डॉ. लहामटे साहेब.! तुम्ही निवडून आले म्हणजे तालुक्याचे बाप नव्हे तर पालक झालेत. विरोधात काम करणार्‍यांचा माज मोडू, पाहून घेऊन गय करणार नाही. आमदारकी म्हणजे तुमची मक्तेदारी नाही.!

 

सार्वभौम (अकोले)-

 सन २०१९ मध्ये १ लाख १३ हजार ३१४ मतांनी निवडून आलेले डॉ. किरण लहामटे २०२४ मध्ये वैभव पिचड आणि मारुती मेंगाळ यांच्या मत विभाजनाच्या फायद्याने अवघ्या ५ हजार ५०० मतांनी निवडून आले. मात्र, हा लाजिरवणा विजय देखील कसा साजरा करावा? म्हणून त्यांची प्रचंड चिडचिड होताना दिसत आहे. अर्थात का न व्हावी? जमविलेली माया सगळी ओतावी लागली. त्यामुळे, तनतन सहाजिक आहे. मात्र, लोकशाहीत मत कोणाला द्यायचे आणि कोणला नाही. हा सर्वस्वी मतदारांचा अधिकार आहे. कोणी काय लिहावं आणि काय नाही हा देखील व्यक्तीस्वातंत्र्याचा भाग आहे. परंतु, ज्यांनी विरोधात काम केले त्यांचा माज मोडू, पाहून घेऊ, गय करणार नाही, विरोधात काम करणार्‍यांनी जवळ येऊन नये. ही आमदारांची कोणती भाषा? तुम्ही लोकशाहीतील आमदार आहात, घरातील आमदार नाही. जेव्हा एखादा व्यक्ती संवैधानिक ठिकाणी लोकशाही मार्गाने निवडून जातो. तेव्हा त्याच्या लेखी सर्व मतदार समान असतात. त्यामुळे, अकोले तालुक्याचे तुम्ही प्रशासकीय पालक आहात. तालुक्याचे बाप होण्याचा प्रयत्न करु नका. अन मतदारांशी किंवा विरोधकांशी फारच खुन्नस धरायची असेल तर राजिनामा द्या आणि घरी बसून काय धमक्या आणि खुनशी द्यायच्या त्या द्या..!!


खरतर इव्हीएम घोटाळा झाला म्हणून राज्यातील अनेक ठिकाणी वेगळे निकाल लागले. एकूण ९५ मतदार संघात मतांची तफावत आढळली, १९ मतदार संघात इव्हीएम मध्ये जास्त मते आढळली, ७६ मतदार संघात कमी मते आढळली, अनेक ठिकाणी हरियाना पॅॅटर्ण राबविला गेला. त्यामुळे, अकोले तालुक्यात देखील यापेक्षा वेगळे काही नाही. अकोल्यातील बिताका येथील बुथवर डॉ. लहामटे यांना फक्त २ मते आहेत. मग प्रश्‍न पडतो. की, बुथ लावणारा, त्याचे आई वडिल, त्याची बायको किंवा २०० मतदारांमधून तेथे एक सुद्धा लहामटेंचा कार्यकर्ता नाही का? फक्त २ मते पडली कशी? यावर खात्री करण्यासाठी काही लोक तेथेे गेले होते. तर, त्यातील अनेकांनी सांगितले. की, आम्ही लहामटेंना मते दिली. मग ती ईव्हीएममध्ये आली का नाही? जर वरच्या भागात मते कमी होतात तर खालच्या भागात मते वाढली अशी? अर्थात ईव्हीएमध्ये गडबड असल्याचे लक्षात येते. याबाबत अकोले तालुक्यात प्रचंड संभ्रम निर्माण झाला आहे. बहुतांशी गावात लहामटे म्हटलं की लोक मारायला धावत होते. मग ही मते आली कोठून? लाडक्या बहिनींच्या नावाखाली हा घोटाळा असल्याचे देखील बोलले जात आहे.

खरंतर २०१४ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देशात फार मोठी लाट होती. तेव्हा सुद्धा महाराष्ट्रात भाजपाला इतक्या जागा आल्या नाही. २०१९ मध्ये देखील पुलवामा हल्ला, कश्मीर व्याप्त भारत, कलम ३७० आणि ३५ (ए) असे अनेक मुद्दे होते. तेव्हा सुद्धा महाराष्ट्रात इतक्या जागा भाजपाला मिळाल्या नाही. मग २०२४ मध्ये असे काय झाले? कोणती लाट होती? कोणते क्रांतीकारी निर्णय घेतले होते? किती शेतकरी समाधानी होते? कोणती निष्ठा दाखविली होती? पक्ष फोडाफोडी, चिन्ह पळवा-पळवी, न्यायासाठी दिरंगाई, महागाई, बेरोजगारी, स्पर्धा परिक्षेतील फ्रॉड, महाराष्ट्राबाहेर जाणार्‍या कंपन्या, स्वयाबिनचा भाव, कापसाला भाव, महागाई कमी, दर्जेदार शिक्षण नेमकी काय क्रांतीकारी निर्णय होता? याचे उत्तर सापडतात सापडत नाही. त्यामुळे, ईव्हीएम मशिनमध्ये असणार्‍या मतांची अफरातफर हेच त्याचे कारण असल्याचे बोलले जात आहे. धुळे जिल्ह्यातील कृणाल पाटील यांना शुन्य मते मिळाली आहे. एका ठिकाणी एकूण मते १६०० आणि विजयी उमेदवाराला मते २१०० शे असा हा ईव्हीएम घोटाळा आहे. त्यामुळे, गुजरातहून आलेल्या या यंत्रणेला राज्य पातळीहून मॅनेज केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे, निवडून आलेल्या उमेदवारांनी फार उराडाला वाळु लावून मिरविण्याचा प्रयत्न करू नये. हा विजय नैतिकतेला धरुन किंवा लोकाहीने दिलेला नाही अशी भावना जनता व्यक्त करत आहे. 

खरंतर, २०१९ मध्ये डॉ. लहामटे यांना १ लाख १३ हजार ३१४ मते होती. यंदा तो आकडा ७३ हजार ९५८ वर आला आहे. विशेष म्हणजे त्यांचे तेव्हाचे विरोधक त्यांच्या विरोधात होते अन्यथा हा आकडा २५ हजारांवर आला असता. त्यामुळे, हा लोकशाहीने दिलेला विजय नाही. हे ते स्वत: जाणून आहेत. मात्र, १ लाख २० हजार मते डॉ. लहामटे यांच्या विरोधात आहेत. त्यामुळे, विजय फक्त आकड्यांनी केलाय हे लक्षात ठेवून आता तरी तोंडावर ताबा ठेवला पाहिजे. निवडून आल्यानंतर त्यांची भाषा जर याचा त्याचा माज जिरविण्याची असेल, पाच वर्षे फार काही दुर नाही. लोकशाहीत प्रत्येकाने माझेच काम करावे ही मानसिकता केवळ हुकूमशहा सारखी आहे. तर, ज्यांनी ज्यांनी लोकशाहीला हिटलरशाहीकडे नेवू पाहिले, त्यांना लोकशाहीने जागा दाखविली आहे. त्यामुळे, लोकशाही योग्यवेळी फार माज करणार्‍याचा देखील माज मोडते हे कोणीच विसरू नये. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.

डॉ. लहामटे सोशल मीडियातील चॅनलवर बोलताना म्हणतात. की, ज्यांनी ज्यांनी माझ्या विरोधात काम केले. त्यांनी माझ्या जवळ येऊ नये. साहेब तुम्हाला काय सोनं लागलेलं नाही. पण, अनेक कार्यकर्ते असतात त्यांना गावचा विकास करायचा असतो. त्यामुळे, ते तुमच्याकडे नव्हे.! तुमच्याकडे लोकशाहीने दिलेल्या अधिकाराकडे धाव घेतात. अनेकांना अजारपणाच्या मुख्यमंत्री सहायता निधी पत्र पाहिजे असते. त्यामुळे, तुम्हाला दिलेली आमदारकी ही काही घरातील गहू बाजरी सारखी मालकी नाही. जनतेने जनतेची सेवा करण्यासाठी तुम्हाला नेमलेले असते. विशेष म्हणजे जनतेकडून जो टॅक्स शासनाला दिला जातो त्यातून तुमचा पगार आणि नंतर महिन्याला ४० हजार रुपये तुम्हाला पेन्शन मिळत असते. त्यामुळे, जनतेवर तुम्ही उपकार करत नाही हे लक्षात ठेवा. विरोधात काम केलेला असो किंवा तुमच्यासाठी दिवसरात्र एक केलेला कार्यकर्ता असो. तुम्हाला दोन्ही समान धरावे लागतील. किमान आमदार होताना ज्या लोकशाहीने तुम्हाला शपथ दिली जाते. त्या शपथेला तरी तुम्ही जागाल अशी अपेक्षा ही मायबाप जनता तुमच्याकडून करीत आहे.