लोखंडे म्हटलं तरी लोक तोंड वाकडं करतात, त्यामुळे खरी लढत वाकचौरे आणि वंचितची.! जनमत बाण काळजात घुसणार.!

     

सार्वभौम (संगमनेर) :- 

गेली १० वर्षे संसदेत प्रश्‍न मांडण्याची संधी देऊन सुद्धा हा माणूस ३ हजार ६५० दिवसात एकदा सुद्धा काही लोकांना दिसला नाही. प्रश्‍न तर सोडाच पण सामान्य मानसांच्या सुख दु:खात देखील हा काळा की गोरा हे पाहण्याचे भाग्य शिर्डी लोकसभा मतदार संघातील लोकांना लाभले नाही. मला जनतेचे काहीच घेणेदेणे नाही, फक्त आजी-माजी आमदार आणि नेते संभाळले म्हणजे मी खासदार होतोय अशी धारणा यांची झाली आहे. त्यामुळे, १० वर्षात अदृश्य झालेले सदाशिव लोखंडे यांना मत द्या असे म्हणले तरी मतदार तोंड वाकडे करु लागले आहेत. पहिल्या निवडणुकीत दोन लाखांचे लिड घेणारे लोखंडे दुसर्‍या निवडणुकीत फक्त लाखभर मतांनी निवडून आले आहेत. तर आता त्यांना दुसर्‍या क्रमांकावर राहणे देखील जिकरीचे झाले आहे. त्यामुळे, उद्याच्या निवडणुकीत खरी लढत ही वंचितच्या उत्कर्षा रुपवते आणि उबाठाचे भाऊसाहेब वाकचौरे यांच्यात होणार असल्याची चर्चा सामान्य मतदारांमध्ये आहे.

नेवाशा पासून ते अकोल्यापर्यंत मैदानात उतरुन मतदारांचा कौल घेतला असता तो सदाशिव लोखंडे यांच्यासाठी फार धक्कादायक असल्याचे लक्षात आले आहे. मतदान कोणाला? अशा प्रकारचा प्रश्‍न केला तर एकतर नाव भाऊसाहेब वाकचौरे किंवा उत्कर्षा रुपवते यांचे येते. मग लोखंडे यांनी काय वाईट केले? असा प्रतिप्रश्‍न केल्यास त्यांच्याबाबत प्रचंड रोष असल्याचे दिसून आले. लोखंडे काळे की गोरे हे माहित नसताना त्यांना एकदा नव्हे.! दोनदा निवडून दिले. मात्र, कामे तर सोडाच साधे त्यांचे दर्शन देखील झाले नाही. त्यामुळे, यंदा मतदान केले नाही तरी चालेल. पण, लोखंडेंना द्यायचे नाही असा निर्धार अनेक मतदारांनी केलेला दिसला. तर, मतदान वंचितला करुन वाया गेले तरी हरकत नाही. पण, लोखंडेंचे नाव सुद्धा घेऊ नका. अशा प्रकारची प्रतिक्रीया घोडेगाव, राहुरी, अकोले आणि संगमनेर तालुक्यातील काही भागांतून आली.

खरंतर भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर पर्याय म्हणून उद्धव ठाकरेंनी लोखंडेंना उमेदवारी दिली. पहिल्या १७ दिवसात हा व्यक्ती कोण आहे? तो कसा दिसतो? काय करतो? कुठला आहे? याची जरा देखील कल्पना नसताना जनतेने केवळ शिवसैनिक म्हणून ठाकरे यांच्या शब्दावर १ लाख ९९ हजार मतांच्या फरकाने निवडून दिले होते. मात्र, ज्या पद्धतीने वाकचौरे यांनी काम केले होते, त्यातील १० टक्के सुद्धा काम लोखंडे यांना करता आले नाही. मात्र, तरी देखील २०१९ मध्ये ठाकरे यांनी शेंदुर फासला आणि हाच आपला देव असे छाती ठोकून सांगितले. त्यामुळे, मातोश्रीचा शब्द प्रमाण माणून मतदारांनी पुन्हा १ लाख २० हजारांचे लिड देऊन लोखंडे यांना निवडून दिले. मात्र, झाले काय? खासदाराच्या हाती शेंदुराची वाटी अन महाशय निघुन गेले गुवाहटी.! ठाकरेंनी लावलेल्या शेंदुराचा रंगच गद्दार निघाला. त्यामुळे, आता त्यांना धडा शिकवायचा आहे अशा प्रकारचा रोषात्मक सुर जनतेतून पहायला मिळाला आहे.

खरंतर, भाऊसाहेब वाकचौरे यांना फक्त पाच वर्षे मिळाले होते. त्यांनी शिवसेना सोडली नसती तर ते पर्मनन्ट खासदार राहिले असते. त्यांच्या एका निर्णयामुळे शिर्डी लोकसभा मतदार संघाचे फार मोठे नुकसान झाले आहे. मात्र, उशिरा का होईना त्यांनी मातोश्रीची माफी मागितली आणि आपली चुक सुधारली आहे. जर हेच १० वर्षे भाऊसाहेब वाकचौरे यांना मिळाले असते. तर, त्यांनी लोकसभा मतदारसंघाचा चेहरा बदलुन टाकला असता. मात्र, जे झाले ते आता आपण बदलु शकत नाही. त्यामुळे येणार्‍या पाच वर्षाचे तरी मतदारांनी वाटोळे करु नये अशा प्रकारच्या भावना शिर्डी लोकसभा मतदार संघातील मतदार व्यक्त करत आहेत. तर, एकवेळी वंचित चालेल, वाकचौरे चालतील, मत वाया गेले तरी चालेले. पण आता लोखंडे नको. इतके लोक गद्दारी, अकार्यक्षमता, अदृश्यता आणि नेत्याच्या ताटाखाली मांजर होऊन बसणार्‍या व्यक्तीला कंटाळले आहेत.

यात आणखी एक विशेष बाब म्हणजे, लोखंडे यांनी आजवर जो काही निधी आणला आहे. तो फक्त त्यांच्या आवती भोवती असणार्‍या पांढर्‍या बगळ्यांनाच दिला आहे. याचा उत्तम उदा. म्हणजे अकोेले तालुक्यातील फक्त समशेरपुर गट म्हणजे पुर्ण अकोले तालुका नव्हे. ती कामे देखील निकृष्ठ दर्जाची आहेत. त्याच्याकडील नेते म्हणजे आमचाच माईक आणि आम्ही सांगू तेच आईक.! अशा पद्धतीने टेंडर त्यांनीच भरायचे आणि कामे देखील त्यांनीच करायची, अन्य कोणी काम भरले तर दादागिरी करायची आणि भेटलेच टेंडर तर खंडणी मागायची अशा प्रकारे लोखंडे यांनी काही व्यक्तींनी गब्बर करुन ठेवले आहे. त्यामुळे, अशा प्रकारचे गुंड पोसण्याची टोळी निर्माण करणार्‍या लोखंडे यांना शिर्डी लोकसभा मतदारसंघातून हद्दपार करायचे आशा प्रकारची शपथ ३ लाख ५० हजार मतदारांनी घेतली आहे. याची प्रचिती येत्या ४ जुन रोजी येईल अशी खात्री मतदारांनी दिली आहे. त्यामुळे कर्जतमधून निघालेले पार्सल मुंबईत आपटले आणि आता पुन्हा हे पार्सल मुंबईला पाठवायचे अशा प्रकारचा निर्धार मतदारांनी केलेला दिसतो आहे.

क्रमश:....