बी फार्मसीच्या विद्यार्थीनीस गुंगीचे औषध देऊन लॉजवर अत्याचार, इयत्ता ९ पासून प्लॅन सुरु होता. अत्याचारासह चौघांवर गंभीर गुन्हे.!

सार्वभौम (संगमनेर) :-

मुलगी इयत्ता ९ वीच्या वर्गात शिकत असताना क्रिकेट खेळणार्‍या एका मुलाने तिला आपल्या जाळ्यात फसविले. मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो असे म्हणत एकदा त्याने तिचे बळजबरी चुंबन केले. २०२० मध्ये सुरू झालेला हा प्रेमाचा अध्याय १० वी आणि १२ वी होईपर्यंत फोन, चॅटिंग आणि भेट यापुढे सरकला नाही. मात्र, मुलगी बी फार्मच्या दुसर्‍या वर्षात गेली आणि त्याने तिला थेट गुंगीचे औषध देऊन तिचे अपहरण करुन मुंबईला नेले. तेथे एका लॉजवर अनेकदा अत्याचार करुन तिच्याशी लग्न केले. मात्र, ९ वी ते बी फार्मसी या दरम्यान जे काही उद्योग झाले होते. त्याचे काही अश्‍लिल फोटो आरोपीकडे होते. तुझ्या घरच्यांना टाकतो, सोशल मीडियावर टाकतो असे म्हणून तो तिला वारंवार ब्लॅकमेल करीत राहिला. मात्र, जेव्हा मुलगी पोलीस ठाण्यात आली. त्यानंतर मात्र, मुलीने जे काही घडले ते सविस्तर पोलिसांपुढे कथन केले. त्यानंतर मुख्य आरोपी शादाब तांबोळी (रा. आंबी खालसा), युसूफ चौघुले, कुणाल शिरोळे व आयाज पठाण (रा. आंबी खालसा, ता. संगमनेर) अशा चौघांवर घारगाव पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

                  याबाबत पीडित मुलीने फिर्यादीत म्हटले आहे. की, मी आंबी खालसा येथे इयत्ता 9 वीच्या वर्गात शिकत होते. त्यावेळी शादाब तांबोळी हा गावात क्रिकेट खेळण्यासाठी येत होता. शादाब तांबोळी व युसुफ चौगुले ही दोघे नेहमी आमचे शाळेजवळ घुटमळत असायचे. त्यावेळी शादाब हा मला वारंवार काहीतरी इशारे करत असे, नंतर भेटण्याचा प्रयत्न करत असे, माझा पाटलाग करत असे. मात्र मी घाबरुन जात होते, त्याच्याकडे दुर्लक्ष करत होते. त्यामुळे शादाब तांबोळी याने मला संपर्क करण्याचा प्रयत्न केला. त्याने त्यावेळी माझा मोबाईल नंबर मिळविला आणि शादाब  मला वारंवार मेसेज व कॉल करु लागला. मी त्याला सांगत होेते, हे सर्व माझ्या घरच्यांनी पाहिले किंवा त्यांना समजले तर माझे शिक्षण बंद होईल आणि मला मारहाण करतील. मी अजून लहान आहे त्यामुळे तू मला त्रास देऊ नको. मात्र, तो एकतर्फी प्रेम करुन मला सतवत राहीला. 

जानेवारी 2020 मध्ये शादाब तांबोळी आणि युसुफ चौगुले हे आंबी खालसा येथे आले होते. तेव्हा युसूफ माझेशी गोड- गोड बोलुन शादाब हा चांगला मुलगा आहे. तो तुझ्यावर मनापासुन प्रेम करतो, तु पण त्याच्यावर मनापासुन प्रेम कर असे म्हणुन मला भावनिक केले. मी देखील त्याचे भुल थापांना बळी पडुन शादाबशी बोलू लागले. फेब्रुवारी 2020 मध्ये मी शादाबला एका ठिकाणी भेटले तेव्हा त्याने माझा किस घेतला. त्यावर मी शादाबला म्हणाले. की, असे वागणे मला आवडत नाही. मी त्या गोष्टीला विरोध केला होता. दरम्यान, शादाब हा पीडित मुलीस भेटतो, यांचे काहीतरी चालु आहे. ही गोष्ट मुलीच्या घरच्यांना माहीत झाली होती. त्यामुळे तिची आई व चुलत भाऊ यांनी शादाब याला समजावुन सांगितले होते. त्यानंतर शादाब याने तिला भेटणे बंद केले होते.  मात्र अधुन मधुन त्याचे प्रेम उपाळून आले. की तो तिला मिसकॉल देणे, फोन करणे किंवा मॅसेज करणे असले उपद्रव करत होता.

           दरम्यान पीडित मुलीने फिर्यादीत पुढे म्हटले आहे. की, सन 2021 मध्ये मी दहावी पास झाले. त्यानंतर मी संगमनेर येथील एका महाविदयालयात 11 वीला प्रवेश घेतला. घर लांब आणि जाणे येणे सोपे नसल्याने मी तेथेच हॉस्टेलमध्ये राहु लागले. ही गोष्ट शादाब याला माहित झाली होती. त्यामुळे, त्याने मला एक दिवस फोन करुन कॉलेजच्या बाहेर बोलावुन घेतले. त्यावेळेस देखील कुणाल शिरोळे याने मला शादाब हा चांगला मुलगा आहे, तो तुझ्यावर मनापासुन प्रेम करतो असे सांगितले. त्यानंतर शादाब तांबोळी हा मला कॉलेज समोरील कॅफेमध्ये घेऊन गेला. तेथे आमच्यात प्रेमाच्या चर्चा झाली. त्यातून त्याने कॉफी पाजण्याचे निमीत्ताने माझ्याशी सलगी करण्याचे सुरु केली. तेथे माझे बरोबर तो फोटो काढु लागला. पुढे शादाब हा माझे बरोबर काढलेल्या फोटोंचा मला दाखवुन माझे तुझ्यावर फार प्रेम आहे असे म्हणुन मला मिठी मारुन माझे किस घेत असे. मी त्यास समजाविले परंतु तो मला फोटो व्हाईरल करण्याची धमकी देत असे. मात्र, या सगळ्यात मी कशी गुंतत चालली होती हे माझ्या लक्षात आले नाही. मात्र, फोटो व्हायरल झाले तर प्रश्न वाढत जातील असे मला वाटत होते. त्यानंतर मी संगमनेर सोडण्याचा निर्णय घेतला. मी सन 2023 मध्ये 12 वी झाल्यानंतर ओतुर ता. जुन्नर येथील एका कॉलेजमध्ये बी फार्मसीसाठी प्रवेश घेतला आणि तेथेच हॉस्टेल वर राहुन मी कॉलेज करत असे.

              दरम्यान, संगमनेर सोडल्यानंतर याचा पिछा सुटेल असे वाटले होेते. मात्र, त्यानंतर देखील तो वारंवार माझ्याशी संपर्क करत होता. मी कॉल केला नाही किंवा रिप्लाय दिला नाही. तर तो माझ्या बरोबर काढलेले फोटो हे मी तुझ्या घरच्यांना दाखवेल, तुझी बदनामी करील अशा धमकी देत होता. त्यानंतर शादाब आणि त्याचा मित्र युसुफ चौगुले हे  दोघेही वारंवार येवुन मला भेटत होते. तेव्हा युसूफ म्हणत होता. शादाब बरोबर तु लग्न कर, तो चांगला मुलगा आहे, तुला सुखात ठेवेल. मात्र, मी नाही म्हटलं की ते मला ब्लॅकमेल करु लागले होते. शादाब व युसुफ यांचे त्रासा कंटाळल्याने मी शादाबला सांगितले की, तु माझा पिछा सोडला नाहीतर तुमच्या नावानी चिठ्ठी लिहुन आत्महत्या करील अशी धमकी दिली. मात्र, तरी देखील त्यांचा त्रास कमी झाला नाही. त्यामुळे मी कायम दडपणाखाली जगू लागले, मला फार मानसिक त्रास होऊ लागला, त्यानंतर मी शादाबला सांगितले. हे कोठेतरी कायमचे थांबले पाहिजे अन्यथा मी आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर असे ठरले. की, आता आपण भेटायचे नाही, बोलायचे नाही, शादाबने दिलेल्या वस्तू परत करायच्या आणि त्याने तिचे फोटो डिलीट करुन दोघांमधील रिलेशन कायमचे संपवायचे हे दोघांनी मान्य केले होते. 

               दरम्यान त्यानंतर दि. जुलै 7 2024 रोजी मी हॉस्टेलला जाण्यासाठी घरुन निघाले होते. तेव्हा मला शादाबचा फोन आला व त्याने मला मंचर पर्यंत यायला सांगितल्याने त्या दिवशी मी एस.टी. ने मंचर येथे गेले. तेथे एस.टी स्टॅन्डवर शादाबने स्टॅन्ड बाहेर असलेल्या एम.एच. 17 बी. एक्स 0097 या गाडीकडे पायी-पायी नेले. त्या गाडीत युसुफ चौगुले हा देखील बसलेला होता. त्याने मला गाडीत बसुन आपण बोलु असे सांगितले. त्यांनी गाडी पुणेच्या दिशेने घेतली. त्यावेळेस मी म्हणाले आपण येथेच बोलुन सोक्षमोक्ष लावु. पण, युसुफ म्हणाला, आपण खेडच्या कोर्टात जावुन वकीलाकडुन लिहुन घेवु आणि प्रश्न मिटवून टाकू. तेव्हा मला त्यांच्या बोलण्याचा संशय आला व मी त्यांचेशी वाद घालु लागले. त्यावर शादाब व युसुफ या दोघांनी मला दमदाटी सुरु केली. आवाज करु नको नाहीतर तुला इथेच संपवुन टाकील. अशी धमकी दिली. तेव्हा मी घाबरल्याने घामाघुम झाले होते, त्याच वेळी युसुफ याने मला पाणी प्यायला दिले ते पाणी पिल्यानंतर मला चकर येवु लागली. मी अर्धवट शुद्धीवर होते. खेड सोडल्यानंतर चाकणचे जवळ मला गाडीतुन बाहेर काढले व तेथे दुसऱ्या गाडीत बसविले, त्यात एक अनोळखी स्री देखील बसलेली होती. त्यांनी माझा मोबाईल काढुन घेतला. 

या सर्व गोष्टी मला अंधुकशा समजत होत्या. मात्र युसुफने मला पाजलेल्या पाण्यात काहीतरी गुंगीचा पदार्थ असल्याने माझी अर्धवट शुद्ध हरपली होती. आमची गाडी थेट मुंबईला गेली. तेथे आदिल नावाच्या माणसा बरोबर शादाब व गाडीत असणारा दुसरा अनोळखी इसम बोलु लागला. त्यावर त्या आदिल नावाचे इसमाने युसुफ यास फोन केला व म्हणाला हे लचांड माझ्याकडे का पाठविले त्या मुलीची परिस्थिती चांगली नाही उगीचच झनझट निर्माण होवुन अडचणी तयार होतील. त्यानंतर आम्हाला त्यांनी सानपाडा येथील एका हॉटेलमध्ये पाठविले. रात्री शादाब याने माझे बरोबर काढलेले फोटो व्हायरल करुन तुझी बदनामी करील अशी दमबाजी करुन मी नाही म्हणत असताना देखील त्याने माझेशी बळजबरीने रात्री वेळोवेळी शारिरीक सबंध केला. आता जे घडले हे कोणाला सागितले तर मी तुला व तुझ्या कुटुंबाला संपुण टाकील अशी धमकी दिली. त्या दिवशी रडून रडून झोपी गेले. 

                दरम्यान दि. 8 जुलै 2024 रोजी शादाब हा मला मॉलवर घेवुन गेला. तेथे आदिल व त्याच्या बरोबर आयाज पठाण होता. मी त्या दोघांना शादाबने रात्री केलेल्या अतिप्रसंगाबाबत सांगत असताना त्यांचे बरोबर असलेला अयाज हा मला दमदाटी करु लागला. तो म्हणाला की माझ्यावर कितीतरी केसेस पोलीस स्टेशनला व कोर्टात चालु आहेत. मी दोन दिवसांपुर्वीच जेलमधुन सुटुन आलो आहे, जास्त बडबड केली तर तुला इथेच संपुण टाकील. त्या दिवशी तेथे पाऊस असल्यामुळे आम्हाला दिवसभर मॉल मध्येच बसुन ठेवले व संध्याकाळी पुन्हा त्याच सानपाडा येथील हॉटेलवर शादाब व मला पाठविले. शादाबने पुन्हा रात्री माझी इच्छा नसताना मला दमदाटी करुन माझेवर शारिरीक अत्याचार केले. दुसऱ्या दि. 9 जुलै 2024 रोजी शादाब मला मॉलमध्ये घेवुन गेला तेथुन पुढे आयाज व मॉल मधील 1-2 इसमांना घेवुन मला त्यांनी शादाब बरोबर बांद्रा येथे नेले. मी त्यांना विचारले की, तुम्ही मला येथे कशासाठी आणले त्यावर आयाजने मला दम दिला की, तुमचे रात्रीचे फोटो सगळीकडे व्हायरल करील. त्यामुळे आम्ही म्हणतो तसेच करायचे. असे बोलल्यावर मी घाबरले व ते म्हणतील तसे वागु लागले. त्यानंतर त्यांनी मला दमदाटया करुन तीन कागदांवर सह्या करण्यास सांगितल्या त्यानंतर रात्री आम्ही लॉजवर गेलो असता शादाब म्हणाला. की, आता तु माझी बायको झाली आहे. तेव्हा मला धक्का बसला, त्यानंतर त्याने माझ्याशी पुन्हा अत्याचार केले.

        त्यानंतर दि. 10 जुलै 2024 रोजी पहाटेच 05 वा. दरम्यान हॉटेल वाल्याने शादाब यास उठविले आणि विचारले. की, बाहेर तुम्ही गाडी बोलाविली आहे का ? त्यावर शादाब याने आलेल्या गाडीवाल्याकडे चौकशी केली असता सदरची गाडी युसुफ चौगुले याने पाठविले असल्याचे सांगितले. कारण, शादाबने मुलीला बळजबरीने पळवुन नेले आहे. असे म्हणुन नगर व संगमनेरला प्रकरण फार तापले आहे असे गाडीवाल्याने सांगितले. त्यानंतर त्याच गाडीतून आम्ही एस.पी. ऑफीसला आलो. तेव्हा युसुफ चौघुले याने पाठवलेल्या माणसांनी मला शादाब विरुद्ध एकही शब्द बोलल्यास तुला व तुझ्या कुटुंबाला संपुण टाकु अशी दमदाटी केली. त्यानंतर मला सांगण्यात आले की, तु फक्त घारगांव पोलिस स्टेशनला गेल्यानंतर तेथील पोलीसांसमोर व घरच्यांसमोर काहीही झाले तरी शादाब सोबत रहायचे आहे. एवढेच वाक्य बोलण्यास सांगितले होते. त्यानंतर तेथील एका अधिकाऱ्याने शादाबकडे चौकशी केली असता शादाबने मी हिचे बरोबर लग्न केले असे खोटे सांगितले. त्यानंतर पीडित मुलीने जो काही घटनाक्रम होता. तो घारगाव पोलीस ठाण्यात कथन केला. त्यानुसार घारगाव पोलीस ठाण्यात शादाबसह चौघांवर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.