पवार-पिचड एकत्र व्हावे ही जनतेची ईच्छा.! डॉ. लहामटे युतीचे फिक्स उमेदवार, आत्ता पवारांकडे दावेदारी चेहरा नाही. साहेब विचार करा.!
सार्वभौम (अकोले) :-
भाजपाने शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडल्याने त्याचे परिणाम लोकसभेला काय झाले हे देशाने पाहिले. त्यात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याविषयी भावनिक लाट निर्माण होऊन महाविकास आघाडीला ३० जागा मिळाल्या. मात्र, लोकसभेच्या या निवडणुकीमुळे महाराष्ट्राचे गणित फार बदलुन गेले आहे. त्यामुळे, ज्यांनी-ज्यांनी गद्दारी केली त्यांना धडा शिवविण्याच्या पवित्र्यात आता महाराष्ट्र असल्याचे दिसते आहे. त्यामुळे, अनेक ठिकाणी महायुतीला खंडार पडण्याचे चिन्ह असून अकोले तालुक्यात देखील फार मोठ्या राजकीय नाट्यमय घडामोडी घडण्याच्या शक्यता आहे. कारण, २०१९ मध्ये शरद पवार यांना सोडून भाजपात दाखल झालेले पिचड साहेब यांनी पुन्हा २०२४ मध्ये पवार कुटुंबाशी संलग्न होऊन झालेली चुक दुरुस्त करावी. तसे झाल्यास जनता त्यांचा विचार करेल. कारण, पवार गटाकडे अकोल्यात तसाही तुल्यबळ उमेदवार नाही. त्यामुळे, पिचड साहेबांनी पुन्हा घरवापसी करावी अशी चर्चा तालुक्यात सुरू आहे. तर, या तालुक्यातून भाजपाचा उमेदवार निवडून येणे शक्य नाही. त्यामुळे, त्यांनी विचार करावा असे अनेकांचे मत असून त्यांनी त्या दृष्टीने पाऊले उचलल्याचे बोलले जात आहे.
जसा देशाच्या लोकसभेचा निकाल लागला आहे. तेव्हापासून महाराष्ट्र राज्यात ठाकरे आणि पवार हे वादळ विधानसभेत घुसले आहे. मुळात आम्हाला लोकसभा नव्हे तर विधानसभा नेटाने लढवायची आहे असे खुद्द शरद पवार आणि जयंत पाटील म्हणाले आहे. त्यामुळे, लोकसभेत चितपट झालेल्या भाजपाच्या पहिलवानाने उपमुख्यमंत्री पदाचा राजिनामा देण्याची मानसिकता ठेवून मला सराव करायला वेळ द्यावा असे भाजपाच्या वरिष्टांकडे मागणी केली आहे. त्यामुळे, महाराष्ट्रात विधानसभा गाजणार यात तिळमात्र शंका नाही. यावेळी अकोले तालुक्याच्या जागेबाबत मात्र फार चर्चा सुरू आहे. एकेकाळी राष्ट्रवादीचे फाऊंडर मेंबर असणार्या मधुकर पिचड यांनी पवार यांचा हात सोडला आणि तो वचपा काढण्यासाठी २०१९ मध्ये एकास एक करण्यासाठी पवारांनी सर्व विरोधक एकत्र केले. त्यामुळे, झाले काय? की, मतांचे विभाजन टळले आणि पवारांनी टाकलेला डाव यशस्वी झाला. तेव्हा डॉ. लहामटे यांचे सिमित राजकारण विधानसभेतून व्यापक झाले. पण, आता राष्ट्रवादी म्हणजे एकात एक नाही, अन बापात लेक नाही या म्हणीप्रमाणे झाली आहे. त्यामुळे, राष्ट्रवादीतच एकी नाही त्यामुळे, अकोल्यात एकास एक हे स्वप्न देखील कोणी पाहू नये. मग अशात १० ते १५ उमेदवार आमदारकीच्या रिंगणात राहणार यात तिळमात्र शंका नाही.
आता राज्यातील गणित पाहता भाजपा, शिंदे गट आणि दादा गट यांची युती कायम राहील असे वाटते आहे. मात्र, त्यांच्या सोबत ऐनवेळी किती आमदार व नेते राहतील याची खात्री देता येत नाही. यात डॉ. लहामटे हे दादा गटाचे शाश्वत उमेदवार राहतील ही काळ्या दगडावरील रेष आहे. मग वैभव पिचड यांचे काय? तर नक्कीच हा प्रश्न तालुक्याला पडला आहे. म्हणून त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांना वाटते आहे. की, आता खर्या अर्थाने मधुकर पिचड साहेबांनी पुन्हा हा सारीपाठ हाती घेतला पाहिजे. २०१९ साली त्यांची इच्छा नसताना पुत्र प्रेमापोटी त्यांनी पवारांचा हात सोडला. तेव्हा आजारपणात बेडवर असताना देखील ते म्हणत होते आम्ही राष्ट्रवादी सोडणार नाही. मग अचानक महिन्यात त्यांना या राजकीय उलाढालीचा भाग व्हावे लागले असे त्यांचे जवळचे सहकारी सांगतात. आता मात्र, त्यांनी शरद पवार यांच्याशी संपर्क करुन त्यांना साद घातली पाहिजे. कारण, एकनाथ खडसे भाजपामधून आले आणि पुन्हा भाजपात गेले. त्यांना पक्षाने लोटले नाही, उलट खडसे कुटुंबात केंद्रीय मंत्रीपद दिले. भाऊसाहेब वाकचौरे यांना लोक गद्दार म्हणत होते. तर उद्धव ठाकरे म्हणत होते त्यांच्याकडून चुक झाली. त्यांना पक्षात घेतले आणि लोकांनी त्याच वाकचौरे यांना पुन्हा खासदार केले. त्यामुळे, म्हणतात ना...सुबह का भूला जब शाम को घर आ जाऐ तो उसे भूला नाही कहते.!! असे प्रकार राजकारणात चालुच राहतात. त्यामुळे, हिच पिचड साहेबांना नामी संधी आहे. जर, त्यांनी भाजपातून आमदार होण्याचे स्वप्न पाहिले असेल. तर, तह हयात पुर्ण होऊ शकत नाही. असे त्यांचे चाहते मत व्यक्त करीत आहेत.
पवारांकडे प्रबळ उमेदवार नाही.!
अकोले तालुका हा पुरोगामी विचारांचा आहे.(काही नेते सोडून) येथील सामान्य मतदार हे दरी खोर्यातील भोळे भाबडे असले तरी, त्यांना लाचारी, गद्दारी कळते आणि वैचारिक काय हे देखील कळते. त्यामुळे, अनेक वेळा पक्ष पदलणे, टेंपररी राजकारण करणे, केवळ बालिश भाषणे करणे हे असले नेतृत्व लोक मान्य करत नाही. त्यामुळे, शरद पवार यांना जर अकोले टार्गेट करायचे असेल. तर, स्वत:ची व्होटबँक असणारा, शंभर पक्ष न बदलणारा, अवकाळी पावसासारखा वरुन खाली उगवणारा असा उमेदवार चालणार नाही. डॉ. लहामटे यांना तोडीस तोड देणारा उमेदवार द्यावा लागणार आहे. अर्थात ती लढत कदाचित वैभव पिचड आणि लहामटे अशीच असावी असे अनेकांना वाटते आहे. त्यामुळे, जुनी मैत्री कायम झाल्यास या तालुक्यातील अनेकांना आनंद होऊ शकतो. कारण, येथे पवार साहेबांना माननारा फार मोठा वर्ग आहे. त्याच बरोबर पिचड साहेबांना देखील माननारा तितकाच मोठा वर्ग आहे. २०१९ मध्ये प्रचंड विरोधाच्या लाटेत पिचडांनी ५५ हजार मते घेतली होती. अर्थात ती लाट या तालुक्यात पुन्हा कधीच दिसणार नाही. त्यामुळे, असे राजकीय समिकरण झाल्यास टफ फाईट होईल असे अनेकांना वाटते आहे.
उत्कर्षाताई रुपवते यांच्यासारखी चूक नको.!
खासदार व्हायचे होते. पण, योग्य वेळी योग्य निर्णय घेता आला नाही. त्यामुळे, जेथे सहा सात लाख मते घ्यायची तेथे अवघ्या लाखभर मतांवर समाधानी होऊन पराभवाचा सामना करावा लागला. का? तर केवळ पक्ष विचार करेल, माझा नेता मला संधी देईल या भरोशावर त्यांनी राजकीय आत्महत्या करुन घेतली. होय.! केवळ योग्य मार्गदर्शन आणि योग्य वेळी योग्य निर्णय झाला नाही म्हणून रुपवते यांचा पराभव झाला. कदाचित सदाशिव लोखंडे यांनी जुलै मध्ये शिंदे गटात पलायन केल्यानंतर किमान ऑगस्टमध्ये तरी रुपवते यांनी कॉंग्रेस सोडून ठाकरे गटात प्रवेश करायला हवा होता. आज त्यांना ६ लाख मते असती. मात्र, हे राजकीय शहाणपण भाऊसाहेब वाकचौरे यांच्याकडे होते. त्यांनी तत्काळ ऑगस्टमध्ये मातोश्री गाठली. कारण, येथील भावनिक लाट, शिवसेनेचा बालेकिल्ला आणि लोकसभेचे गणित हे त्यांनी ओळखले. आज चार पक्ष बदलुन देखील वाकचौरे खासदार आहेत. का? तर योग्य वेळी योग्य निर्णय घेतला गेला. अशीच वेळ पिचड साहेब यांच्यावर आहे. त्यामुळे, त्यांनी अयोग्यवेळी केलेली चूक आता योग्यवेळी दुरुस्त केली. तर, कदाचित तालुक्याच्या विधानसभेचे गणित वेगळे असू शकते.
भाजपाकडून उमेदवारी मिळणे अशक्य.!
देवेंद्र फडणविस यांनी राष्ट्रवादी फोडल्यामुळे अजित पवार यांच्या गटात डॉ. किरण लहामटे गेले आहेत. त्यांनी तालुक्याला निधी देखील चांगला आणला आहे. अर्थात पुढील व्हिजन लक्षात दादांनी कोट्यावधी निधी अकोल्यास दिला आहे. तर, एक कर्तबगार आणि विद्यमान आमदार म्हणून त्यांना डावलणे अशक्य आहे. त्यामुळे, तुम्ही कामाला लागा असे आदेश देखील आ. लहामटे यांना मिळाले आहेत. त्यामुळे, त्यांनी सोशल मीडियात कामाच्या जाहिरातबाजींचा तडाखा सुरू केेला आहे. एकंदर लहामटे यांची उमेदवारी युती असो किंवा नसो ती फिक्स झाली आहे. त्यामुळे, भाजपाने अन्य उमेदवारांना त्यांचे मार्ग खुले केले आहेत. तुम्ही तुमचे निर्णय घ्या असा देखील सल्ला दिल्याचे समजते आहे. त्यामुळे, आमदार होण्याचे स्वप्न पुर्ण करायचे असेल तर आता हलचाली केल्याशिवाय पर्याय नाही असे दिसते आहे.