थोरात साहेबांच्या कार्यकर्त्यांचे गुन्हे आणि कारणामे आता जनतेच्या कोर्टात.! सुप्त लाटेतून उत्तर.!
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर तालुक्यात विधानसभेचे वारे वाहू लागले आणि तालुक्यातील जुन्या गोष्टींचे उत्खनन होऊन एक-एक घोटाळे समोर येऊ लागले आहे. चुकीत सापडेल त्यांना कधी दंड झाले, तर काहींचे वाद झाले. कधी नव्हे इतका तालुका घोटाळ्यांनी पोखरला गेला. थोरात साहेब नव्हे, पण कार्यकर्त्यांवर मोठ्या प्रमाणात घोटाळ्याचे आरोप झाले. कधी पतसंस्था घोटाळ्यात काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य आरोपी जेलमध्ये गेले. तर अमृतवाहीनी बँकेचे माजी चेअरमन अमित पंडीत हे देखील जेलवारी करून आले. कधी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मिलिंद कानवडे यांनी जमीन बळकवण्याचा प्रयत्न केला असा आरोप झाला. तर कधी वर्षानुवर्षे शासनाचा महसुल बुडवल्याने इंद्रजीत थोरात, के. के. थोरात, काँग्रेस शहर अध्यक्ष सोमेश्वर दिवटे, माजी नगराध्यक्ष विश्वास मुर्तडक, दिलीप पुंड यांचे नातलग आणि कार्यकर्त्यांना ८०० कोटींचा स्टोनक्रेशर धारकांना दंड झाला. कधी मिनी आमदार म्हणुन उपसभापती व दुध संचालकाचा वाद झाला. तर कधी घुलेवाडीमध्ये जिल्हा परिषद सदस्यांचे वारंवार वाद होऊन गुन्हे दाखल झाले. तर एका काँग्रेसच्या नेत्याने पत्रकाराच्या कुटुंबाला घरी जाऊन दमदाटी केली. साकुर पठारभागावर सामाजिक कार्यकर्त्याची संपूर्ण पाठ काळीनिळी करेपर्यंत कार्यकर्त्यांनी मारले. इतकेच काय! धनगंगा पतसंस्थेत घोटाळा करणारा आज प्रचार करत फिरत आहे अशी पोस्ट आता व्हायरल होत आहे. हे सर्व आता जनतेसमोर आल्याने थोरात साहेबांना याचा मतावर परिणाम होईल का? हा येणारा काळच ठरवेल. मात्र, थोरात साहेबांना या पाच वर्षात कार्यकर्त्यांचे ग्रहण लागले हे नक्की. त्यामुळे, आता विरोधक याचे भांडवल करून आ. थोरात साहेबांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये विरोधकांना फायदा होईल का? आणि झाला तर तो विजयापर्यंत नेईल का? याचे उत्तर येणारा काळच ठरवणार आहे.
संगमनेर तालुका जितका विकासाने ओळखला जातो तितके घोटाळे आता बाहेर येऊ लागले आहे. एक संस्था काढायची तिला गोंडस असे नाव द्यायचे आणि संस्थेत साहेबांचा फोटो लावायचा. त्यानंतर काय झाले सर्वांनी उघड्या डोळ्याने पाहिले. दुधगंगा पतसंस्था ही ग्रामीण भागासह शहराच्या जवळ होती. शेतकरी, कामगार आणि व्यापाऱ्यांनी या पतसंस्थेत ठेवी ठेवल्या. नंतर झाले काय? कोट्यावधी रुपयांचा घोटाळा बाहेर आला. लोकांनी काबाड कष्ट केले, घाम गाळला, रुपया-रुपया गोळा करून ठेवी ठेवल्या ते पैसे बुडत असतील तर हा रोष कुठं व्यक्त करणार. लोक आंदोलन करून टाहो फोडत होते. त्यांची आर्त हाक ऐकण्यासाठी कोणी वाली नव्हते. त्यामुळे, कोर्ट कचेरीची पायरी चढल्याशिवाय पर्याय राहिला नाही. शेवटी गुन्हा दाखल झाला काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्यसह आरोपींना अटक करावा लागली. हीच परिस्थिती धनगंगा पतसंस्थेची परंतु यामधील मुख्य आरोपी आता प्रचार करत असुन त्यांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. त्यानंतर आ. थोरात साहेबांचे खंदे समर्थक समजले जाणारे अमित पंडीत हे नगर अर्बन बँकमध्ये घोटाळा करून फरार होते. त्यांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केले. असे घोटाळेखोर साहेबांना चिटकले असल्याने साहेबांची प्रतिमा कधी डागळलेली नाही. साहेबांनी नेहमी स्वच्छ प्रतिमेने संगमनेरात कारभार चालवला. मात्र, कार्यकर्त्यांमुळे थोरात साहेबांवर विरोधकांनी टिकेचे झोड उठवताना पाहिले.
खरंतर, एकीकडे भाजपचे नेते मंडळी आ. थोरात साहेबांचे कौतुक करतात. विरोधात असताना सुद्धा त्यांच्या कामाची स्तुती केली जाते. मात्र, कार्यकर्ते या विश्वासाला तडा पोहचवताना दिसतात. कार्यकर्त्यांनी स्टोन क्रेशर टाकले खरे मग, साहेब महसुलमंत्री आहे. आपल्याला परवानग्या कर नाही का? की, डोळ्यावर गांधारीची पट्टी बांधायची आणि बिनधास्त अवैध उत्खनन करायचे हे काँग्रेसच्या नेते मंडळींच्या लक्षात यायला हवे. या नेते मंडळीना दंडाचा आकडा ऐकल्यावर भल्या-भल्यांची झोप उडेल. आता ही सर्व कारवाई हरीत लवादाकडुन झाली. या कारवाईत एक-दोन कोटी नवे तर ८०० कोटींपेक्षा अधिक आकडा आहे. यामध्ये इंद्रजीत थोरात, के. के. थोरात यासारख्या ५७ दिगगजांची नावे आहे. आता ही कारवाई राजकीय सुडाने केली असल्याची चर्चा केली जाते. मात्र, या कारवाईची तत्कालीन तहसीलदार अमोल निकम यांनी प्रेस घेऊन ही आकडेवारी दिली होती.
संगमनेर तालुक्यात जमीनीला भाव किती हे सांगण्याची गरज नाही. त्यामुळे, येथे मुळशी पॅटर्न सारखे जमिनीवर ताबा मारण्याची पद्धत सुरु झाली. गुंड वगैरे असते तर काय नाही पण, कार्यकर्त्यांमध्येच जमिनीवरून वाद झाल्याचे पाहायला मिळाले. एक दुध संघाचे संचालक व उपसभापती मध्ये हा वाद पाहायला मिळाला. याची मध्यस्थी दिगग्ज नेत्यांना करावी लागली. तर काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मिलिंद कानवडे यांच्यावर जमीन बळकवण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप झाला. त्यामुळे, असे एक ना अनेक कार्यकर्त्यांच्या गुन्ह्यांमुळे, दंडामुळे, जेलवाऱ्यांमुळे, पदाधिकाऱ्यांच्या आपअपसातील वादांमुळे विरोधकांचे थोरात साहेब केंद्रबिंदू ठरले आहे. हे सर्व मागील पाच वर्षात झाल्यामुळे या निवडणुकीत त्याचा काय परिणाम होईल हा येणारा काळ ठरवेल. मात्र, विरोधकांनी थोरात साहेबांना पराभव करण्यासाठी या घोटाळ्यांची, गुन्ह्यांची, दंडाची भाषणात टिका करून थोरात साहेबांना पराभव करण्यासाठी व्यूहरचना आखली आहे. यामध्ये विरोधक किती यशस्वी होतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.