दादा.! थोरातांची माणसं कुत्र्यावाणी हाणत्यात-खेमनर, घाबरु नका, टायगर अभी जिंदा हैं.! साकुरच्या सभेत टोलेबाजी.!

- सुशांत पावसे 

सार्वभौम (संगमनेर) :- 

                  संगमनेर तालुक्यात निवडणूकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. तालुक्यातील साकुर पठारभागावर डॉ. सुजय विखे यांनी शक्तीप्रदर्शन करून काँग्रेसच्या डॉ. जयश्री थोरात यांनी जोर्वे येथील केलेल्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले. की, येथील सुकन्या बोलल्या की, हा बाप माझ्या एकटीचा बाप नाही सात लाख लोकांचा बाप आहे. मी नुसतं पाहत राहिलो. पन्नास वर्षे विखें पाटील परिवाराने राजकारण केलं. कै. बाळासाहेब विखें पाटील यांनी आदर्श घडविला की, जनता ही "मायबाप" असते. संगमनेर तालुक्याच्या इतिहासात, महाराष्ट्रात पहिल्यांदा घडलं जिथे या तालुक्याच्या राजकन्या म्हणतात जनता नव्हे, इथला आमदार सगळ्यांचा बाप आहे. हे पहिल्यांदा ऐकायला मिळाले. इथल्या गोरगरीब जनतेचा शेतकऱ्यांचा बाप काढला येणाऱ्या २० नोव्हेंबरला इथली जनता मायबाप आहे हे संगमनेर तालुक्यातील जनता दाखवून देईल आणि २३ नोव्हेंबरला सत्तेतुन उतरवील. चाळीस वर्षात तुम्हाला काही करता आले नाही, गेल्या अडीच  वर्षात याचं साकुर पठार भागासाठी चाळीस कोटी रुपयांचा निधी देऊन आपण विकास केला आहे. काम केलय मंग मतदान मागायला आलो आहे. फक्त प्रत्येक बुथवर दहा सर्वसामान्य घरातले पत्र्याच्या खोलीतले प्रामाणिक १० माणसे द्या पाकिटावर मॅनेज होणारे नको. इथला संपूर्ण कायापालट आणि तक्ता पालट करून दाखवू असे बोलुन शेरो शायरी मधुन आ. थोरतांवर चाळीस वर्षांच्या कार्यकिर्दीवर टीकेची झोड उठवली. "तुम्हारा चालीस साल का काम देख कर, हर बंदा यहा शर्मिंदा है, यहाँ पे हर उनका कार्यकर्ता करता गोरख धंदा है, यह समझ रहें थे इतने सालो से, की साकुर का हर इन्सान बेहरा और अंधा है, लेकीन डरो मत साकुर के भाई और बेहनो, टायगर अभी जिंदा है, टायगर अभी जिंदा है.! 

ते पुढे बोले की, आजचा दिवस साकुरच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांमध्ये लिहून जाणारा हा दिवस आहे. आजपर्यंत प्रस्थापितांना विरोध करणारी मोठी सभा आहे. आज मान्यवरांचा प्रवेश केला. प्रवेश करत असताना त्यांच्या खांद्यावर मफलर टाकत होतो. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर दहशत दिसत होती. उपसरपंच हसायला तयार नाही. मी म्हणलं बाबा हास, तू सुजय विखेंच्या स्टेजवर आहे. ईथे तुझ्या केसाला कोणी धक्का लावणार नाही. आजपर्यंत साकुर पठार भागात कार्यकर्ते दहशतीखाली राहत होते. तशा घटना देखील घडल्या. बुवाजी खेमनर यांनी कोणाला-कोणाला मारले याचा उल्लेख केला. त्यामुळे, डॉ. सुजय विखें यांनी दहशतीचा बाजार उठवायचा असे सांगितले. माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे तुम्हाला जर कोणी धक्का दिला, कोणी मारलं तर मला फोन अगोदर लावायचा नाही. मला फोन लाऊन सांगायचे नाही. त्याने एक कानाखाली दिली तुम्ही दोन द्या मंग फोन लावा. दादा याने मला एक ठेवली होती मी दोन देऊन गार केले. आता मला वाचवा. तुमच्या पाठीमागे सुजय विखें उभा आहे. दहशत मोडायची असेल तर ती सर्वसामान्य माणसाच्या ताकतीने मोडावी लागेल. दहशत मोडायची असेल तर गोरगरीब जनतेच्या मनगटामध्ये काय ताकत आहे हे प्रस्थापितांना दाखवण्याची वेळ या संगमनेरात आली आहे.

          दरम्यान, युवा संवाद यात्रेवरून डॉ. सुजय विखें यांनी टिका केली. युवा संवाद यात्रेमध्ये दोनच व्यक्ती दिसताय एकतर त्यांचे कर्मचारी त्यांचे घरचे नाहीतर वाळूवाले. यापलीकडे कोणी दिसत नाही. युवा संवाद कसली काढताय तुमच्या तालुक्याचा युवक आज डॉ. सुजय विखें बरोबरच आला आहे. त्यामुळे, ही यात्रा बंद करा. डॉ. जयश्री थोरात यांच्या युवा संवाद यात्रेवरील भाषणावरून डॉ. सुजय विखें यांनी मिश्कील टिका केली. ते बोले मी भाषण ऐकलं या संगमनेर तालुक्याच्या राजकन्या म्हणतात माझ्या बापावर काही बोले तर याद राखा. ताई ओ ताई असे जयश्री थोरताना म्हणत मी तुमच्या वडिलांबद्दल काही बोलोच नाही. मी आमदारांबद्दल बोलो. आमदारांच्या कार्यपद्धती बद्दल बोलो, मी आमदारांच्या निष्क्रियते बद्दल बोलो. जो आमदार चाळीस वर्षापासुन सार्वसामन्याना खेळवत राहिला त्याच्या बद्दल बोलो. कधी ऐकायची सवय नाही. ऐकायला शिका वर्षानु वर्षे लोकांचे तोंड दाबुन ठेवले आता हा संगमनेर तालुका गप्प बसणार नाही. तुम्ही कानात जरी कापसाचे बोळे घातले तरी हा आवाज घरापर्यंत पोहचल्या शिवाय राहणार नाही. ही परिवर्तनाची नांदी आहे. ही संगमनेरच्या प्रस्थापितांची तक्ता पलट केल्याशिवाय थांबणार नाही. हा शब्द सुजय विखें पाटील देतो. त्यामुळे, तुम्ही गैरसमज करुन घेऊ नका. जयश्री थोरात यांना जे गाडीमध्ये बसलेले कलाकार आहे ते बोलायला सांगतात तेच तुम्ही बोलतात आणि तुमच्या गाडीत बसणारे हेच तुमचे वाटोळे करायला निघालेले आहेत. असे म्हणत डॉ. विखे यांनी अनेकांवर निशाणा साधला.

उमेदवार कोण? हे पाहू नका..!!

संगमनेर तालुक्यातून डॉ. सुजय विखे हे उमेदवारी करणार की नाही? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. त्यांच्या सभा, सभेंची गर्दी, जनतेचा प्रतिसाद आणि त्यांनी घातलेले राजकीय तांडव ही राज्याची लक्षवेधी ठरली आहे. मात्र, एकाच कुटुंबात दोन उमेदवार्‍या नको ही एक चर्चा आणि बलाढ्य थोरातांपुढे डॉ. सुजय विखे पुन्हा पराभूत झाले तर विखे कुटुंबाची नाचक्की या दोन गोष्टी कुरूप बनल्या आहेत. त्यामुळे, सुजय विखे स्वत: म्हणतात. की, उमेदवार मी असो वा कोणीही तुम्ही काळजी करू नका. परिवर्तन करण्याची तयारी ठेवा. याचा अर्थ डॉ. सुजय विखे उमेदार असतील याची सुत्राम शक्यता नाही. मात्र, अमोल खताळ किंवा अन्यकोणी उमेदवारास ते पुरेपूर बळ देऊन आ.थोरातांना पळता भुई थोडी करतील यात तिळमात्र शंका नाही.

टायगर अभी जिंदा हैं.!

नगर दक्षिण लोकसभेत खा. निलेश लंके यांनी डॉ. सुजय विखे यांचा पराभव केला. यात महत्वाची भुमिका ही बाळासाहेब थोरात यांनी बजावली होती. त्यामुळे, डॉ. विखे यांचा पराभव झाला. त्यानंतर थोरात यांची ताकद आणि राज्यातील प्रतिष्ठा आणखी वाढली. आता राजकीय स्थैर्यासाठी डॉ. विखे यांना पाच वर्षे वाट पहावी लागेल असे अनेकांना वाटले होते. मात्र, ज्यांनी विखेंचा पराभव केला. त्यांना देखील पाडण्याची ताकद विखेंमध्ये आहे. हे सिद्ध करण्यासाठी डॉ. सुजय विखे यांनी संगमनेरात तळ ठोकला आहे. दोन दिवसांपुर्वी तळेगाव तर काल साकूर येथे सभा घेऊन डॉ. सुजय विखे यांनी थोरातांना आव्हान दिले आहे. की, टायगर अभी जिंदा है.!

डॉ. थोरात ताईंच्यावतीने डॉ. विखेंची माफी.!

लोकशाहीत आणि विशेषत: निवडणुकीत तरी जनता ही नेत्यांसाठी मायबाप असते. मात्र, महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कन्या डॉ. जयश्री थोरात यांनी बापाला सात लाख जनतेचा बाप बनवून टाकले. अर्थात त्यांची भावना ही प्रांजळ आणि भावनिक होती. मात्र, मराठी भाषा फार भयानक आहे. क्रम चुकला की प्रपोगंडा होतो, यातुनच थोरात ताई यांच्या बोलण्यातून चुकीचा अर्थ काढण्यात आला. माझा बाप सात लाख मतदारांचा पालक आहे असे किंवा माझ्या बापासाठी सात लाख जनता मायबाप आहे असे म्हणणे अपेक्षित होते. यावर आज प्रतिक्रिया देताना डॉ. सुजय विखे म्हणाले. की, ताई राजकारणात नवीन आहे. त्यामुळे, एक लाडकी बहीण समजुन त्यांच्या वक्तव्याबद्दल मी जनतेची जाहीर माफी मागतो.!

दादा.! थोरातांची माणसं कुत्र्यावाणी हाणत्यात.!

साकूर येथे प्रचंड दहशतीचे वातावरण आहे. जर कोणी विरोधात बोलले तर त्यांचे तोंड दाबले जाते, कोणी त्यांना विरोध केला तर खोटे गुन्हे दाखल केले जाते, ग्रामपंचायतीत विरोध केला तर कार्यालयात कडी लावून मारले जाते. एकदा विरोध केला तर खोटी ऍट्रॉसिटी दाखल केली. ज्या महिलेने विनभंग दाखल केला तिला आम्ही पाहिले देखील नव्हते. मात्र, तरी देखील खोटे गुन्हे नोंदविले. तसेच दादा विरोध करणार्‍यांना थोरातांची माणसं कुत्र्यावाणी हाणत्यात असे म्हणत खेमनर आणि थोरात यांची दहशत मोडीत काढण्याची विनंती एका पठारावरील भाजप नेत्याने केली.

थोरातांनी दत्तक घेतलेलं गाव भाजपात.!

माजी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्यातील खरशिंदे हे गाव दत्तक घेतले होते. मात्र, ते आमदार आणि मंत्री होऊन देखील त्या गावचा विकास झाला नाही. तेथे आवश्यक तो निधी दिला नाही. उलट राधाकृष्ण विखे पा. यांनी अडीच वर्षात ४० कोटींचा निधी फक्त पठार भागावर दिला आहे. त्यामुळे, बाळासाहेब थोरात यांच्यावर अविश्‍वास दाखवून तेथील सरपंच आणि उपसरपंच यांनी डॉ. सुजय विखे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे, निवडणुकीच्या तोंडावर गावचे प्रथम नागरिक आणि अन्य सदस्य भाजपात गेल्याने खरोखर ही कॉंग्रेससाठी नाचक्की झाल्यासारखी गोष्ट असल्याचे बोलले जात आहे.