अखेर आणखी दोन मृतदेह सापडले, मृतांची संख्या सहावर, दोन बुडाले त्यांनी चार खाल्ले, सुगावला बुडाला, कळसला सापडला.!

 

- सागर शिंदे

सार्वभौम (अकोले) :- 

                        प्रशासनाला उशिरा सुचलेल्या शहाणपणामुळे अकोले तालुक्यातील सुगाव हाद्दीत सुरु आसणाऱ्या मृत्युतांडवला अखेर पुर्णविराम मिळाला आहे. चौघांचे मृतदेह यापुर्वीच मिळून आले होते. तर दोघे अद्याप मिसिंग होते. त्यानंतर आज दि. 24 मे 2024 रोजी सकाळी 7  वाजल्यापासून ठाण्याचे शोध पथक प्रवरा पात्रात उतरले होते. पहिल्या दिवसापासून मिसिंग असलेला जेडगुले व काल बुडालेले वाकचौरे या दोघांचा शोध घेण्यात पथकाला यश आले आहे. मात्र, काल प्रवरेचे रोटेशन बंद केले म्हणून पाणी आटले आणि दोन्ही मृतदेह वर तरंगत असल्याचे दिसले. देशमुख यांचा मृतदेह अगदी काही अंतरावर होता तर जेडगुले हा थेट कळस हाद्दीत मिळून आला आहे. अर्थात पहिल्याच दिवशी प्रवरेचे पाणी बंद केले असते. तर, आज ही वेळ आली नसती. त्यामुळे, पाणी नेणाऱ्यांना अकोल्याच्या लोकांचे काही घेणेदेणे आहे की नाही? तुम्ही मरा नाहीतर जगा फक्त आम्हाला पाणी येऊद्या, पाण्यासोबत तुमचे मडे जरी खाली आले तरी हरकत नाही. पण, पाणी बंद करता कामा नये. हाच संदेश पाणी लुटारुंनी दिल्याचे बोलले जात आहे. दर्दैवाने आज ही वेळ आली उद्या पुन्हा येऊ नये यासाठी उपोयोजना केली पाहिजे.  नेत्यांना पाणी न्यायचे तर नेवूद्या पण आपत्तीच्या काळात तरी पाणी बंद करण्याचा न्याय समन्यायी पाणी वाटप कायद्यात करुन घ्या. अन्यथा मुडदे पडले तरी नेत्यांना काही वाटणार नाही. जीव शेतकरी आणि सामान्य मानसांचे जाणार आहेत.    

दि. 22 मे 2024 रोजी सागर पोपट जेडगुले (वय 25) व अर्जुन रामदास जेडगुले (वय 18) ही दोघे सुगाव व मनोहरपुर परिसरात असणाऱ्या केटी वेअर येथे पोहण्यासाठी गेले होते. तेव्हा ही दोघे पाण्यात बुडाले. त्यानंतर त्यांना काढण्याचे शर्तीचे प्रयत्न झाले. मात्र, यश आले नाही. सायंकाळी या दोघांमधील सागर जेडगुले याचा शोध लावण्यात स्थानिक नागरिकांना यश आले. मात्र, अर्जुन जेडगुलेचा मृतदेह सापडत नव्हता. म्हणून दुसऱ्या दिवशीच SDRF चे जवान सुगावला पाचारण करण्यात आले होते. दि. 23 मे रोजी सकाळी यांनी शोधमोहिम सुरु केली. मात्र, नक्की ही दोघे बुडाली कोठे ? हे निश्चित माहित नव्हते. बाकी लोक बाहेरुन सांगत होते. पण, या पथकासोबत जाण्याची धाडस कोणी करत नव्हते. मात्र, एक धाडसी व्यक्तीमत्व गणेश देशमुख वय 37 यांनी या जवानांसोबत पाण्यातील घटनास्थळ दाखविण्याचे धाडस केले. हे पथक काही काळ अन्यत्र फिरले मात्र त्यांना अर्जुनचा मृतदेह मिळून आला नाही. 

           दरम्यान, जवानांच्या दोन बोटी सैरभैर फिरत होत्या. मात्र, तरी देखील मृतदेह मिळाला नाही. त्यामुळे, केटी वेअरच्या भिंतीहून पाणी पडत होते तेथे गणेश देशमुख यांची बोट गेली. काही क्षणात तेथील भावऱ्याने तिला घेरले आणि बोट व्हायबल होऊ लागली. तेव्हा बोटीतील दोघे पहिल्यांदा खाली पडले आणि ज्या ठिकाणी खोल गर्ता होता त्यात ते सापडले. भिंतीहून येणारा प्रवाह आणि निर्माण झालेला भोवरा यात गणेश वाकचौरे दाबले गेले. बुडाल्या नंतर अगदी काही काळ त्यांनी वर येण्याचा प्रयत्न केला, कारण, प्रचंड पाण्याचा दबाव निर्माण झालेला होता. त्यामुळे, देशमुख यांना खाली दाबले गेले तर जसजशी बोट भिंतीच्या कडेला गेली, तसतसे बोटीत पाणी शिरुन ती दाबली गेली. तोवर बोटीत तिघे होते मात्र तिघेही एकाच बाजुला असल्याने त्याच बाजुवर दबाव निर्माण झाला आणि बोट काही क्षणात उलटी झाली. त्याखाली दोन जवान सापडले. त्यांनी बाहेर येण्याचा प्रयत्न केला. मात्र, वरतून पडणारे पाणी, उलटी पडलेली बोट आणि भोवऱ्यात सापडलेले जवान ही सर्व दुर्दैवी वेळ जुळून आली आणि त्यात तिघांचा अंत झाला.

                           दरम्यान यात पोलीस उपनिक्षक  प्रकाश नाना शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल गोपीचंद पावरा व पोलीस वाहन चालक वैभव सुनील वाघ हे तिघे मयत झाले. तर, कॉन्स्टेबल पंकज पंढरीनाथ पवार व अशोक हिम्मतराव पवार (कॉन्स्टेबल) हे जखमी झाले होते त्यांनंतर या दोघांवर उपचार करण्यात आले. हे दोघेही सुस्थितीत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. मात्र, या दरम्यान, पथकाच्या मदतीला आलेले गणेश देशमुख आणि पहिल्या दिवशी बुडालेला अर्जुन जेडगुले हा अद्याप मिळून आले नव्हते. त्यामुळे, त्यांना शोधण्याचे धाडस कोणीच दाखविले नाही. एव्हढेच काय.! हा प्रसंग घडल्यानंतर पाण्यात पाय देखील टाकण्याची मजाल कोणी करताना दिसले नाही. त्यामुळे, केटी वेअर नदी आणि पाणी याबाबत आता फार मोठी भिती व दहशत निर्माण झाली आहे. खरंतर एकेकाळी दिवसभर मुले नदी नाल्यावर फिरत होती, बिन्धास्त आंघोळी करत होते,कोठे ठाव आहे कोठे नाही, कोठे गेले पाहिजे कोठे नाही हे सर्व माहित होते. सगळा नदिचा शिवार मुलं फिरत होते. नदित आंघोळ्या करुन खडकांवर उन पहाळ्या घेत होते. दुर्दैवाने अनाधिकृत केटी वेअर नद्यांवर स्थिरावले आणि नदिचा ठाव लागेनासा झाला, उनपहाळ्या घेणारे खडक पाण्याखाली गेले. नदिचे पात्र व्यापक झाले, पोहायला गेला म्हणजे मृत्युच्या खायीत गेला हीच संकल्पना रुजू झाली आहे. त्यामुळे, केटी वेअर संदर्भात प्रशासन, गावकरी आणि सरकार यांनी विचार केला पाहिजे.

                  उशिरा सुचलेले शहाणपण...

22 तारखेला दुपारी दोन तरुण पाण्यात बुडाले होते. तेव्हाच प्रशासनाने पाणी बंद करावे अशी विनंती करण्यात आली होती. मात्र, केवळ, नेत्यांच्या ताटाखालची मांजर बनून राहिले म्हणजे बदली होत नाही, पुढे नोकरीत अडचणी निर्माण होत नाही म्हणून कल्याणकरी निर्णय अधिकाऱ्यांना नको वाटतात. केवळ नेते बोले आणि अधिकारी चाले अशा इशाऱ्याची प्रथा नगर जिल्ह्यात पडली आहे. त्यामुळे, 22 तारखेला वाहून गेलेला मुलगा 24 तारखेला पाणी कमी केल्यावर सापडतो. ही दुर्दैवी बाब आहे. विशेष म्हणजे पाणी बंद करण्यासाठी व मृतदेह मिळविण्यासाठी तालुक्यातील नेत्यांना आंदोलन करावे लागते ही फार दुर्दैवी बाब आहे. खरंतर मयत व्यक्तींच्या कुटुंबाने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पाहिजे. की, प्रशासनाच्या हालगर्जी कारभारामुळे चार जणांचा बळी गेला असून यांच्यामुळे मृतदेहाची अवहेलना झाली आहे. अन्यथा न्यायालयात हे प्रकरणे नेल्यास यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊ शकतो. त्यामुळे, नातेवाईक, मित्र किंवा गावकरी यांनी यावर विचार केला पाहिजे. अन्यथा सुगावमध्ये बुडालेला व्यक्ती येणाऱ्या काळात नेवाशात सापडायला जावे लागेल.  अधिकाऱ्यांच्या मनमानी व राजकीय दावण्या तोडण्यासाठी काही तरुण कोर्टात जाण्याच्या तयारीत आहेत. जेव्हा अचानक यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला तर आता नवल वाटण्याचे काहीच कारण नसेल. मात्र, त्या निमित्ताने जुलमी प्रशासनावर अंकुश बसेल हे बाकी नक्की.!!

               सन 2005 च्या कायद्याला धरुन समन्यायी पाणी वाटप कायदा 2013 मध्ये 12 मुद्द्यांनुसार नियम व अटीत अधिक दृढ झाला. त्याचा फायदा अकोल्यापासून खाली नेत्यांनी घेतला. दुर्दैवाने ज्यांच्या हाद्दीत धरण त्यांना प्यायला पाणी नाही, 10 ते 20 एकर शेती असून भाताची लागवड वगळता पिक घेता येत नाही. डोळ्यांनी पाणी दिसतय पण कोरड्या शेताची तहाण भागू शकत नाही. यात समन्याय सरकारला दिसत नाही. पण, आदिवासींच्या जमिनीतून पाणी काढून शेकडो मैल दुर असणाऱ्या जमिनी पिकल्या पाहिजे, त्यांचे घसे कोरडे पडता कामा नये, हे आदिवासीच आणि ते सदन झाले पाहिजे हा कोणता समन्याय? हे मनुवादी मानसिकता असणाऱ्यांना विचारले पाहिजे. या  उन्हाळ्यात आदिवासी भगिनींनी झरे शोधून डोंगर टेकड्या चढून घरात पिण्यासाठी पाणी आणले आहे. तेव्हा घरोघरी नळ देणाऱ्या सरकारला समन्याय सुचत नाही का? भर पावसात उतरत्या छपरांच्या गळक्या घरात राहून जल, जंगल आणि जमिन यांचे संवर्धन आदिवासी बांधव करीत आहेत. त्या प्रत्येकाला बिनशर्त पक्की घरे देण्यासाठी समन्यायी प्रमाण चालत नाही का? असे अनेक प्रश्न आहेत. मात्र, दुर्दैवाने ना येथील खासदाराकडे ना आमदारांकडे आदिवासी विकास प्लॅन आहे ना प्रशासनाकडे. त्यामुळे, हा अन्याय असून त्याचा मोबदला शुन्य आहे. किमान ज्या भागात पाण्याचा स्रोत आहे त्या तालुक्याला डिपीडीसी आणि डोंगरी प्रमाणे अधिक निधीची तरतुद केली पाहिजे. तर, जेव्हा सुगाव सारख्या दुर्घटना घडतील अशा वेळी तरी समन्याय हे गोंडस कायदे बाजुला ठेवून पाण्याचा प्रवाह थांबविला पाहिजे. आता पाणी थांबविले असले तरी हे नेते पुन्हा खाली पाणी पळवून नेणार आहेत, चार ऐवजी दोन नेतो असल्या भ्रामक संकल्पनेतून खाली किती पाणी जाईल याचे कोणतेही प्रमाण नाही. त्यामुळे, हा सर्व भोंगळा कारभार सामान्य जनतेला मान्य नाही. तरी देखील किमान अकोले लुटताना नेत्यांनी थोड्या येथील लोकांच्या भावना जपल्या पाहिजे. जर हाच भावनिक विचार काल केला असता. तर, आज सहा जणांचे बळी गेले नसते.

खरंतर, आपत्ती व्यवस्थापनाची टिम इतक्या तातडीने आली त्यांचे कौतुक करावे तितके कमीच आहे. मात्र, याला फार मोठी प्रोसेस आहे. तरी देखील महसुल प्रशासनाने चांगली तत्परता दर्शविली. मात्र, हीच तत्परता नदीचे पाणी बंद करण्यात का दर्शविली नाही? दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या पथकाचे म्हणणे होते. की, जेव्हा आम्ही घटनास्थळी होतो तेव्हा स्थानिक प्रशासनाचे तेथे कोणीच नव्हते. घटनास्थळ दाखविणे, स्थळाची माहिती देणे, नदिच्या पात्राची माहिती देणे हे स्थानिक प्रशासनाचे काम होते. तर, पथक यायच्या आत वस्तुनिष्ठ माहिती घेऊन त्यांना मार्गदर्शन करणे हे स्थानिक प्रशासनाचे काम होते. त्यांनी त्यांचे काम पार पाडले नाही म्हणून गणेश वाकचौरे आणि अन्य चार जणांचा जीव गेला. याला जबाबदार काेण? तर नक्कीच प्रशासनाचा हालगर्जीपणा असे नागरिकांचे मत आहे. त्यामुळे, ही टिम कोणी व कशी बोलविली, त्यांना स्थानिक प्रशासनाने मदत केली की नाही केली? या बळीचे खापर कोणावर फोडायचे, वास्तव याला जबाबदार कोण? याची सखोल चौकशी करावी. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा. व जिल्हाधिकारी यांनी यात स्पेशल टिमची नेमणूक करुन अहवाल तयार करुन दोषींवर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.