साहेब.! तुमच्या पाया पडतो, पण लहामटे अन पिचडांचा प्रचार करायला लावू नका.! शिंदे गटात धुमचक्री.! सगळे वाजविणार तुतारी.!
सार्वभौम (अकोले)-
डॉ. किरण लहामटे आणि वैभव पिचड यांना सगळं काही पुरविले होते. तरी देखील लोकसभेला हे घरात बसून राहिले. ही दोघे मात्तबर नेते असून देखील यांच्यामुळे, अकोले तालुक्यात सदाशिव लोखंडे यांना कमी मते पडली आणि ३५ हजार मतांचे लिड भाऊसाहेब वाकचौरे यांना मिळाले होते. तर, लोकसभेत काम करण्यासाठी डॉ. लहामटे यांनी प्रचंड अकांत तांडव केला होता. बाजिराव दराडे व्यासपिठावर असतील तर मी तेथे येणार नाही, असे म्हणत दंड थोपटले होते. शेवटी पक्ष आणि नेत्याच्या विजयासाठी दराडे यांनी तो अपमान देखील सहन केला. पण तरी देखील पिचड आणि लहामटे यांच्यामुळे लोखंडे यांचा पराभव झाला. ही स्टोरी इथेच थांबली नाही. तर, दराडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात पुढाकार असेल किंवा ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करुन सामाजिक तेढ निर्माण करण्यास हातभार असेल यात देखील साहेब कोठे कमी पडले नाही. आता तर एकनाथ शिंदे यांचा फोटोच बॅनरवर नको अशी भुमिका घेत महायुती आणि मित्रपक्ष तसेच कार्यकर्त्यांना आव्हान दिले आहे. त्यामुळे, शिंदे गटाच्या नेत्यांनी संपर्कप्रमुख यांच्यापुढे हात जोडले आणि मोठ्या त्वेषात्मक भावनेने म्हणाले. साहेब.! तुमच्या पाया पडतो. पण, डॉ. लहामटे यांचा प्रचार करायला लावू नका.
एकनाथ शिंदे साहेब यांना आम्ही खुप मानतो, ते आमच्यासाठी दैवत आहेत. पण, या डॉ. किरण लहामटे यांनी आजवर शिवसैनिकांची प्रचंड मानहानी केली आहे. त्यामुळे, काहीही झाले तरी आम्ही महायुती तथा डॉ. लहामटे यांचा प्रचार करणार नाही. आम्ही कट्टर शिवसैनिक आहोत, बाळासाहेबांना आणि शिंदे साहेबांना मानतो. मात्र, या आमदारांनी कायम शिंदे साहेब आणि येथील शिवसैनिकांची अवहेलना केली आहे. त्यामुळे, काही झालं तरी चालेल. पण, कोणतीही कारवाई केली तरी चालेल. पण यावेळी डॉ. लहामटे यांना मतदान करणार नाही म्हणजे नाही. या निर्णयावर आम्ही ठाम आहोत अशा प्रकारचे मत नामदेव गोर्डे यांनी अगदी परखड आणि आक्रमकरित्या मांडले. त्यांनी शिंदे गटातील शिवसैनिकांना काम करायचे का? असे विचारले असता सगळ्यांनी नकार दर्शविला आणि महायुतीला मदत करायची म्हटलं तरी मोठा गदारोळ उभा केला.
खरंतर, आडात नाही तर पोहर्यात येणार कोठून? त्यामुळे, डॉ. लहामटे यांचे पाच वर्षातील कारणामे आणि इतरांना दिलेली वागणुक ही आता बाहेर पडू लागली आहे. खरंतर, असे म्हणतात की, काल सुपात असणारा उद्या जात्यात येतोच. त्यामुळे, आज बरोबर डॉ. लहामटे हे जात्यात सापडले आहे. कारण, खासदारकीला जेव्हा लोखंडे साहेब किंवा शिंदे गटाने मदत मागितली. तेव्हा अक्षरश: आमदारांनी अनेक अटी व शर्ती ठेवल्या. त्यावेळी लोखंडे यांची मानसे यांच्या मागे फिरत होते. आता मात्र, शिंदे गटाचे वरिष्ठ नेते संगमनेरला आले आणि त्यांनी लहामटे यांना बोलविले तर त्यांनी नकार दिला. मात्र, राजकीय दट्ट्या लावताच त्यांनी संगमनेर गाठले. इतकेच काय.! काल लहामटे यांना बाजिराव दराडे यांची गरज नव्हती. मनात प्रचंड द्वेष होता. आता मात्र त्यांच्या बैठका होऊ लागल्या आहेत. त्यामुळे, काल सुपात असणारे आता जात्यात आल्याने ज्याला वाट्टेल तो आमदारांना दळुन घेऊ लागला आहे. अर्थात आपल्या वागण्याने किती लोक दुखावले, किती विरोध निर्माण केला. याची जाणिव त्यांना झाली असेल तर बरे.! अन्यथा पुन्हा ओपीडी शिवाय पर्याय नाही. अशी टिका त्यांच्यावर होऊ लागली आहे.
काही भागात शिंदे काही भागात नाही.!
मोदीजी आणि शहा तसेच शिंदे आणि फडणविस यांचे फोटो बॅनरवर पाहिले की मतदार मतदान करीत नाही. हीच रित अकोले तालुक्यात आहे. त्यामुळे, अजित पवार गटाचे उमेदवार लहामटे हे त्यांच्या प्रचारात त्यांचे नाव सोडा बॅनरवर फोटो देखील लावायला तयार नाही. मात्र, जेव्हा स्थानिक नेत्यांनी वरिष्ठांकडे तक्रार केली. त्यानंतर लहामटे यांनी असा निर्णय घेतला. की, फक्त काही भागातच मोदीजी आणि शहा तसेच शिंदे आणि फडणविस यांचे फोटो असलेल्या बॅनरच्या गाड्या तिकडे फिरवायच्या. मात्र, ज्या भागात पुरोगामी विचार प्रलग्भ आहे, भाजपा, शिंदे गटाचे मानसे कमी आहेत. त्या भागात लाडकी बहीण आणि फक्त अजित दादांचा फोटो असणार्या गाड्या फिरवायच्या. म्हणजे ही किती वाईट वेळ आमदारांवर आली आहे.
होय.! पिचड लहामटेंमुळे लोखंडेंचा पराभव.!
२०१४ आणि २०१९ अशा दोन वेळा शिर्डी लोकसभेतून खासदार होणारे सदाशिव लोखंडे यांनी २०२४ मध्ये देखील आपले नशिब आजमाविले होते. त्यांना नेवासा, श्रीरामपूर, कोपरगाव, राहाता, राहुरी अशा तालुक्यांमधून चांगले लिड होते. संगमनेरात देखील होते पण फार काही लिड नव्हते. मात्र, अकोले तालुक्यात पिचड आणि लहामटे हे दोन्ही प्रस्तापित नेते होते. तरी देखील त्यांना रसद पुरवून देखील त्यांनी काम केले नाही असा आरोप करण्यात येत आहे. खाली प्रत्येक तालुक्याने प्रामाणिकपणे काम केले. मात्र, अकोल्यात वास्तवत: पिचड यांनी तरी बर्यापैकी काम केले. मात्र, डॉ. लहामटे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना वंचितचा प्रचार करण्याची मोकळीक दिली होती. त्यामुळे, जे पाहिजे ते घेतले आणि जवळ ठेवले. मात्र, मते बाहेर काढण्याऐवजी ते घरात बसून राहिले. त्यामुळे, खाली सगळीकडून लिडने आलेले लोखंडे, अकोले तालुक्यात मागे राहिले. मग या दोघांना महाविकास आघाडी आणि त्यात अमित भांगरे विरोधक म्हणून जड भरले होते.
पिचड-लहामटेंमुळे मान खाली घालावी लागते.!
डॉ. किरण लहामटे आणि वैभव पिचड यांना सगळं काही पुरविले होते. तरी देखील लोकसभेला हे घरात बसून राहिले. यांनी जर प्रमाणिक काम केले असते. तर, आज सदाशिव लोखंडे हे पुन्हा खासदार झाले असते. बाजिराव दराडे हे अकोले तालुक्यातून येतात. त्यामुळे, जिल्हासंपर्कप्रमुख आणि त्यांच्याच तालुक्यामुळे खा. लोखंडे यांचा पराभव झाला. ही खरोखर लाजिरवाणी बाब आहे. त्यामुळे, जिल्ह्यावर किंवा राज्यात काम करीत असताना जेव्हा २०२४ च्या खासदारकीचा विषय निघतो तेव्हा मान खाली घालावी लागते. अशा प्रकारच्या भावना बाजिराव दराडे यांनी बैठकीत व्यक्त केल्या.