लोखंडेंच्या मागे नेते भरपूर पण मतदार नसतील.! अकोल्यातील २०१९ च्या विधानसभेसारखी शिर्डीची लोकसभा होईल.!
सार्वभौम (संगमनेर) :-
शिर्डी मतदार संघात फार मात्तब्बर नेते आहेत. त्यात विखे पाटील यांचे अंतर्गत चालणारे राजकारण हे फार धोकादायक आणि धक्कादायक असते. मात्र, आजकाल संस्थात्मक मतदान सोडले तर मतदार राजा हा कोणाला उलथे करेल हे सांगता येत नाही. त्यामुळे नेत्यांच्या जिवावर सदाशिव लोखंडे यांनी आजवर जे राजकारण केले. ते आता २०२४ मध्ये चालणार नाही. ही काळ्या दगडावरील रेष आहे. खरंतर आजकाल मतदार दोन प्रकारच्या मानसिकतेचे झाले आहेत. एक कर्तुत्व बघणारे आणि दुसरे अकार्यक्षम उमेदवाराच्या ठिकाणी परिवर्तन घडविणारे. म्हणून तर बाळासाहेब थोरात आणि विखे यांच्या कर्तुत्वामुळे त्यांच्या कुटुंबाला पराभव माहित नाही. मात्र, अन्य ठिकाणी खांदे पालट सुरूच आहे. तसेच यंदा शिर्डी लोकसभेत खांदेपालट होण्याची शंभर टक्के खात्री दिसू लागली आहे. खरंतर सदाशिव लोखंडे यांचा गोड गैरसमज आहे. की, लहामटे, पिचड, काळे, कोल्हे, विखे हे मला सहज निवडून आणतील. मात्र, आता नेत्यांच्या मागे सामान्य जनता राहिली नाही, लोकसभेला तर नाहीच नाही. जसे अकोले विधानसभेत २०१९ साली सर्व नेते एका बाजुला आणि मतदार एका बाजुला होते. अखेर निवडणुक जनतेने हाती घेतली आणि पर्यायी चेहरा म्हणून डॉ. लहामटे यांचा ऐतिहासिक विजय झाला. तशीच शिर्डीची निवडणुक होणार आहे. सदाशिव लोखंडे यांच्या मागे अनेक नेते असतील. मात्र, जनता त्यांचा कौल भाऊसाहेब वाकचौरे किंवा उत्कर्षा रुपवते यांच्या बाजुने देताना दिसेल अशा प्रकारचे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे.
अकोल्याची विधानसभा व शिर्डीची लोकसभा.!
सन २०१९ मध्ये पिचड साहेबांनी पक्षबदल केल्याचा प्रचंड रोष जनतेच्या मनात होता. त्यामुळे, जनता पर्यायी चेहरा शोधत होती. त्याच वेळी डॉ. लहामटे उभे राहिले आणि मोठ्या मताधिक्याने निवडून आले. तेव्हा तालुक्यातील सर्वच मातब्बर नेते पिचड साहेबांच्या सोबत होते. मात्र, जनतेची सुप्त लाट नेत्यांच्या आणि पक्षबदलाच्या विरोधात होती. तरी देखील पिचड साहेबांचे उताविळ कार्यकर्ते म्हणत होते साहेब दिड लाख मतांनी येतील. दुर्दैवाने साहेब दिड लाख मतांनी पडले. शिर्डी लोकसभेत देखील असेच चित्र होण्याची शक्यता आहे. लोखंडे यांच्या बाजुने मुख्यमंत्री, पालकमंत्री, मंत्री, आमदार, माजी आमदार फार मोठा फौजफाटा दिसतो आहे. मात्र, वास्तवत: १० वर्षे अकार्यक्षम राहिल्याने जनता त्यांच्या विरोधात दिसत आहे. नेत्यांनी कितीही घसे फाडले आणि कितीही मलिदा वाटला तरी मतदारांची मानसिकता दिसत नाही. त्यामुळे, जसा बदल अकोले विधानसभेत झाला. तसा लोकसभेत पक्षबदल आणि अकार्यक्षमतेचा फटका लोखंडे यांना बसणार असून खांदेपालट होणार ही अटळ गोष्ट आहे.
लोखंडे शेवट पर्यंत हवेत राहतील.!
अकोल्यातून पिचड साहेब आणि डॉ. लहामटे, शिर्डीतून विखे पा. कोपरगावातून काळे व कोल्हे नेवाशातून लंघे आणि मुरकुटे अशी नेत्यांची फार मोठी यादी आहे. यांच्या भरोशावर लोखंडे हवेत राहिले आहे. २०१९ मध्ये बुथ निहाय काम झाले. तरी लाखभर मते कमी पडली. आता मात्र तसे होताना दिसणार नाही. या नेत्यांच्या मागे दलित नेते जातील मात्र, जनता जाणार नाही. या नेत्यांच्या मागे पुढारी जातील. मात्र, मतदार जाणार नाहीत. त्यामुळे, तीन ते चार लाखांची जी गोळाबेरीज लोखंडे करीत आहेत. त्यातील दोन अडिच लाख मतांची तफावत पडणार आहे. त्यामुळे, नेत्यांच्या भरवशावर लोखंडे हे शेवटपर्यंत हवेत राहणार आहेत. आणि हा गाफील राहिल्याचा तोटा त्यांना कधीच भरून काढता येणार नाही.
विखे पा. हात वर करुन घेणार.!
सदाशिव लोखंडे आणि रामदास आठवले यांना तिकीट देऊ नका. त्यांच्यासाठी शिर्डी मतदार संघात पोषक वातावरण नाही अशा प्रकारची सुचना विखे यांनी केल्याचे बोलले जात आहे. खुद्द आठवले यांनी देखील पुण्यात यास दुजोरा दिला. त्यामुळे, लोखंडे यांना पराभवाला सामोरे जावे लागल्यास त्यात विखे पाटलांचा काही एक दोष असणार नाही. तसेही ते डॉ. सुजय विखे यांच्या प्रचारात व्यस्त आहेत. त्यामुळे, घरचं सोडून दारच्यासाठी ते जीव काढण्यात स्वारस्य दाखविणार नाही. मात्र, पराभवानंतर ते हात वर करुन घेतील. यात तिळमात्र शंका नाही. पुर्वी लोणीची यंत्रणा लोखंडेंसाठी कार्यरत होती. मात्र, एकसोबत निवडणुक आल्याने लोखंडे पुर्णत: उघडे पडले असून त्यांच्यावर भाजपा व राष्ट्रवादी यांच्या आयत्या बुथ कमिट्या घेण्याची वेळ आली आहे. तर शिंदे गटाचे संघटन आणि बुथ कमिट्या हे कशातच काही नाही. भाजपा, राष्ट्रवादी आणि रिपाई या नेत्यांच्या पाया पडून निवडणुक पार पाडण्याची वेळ लोखंडे यांच्यावर आली आहे. मात्र, यात विखे हे महत्वाचा दुवा आहेत. ते राज्याचे नेते लोखंडेंच्या प्रचारासाठी आले की त्यांच्या सुरात सर मिसळताना स्टेजवर दिसतात. वास्तवत: दक्षिण काबिज करणे हेच त्यांचे लक्ष असून शिर्डीचा उमेदवार त्यांच्यासाठी अदखलपात्र असल्याचे बोलले जात आहे. लोखंडे यांचा पराभव हा निश्चित मानला जाऊ लागल्याने येणार्या काळात विखे पा. शंभर टक्के म्हणतील. मी सांगत होतो लोखंडे यांच्यासाठी शिर्डीत वातावरण पोषक नाही. तरी देखील तुम्ही हा उमेदवार लादला. त्यामुळे, मी काहीच करु शकत नाही.
नेत्यांच्या मागे मतदार नाहीत...
देशात आणि राज्यातील गलिच्छ राजकारण पाहिले तर भारतातील प्रत्येक मतदार या राजकारण्यांना वैतागला आहे. जिकडे खोके तिकडे हे डोके. त्यामुळे, मतदारांचा नेत्यांवर विश्वास राहिला नाही. आजकाल जे सामान्य मतदार आहेत ते खर्या अर्थाने लोकशाही जिवंत ठेवण्याचे काम करीत आहे. जे सस्थात्मक मतदार आहेत. त्यांची नोकरी धोक्यात येऊ नये म्हणून ते गुलाम मतदार होऊन बसले आहेत. म्हणून नेत्यांची दादागिरी आणि वजन वाढते राहिले आहे. मात्र, तरी देखील सामान्य मतदारात इतकी ताकद आहे. की तो शंभर टक्के परिवर्तन घडवून आणू शकतो. आजकाल आमदार यांना देखील मतदार सांगतात. साहेब तुम्ही तुमच्या विधानसभेपुरते बोला. लोकसभेला आम्ही काय करावे ते तुम्ही आम्हाला सांगू नको आणि आमच्यावर लादू नका. म्हणून तर शिर्डी लोकसभा मतदार संघात एकेकाळी कॉंग्रेसचे प्राबल्य आणि एकही आमदार शिवसेनेचा नसताना शिर्डीतून आजाही शिवसेनेचा खासदार निवडून जातो. ही खर्या अर्थाने सामान्य मतदारांची ताकद आहे. तर, विशेष म्हणजे संगमनेर हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला असून देखील येथे कॉंग्रेसच्या उमेदवाराला ७ हजार मतांचे लिड कमी होते. त्यामुळे, नेत्यांच्या आणि पुढार्यांच्या मागे मतदार नाहीत हे शाश्वत उदा. आहे. त्यामुळे, यांदा मतदारांनी ठरविले आहे. लोखंडे नकोच. त्यामुळे, नेत्यांच्या जीवावर संसदेत जाण्याचे दिवास्वप्न पाहणार्या लोखंडे यांचा भ्रमनिराश होणार हे नक्की.!