अरे देवा.! आमदारांचे विश्‍वासू विकासराव शेटे देखील फुटले.! डॉ. लहामटेंना मत म्हणजे भाजपाला मत.! हे पाप मी करणार नाही.!

  

सार्वभौम (अकोले)-

 अगस्ति सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सिताराम पा. गायकर साहेब यांचे विश्‍वासू तथा कारखान्याचे संचालक विकासराव कचरु पा. शेटे यांनी काल डॉ. लहामटे यांचा हात सोडला आहे. भाजपाची विचारसारणी मला मान्य नाही. २०१९ देखील मान्य नव्हती आणि २०२४ ला देखील मान्य नाही. महागाई, बेरोजगारी, शेतकर्‍यांचे प्रश्‍न, दुध दरवाढ, शेतमाल आणि राज्यात भाजपाने केलेली पक्ष फोडाफोडी यांचा मनात इट आला होता. दुर्दैवाने केवळ माझे दैवत आणि सहकार महर्षी यांच्या प्रेमापोटी कधी बंड केले नाही. मात्र, सतत मनाशी द्वंद्व करणे शक्य होत नव्हते. डॉ. लहामटे यांची कार्यपद्धती, नेहमी होणारी अवहेलना आणि शरद पवार साहेबांशी वैयक्तीक प्रेम यामुळे मी पुन्हा पवार साहेबांशी एकरुप झालो आहे. गेल्या काही दिवसांपासून मनात प्रचंड घुसमट होत होती. आज मन मोकळे झाल्यासारखे वाटत आहे. माझ्यासोबत असणार्‍या संबंध मित्रांनी वैचारिक दृष्टीकोणी आणि शेतकर्‍यांचा विचार करता गावोगावी तुतारी हाती घ्यावी. अशा प्रकारचे आवाहन विकासराव शेटे यांनी केले आहे. त्यांनी बंड पुकारल्यानंतर रोखठोक सार्वभौमशी बोलत होते.

दरम्यान, अकोले तालुक्याचे लोकप्रतिनिधी हे सर्वाना धरुन चालणारे असायला हवे. मात्र, आमदारांनी कधी तशी भुमिका घेतली नाही. पदाधिकारी नेमले खरे, पण त्यांना अधिकारच दिले नाही. तालुक्यातील संजय गांधी निरोधार योजनेतून हजारो व्यक्तींना त्यातून न्याय देता आला असता. मात्र, त्यांनी कधी कार्यकर्त्यांना अध्यक्ष होण्याची संधी मिळावी अशी भावना ठेवली नाही. असे अनेक उदा. आहेत. त्यामुळे आज त्यांच्यासोबत लाभार्थी वगळता कार्यकर्ता टिकला नाही. ना त्यांनी कधी कार्यकर्त्यांना बळ दिले. त्यांच्यात अनेक दुर्गन आहेत, सांगावे तितके कमी आहेत. केवळ  निधी आणणे म्हणजे जनतेचे समाधान ही त्यांनी केलेली व्याख्याच चुकीची आहे. खरंतर सगळे पत्ते ओपन करायचे नसतात. पण, तरी सांगतो. की, आम्ही २०१९ पासून त्यांच्या सोबत होतो. त्यांना शक्य तितकी मदत केली. का? तर ते शरद पवार साहेब यांच्यासोबत आहेत, वैचारिक पक्षासोबत आहे. मात्र, त्यांनी पवार साहेबांना सोडले आणि दादांसोबत जाणे पसंत केले. हे ना आम्हाला पटले ना जनतेला. त्यामुळे, वार्‍याच्या दिशेप्रमाणे उपणणे आणि सोईनुसार राजकारणे हे या तालुक्याला सहन होत नाही. आज डॉ. लहामटे हे तालुक्यात जी संस्कृती रूजू पहात आहेत. ती येणार्‍या काळात फार घातक आहे, त्यामुळे, आमची पिढी जर आम्हाला म्हणाला. की, या तालुक्याची व महाराष्ट्राची परंपरा, संस्कृती आणि पुरोगामी विचारांवर वार होत होते. तेव्हा तुम्ही काय करत होते? तेव्हा आम्ही निरुत्तर होण्यापेक्षा आजच त्या इतिहासाचे साक्षिदार झालेले कधीही चांगले. त्यामुळे, मी माझ्या आयुष्यातील सर्वात क्रांतीकारी निर्णय घेतला आहे. 

लहामटेंना त्यांचे कार्यकर्तेच पाडणा.!

गेल्या पाच वर्षात मला जेव्हा-जेव्हा संधी मिळेल. तेव्हा-तेव्हा मी डॉ. लहामटे यांना मदत केली आहे. ज्यांचे २०१९ पासून काडीचे योगदान नाही ते आमदारांचे कान भरवत आहेत आणि उलट-पालट कानपिचक्या देत आहेत. तसेच माझ्या बाबत देखील करण्यात आला. डॉ. लहामटे यांना बळ मिळू नये म्हणून त्यांच्याच पक्षाचे काही पदाधिकारी कायकर्त्यांबाबत वाईट वाकडे बोलत आहेत. डॉ. लहामटे यांना चुकीचे मार्गदर्शन करीत आहेत. मी त्यांना सोडण्यापुर्वीच मी फुटलो, मी बंडखोरी केली असे काही पदाधिकारी म्हणत होता. त्यामुळे, मेलं तरी रांडकी आणि नाही मेलं तरी रांडकी. त्यापेक्षा बाहेर पडून कपाळाला शेण लावण्यापेक्षा शेंदुर लावलेला कधीही बरे.! वैचारिक पक्षात जाऊन स्वत:चे अस्तित्व तरी टिकवता येता, कार्यकर्त्यांचे संघटन बांधता येते. म्हणून मी वैयक्तीक भाजपा प्रणित महायुती सोडत असल्याचे त्यांनी सार्वभौमशी बोलताना व्यक्त केले.

माझी निष्ठा गायकर साहेबांशी कायम.!

माझे दैवत सहकार महर्षी सिताराम पा. गायकर साहेब आणि निवडणुक याचा काही एक संबंध नाही. ते आमचे कैटुंबिक नाते आहे. माझ्या हयातीत मी त्यांना कधी सोडले नाही आणि उद्याच्या काळात देखील सोडणार नाही. मात्र, यंदाची निवडणुक वेगळी आहे. २०१९ मध्ये मधुभाऊ नवले यांनी भाजपाचे काम केले. त्यानंतर बाहेर पडताच त्यांनी स्वत: सांगितले. की, भाजपात माझी घुसमट होत होती, माझा जीव रमत नव्हता, मनात सदैव वैचारिक द्वंद्व सुरू होते. त्यामुळे मी बाहेर पडलो. अर्थात इतक्या मोठ्या विचारवंत व्यक्तींना असे वाटते. तर, आम्ही देखील १९९९ च्या राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्यासोबत काम केले आहे. पवार साहेब काय आणि कॉंग्रेस काय.! एकच विचारसारणी आहे. त्यामुळे, माझी देखील २०१९ ते २०२४ अशी प्रचंड घुसमट झाली होती.

अनेकजण फक्त तेथे कागदी वाघ.!

खरंतर काही निर्णय हे सामाजासाठी किंवा काही निर्णय कौटुंबिक तथा नैतिक जबाबदारी म्हणून घ्यावे लागतात. मात्र, जेव्हा वारंवार निर्णय लादले जातात तेव्हा मात्र मनात मानसिक गुलामी सुरु होते. मनाशीच वैचारिक दिवाळखोरी होते. तेव्हा स्वत:ची घुसमट होते. तीच घुसमट झाली झाली होती. डॉ. किरण लहामटे यांनी गेल्या पाच वर्षात कधीच मान सन्मान दिला नाही. तुम्ही आमचे आहात, आपले कार्यकर्ते आहात अशा विश्‍वास त्यांना कधी वाटला नाही. मी एकटा आहे आणि एकटाच राहणार, तुम्ही असेल काय आणि नसले काय.! काहीच फरक पडत नाही. असा त्यांचा अविर्भाव कायम होता. त्यामुळे, अशा दुसावट्याच्या वागणुकीला आम्ही फार कंटाळलो होतो. एकेकाळी सभा गाजविणारे, संपुर्ण निवडणुका हताळणारे, कायम समाजात राहणारे निवडणुकीतील राजे होतो. मात्र, डॉ. लहामटेंच्या संपर्कात आल्यापासून अक्षरश: मीच काय.! अनेकजण आज देखील फक्त कागदी वाघ म्हणून त्यांच्या सोबत आहे.