आ. डॉ.लहामटेंसाठी तीन महिने मी एकच अंडरपॅन्ट अन एकच बनियान घातले.! निवडून येताच मला दुर लोटले.! सगळ्यांचा पोपट झाला...!

- पोपट चौधरी

सार्वभौम (अकोले)-

डॉ. किरण लहामटे यांनी विकास कामे केली नाही असे कोणी म्हणत असेल तर तो त्याचा निव्वळ बाळबोधपणा आहे. मात्र, ज्यांच्या जोरावर डॉ. लहामटे निवडून आले, त्यातील प्रचंड धावपळ करणारे दहा माणसे देखील त्यांच्यासोबत नाही. हे जर कोणी नाकारत असेल तर तो देखील निव्वळ मुर्खपणा ठरले. त्यातला एक पोपट चौधरी आहे. डॉ. लहामटेंना आमदार होताना पहायचे, येथील पुरोगामीत्व जपायचे, परिवर्तनाचे साक्षिदार व्हायचे म्हणून ज्या निष्ठेने पोपटने काम केले त्याचा हा तालुका आय विटनेस आहे. त्यामुळे, डॉ. लहामटेंसाठी तीन महिने एकच अंडरपॅन्ट आणि एकच बनियान घातले आणि निवडून आल्यानंतर त्याला दुर लोटले.! या भावना बाकी सहज कळत न कळत डोळ्याची पाते आलेचिंब करतात. 

सन २०१९ ची निवडणुक ही खर्‍या अर्थाने परिवर्तनाची लाट होती. त्यामुळे, ही डॉ. लहामटेंची नव्हे तर माझी निवडणुक आहे. अपमान झाला तरी चालेल, मान नाही मिळाला तरी चालेल, उमेदवार दिसला नाही तरी चालेल, बुथला पैसे नाही मिळाले तरी चालेल पण गावात जायचे आणि मतदान करायचे, हक्काची मते घराबाहेर काढून ती करुन घ्यायची अशा प्रकारची एक आपुलकी वाटत होती. त्यामुळे, येथील लाखो मतदारांनी शुन्य अपेक्षा ठेवून डॉ. लहामटे यांना निवडून दिले होते. त्यात पोपट चौधरी हा एखाद्या घर गड्यापेक्षा जास्त आणि स्वत:च्या उमेदवारीपेक्षा अधिक धावपळ करीत होता. मात्र, डॉ. लहामटे निवडून येताच चौधरीचाच काय.! सगळ्यांचा पोपट झाला...!!

अर्थात ही सल फक्त एकट्या पोपटची नाही. तर, मा. नगरसेवक स्वतीताई शेणकर, त्याचे पती संदिप शेणकर, भाऊसाहेब साळवे, महेश तिकांडे, राजेंद्र कुमकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांची आहे. यातील अनेक तरुणांनी कधी शेणात हात घातला नाही. पण, प्रचार सभेसाठी शरद पवार यांचे हेलिपॅड शेणाने सारविले होते. रात्र-रात्र जागून व्यासपिठ उभे केले होते. मैदान स्वच्छ केले होते. एक हाक्काचा, आपुलेपणाचा आमदार होईल आणि कॉलर ताईट करुन आम्ही परिवर्तनाचे शिलेदार व साक्षिदार राहू असे मनोमन वाटणार्‍या तरुणांचे नंतर काय हाल झाले? तेच काय.! तर स्वत: अजित दादा आणि शरद पवार स्व. अशोकराव भांगरे यांना २०१९ च्या विजयाचे शिल्पकार म्हटले होते. त्या अशोकरावांना यांनी जुमानले नाही. तर शेणात हात घालणारे तरुण म्हणजे किडेच ठरले.!!

निवडणुक आणि मतभेद काहीही असो. पण, ज्यांच्यामुळे आपण निवडून आलो, ज्यांच्यामुळे विजय मिळला, ज्यांच्यामुळे प्रतिष्ठा मिळाली त्या कार्यकर्त्यांना सोडून देणे ही फार खेदाची गोष्ट आहे. म्हणजे ज्यांनी जन्माला घातले, ज्यांनी दुध पाजून लहानचे मोठे केले, ज्यांनी चालायला शिकविले, ज्यांनी पद, मान, प्रतिष्ठा दिली अशा आई वडिलांना अनाथ आश्रमात सोडल्यासारखे आहे. चुका कोणाकडून होत नाही? पण, तरी देखील कार्यकर्त्यांना वार्‍यावर सोडणे ही डॉ. लहामटे यांची चूक त्यांना येणार्‍या काळात राजकीय दृष्ट्या फार घातक ठरू शकते. त्यामुळे, पोपट चौधरी यांनी फक्त एकच खंत व्यक्त करुन आपल्या भावनांचा बांध फोडला आहे. तो जर खरोखर व्यक्त झाला. तर तो अनेकांच्या काळजाचा ठाव घेईल आणि २०१९ साली आपण जो माणूस निवडून दिला तो अयोग्य होता असे हीच मायबाप जनता म्हणू शकते.

खरंतर, डॉ. किरण लहामटे यांनी कामे केली हे कोणी नाकारत नाही. मात्र, या तालुक्यात कुटुंब प्रमुख म्हणून जी जबाबदारी त्यांच्यावर दिली होती. त्यात ते अपयशी ठरल्याचे सर्वच जाणकार म्हणतात. कळत नकळत जातीयवादावर येथे पत्रकार परिषदा झाल्या, तालुक्यातील ज्येष्ठ नेत्यांच्या अवहेलना यांच्याच काळत झाल्या, ज्यांनी साथ दिली त्यांना कोलण्याचे काम यांनीच केले, इतकेच काय.! तर मतदारांच्या छाताडावर लाता आणि निष्ठावंतांना जेलमध्ये टाकण्याचे काम यांनी केले असे देखील आरोप झाले. अशी अनेक कारणे सांगता येतील, त्यामुळे निधी आणला आणि कामे केली म्हणजे फार जगावेगळे काहीतरी केले असे काहीच नाही. शिक्षकाला शाळेवर नेमले म्हणजे फक्त शालेय पोषण आहार खाण्यासाठी नव्हे.! तर मुलांना शिकविण्यासाठी आणि शाळा भौतिक व गुणवत्तेच्या दृष्टीने सक्षम करण्यासाठी. त्यामुळे, आज त्यांना संधी मिळाली त्यांनी काम केले. उद्या दुसरी कोणाला मिळाली तर तो यांच्यापेक्षा वेगळे काम करुन दाखवेल. फक्त तालुक्याने तरुणांना संधी देणे गरजेचे आहे आणि २०२४ ला अकोले तालुका पुन्हा परिवर्तन करणार आहे.