पिंपळगाव परिसरात ब्रिझा व ट्रॅव्हल्सचा अपघात, चौघी जगीच ठार, सात गंभीर जखमी.!

   

सार्वभौम (अकोले) :- 

वर्षश्राद्ध विधी अटपून पुन्हा मुंबईला जाताना पिंपळगाव जोगा ता. जुन्नर परिसरात असताना ब्रिझा व ट्रॅव्हल्सचा अपघात झाला. यात चार महिला जागीच ठार झाल्या असून चौघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज रविवार दि. ४ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ८:१५ वाजण्याच्या सुमारास घडली. यात भाग्यश्री साहेबराव गायकर (वय १८, रा. कळंब, ता. अकोले, जि. अ.नगर) व कुसूम मारुती शिंगोटे (वय ५५, ता. बदगी बेलापूर, ता. अकोले, जि. अ.नगर), सविता साहेबराव गायकर (सर्व रा. कळंब) व सुनिता कारभारी हाडवळे (रा. लिंगदेव, ता. अकोले, जि. अ.नगर) अशा चौघी मयत झाल्या आहेत. तर वाहन चालक साहिल साहेबराव गायकर, साहेबराव रामदास गायकर, असे दोघे जखमी असून त्यांच्यावर आळेफाटा येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी. की, गायकर परिवार हा मुळचा ब्राम्हणवाडा-कळंब येथील आहे. गायकर हे मुंबईत क्लासेस घेत असून ते मुंबईत स्थायीक झाले आहेत. मात्र, गेल्या १० ते १५ दिवसांपुर्वी त्यांच्या नात्यातील जवळचे व्यक्ती मयत झाल्याने ते गावाकडे ब्राम्हणवाडा येथे आले होते. काल, वर्षश्राद्ध विधी अटोपल्यानंतर आज रविवार दि. ४ ऑगस्ट २०२४ रोजी त्यांच्या एम.एच ४३ सीजी २९१३ या ब्रिझा कारमधून सकाळीच मुंबईला निघाले होते. सकाळी ८:१५ वाजण्याच्या सुमारास ते पिंपळगाव जोगा परिसरात असताना त्यांच्या समोरून कल्याणकडून नगरच्या दिशेने एम. एच ४७ बीएल ४२५१ ही टेम्पो ट्रॅव्हल्स बस आली.

दरम्यान, पाऊस देखील चालु होता. त्यात रस्ता पुर्ण ओला झालेला होता आणि चिखल देखील होता. त्यामुळे, टेम्पो ट्रॅव्हल्स चालक याला वेगाचे नियंत्रण करता आले नाही. त्यामुळे दोन्ही गाड्या एकमेकांना अगदी समोरासमोर धडकल्या आणि रस्त्याच्या खाली फेकल्या गेल्या. ट्रॅव्हल मोठी असल्यामुळे त्यातील पाच लोक जखमी झाले. मात्र, आर्थिक नुकसान सोडता कोणत्याही प्रकारची मनुष्य हानी झाली नाही. अचानक झालेल्या अपघातामुळे बस मधील प्रवाशांनी एकच आरडाओरड केली. महीला देखील घाबरून गेल्या होत्या. त्यातील लहान मोठ्या प्रवाशांना किरकोळ जखमी झाल्या होत्या. तर चालक धनंजय सोपान दास (वय २६, रा. गोरेगाव, मुंबई) आणि क्लिनर ससोदर सुमीदर दास (वय ४०, रा. गोरेगाव) या दोघांनाही लागले होते.

दरम्यान, समोर मोठी गाडी असल्यामुळे गाडीचे इंजिनला जोराची धडक बसली. यावेळी चालक साहील आणि साहेबराव चासकर हे पुढे बसलेले होते. गाडीची ऐअरबॅग उघडल्यामुळे कदाचित दोघांना दैवाची साथ मिळाली. मात्र, मागे बसलेली साहिलची बहिन भाग्यश्री साहेबराव गायकर, एक नातेवाईक कुसूम शिंगोटे, सविता गायकर आणि सुनिता हाडवळे यांना जबरी मार लागला. यात त्या मतय झाल्या आहेत. ही घटना घडल्यानंतर काही वेळात त्यांना गाडीतून बाहेर काढण्यात आले होते. जे लोक जखमी झाले त्यांना तत्काळ एका खाजगी रुग्णालयात नेले गेले. जखमी असलेल्या सर्वांची प्रकृती चांगली असल्याची माहिती पोलीस ठाण्याकडून मिळाली. मात्र, या घटनेने अकोले तालुक्यावर दु:खाचा डोगर कोसळला आहे.