तीन चिमुरड्या विद्यार्थ्यानींचा शेततळ्यात बुडून मृत्यू, अभ्यास करायला गेल्या अन अनर्थ घडला, पाणी जीव घेतोय सावधान.!

 

सार्वभौम (संगमनेर) :- 

                       संगमनेर तालुक्यातील मेंढवण येथे तीन विद्यार्थीनी पोहण्यासाठी गेले असता त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवार दि.१५ जुन २०२४ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली. यात अनुष्का सोमनाथ बढे (वय १४), सृष्टी उत्तम ढापसे (वय १३),वैष्णवी आण्णा जाधव (वय १२ सर्व रा. मेंढवण ता. संगमनेर) यांचा मृत्यु झाला आहे. ही बाब काही स्थानिक नागरिकांनी पाहिली असता पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.या घटनेने संगमनेर तालुक्यात शोककळा पसरली आहे. 

                याबाबत सविस्तर माहिती अशी की, तीन ही विद्यार्थीनी एकाच गावातील असल्याने त्यांची एकमेकांसोबत ओळख होती. ते एकाच परिसरात राहत असल्याने अभ्यासासाठी खेळायला एकत्र येत. आज १५ जुन असल्याने शाळा सुरू झाली. ते सकाळी शाळेत गेले दुपारी शाळेतुन घरी आले. त्यानंतर ते गावाशेजारी राहणारे सोमनाथ बढे यांच्या घरी खेळण्यासाठी गेले. तेथे घरापासून शंभर मीटर अंतरावर शेततळ्याचे काम सुरू होते. तेथे अर्धवट असणाऱ्या शेततळ्यात पावसाचे पाणी साचलेले होते. काही दिवसांपूर्वी उन्हाळ्याच्या सुट्टी मध्ये एक मुलगी वॉटर पार्क येथे गेली होती. तेथे मोठ्या प्रमाणात एन्जॉय केला होता. त्यामुळे, त्या मुलीने पाण्यात उतरण्याचे धाडस केले. मात्र, हे धाडस अंगलट येईल असे किंचीतही मनात आले नसावे. त्यामुळे, या मुलीच्या पाठोपाठ या दोन्हीही मुली या अपूर्ण असलेल्या तळ्यात उतरल्या. 

           दरम्यान, तिन्ही मुली पाण्यात खेळत होत्या. ते हळूहळू मोठ्या खड्याकडे गेले एका ठिकाणी खोल भागात गेल्यावर पाण्यात बुडायला लागले. जेव्हा नाका तोंडात पाणी जायला सुरवात झाली तेव्हा यांनी गटांगळ्या खाल्ल्या. वाचवा, वाचवा म्हणुन आवाज देखील दिला. मात्र, ठाव न लागल्याने तिघींना पुरेसा श्वास घेता आला नाही. त्यामुळे, तिघांनाही मृत्यूस सामोरे जावा लागले.काही दिवसांपूर्वी गंगामाई घाटावरील घटनेने संपूर्ण तालुका हळहळला. आज पुन्हा ही घटना संगमनेरकरांच्या मनाला चटका लाऊन गेली आहे. ही घटना काही स्थानिक नागरिकांनी पाहिली त्यानंतर पोलिसांनी कळविले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. त्यानंतर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.        

दरम्यान,संगमनेरात वारंवार पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडत आहे. यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. वॉटर पार्कला अनेकजण आनंद घेतात. फोटो काढतात रिल पाहतात. त्यामुळे,नदी किंवा अन्य पाण्याच्या ठिकाणी अनेकजण पोहायला जाताना दिसतात. त्यांच्या सोबत लहान मुले देखील असतात. त्यामुळे, अशा व्यक्तींनी यातून काहीतरी धडा घेतला पाहिजे. कारण, आजकाल मृत्यु इतका स्वस्त झाला आहे. की, कोणत्या क्षणाला व कोणत्या रुपात तो येईल याचा काहीच नियम नाही. त्यामुळे, पालकांनी आपल्या मुलांना पाण्यापासून सावध ठेवले पाहिजे.