमचा देखील भाऊ होता. त्यामुळे, आता माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी पैसे नाही असे त्यांच्यातील वाद सुरु होते. यांच्यातील जमीन वाटप आणि आर्थिक देवाणघेवाण यातून कायम वाद होत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. आज उज्वला स्वयाबिन काढण्यासाठी आली होती. मात्र, घरी या दोघांचे भांडण सुरू झाले. त्यावेळी आरोपी दत्तात्रय फापाळे याने कोयता आणला आणि आपल्या भाऊजयीवर सपासप वार केला.
दरम्यान, उज्वला फापाळे यांच्या डोक्यावर वार केल्यानंतर तेथे जवळच उभ्या असलेल्या उज्वला यांच्या जाऊबाई वैशाली संदिप फापाळे यांनी हा प्रकार पाहिला असता त्या पुढे झाल्या आणि त्यांनी दत्तात्रय फापाळे यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा राग इतका होता. की, या माथेफिरू फापाळे याने निष्पाप वैशाली हिच्यावर देखील कोयता चालविला. यात एकाच वेळी एकाच ठिकाणी दोन्ही महिला रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. यांना पाहिल्यानंतर अन्य काही तेथे आले मात्र दत्तात्रय फापाळे याला थांबविण्याचे धाडस कोणाचे झाले नाही. दोन्ही महिला एकाशेजारी एक पडल्यामुळे अक्षरश: घटनास्थळी रक्ताचे पाट वाहताना दिसत होते.
दरम्यान ही घटना घडल्यानंतर आरोपी दत्तात्रय फापाळे हा त्याच्या हातात कोयता घेऊन भर दिवसा आणि भर गावातून पायी चालत गेला. त्याच्या हातात भलामोठा कोयता असल्याचे देखील सीसीटीव्हीत दिसत आहे. ही घटना अकोले पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा केला आहे. मात्र, आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. ही घटना घडल्यानंतर बेेलापूर गावात मात्र फार भितीचे आणि दहशतीचे वातावरण पहायला मिळाले.