हा शिक्षक की नराधम.! गृहपाठाच्या वहीत विद्यार्थीनीला प्रेमपत्र, शरिर सुखाची मागणी आणि बरेच काही.! निलंबन नको, बडतर्फ आणि गुन्हा नोंदवा...
एका शिक्षकाने चक्क आपल्या विद्यार्थीनीस प्रेम पत्र लिहिले आणि त्यात प्रचंड अश्लिल शब्दांचा वापर करुन लग्न आणि त्यातून शरिर संबंधांची देखील मागणी केली. या बहादराने एक- दोन पाने नव्हे तर चक्क सगळी गृहपाठाची वहीच प्रेम व्यक्त करण्यासाठी केली. ही वही शाळेतील काही व्यक्तीच्या हाती लागली आणि नंतर या घटनेवर प्रकाश पडला. त्यानंतर या घटनेची चौकशी झाली आणि संबंधित शिक्षक दोेषी आढळला. त्याचे सीईओ आशिष येरेकर यांनी निलंबित केले आहे. ही घटना कोठे युपी-बिहार येथे घडली नसून खुद्द संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथे घडली आहे. गणपत जानकू सुकटे असे या निलंबित शिक्षकाचे नाव आहे. निलंबनानंतर त्यास जामखेड हे मुख्यालय देण्यात आले आहे. मात्र, त्याचे फक्त निलंबन नको तर त्याला बडतर्फ करुन त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली जात आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी. की, गणपत सुकटे हा पुर्वी अकोले तालुक्यात शिक्षक म्हणून काम करीत होता. मात्र, तेथे देखील तो वादाच्या भोवर्या सापडला होता, त्यामुळे तो संगमनेर तालुक्यातील खंडगाव येथे नेमणुकीस होता. तेथे गेल्यानंतर या गड्याने काही दिवस लवकर शाळेत येणे, पालकांशी संपर्क ठेवणे, आगाऊ तास घेणे, कच्च्या मुलांकडे लक्ष देणे अशी अनेक चांगली कामे करुन पालकांच्या मनावर ताबा निर्माण केला होता. त्यामुळे, त्याला कोणी बोलले तरी सगळे गाव अन्य शिक्षकांच्या विरोधात आणि सुकटे याच्या समर्थनार्थ बोलत होते. त्यामुळे, त्याने जी भावनिक जादू केली होती, त्याचा अन्य शिक्षकांना देखील त्रास होत होता.
दरम्यान, पालकांनी डोक्यावर घेतलेल्या सुकटे याने त्याच्याच वर्गातील मुलीशी नको ते चाळे सुरु केले. गृहपाठाच्या वहीत याने शेरो-शायरी, चोरोळ्या आणि कविता करुन संबंधित विद्यार्थीनिस मोहात पाडण्याचा प्रयत्न केला. यांचे हे प्रकरण इतके पुढे गेले. की, एकाच वहीत हे दोघे एकमेकांसाठी चिठ्ठ्या लिहू लागले. बोलबोल करता यांची वही भरली आणि ती त्याने आपल्या प्रेमाचे प्रतिक म्हणून संभाळुन ठेवली. मात्र, ही आपली विद्यार्थीनी आहे आणि आपण शिक्षक आहोत याचे जरा देखील भान या सुकटेला राहिले नव्हते. त्याने वहीत लिहीलेला मजकूर हा एखाद्या पालकानेच काय.! सामान्य व्यक्तीने देखील वाचला तरी तळपायाची आग मस्तकात जाईल इतकी घाणेरडी भाषा आणि त्या चिमुरडीकडून नको नको तशी अपेक्षा ठेवली आहे. त्यामुळे, असे शिक्षक हे व्यवस्थेला काळीमा असल्याची भावना सोशल मीडिया आणि खांडगाव येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, सुकटे याची ही वही त्याने शाळेत ठेवली होती. जेव्हा ती सहशिक्षकांच्या हाती लागली तेव्हा त्यांनी वरिष्ठ अधिकार्यांकडे जमा केली. त्यातील मजकूर वाचून अधिकार्यांना घाम फुटला होता. एक शिक्षक एका विद्यार्थीनीशी असे वर्तन करु शकतो का? यावर त्यांना देखील शंका आली कारण हे सर्व अविश्वसनीय होते. म्हणून अधिकार्यांच्या मार्फत त्यावर चौकशी नेमण्यात आली. संबंधित सुकटे या शिक्षकाच्या प्रेमाचे बाड अधिकार्यांपुढे ठेवण्यात आले. ज्या गृहपाठाच्या वहीत मुलींचे आयुष्य आणि ज्ञानाची शिदोरी बांधण्याचे काम शिक्षक करतात, त्याच वहीत सुकटे याने आपल्या विद्यार्थीनीशी लग्नाची गाठ आणि शरिर संबंधांची मागणी केली होती. इतके गलिच्छ कृत्य करुन विशेष म्हणजे या गड्याने ते गृहपाठाच्या वहीत जतन करुन ठेवले होते.
निलंबन नको, बडतर्फ व गुन्हा नोंदवा.!
ज्या विद्यार्थीनीसोबत हे कृत्य झाले आहे. त्या मुलीस किंवा पालकांशी संपर्क न करता प्रशासनाने यात अधिक सखोल चौकशी केली पाहिजे. संबंधित मुलगी किंवा पालक यांना त्रास न देता खुद्द मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आदेश देऊन सरकारी फिर्यादी होऊन या प्रकरणात फौजदारी गुन्हा नोंदविला पाहिजे. तसा अधिकार सीईओ यांना आहे. विशेेष म्हणजे मुलगी अल्पवयीन आहे, शिक्षक जबाबदार व्यक्ती आणि त्याच्या विरोधात प्रशासनाकडे सबळ पुरावे आहेत. त्यामुळे, हे प्रकरण म्हणजे म्हतारी मेेल्याचे दु:ख नाही, पण काळ सोकावता कामा नये असे आहे. म्हणून, मुख्य कार्यकारी अधिकारी हे देखील फिर्यादी होऊ शकतात किंवा कोणालातरी आदेश देऊ शकतात. तसे न झाल्यास सामाजिक संघटना, महिला आयोग, चाईल्ड लाईन, नेते मंडळी आणि बाल संरक्षण हक्कासाठी काम करणार्या संस्थांनी यात लक्ष घालुन संबंधित शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यास पुढाकार घेतला पाहिजे. कारण, ही प्रवृत्ती आज ठेचली नाही तर येणारा काळा याहून भयान असणार आहे. त्यामुळे, या शिक्षकांचे केवळ निलंबन नको तर यास बडतर्फ करुन याच्यावर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली जात आहे.
लेकराच्या वयाची विद्यार्थीनी...
शिक्षक म्हटलं की आज देखील अनेक रथी महारथींच्या माना आदराने गुरूंच्या पायाकडे झुकतात. मात्र, सुकटे याच्यासारख्या शिक्षकाकडून विद्यार्थ्यांनी काय आदर्श घ्यावा? आज इथे तर उद्या तिथे ही बदलीची प्रक्रिया असली तरी ती प्रवृत्ती संपणार नाही. कारण, त्या गृहपाठाच्या वहीतील मजकूर वाचल्यानंतर खरोखर एखादा शिक्षक असे लिहू शकतो का? ४५ ते ५० वर्षाचा हा व्यक्ती अन शाळेत शिकणार्या आपल्या लेकराच्या वयाच्या विद्यार्थीनीशी असे चाळे करतो, त्याच्या नावाचे कुंकु तिला भांगेत भरायला लावतो, तिच्याकडून अनेक वेळा शरिर सुखाची मागणी करतो, तिला गरोदर ठेवण्याची भाषा करतो. हा खरोखर शिक्षक आहे का? त्यामुळे, याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.