काँग्रेसचे बाजीप्रभु फितुर मावळ्यांमुळे संगमनेरच्या खिंडीत अडकले, स्वतःच्या बालेकिल्ल्यात चारीमुंड्याचित.!
डॉ. सुजय विखें पाटील यांना लोकसभेला पराभुत करण्यासाठी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी ताकद लावली होती. संपूर्ण थोरात साहेबांची यंत्रणा दक्षिण नगरला लावुन डॉ. सुजय विखें यांचा पराभव केला. यामध्ये खा. निलेश लंके यांचा विजय झाला. परंतु, सुजय विखें यांना लोकसभेतील पराभव हा जिव्हारी लागला. त्यांचा पराभव होताच त्यांनी संगमनेरात लक्ष केंद्रित केले. आपल्या पराभवाची सल संगमनेर विधानसभेला थोरात साहेबांना पराभूत करूनच पूर्ण होईल. असा चंग विखें कुटूंबाने बांधला. राधाकृष्ण विखे पाटील यांना पालकमंत्री पद मिळाले. त्यांनी अमोल खताळसह कार्यकर्त्यांना बळ देऊन या मतदारसंघातील काही ग्रामपंचायत ताब्यात घेतल्या. या मतदारसंघात सहाशे कोटींपेक्षा अधिक निधी देऊन संगमनेरात आपली पकड निर्माण केली. त्यानंतर, विधानसभेच्या रणांगणात डॉ. सुजय विखे यांनी भाषणे ठोकली. त्यांना तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळाला. मात्र, तिकीट सुजय विखें यांना नसले तरी त्यांनी "अरे ला कारे" उत्तर देणारा कार्यकर्ता शोधला. अमोल खताळ यांना उमेदवारी देऊन लढा उभा केला. त्यांनी बाळासाहेब थोरात यांची नस ओळखुन निमोण, तळेगाव भागात नंतर साकुर भागातील कार्यकर्त्यांना हाताशी धरून मतदारसंघ संपूर्ण पिंजूण काढला. येथे जनसेवेचे कार्यालय सुरू करून प्रशासकीय पातळीवरील कामे मोठ्या प्रमाणात केली. जनता दरबार ठेऊन न्याय देण्याचा प्रयत्न केला. या जनता दरबारला मोठ्या प्रमाणात लोक प्रतिसाद देत होते. अमोल खताळ यांना विशेष अधिकार देऊन तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे, कधी नवे असा इतिहास घडला. अमोल खताळ यांनी बाळासाहेब थोरात यांचा पराभव करून डॉ. सुजय विखें यांनी नगर दक्षिणचा वचपा काढला.
अमोल खताळ हे भाजपात असताना त्यांना मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता. अमोल खताळ यांचे नाव भाजपा तालुका अध्यक्षपदी चर्चेत आले. तर अनेक दुःखी आत्मे वरिष्ठ भाजपला भेटले. अनेकांनी राजीनामा देण्याच्या वलग्ना केल्या. अमोल खताळाना तालुका अध्यक्षपद मिळु दिले नाही. पण, नाराजी दुर करण्यासाठी त्यांना संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष केले. त्याचा पुरेपूर फायदा अमोल खताळ यांनी उचलला. त्यांनी तालुक्यात हजारो वयोवृद्धांना संजय गांधी योजनेचा लाभ मिळून दिला. चार कोटी रुपये लाभधारकांच्या खात्यात वर्ग झाले. तरी देखील त्यांना पक्षांतर्गत विरोध झाला. त्यांचे भाजपच्या एका गटाकडून कुठेही बॅनरवर फोटो दिसले नाही. नेहमी अमोल खताळ या नावाने विष पेरण्यात आले. ऐन विधानसभेच्या निवडणुकी पुर्वी वसंतराव देशमुख यांनी चुकीचे विधान केले. त्याचा फटका सुजय विखें याना मिळाला. त्यानंतर हा मतदारसंघ शिवसेनेकडे गेला. येथे उमेदवार कोण? असा प्रश्न सर्वांना पडला. त्यावेळी अमोल खताळ हे नाव पुन्हा पुढे आले. अमोल खताळ यांच्या एवढा तुल्यबळ उमेदवार नाही हे सुजय विखें यांच्या देखील लक्षात आले. मात्र, अमोल खताळ यांना उमेदवारी मिळताच "घरचा भेदी लंका दहन" अशीच गत भाजपात पहायला मिळाली. हे नाव ऐकताच अनेकांच्या पोटात गोळाच उठला. अमोल खताळ नावाची गरळ ओकण्यास सोशल मीडियावर सुरवात करण्यात आली. कोणी ब्लॅक डे लिहीले तर कोणी ब्लॅक मेलर लिहले. मात्र, अमोल खताळ यांनी दहा-वीस कार्यकर्ते जिवाभावाचे तयार करून हा लढा उभा केला. त्यांनी संपूर्ण तालुका पिंजून काढला. जस-जसे वातावरण बनत गेले. तरुण मुलं ऍक्टिव्ह होत गेले. परिवर्तनाचे वारे वाहू लागले. नंतर विखें पाटील यांनी सर्वांची कानउघडणी केली. तेव्हा सर्वजण मैदानात उतरले. आता अमोल खताळ यांच्या विजयाचे श्रेय घेण्यासाठी सर्वजण पुढे येत आहे. मात्र, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात हे मंत्री असल्यापासुन सर्वात कडाडून विरोध कोणी केला असेल तर तो अमोल खताळ यांनी केला. भर पावसात विरोध केला, आंदोलने केली, निदर्शने केली, मोर्चे काढले. इतकेच काय.! बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकर्त्यांना कोट्यावधी रुपयांचा दंड करून सर्व कागदावर घेतले. तालुक्यात सातत्याने चुकीच्या कामांविरोधात बोलणारा. अंगावर आल्यावर शिंगावर घेणारा हा एक तरुण नेता अशी ओळख असल्याने हा तरुण चेहरा उमेदवार होऊ शकतो हे सुजय विखें यांच्या लक्षात आले. त्यामुळे, अमोल खताळ यांना विरोध असताना देखील उमेदवारी मिळाली. ती ऐतिहासिक विजयाची ठरली.
साहेबांसोबत अमित भांगरे सुद्धा खिंडीत अडकले.!
पठार भागावर अमित भांगरे यांना मदत करावी असा संदेश बाळासाहेब थोरात यांनी दिला होता. मात्र, तेथे अजय फटांगरे, गौरव डोंगरे यांच्यासह कोणाचीही जादू चालली नाही. अनेकांनी फक्त उमेदवार यथेच्छ लुटण्याचा आनंद घेतला. मात्र, ज्या पठार भागाहून थोरात साहेब म्हणाले होते. अमित भांगरे यांना १० हजारांचे लिड देऊ. त्या पठार भागावर ३ हजार मायनस राहिल्यामुळे भांगरे यांची गणिते पुर्ण बदलून गेली. संगमनेरच्या संपुर्ण तालुक्याने बाळासाहेब थोरात यांचा घात केला त्यात पठार भागात वेगळे काहीच नव्हते. बाळासाहेबांना मुख्यमंत्री करायचे असे अनेकांच्या तोंडून ऐकावयास मिळत होते. कसं? थोरात साहेब म्हणतील तसं.! पण, साहेब म्हणतील तसे काहीच झाले नाही. पठार भागावर सत्ताधाऱ्यांनी प्रचंड पैशांचा पाऊस पाडला, जेवणासाठी हॉटेलं बुक केले, रात्रीतून मतांची सौदेबाजी झाली. त्या लाटेपुढे थोरात साहेबांच्या कार्यकर्त्यांनी नांग्या टाकल्या. मतदान झाल्यावर अनेकांना वाटत होते. की, १० नाही पण ३ ते ४ हजारांचे लिड पठाराहून मिळेल. पण, खोके आणि पेट्यांपुढे मतदार बाळासाहेबांना देखील विसरुन गेले. तर, माजी आमदारांनी बाळासाहेब थोरात यांच्या नाकावर टिच्चून पठाराहून मते काढली. तुम्ही म्हणजे पठारभाग नाही, तुम्ही म्हणाल तसे पठार भाग ऐकत नाही, तुमच्या शब्दाला पठार भाग बांधिल नाही, थोरात साहेब, तुम्ही पठारावर जाऊन म्हणाले, डॉ. लहामटेंनी कोरोना काळात अकोल्यात माझा अपमान केला, त्याचा बदला घ्यायचा आहे. पण, तुमचा मान, अपमान, मान सन्मान याच्याशी आम्हाला काही घेणेदेणे नाही. अशा प्रकारचा संदेश पठार भागाने दिला. त्यामुळे, चंदनापुरीच्या खिंडीत देखील थोरात साहेब अडकले आणि पठारावर सुद्धा त्यांच्या शब्दाचा दारुन पराभव झाला, अकोल्यात देवठाण गट सोडता सगळीकडे भांगरे यांना चांगली मते आहेत. मात्र, पठारावर ५ ते ६ हजार मते असती तरी भांगरे यांचा विजय सहज होता अशा भावना व्यक्त केल्या जात आहे.