बाप रे.! भर दिवसा, भर बाजारपेठेत दरोडा, तीन चार ठिकाणी गोळीबार करुन दरोडेखोर पुण्याकडे पळाले.!

 

सार्वभौम (संगमनेर) :- 

                 संगमनेर तालुक्यातील साकुर येथे बस स्टँड परिसरातील कान्हा ज्वेलर्समध्ये बंदुकीचा धाक दाखवून पाचशे ते सहाशे ग्रॅम सोने व रोख रक्कम घेऊन लाखो रुपयांचा ऐवज घेऊन धुम स्टाईल दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना आज सोमवार दि.11 नोव्हेंबर रोजी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये पाच दरोडेखोर पल्सर गाडीवर पारनेरच्या दिशेने पळाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळावर धाव घेतली असुन पोलीस उपअधीक्षक कुणाल सोनवणे यांनी पथके रवाना केली आहे. मात्र, पोलिसांच्या कायदा सुव्यवस्थेवर तीनतेरा नऊबारा झाले आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, साकुर येथे निखील सुभाष लोळगे यांची गेली अनेक वर्षांपासून कान्हा ज्वेलर्सचे दुकान आहे. त्यामुळे, परिसरातील बहुतांश लोक सोने खरेदी करण्यासाठी येत असतात. छोट-छोटी वाडी वस्ती साकुर बाजार पेठेला जोडलेले असल्याने सर्व लोक साकुरमध्ये या ज्वेलर्सच्या दुकानात येतात. आज देखील या ज्वेलर्सच्या दुकानात लोक येत जात होते. अचानक मास्क लावून दुपारच्या सुमारास पाच लोक पल्सर गाडीवर आले. त्यांनी गाडी दुकानाला खेटून बाहेर मध्यभागी लावली. कान्हा ज्वेलर्समध्ये घुसले इकडे तिकडे पाहून त्यांनी कान्हा ज्वेलर्सच्या मालकावर रिव्हॉल्व्हर ताणली. दुकानचा मालक घाबरल्याने तो शांत बसला. मात्र, या दरोडेखोरांनी एक-एक दागिना काढून बॅगमध्ये मालका समोर भरला. संपूर्ण सोने बॅगमध्ये भरल्यानंतर रोख रक्कमदेखील काढून नेली.

         दरम्यान, ते सर्व सोने व रोख रक्कम बॅगमध्ये घेऊन मालकाला दम दिला. त्यानंतर मालकाचा मोबाईल काढून घेतला. दुकानाच्या बाहेर पडत असताना आरडा ओरडा करून सावध करणार तेच बाहेर येऊन दरोडेखोरांनी भर रस्त्यात रिव्हॉल्व्हर काढून फायरिंग केली. आणि लगेच पल्सर गाडीवर बसुन पारनेरच्या दिशेने पळाले. ते पारनेरच्या दिशेने जात असताना पुढे मांडवा फाटा येथे लोकांना सांगितले की, पाच जण सोने लुटून येत आहे. तेथे मोठ्या प्रमाणात लोक जमले ते अडवण्यासाठी थांबले असता. तेथे देखील दरोडेखोरांनी गाडीवरून फायरिंग केली. पुढे खडकी रस्त्याला ज्वेलर्स दुकान मालकाचा मोबाईल टाकुन दिला. त्यानंतर पुन्हा खडकी रस्त्यावर फायरिंग करून पाच दरोडेखोर पारनेरच्या दिशेने पळाले.

दरम्यान, परिसरातील लोकांनी पोलिसांना फोन करून तात्काळ कळवले. तो पर्यंत आरोपी पसार झाले होते. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन शोध मोहीम सुरू केली. पोलीस उपअधीक्षक  कुणाल सोनवणे यांनी पथके तयार करून रवाना केले. खरंतर, भर दुपारी गजबजलेल्या परिसरात दरोडा पडल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. चैन स्नॅचिंग, छोट्या मोठ्या चोरी घडतच होत्या. मात्र, लाखो रुपयांचा दरोडा पडल्याने साकुर परिसरातील अनेकांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.