पीएसआय व कॉन्स्टेबलसह प्रवरेत सहा जणांचा बुडून मृत्यू, दोघे बेपत्ता, सविस्तर वृत्तांत, याला जबाबदार कोण? केटिवेअर शाप की वरदान.!


 सार्वभौम (अकोले) :- 

                 अकोले तालुक्यातील मनोहरपुर फाट्याजवळ असणाऱ्या प्रवरा नदीपात्रात केटिवेअरवर पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवक पाण्यात बुडाले होते. यामध्ये सागर पोपट जेडगुले (वय-25,रा. धुळवड पिंपरी, ता. सिन्नर) हा पाण्यात मयत अवस्थेत मिळुन आला तर अर्जुन बबन जेडगुले (वय 18,रा.पेमगिरी, ता. संगमनेर) हा 24 तास उलटूनही बेपत्ता  आहे. ही सर्व धक्कादायक घटना काल बुधवार दि. 22 मे रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडली. अर्जुन जेडगुले याचे शोधकार्य शर्यतीने सुरू होते. मात्र, रात्री उशिरापर्यंत शोध घेतला असता तो मिळुन आला नाही. त्यामुळे, सकाळीच या तरुणाचा शोध घेण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची (SDRF) ची टीम बोट घेऊन अकोले तालुक्यातील सुगाव परिसरात दाखल झाली. तेथील एका स्थानिक व्यक्तीला पाण्यातील घटनास्थळ दाखविण्यासाठी बोट घेऊन पथक नदीपात्रात गेले. तेथे केटिवेअर असल्याने घटनास्थळी फार मोठा भोवरा निर्माण होऊन ही बोट अचानक उलटी झाली. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक प्रकाश नाना शिंदे, राहुल गोपीचंद पावरा(कॉन्स्टेबल), वैभव सुनील वाघ (चालक) हे तिघे मयत झाले आहे तर पंकज पंढरीनाथ पवार, अशोक हिम्मतराव पवार हे उपचार घेत आहे. तर स्थानिक गणेश मधुकर वाकचौरे (वय-38,रा. मनोहरपुर,ता. अकोले) हा बेपत्ता आहे. ही सर्व घटना आज गुरुवार दि. 23 मे रोजी सकाळी 7:30 वाजण्याच्या दरम्यान घडली. त्यामुळे या घटनेत एकुण चार जण मयत झाले असुन तर दोघे बेपत्ता आहे. त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.  

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सागर जेडगुले व अर्जुन जेडगुले हे एका कामगार टोळीमध्ये कामाला जात होते. ते जनावरांसाठी लागणाऱ्या मकाची कुटी करण्याचे काम करत होते. त्यामुळे, ते मकाचे पिक जेथे असेल त्या शेतात जाऊन काम करुन आपल्या कुटुंबाला हातभार लावत होते. काल अकोले तालुक्यातील मनोहरपुर फाट्याजवळ मकेची कुटी करण्यासाठी गेले होते. भर उन्हात ही कुटी करत असल्याने त्यांच्या अंगाची लाही-लाही झाली होती. उन्हाचे चटके असहाय्य झाल्याने कुटीचे सर्व काम आवरले व जेवणासाठी ते एका झाडाखाली बसले. म्हणतात ना.! मरण आले ठाई तर चालुन जाई पायी, या म्हणीप्रमाणेृ जेवण झाल्यानंतर त्यांनी जवळच असलेल्या नदी पात्रात अंघोळ करू असे ठरले. दुपारी दोन वाजता ते नदीपात्रात उतरले सर्वजण अंघोळ कडेला करत होते. मात्र, सागर आणि अर्जुन हे नदीच्या मध्यभागी गेले. जस जसे ते आत गेले तेथे यांचे पाय खाली टेकले नाही. परिणामी काही क्षणात त्यांच्या नाका तोंडात पाणी गेले. तेथे केटिवेअर असल्याने वरून पाणी खाली पडत होते, त्यामुळे तेथे भोवरा निर्माण होत होता. वरुन पाणी संथ दिसत असले तरी खालून गर्ता निर्माण झालेला असतो. त्यामुळे, सागर व अर्जुन हे कोठे गेले याचा शोधच लागला नाही.

              दरम्यान, सर्व तरुण बाहेर आले. त्यांनी पोलिसांना कळवले. त्यानंतर घटनास्थळी पोलीस तात्काळ  आले. तहसीलदार देखील घटनास्थळी आले. त्यांनी गोताखोर बोलवले तरी देखील शोध लागला नाही. सायंकाळी 7 वाजेपर्यंत शरतीचे प्रयत्न केले. मात्र, पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात असल्याने व अंधार पडत असल्याने शोध कार्यास अडथळा निर्माण झाल्याने त्यांनी संध्याकाळी शोधकार्य थांबविले. या दरम्यान फक्त सागर जेडगुले या तरुणाचा मृतदेह हाती लागला होता. आता स्थानिकांचे प्रयत्न संपले होते. म्हणून एका बेपत्ता तरुणाचा शोध घेण्यासाठी तत्काळ राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची (SDRF) च्या टीमला घटनस्थळी पाचारण करण्यात आले. ही टिम आज सकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान बेपत्ता ऑपरेशनसाठी नदीपात्रात बोट घेऊन उतरली. त्यांनी माहितीसाठी एक स्थानिक तरुण गणेश वाकचौरे यांना घेतले. सहा जणांची टीम या तरुणाचा शोध घेत होती. मात्र, पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात होता. तेथे छोटीसा केटिवेअर बांधण्यात आलेला आहे. त्याची मोठी भिंत असून त्याच्या पुर्व पश्चिम दोन्ही बाजुंनी खोल पाणी आहे. त्यावरून पाणी पडल्यानंतर खालच्या बाजुने तेथे भोवरा निर्माण होतो. त्या भोवऱ्यात ही बोट अचानक उलटली. बोटीतील जवान नदीपात्रात पडले. 

           दरम्यान, नदीपात्र पडताच एकच आरडाओरड झाला, बचावासाठी आलेले जवानच घाबरुन गेले आणि  त्यांच्या नाकातोंडात पाणी जाऊ लागले. त्यांना नदीच्या खोलीचा अंदाज आला नाही. त्यामुळे, या टीम मधील एका अधिकाऱ्यासह दोन कॉन्स्टेबल यांचा मृत्यू झाला आहे. तर बाकीचे दोघेजण दवाखान्यात उपचार घेत आहे. तर गणेश मधुकर वाकचौरे (रा. मनोहरपूर, ता.अकोले) व अर्जुन बबन जेडगुले (वय 18,रा. पेमगिरी, ता. संगमनेर) या तरुणाचा शोध अद्याप लागलेला नाही. त्याचे शोध घेण्याचे काम सुरू आहे. तर काल व आज सकाळच्या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असुन दोघे जण बेपत्ता आहे. तर दोघांवर उपचार सुरु आहेत. विशेष म्हणजे बचाव करण्यासाठी आलेल्या जवानांच्या समोर बचाव करणारे जवान बुडत होते. पण, त्यांची देखील फारशी हिंम्मत झाली नाही. या संपुर्ण घटनेने महाराष्ट्र हदरला असून अकोले तालुक्यावर शोककळा पसरली आहे. अशी घटना महाराष्ट्रात फार क्वचित वेळा घडली आहे. त्यामुळे, अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. या घटनेनंतर बाळासाहेब थोरात आणि आमदार डॉ. किरण लहामटे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.

या घटनेची चौकशी केली पाहिजे.!

खरंतर ज्या ठिकाणी चार जणांचा बळी गेला, दोन बेपत्ता आहेत आणि दोघे उपचार घेत आहेत. या ठिकाणापेक्षा कठीण ठिकाणी एसडीआरएफ जवानांनी प्राणाची बाजी लावून कर्तुत्व गाजविले आहे. मात्र, खुद्द निष्णात जवान पाण्यात बुडून मयत होतात ही फार खेदाची बाब आहे. त्यामुळे, खरोखर हे जवान पुर्ण प्रशिक्षित होते का? यांना तेथे ज्यांनी पाठविले त्यांना या जवानांबाबत पुर्ण कल्पना होती का? या जवानांच्या अंगात सुरक्षा जॉकेट होते तरी देखील यांचा प्राण वाचू शकले नाहीत, यांची बोट बुडाल्यानंतर  हे जरा देखील बाहेर कसे येऊ शकले नाहीत? जर यांच्याकडे पोहण्याची कसब नव्हती, यांचे प्रशिक्षण नव्हते, होते तर ते इतक्या सहज बुडून मरतात म्हणजे यांची नियुक्ती खरोखर परदर्शी होती का? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. कारण, निष्णात पोहणारे जवान बुडून मरतात त्यामुळे आपण एखादा बुडत असेल तर मदत करावी का? हा मेसेज समाजात जातो. तर, ज्या जवानांचा जीव गेला त्यांच्या नंतर अन्य अप्रशिक्षित जवान पुन्हा मिशनवर जाऊन ते मृत्युचे बळी ठरु नये याची काळजी घेतली पाहिजे. म्हणून या घटनेची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी अकोल्यातील सुज्ञ नागरिकांनी केली आहे.

मदतीला गेला तो कायमचा गेला.!

दोघे कोठे बुडाले हे दाखविण्यासाठी तेथील एका स्थानिक तरुणास विचारले. जेथे बुडाले ते पाण्यातील घटनास्थळ दाखविण्यासाठी गणेश वाकचौरे हा तरुण बोटीत बसला. मात्र, दुर्दैव असे. की, ती बोट भोवऱ्यात सापडली आणि काही क्षणात पलटी झाली. त्यामुळे, कट्टर पोहणारे देखील हदरुन गेले आणि ते स्वत:चा जीव वाचवू शकले नाही. त्यामुळे, गणेशला वाचविणार कोण? हा मोठा प्रश्न होता. त्यामुळे, मदत करायला गेलेला गणेश भोवऱ्यात गुंतला तो अद्याप बाहेर आला नाही आणि अद्याप सापडलेला नाही. त्यामुळे, त्याच्या कुटुंबाची आर्त हाक आता कोण ऐकणार आहे का? त्यामुळे, मदत करताना देखील आपण पाणि आणि आग्नी यांच्यापुढे जाऊ नये, प्रशिक्षित व्यक्तींनी त्याचा नक्की विचार करावा, मात्र, घटना आणि घटनास्थळाशी अनभिज्ञ असणाऱ्या व्यक्तींनी मदत करताना हजारदा विचार केला पाहिजे.

केटिवेअर शाप की वरदान.!

भांडरदरा ते कळस या दरम्यान अनेक केटिवेअर आहेत. यात आत्तापर्यंत 15 ते 20 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे, हे वरदान की शाप याचे आत्मचिंतन केले पाहिजे. विशेष म्हणजे 6 जण बुडून देखील प्रवरेचा प्रवाह बंद केला नाही. त्यामुळे, अकोल्याचे पाणी आणि खालच्यांची तहाण भागवायला मानसे मेली तरी चालतील पण प्रवाह थांबता कामा नये ही कोणती मानसिकता आहे. जर कालच पाणी बंद केले असते तर आज पाच जण मृत्युच्या खाईत सापडले नसते. त्यामुळे, अकोल्याचे आजी माजी आमदार, नेते आणि चळवळीतील व्यक्तींनी यावर विचार केला पाहिजे. तर, ज्यांनी पाणी बंद केले नाही त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली जात आहे. तर या घटनेत अनेकदा असे लक्षात आले आहे. की, भोवऱ्यात सापडलेला व्यक्ती कधी बाहेर येत नाही. त्यामुळे, निष्णात पोहणाऱ्या व्यक्तींने सांगितले. की, भोवऱ्याच्या किंवा केटिवेअरच्या ठिकाणी व्यक्ती बुडाल्यास त्याने जितका दम असेल तितका दम पाण्यातून वर येण्यापेक्षा खाली तळास जाऊन दगडांच्या माध्यमातून प्रवाहाच्या दिशेेने पुढे गेले पाहिजे. असे झाल्यास वाचण्याचे चान्सेस चांगले असतात. पण, त्यासाठी देखील किमान प्रसंगावधान आणि पोहण्याचा सराव असला पाहिजे. तर, हे केटिवेअर अजून किती जीव घेणार आहे? असा प्रश्न विचारला जात आहे. तसेच हे अवैध व बेकायदेशीर बांधकाम केलेले केटिवेअर नस्ट करावे अशी मागणी केली जात आहे.